Kamini Traval - 3 in Marathi Short Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | कामीनी ट्रॅव्हल - भाग ३

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 52

    નિતુ : ૫૨ (ધ ગેમ ઇજ ઓન)નિતુ અને કરુણા બંને મળેલા છે કે નહિ એ...

  • ભીતરમન - 57

    પૂજાની વાત સાંભળીને ત્યાં ઉપસ્થિત બધા જ લોકોએ તાળીઓના ગગડાટથ...

  • વિશ્વની ઉત્તમ પ્રેતકથાઓ

    બ્રિટનના એક ગ્રાઉન્ડમાં પ્રતિવર્ષ મૃત સૈનિકો પ્રેત રૂપે પ્રક...

  • ઈર્ષા

    ईर्ष्यी   घृणि  न  संतुष्टः  क्रोधिनो  नित्यशङ्कितः  | परभाग...

  • સિટાડેલ : હની બની

    સિટાડેલ : હની બની- રાકેશ ઠક્કર         નિર્દેશક રાજ એન્ડ ડિક...

Categories
Share

कामीनी ट्रॅव्हल - भाग ३

कामीनी ट्रॅव्हल भाग ३

मागील भागात आपण बघीतले की हर्षवर्धन आणि कामीनी बाईंचा गंभीर चेहरा बघून प्राचीनता खूप प्रश्न पडतात. तिला त्या प्रश्नांची उत्तरं मिळतील का? बघू या भागात.


कामीनी ट्रॅव्हल्स भाग ३रा
मागील भागावरून पुढे…

सकाळी प्राचीला जाग आली. पण अंथरूणातून तिला ऊठावसं वाटतं नव्हतं. आपलं डोकं खूप जड झालंय हे तिच्या लक्षात आलं. कालचा सगळा प्रसंग आठवल्यावर पुन्हा तिची चीडचीड सुरू झाली. तिला वाटायला लागलं कुठून त्या शरूच्या लग्नात या माणसानी आपल्याला बघीतलं. तो मुलगा पण कसला नेभळट.प्राचीच्या लक्षात आलं की आपल्या आईबाबांना हे स्थळ पटलंय.आपल ऐकतील याची तिला खात्री वाटत नव्हती.

आपल्या खोलीबाहेर येताच तिला समोरच्या खोलीत आई-बाबा चर्चा करताहेत असं दिसलं.तिला बघताच अशोक म्हणाले " या राजकुमारी. शुभसकाळ" " बाबा हे काय नवीन?" " अगं तुला गुडमाॅर्निंग म्हणतोय. रोज इंग्लीश मध्ये म्हणतो आज मराठीत म्हटलं एवढंच." आणि स्वतःच हसले. "यात काय हसण्यासारखं झालं?" प्राची हे मनातच बोलली. तिच्या लक्षात आलं बाबा आता आनंदाने कशावरही हसतील. कारण श्रीमंत जावई मिळणार होता त्याचा आनंद होता.


प्राची अनिच्छेनी टेबलसमोर येऊन बसली. वासंती नी तिच्यासमोर चहा आणि बिस्कीट आणून ठेवली. कितीतरी वेळ प्राची चहाच्या कपाकडे बघत बसली. तिला तंद्रीतून बाहेर काढत वासंती म्हणाली " प्राची तुझं लक्ष कुठे आहे.केव्हाची चहाच्या कपाकडेच बघत बसली आहेस." प्राचीच्या कानाशीच वासंती बोलल्यामुळे प्राचीची तंद्रीत भंगली. " अगं… घेते न चहा." " प्राची बेटा तुझं काय ठरलय? आमचं ठरलय मुलांकडे होकार कळवायचं." " बाबा एवढी घाई का करताय? कालच बघून गेलेत नं. दोनचार दिवस विचार करायला वेळ तर द्या."
"कशाला आणखी वेळ हवा विचार करायला? विचार करण्यात चांगलं स्थळ हातचं जाईल." वासंती म्हणाली.


प्राचीला कळत नव्हतं या दोघांना काय झालंय.यांना हे स्थळ इतकं का आवडलंय. मला जे प्रश्न पडलेत यांना नाही का पडले. प्राचीचं डोकं चालेना.

"पुन्हा कसल्या विचारात गुंतलीस प्राची?" वासंती नी पुन्हा तिला एकदा टोकलं. "आई या स्थळात असं काय आहे ज्यामुळे तुम्ही एवढे लगेच या स्थळाला हो म्हणताय?" "आक्षेप घेण्यासारखं तरी काय आहे या स्थळात सांग आम्हाला." वासंतीनी विचारलं."आई त्या मुलावर माझा आक्षेप आहे. एवढ्या वेळ तो एकही शब्द बोलला नाही. ती मंडळी जवळपास अर्धातास तरी होती आपल्याकडे. तो आणि त्याची आई एवढ्या वेळात एकही शब्द बोलले नाही. हे तुम्हाला वीचित्र वाटतं नाही.?"

"यात काय वीचित्र वाटण्यासारखं आहे.?" वासंती ने प्रतीप्रश्न केला. "अगं कोणाकोणाकडे खूप बोलण्याची पद्धत नसते म्हणून ती दोघं बोलली नसतील. भय्यासाहेब म्हणाले मला त्यांची बायको आणि मुलगा कमीच बोलतात."अशोकनी स्पष्टीकरण दिलं. "होका.तुम्हाला सांगीतलं त्यांनी. ते मुलाचे वडील खूप मोकळेपणानी बोलतात आणि बघतातसुद्धा." प्राची चिडूनच बोलली. "मोकळेपणानी बघतात म्हणजे काय?" वासंतीचाही आता पारा चढला होता. एवढं चांगलं स्थळ येऊन ही मुलगी नाकारतेय.

"यांचा अर्थ हा की त्या मुलाच्या वडिलांची नजर चांगली नाही." "अगं तुझ्या जीभेला हाड आहे की नाही? मनात येईल ते बोलतेस." " मला त्यांची नजर चांगली वाटली नाही. मुलाची कशी आहे माहित नाही कारण त्याने माझ्याकडे खूप बघीतलच नाही. मुलाची आई मला घाबरलेलीच वाटली." "हात जोडले तुझ्यापुढे. काय तर्क करते एकेक. अहो हे जी बडबड प्राची करतेय नं त्या हिच्या मैत्रीणींच्या अकला आहेत."


प्राची तडकूनच बोलली."आई यात माझ्या मैत्रीणीना तू का मधे आणतेस? त्यांच्यापैकी एकजण तरी होती का काल. तूच मनात येईल तसं बोलते आहेस." "गप्प बस.काल त्या नव्हत्या फार बरं झालं. तुझी ती मैत्रीण कश्मीरा तिच्या लग्नापासून तुमची सगळ्यांची टाळकी फिरली आहेत." "आता कश्मीराचा काय संबंध इथे?"

"हे बघ प्राची आत्तापर्यंत तू तुझ्याशी संबंधीत जे निर्णय घेतले ते आम्ही मान्य केले.पण हा खूप मोठा निर्णय आहे. यावेळी आम्हाला जे योग्य वाटतं ते करणार.हा तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे." " माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे नं म्हणूनच म्हणतेय मला हे स्थळ पसंत नाही. तुम्ही दोघं ऐकायलाच तयार नाही."

"हे बघा तुम्ही दोघी वाद घालू नका. प्राची आम्ही या स्थळाला होकार कळवणार आहे.आम्हाला जे महत्वाचं वाटतं त्याची चौकशी आम्ही केली आहे.आमचं समाधान झालं आहे.आता तू अजून खुसपट काढायची नाहीत." अशोकचं बोलणं ऐकताच प्राची रागारागानी उठून तिच्या खोलीत गेली. तिच्या रागाकडे वासंती आणि अशोक या दोघांनी दुर्लक्ष केलं.


प्राची गेल्यावर अशोक वासंतीला म्हणाला "मी भैय्यासाहेबांना फोन करतो. नंतर हाॅल बघावा लागेल. किती लोकांना बोलवायचं याची यादी करावी लागेल."
"हो. त्यांना होकार कळल्यावर आधी हाॅल बघा.आजकाल हाॅल बघून कार्यक्रम ठरवावे लागतात. हाॅल बुक करा मी तोपर्यंत यादी करायला घेते. बॅंकेच्या लाॅकरमधून दागीने काढावे लागतील.अरे हो हाॅल बुक झाला की गुरूजींना बोला." "अगं आजकाल कार्यालयाचेच गुरुजी असतात." " बघा. जर आपले गुरुजी बोलवायचे असतील तर त्यांना अगोदर सांगायला हवं." " बरं बघतो." असं म्हणत अशोक उठले.


प्राचीचं डोकं आता रागानी फुटण्याची वेळ आली होती. राधाला ही फोन करायची तिला इच्छा होत नव्हती. बिचारी आपल्या फोनची वाट बघत असेल हे प्राचीला कळत होतं पण आपली बाजू आई-बाबा ऐकत नाही याचा तिला प्रचंड राग येत होता. काय करावं कळत नव्हतं.


शेवटी प्राचीच्या फोनची वाट बघून राधाचाच फोन आला. प्राचीनं फोन घेतला. "साॅरी राधा.माझा मूडच नाहीत कालपासून." " का ग. नकार दिला का मुलाकडच्यांनी" " अगं मलाच पसंत नाही हे स्थळ.पण आई बाबा माझं काही सुद्धा ऐकून घ्यायला तयार नाही." " का पण? लग्नं तुला करायचय प्राची. तुला जर पसंत नसेल तर ते का तुला जबरदस्ती करतात आहे. तुला हे स्थळ का आवडलं नाही?"


"अगं श्रीमंत बापाच्या मुलगा आहे पण नेभळट आहे. त्यानी अर्ध्यातासात एकदाच माझ्याकडे बघीतल. बोलला नाही. त्याचे वडील तर मला चंदी फंदीच वाटले." "अगं काय बोलतेस! असं कसं असेल?" "अगं मी पोह्यांची प्लेट त्यांच्यासमोर धरली तर इतके विचीत्र नजरेनी माझ्याकडे बघत होते. मला घाण वाटली त्या नजरेची."


"आईबाबांचं काय म्हणणं आहे?" "अगं त्यांना हे स्थळ आवडलं आहे. कश्मीरानी परधर्मीय मुलांशी लग्नं केलं आणि त्याचा त्रास मला होतोय." "ऐ काय भंकस करतेस? कश्मीराच्या लग्नाचा इथे काय संबंध?" " आहे की?" "अगं कसा संबंध असेल?" "पण आमच्या मातोश्रींना संबंध वाटतोय. तिच्यासारखी मीपण पळून जाईन. म्हणून हे स्थळ नाकारतेय असं आईला वाटतंय."

"अरे देवा! हे कठीण काम आहे.आता काय करायचं?" " त्यांनी होकार कळवला सुद्धा." "काय?" " हो. राधा त्या मुलानी माझ्याकडे जेव्हा बघीतलं तेव्हा त्याचे डोळे इतके निर्विकार होते की मी शाॅक झाले. एका तरूण मुलीकडे बघतांना तरूण मुलांच्या डोळ्यात जी चमक, उत्सूकता दिसते नं ती अजीबात नव्हती. म्हणून मला खटकतय."


"मग आता…?""आता काय..! ठरवलय सगळं आईबाबांनी. ठरलेल्या मुहूर्तावर त्या नेभळट मुलाच्या गळ्यात माळ घालीन." वैतागलेल्या सुरात प्राची बोलली. " चिडून नको प्राची.मला कळतेय तुझी चिडचीड.एक काम कर भेटूया संध्याकाळी आपल्या कट्ट्यावर.पाच वाजता." " हो मला भेटायची आहे तुला." " डन.ये पाचपर्यंत" " हो" म्हणून प्राचीने फोन ठेवला.

प्राची संध्याकाळी राधाला भेटायला निघणार तेवढ्यात वासंतीनं विचारलं " कुठे चाललीस?" "राधाला भेटायला."
"इतकी काय सारखी राधा लागते तुला?" " लागते? अगं ती काय तोंडी लावणं आहे का?हाडामासाची मुलगी आहे. मैत्रीण आहे माझी. आई तू आजकाल काहीपण विचार करतेस. चल निघते मी." "फार उशीर करू नकोस." "उशीर करणार नाही.पण सातच्या आत घरात नाही येणार बाय." जरा रागातच प्राचीनी गाडी सुरू केली आणि गेटच्या बाहेर पडली.

अशोक वासंती जवळ येऊन म्हणाला " अगं तू तिची आई आहेस पहारेकरी नाही विसरलीस का?" " माझ्या लक्षात आहे. तुम्ही तिचे वडील आहात हे विसरू नका. नाहीतर हिची दुसरी कश्मीरा व्हायची." एवढं बोलून फणफणतच वासंती आत गेली.अशोक वासंती चे विचार ऐकून कपाळाला हात लावून बसला.

प्राची अशी का लागतेय ते अशोकला कळत नव्हतं. एवढं छान स्थळ आहे पटवर्धनांचं पण ही मुलगी तो मुलगा बोलला नाही म्हणून नाही म्हणतेय. कसं करावं.एवढ्या श्रीमंत घरी आपली मुलगी जाणार याचा खरंतर अशोक आणि वासंती दोघांना आनंद झाला होता. अशोक आणि वासंती दोघांनीही आर्थिक झळ खूप संहन केली होती अगदी लग्नं झाल्यापासून.

लग्नं झाल्यानंतर काही दिवसातच वासंतीच्या लक्षात आलं की पैशासाठी याची फार परवड होते. अशोकला खूप पगार नव्हता. त्यातले अर्धे आई-वडिलांना गावी पाठवावे लागत.अशोक एकुलता एक होता. म्हातारपणी ते अशोककडे नाही बघणार तर कोणाकडे. त्याचे आईवडील ही जेवढे पैसे अशोक पाठवायचा त्यात भागवायचे.माझ्याकडे येऊन रहा असं त्यानी आई-बाबांना कितीदा म्हटलं असेल.

नेहमीसाठी येऊन राह्यला ते तयार नव्हते. कंटाळा यायचा त्यांना.असं करता करता अशोक वासंती ची उमेदीचं वय निघून गेलं. पैसा पुरेसा वाढला तरी त्यांच्या दुप्पट महागाई वाढली.त्यामुळे पैसे आणि आराम याचं गणित कधी जुळलच नव्हतं.अशोकचे आई-बाबा जाऊनही काही वर्षे होतील.

वासंतीला आठवले ते जुने दिवस.त्यावेळी अशोकची तडतड बघून वासंती एक दिवस त्याला म्हणाली "मीपण काही काम करू का? घरातलं सगळं आवरलं की मला वेळ असतो. मी बघते काय करता येईल. तेवढीच आपल्या घराला मदत." "वासंती मला खरं लाज वाटतेय.मी तुझं काहीच कौतुक करू शकत नाही. पण काय करणार माझा पगार बघता बघता संपतो. ऐश करायला काही हातात उरतं नाही.आता महागाईत वाढली आहे. मुंबईत हे भाड्याचं घर मिळालं आहे हेच नशीब."

"मला वाटतं ऐश करण्याच्या नादात तुम्ही कोणाकडून कर्ज काढत नाही ही किती चांगली गोष्ट आहे.नाहीतर आज ते कर्ज फेडता फेडता तोंडाला फेस आला असता. नशीबाला आपण बरोबर घेऊन चलु. बघू तो साथ देतो की हात सोडतो. मी घरगुतीच काम सुरू करते. सुरवातीला जे पैसे मिळतील ते घरात खर्च न करता व्यवसायातच टाकू. मग जास्त पैसे यायला लागले की बघू."

अशोकला वासंतीची कल्पना आवडली. त्याने हो म्हटलं.मग वासंतीने तयार पिठं करून देण्याचं ठरवलं.आजूबाजूला सगळ्यांना सांगीतलं की मी नवीन व्यवसाय सुरू केलाय.एक शेजारीण म्हणाली तोंडोतोंडी सांगून होणार नाही. तुझ्या व्यवसायाचं नाव ठरवून पॅंम्प्लेट छापून पेपर वाटणा-या मुलाला दे. त्या पत्रकात तुझा फोन नंबर दे." वासंतीला ही कल्पना पटली.

तिनी लगेच अशोकला सांगीतले.पॅम्प्लेट छापून वाटले. बघता बघता वासंतीचा या व्यवसायात जम बसला.थोडाफार नफा मिळत होता तो ती बाजूला ठेवत होती.हळुहळू वर्ष होत आलं तिचं काम छान चालू होतं आणि त्याचवेळी वासंतीकडे गोड बातमी समजली.पहिल्यापासून तिला उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्याने ती इतकी बेजार झाली की सुरु केलेला व्यवसाय तिला बंद करावा लागला.कारण तिला मदतनिस कोणीच नव्हती.

आत्तापर्यंत साठवलेला पैसा तिच्या बाळंतपणात खर्च झाला. त्यानंतर प्राची लहान तिला कोण सांभाळणार? अशोकचे आई वडिल येऊ शकत नव्हते. त्यांच्यावर त्याच्या मोठ्या भावाची मुलं सांभाळण्याची जबाबदारी होती. वासंतीचे आई-वडील पण याच कारणामुळे येऊ शकत नव्हते. आई वडील येऊ शकत नव्हते त्यामुळे सुरू झालेला छान व्यवसाय बंद करावा लागला.कोणीच मदतनिस न मिळाल्याने चांगला जम बसलेला व्यवसाय बंद करावा लागला. याचं वासंतीला खूप दु:ख होतं होतं.

प्राचीच्या जन्मानंतर प्राची साठी सगळं काही करणं चालू होतं. अशोक आणि वासंती स्वतःची हौसमौज विसरलेच होते. तिच्या उत्तम शिक्षणासाठी पैसे जोडणं चालु होतं. प्राचीच्या सगळ्या इच्छा, ज्या पूर्ण करता येतील त्या दोघंही पूर्ण करत.
हळुहळू प्राची मोठी होत होती.ती मुळातच समंजस असल्याने तिला कळलं होतं आपली आर्थिक परीस्थिती बेतास बात आहे. म्हणून ती खूप मोठ्या खर्चिक मागण्या करत नसे.

एकदा वासंतीनी प्राची आणि तिच्या मैत्रीणीचं बोलणं ऐकलं होतं. सविता प्राचीची मैत्रीण. दोघीही दुसरीत होत्या.सवितानी खुप महागडा खेळ दाखवायला आणला होता. तो बघताच प्राचीचे डोळे चमकले."सविता मला बघू कसा आहे हा खेळ?" प्राचीनी जसा हात पुढे केला तसं सवितांनी खेळ आपल्या जवळ घेतला."मला हात लावू दे नं" प्राची म्हणाली.

"नाही आईनी सांगीतलं आहे कोणाच्या हातात खेळ द्यायचा नाही. आईनी सांगीतलं प्राचीच्या हातात तर मुळीच द्यायचा नाही." " का?" " तुमची ऐपत नाही एवढा महागडा खेळ घ्यायची. तू तोडशील असं आई म्हणाली." " ऐपत म्हणजे?" प्राचीने न समजून सविताला विचारलं." " तुझे बाबा एवढा महागडा खेळ घेऊन देऊ शकत नाही. तुम्ही गरीब आहात नं प्राची?" आतल्या खोलीत वासंतीला हे ऐकून हुंदका फुटला. विचारणारी मुलगी निरागस होती. तिच्या आईचे शब्द ती प्राचीला ऐकवत होती. यावर प्राची म्हणाली." आम्ही गरीब नाही.पण मलाच एवढे महागडे खेळ आवडतं नाही.तुला माहितीये रोज रात्री जेवण झाल्यावर आई-बाबा आणि मी कॅरम खेळतो,कधी भेंड्या खेळतो तुझ्या घरी खेळता तुम्ही?"

"नाही. अय्या कित्ती मज्जा येत असेल नं प्राची? मी येत जाऊ खेळायला?" "नको. आम्ही खेळतो ते खेळ खूप महाग आहेत.तुला परवडणार नाही." " का?" " कारण तुम्ही गरीब आहे."

"नाही. आम्ही गरीब नाही". "तू गरीब आहे मला माझ्या आईनी सांगीतलं. थांब माझ्या आईला तुझं नाव सांगते." आणि रागानी सविता पाय आपटत घरी गेली. प्राची स्वतःशीच खूप हसली. वासंतीला खूप अभीमान वाटला आपल्या मुलीचा.

ती बाहेर आली आणि चटकन तिनी प्राचीला पोटाशी घेतलं आणि डोळ्यातून येणारं पाणी नि:संकोच बाहेर येऊ दिलं.

हे सगळे प्रसंग वासंतीच्या डोळ्यासमोर आले. जणूकाही कालच घडले आहेत. आपली जशी काटकसर करताकरता वाट लागली तशी आपल्या मुलीची अवस्था होऊ नये म्हणून आपणहून चालत आलेल्या या स्थळाला प्राची नाही म्हणू नाही असं वासंतीला तीव्रतेनी वाटत होतं.


सगळच आपल्या हातात नसतं हे ती जाणून होती.प्राचीने या स्थळाला होकार द्यावा असं वासंतीला मनापासून वाटत होतं.ते होकाराचे शब्द ऐकायला तिचे कान आतूर झाले होते.
-------------------------------------------------------------
क्रमशः
लेखिका...मीनाक्षी वैद्य.