Kamini Traval - 1 in Marathi Short Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | कामीनी ट्रॅव्हल - भाग १

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

कामीनी ट्रॅव्हल - भाग १

कामीनी ट्रॅव्हल्स भाग १ला.","कामीनी ट्रॅव्हल्स...भाग १ ला

हाॅल गच्च भरला होता. यावर्षी लागोपाठ तिस-यांदा कामीनी ट्रॅव्हल्सला उत्तम कामगिरीबद्दल पुरस्कार मिळाला होता. कामीनी ट्रॅव्हल्सचा सर्वेसर्वा होता हर्षवर्धन पटवर्धन. फार कमी दिवसांत हर्षवर्धननी आणि कामीनी ट्रॅव्हल्सनी आपले पाय ट्रॅव्हल्स च्या क्षेत्रात मजबूतपणे रोवले होते.

सतत तीन वर्ष हा पुरस्कार पटकावून हर्षवर्धनने हॅट्रीक साधली होती. म्हणून या वर्षी कामीनी ट्रॅव्हल्सच्या दृष्टीनी कार्यक्रमाला चार चांद लागले होते. कामीनी ट्रॅव्हल्सच्या सगळ्या लोकांसाठी हा दिवस खूप आनंदाचा होता.

ट्रॅव्हल्सच्या या क्षेत्रात खूपच स्पर्धा होती. प्रत्येकजण प्रवाश्यांना आकर्षित करण्यासाठी काही न काही आकर्षक गोष्टी प्रवासात ठेवतात. कामीनी ट्रॅव्हल्स सुरु झाली ती एका टूरनी आणि सहा कर्मचा-यांच्या साथीने. सुरवातीला या प्रवासात हर्षवर्धन, प्राची आणि कामीनी बाई तिघही असतं. या पहिल्या टूरमध्ये प्रवासी होते फक्त पंधरा आणि प्रवासही खूप लांबचा नव्हता.

या पहिल्याच प्रवासात या तिघांनी आणि सहा कर्मचा-यांनी प्रवाशांची खूप काळजी घेतली. त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी घेतली. पथ्य असणा-या दोन वृद्ध जोडप्यांची विचारपूस आणि काळजी खूद्द कामीनी बाईंनी घेतली. याच जोडप्यांनी पुढच्या प्रवासासाठी आपल्या ओळखीचे आपल्या वयाचे प्रवासी मिळवून दिले. ही दुसरी टूरही लांब पल्ल्याची नव्हती. यातही प्रवाशांची खूप काळजी घेतल्या गेली.

हळुहळू कामीनी ट्रॅव्हल्स वरचा प्रवाशांचा विश्वास वाढला. तशी त्यांची संख्याही वाढली. चार-पाच टूरनंतर पहिली लांबपल्याची टूर कामीनी ट्रॅव्हल्सनी हाती घेतली. पूर्ण नियोजन करून ही टूर आखली होती. आता त्यांच्याकडे कर्मचारी वाढले होते. ऑफीसमध्ये चारजण होते. जे टूरचं बुकींग करणं, प्रवाशांना कुठे जाणार आहे, त्यांना काय दाखवणार आहे, याची माहिती देत असत. प्रवासात दोन टुरीस्ट गाईड होते. दोन आचारी होते. अजून प्रवाशांना मोठ्या हाॅटेलमध्ये राह्यला ठेवण्याची ऐपत कामीनी ट्रॅव्हल्सची नव्हती.

झोपण्यापुरतं छोटं हाॅटेल ते बुक करत. नाश्ता जेवण कामीनी ट्रॅव्हल्सचे आचारी बनवत. हळुहळू प्रवाशांनी तोंडोतोंडी केलेल्या जाहीराती मुळेच कामीनी ट्रॅव्हल्सकडे येणारे प्रवासी वाढले. पहिल्या प्रवासातील काही प्रवासी अजूनही कामीनी ट्रॅव्हल्स बरोबर आहेत.कामीनी ट्रॅव्हल्स बरोबर येणारे प्रवासी समाधानानी आणि प्रवासाचा मनसोक्त आनंद घेऊन आपल्या घरी परत जात असत. यामुळे कामीनी ट्रॅव्हल्सला प्रवाशांना आपल्याकडे आणण्यासाठी काही आमीषं दाखवायची वेळ आली नाही.

इतक्या कमी वेळात एवढी मोठी झेप घेतांना कामीनी ट्रॅव्हल्सच्या बरोबर हर्षवर्धन, प्राची आणि कामीनी बाई होत्याच पण त्यांचा कर्मचारी वर्गही बरोबर होता. हे सगळे आत्यंतिक तळमळीनी काम करत. आपली जबाबदारी पार पाडत. प्रत्येकाच्या बोलण्याची पद्धत नम्र होती म्हणूनही प्रवासी खूष होत.

हर्षवर्धनच्या चेह-यावर आलेली तकाकी ही त्यांच्या यशाची गाथा सांगणारी होती. त्याच्या चेह-यावरची ही तकाकी बघून कामीनी बाईंच्या म्हणजेच हर्षवर्धनच्या आईचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले. अशीच अवस्था प्राचीची म्हणजे हर्षवर्धनच्या बायकोची पण झाली होती. प्राचीनी हळूच कामीनीबाईंच्या हातावर थोपटलं.

कामीनीबाई थरथरत्या आवाजात बोलल्या,

" प्राची हे तुझ्यामुळे शक्य झालं. तुझे प्रयत्न सफल झाले. नाहीतर माहित नाही आज हर्षवर्धन कुठे असता.?" बोलतानाही त्यांना रडू फुटलं.

" आई आजच्या आनंदाच्या दिवशी असं नका म्हणू. फक्त मीच प्रयत्नं केले नाहीत तुमचाही तेवढाच वाटा आहे. तुमच्या मदतीशिवाय मी एवढं मोठं पाऊल उचलू शकले नसते. बघताय नं हर्षवर्धनचा चेहरा आनंदानी किती फुलला आहे. दुस-यांशी बोलताना त्याचा चेहरा बघा किती आत्मविश्वासानी भरला आहे."

" हो.खरच आजचा दिवस माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा आणि आनंदाचा आहे."

पुढे कामीनीबाई बोलूच शकल्या नाहीत.

थोड्या वेळानी कार्यक्रम सुरू झाला. काहींनी ट्रॅव्हल्सचा आत्तापर्यंतचा प्रवास सांगण्यात आला. त्यानंतर मुख्य पाव्हण्यांच्या हस्ते हर्षवर्धनला पुरस्कार देण्यात आला.तेव्हा हर्षवर्धन पाहुण्यांना म्हणाला

" माझ्या यशात माझ्याबरोबर तितकाच वाटा असणा-या माझ्या आई आणि पत्नीला मी स्टेजवर बोलवू शकतो का? हां पुरस्कार मला त्यांच्यासह स्विकारायचा आहे."

"हो नक्कीच"
पाहुणे म्हणाले. संयोजकांनी लगेच सूत्रसंचालन करणा-या व्यक्तीला प्राची आणि कामीनी बाईंना स्टेजवर आमंत्रीत करण्याविषयी सांगीतलं.

सूत्रसंचालन करणा-याने दोघींचं नाव घेऊन त्यांना स्टेजवर येण्याची विनंती केली तेव्हा दोघी चकीत झाल्या. पण त्या विनंतीला मान देऊन दोघी स्टेजवर गेल्या.तो पुरस्कार तिघांनी मिळून घेतला.धडाधड आजूबाजूच्या कॅमेरांचे फ्लॅश चमकले.

त्या ऊजेडानी कामीनीबाई क्षणभर दचकल्या. कारण अशी गोष्टं त्यांच्या आयुष्यात कधीच आली नव्हती. त्यांच्या मनात चटकन आलं एवढ्या वर्षांत एवढं कौतुक कधीच बघीतलं नव्हतं आपण. सतत अवहेलनाच सहन केली. वारंवार अपमान करणारं कोण होतं तर प्रत्यक्ष आपला नवराच.

या कॅमेऱ्याच्या लखलखाटाला आपण पात्र आहोत का? आपल्या मुलामुळे हर्षवर्धनमुळे आज हा लखलखाट आपण बघीतला. या लखलखाटाची झींग चढायला लागली आहे आपल्या मनावर. झिंगणं हे आपण नेहमी दारुशीसंबंधीत ऐकलं होतं. अशीही झिंग येऊ शकते हे कधी माहित नव्हतं पण आज अनुभवलं. त्यांनी मनोमन आपल्या मुलाचे आभार मानले. त्याच्यामुळे हा क्षण त्यांच्या आयुष्यात आला होता.

सुखाशी आपलं जन्मत:च वैर होतं बहुदा. आपण लहान असतानाच आई गेली.नंतर काही दिवसांनी आपल्या वडिलांनी आपल्याला नवीन आई आणली.ती दुष्ट नव्हती पण तिची हौसमौज होत नव्हती कारण मी लहान होते.त्यातच आपल्याला तीन भावंडे झाली.नंतर मोठी बहिण म्हणून आपलं सुखाशी नातं संपलं.आपण उरलो एक बिनपगारी हमाल म्हणून.

ज्याच्या बरोबर आपण सप्तपदी चाललो तो तर आयुष्यभर वेगळाच वागला. आपल्याला सहधर्मचारीणी त्यांनी कधी मानलीच नाही. सतत पैसा आणि सेक्स हेच आयुष्यात महत्वाचं मानलं.

आज मन सुखाच्या सागरात पोहतय पण कुठेतरी हूरहूरही वाटतेय. हे क्षणिक सूख नसेल नं. तेव्हाच प्राचीनी त्यांना हलवून तंद्रीतून बाहेर काढलं.

"आई आपण खाली ऊतरायचय. चलता नं."

"हो"
कामीनी बाई कसंबसं बोलल्या. दोघी खाली उतरून जागेवर जाऊन बसल्या. नंतरचा कार्यक्रम पुढे सुरू झाला.

मघाशी स्टेजवर असताना कामीनी बाईंच्या मनात जे विचार येत होते ते पुन्हा येऊ लागले. त्या स्वतःशीच पण मनात बोलत होत्या. आपल्याला कधी वाटलच नव्हतं की हर्षवर्धन एवढा मोठा व्यावसायिक होईल. शिक्षण पूर्ण होईपर्यंत हर्षवर्धन तसा ठीक होता पण नंतर मात्र सगळंच बिघडलं. यांचा स्वभाव फार विचीत्र त्यामुळे हर्षवर्धन घरी फार थांबयचाच नाही. आपल्या वडलांच्या वा-यालाही तो उभा राहत नसे. त्यांना काहीच फरक पडत नव्हता या गोष्टींनी

ते फक्त स्वतःचे होते. स्वत:च्या इच्छा फक्त त्यांना महत्वाच्या वाटायच्या. आपल्याशी तर कधी प्रेमाचे चार शब्द बोलले नाहीत. वेश्येकडे जायची हिम्मत नव्हती म्हणून आपल्याकडून ती गरज भागवून घ्यायचे. त्यातही त्यांचीच दडपशाही चालायची.

आपलं मन त्यांना बघून कधी मोहरलच नाही. कारण पहिल्याच रात्री आपल्या मनाला फुटत असणारा मोहोर त्यांनी आपल्या दडपशाही वृत्तीनं पार भुईसपाट करून टाकला होता.

आपल्यासमोर आपल्या मुलाचं भविष्य अंधारात चाललं होतं पण आपण काही करू शकलो नाही. सतत त्याची चिंता आपलं मन पोखरायची पण काय करणार आणि कसं करणार ते कळत नव्हतं.

आपल्या माहेरी बेतासबात परीस्थिती. त्यात सावत्र आई.तशी ती खूप वाईट नव्हती पण परीस्थितीनं तिला गांजवलं होतं. ती तरी काय करणार! आपले वडील खूप मोठ्या पगारावर नोकरी करत नव्हते. एका कंपनीत साधे चपराशी होते. स्वभावाने गरीब.त्याचा फायदा इतरांनी खूप घेतला.पण आपल्या वडिलांनी कधी तक्रार केली नाही कोणाबद्दल. म्हणायचे पांडूरंग सगळं बघतोय.तो करेल सगळं ठीक.

आपल्या मुलांच्या भविष्यापुढे तिला आपला अडसर नको होता. तिचं तरी काय चुकलं. तिनी तिच्या मुलांचं भविष्य बघीतलं. म्हणून फार विचार न करता पैसेवाला जावई मिळाला याच आनंदात आपलं लग्नं यांच्याशी लावून दिलं.

आपल्या वडलांना हे फारसं पटलं नाही. पण त्यांचं कोणी ऐकलं नाही. आपली सावत्र आई लग्नं होऊन आपल्या घरी आली तेव्हा आपण खूप लहान होतो. तिनी आईचं प्रेम आपल्याला दिलं नाही पण दुष्टपणाही केला नाही. काम खूप करून घ्यायची पण पोटभर जेवायला द्यायची. हेच आपल्या नशीबी आलेलं खूप मोठं सूख होतं.

यांना फार देखणी हुशार बायको नकोच होती. हवी होती एक स्वयंपाकीण, एक घरासाठी केअरटेकर, आणि इच्छा झाली की ती पूर्ण करण्यासाठी एक बाई. आपण अशा तीन रूपात वाटलो गेलो. भावांच्या शिक्षणाचा खर्च हेच बघणार होते. एकंदरीत त्या खर्चाच्या बदल्यात यांनी आपल्याला विकत घेतलं होतं असं म्हटलं तरी चालेल. खरेदी केलेल्या वस्तूंवर जसा त्या विकत घेणा-याचा हक्क असतो तसाच आपल्यावरही यांचा हक्क होता.

समोर स्टेजवर काय चाललं होतं, कोण काय बोलतो होतं हे काहीही कामीनी बाईंच्या कानापर्यंत पोहचत नव्हतं. त्या आपल्याच विचारात होत्या.

आपल्याला कुठलीही आवड निवड सांगण्याचा अधिकार नव्हता. कसा असेल?आपलं यांच्याशी लग्नं झालं म्हणून यांची बायको झालो पण बायकोचा दर्जा त्यांनी आपल्याला कधी दिलाच नाही. नातेवाईक असे फार नव्हतेच. यांच्या स्वभावामुळे सगळे यांच्यापासून दूर राहत.

कसला माज होता यांना एवढा? संपत्तीचाच माज होता. संपत्तीतर मोजता येणार नाही इतकी होती. शेती भरपुर होती. त्याचं उत्पन्न होतं. घरं बांधण्याच्या व्यवसायात यांनी हुशारीनी पैसा लावला, पार्टनर धूर्तपणे निवडले. नशीब नेहमी यांच्याबरोबर असायचं त्यामुळे जिथे हात टाकतील तिथून पैसाच यायचा.

हां एवढा पैसा असून आपण अजूनपर्यंत हजार रूपये किती आणि कसे असतात ते बघीतले नाही. इथे यांनी दाखवले नाही आणि माहेरी श़भर रूपयाचीच नोट कधीकधी बघायला मिळायची. आपलं आयुष्यं कसं कसं वळण घेत इथपर्यंत आलं हे त्यांनाच माहिती.नव-याचा स्वभाव पटत नव्हता तरी घटस्फोट घेता येत नव्हता.

घटस्फोट घेऊन राहणार कुठे? आपण घटस्फोट घेतल्यावर आपल्या भाऊ बहिणींच्या आयुष्याची वाट लागली असती.ती आपण सहन करू शकलो नसतो. इथं या सोन्याच्या पिंज-यात आपण राहत होतो म्हणून आपल्या माहेरी चार घास सुखाचे खाऊ शकतात आहे. आता त्यांना कुठल्या अन्नछत्रात जावं लागतं नाही जेवायला.

कामीनी बाई आपल्याच विचारात होत्या तशी प्राचीही आपल्याच विचारात होती. कार्यक्रम चालूच होता प्राचीचं मन मात्र भूतकाळात गेलं. लग्नाआधीचा भूतकाळ की लग्नानंतर च्या काही वर्षातील आठवणी. त्यांच्या लग्नाला सहा वर्ष झालीत. काय होता प्राचीचा भूतकाळ? किंवा लग्नानंतर काही वर्षातील आठवणी ज्याला आता भूतकाळ म्हणू शकतो. प्राचीला इतक्या आनंदाच्या क्षणी भूतकाळ का आठवला? काय होतं त्या भूतकाळाच्या पोटात? आनंदावर विरजण घातल्या सारखा तो भूतकाळ का तिला आठवला. हे तर प्राचीच सांगू शकते.

प्राचीचा चेहरा आत्ता कोणीही बघीतला असता तरी सहज तो अंदाज बांधू शकला असता की काहीतरी तिला दुखतंय.या आनंदाच्या क्षणी नको असतांनाच काहीतरी वाईट गोष्ट तिला आठवते आहे.काय आठवतं असेल तिला ? असं काय घडलं असेल लग्नानंतर किंवा लग्नाच्या आधी.

प्राचीचा दुखरा कोपरा काय होता.कसलं इतकं दु:खं होतं तिला. आजचा दिवस कामीनी ट्रॅव्हल्स साठी खूप आनंदाचा होता.त्या आनंदाच्या झुल्यावर झुलण्याऐवजी दु:खं का उगाळत बसली आहे.

प्राचीच नाही तर कामीनी बाईंची पण अशीच मन:स्थिती होती. या दोघींच्या मनातल्या विचारांच्या वादळाची कार्यक्रमात सहभागी झालेल्या हर्षवर्धनला काहीही कल्पना नव्हती.तो इतर लोकांशी बोलताना मधून मधून आई आणि प्राचीकडे बघायचा तर त्याला त्या दोघी. शांत बसलेल्या दिसत होत्या.

त्यालाही कोडं पडलं होतं की एवढ्या आनंदाच्या क्षणी या दोघींचे चेहरे इतके निर्विकार का आहेत.या दिवसाची या दोघी किती वाट बघत होत्या.आपल्याला हा पुरस्कार तिस-यांदा मिळाला त्यामागे या दोघींचे किती परीश्रम आहेत.तरी या अश्या निर्विकार का बसल्या आहेत?

हर्षवर्धन दोघींजवळ येऊन म्हणाला,

" कसल्या विचारात आहात तुम्ही दोघी?"

दोघींची तंद्री त्यांच्या आवाजानी तुटली.दोघी काहीच बोलल्या नाहीत.डोळ्यातले अश्रू हळूच पुसले.कामीनी बाईंनी हर्षवर्धनच्या डोक्यावर मायेनी हात फिरवला.

"खूप यश मिळवलस.माझे डोळे धन्य झाले तुझा सत्कार बघून.असाच यशस्वी हो."

" हर्षवर्धन आत्ता आई आणि माझ्या भावना एकच आहेत.तुला खूप शुभेच्छा."
प्राची पुढं बोलू शकली नाही.हर्षवर्धनने दोघींचे हातात घेतले आणि आनंदानी हसला.
-----------------------------------------------------------
क्रमश: --- कामीनी बाई खूप आनंदात आहेत बघूया पुढे काय होईल!

लेखिका….मीनाक्षी वैद्य.