जितवणीपळाले- भाग ०9
अंडर ग्राऊण्ड टाकीचे खोदकाम सुरू झाले . चाळीस फूट खोदकाम झाल्यावर बारीक बारीक झरे लागले. आश्चर्यम्हणजे ते गोड्या पाण्याचे झरे होते.जितवण्याचे पाणी त्यात आणून सोडले की गावाचा पाण्याचा प्रश्न शाश्वत स्वरुपात सुटणार म्हणून गावकरी खुशहोते. टाकीची खोदाई झाल्यावर कडेला कॉन्क्रिटच्या भिंती ओतण्यात आल्या. दरम्याने जलकुंभाचा बेस बांधून होत आला. पाऊसकाळ नजिक आल्यामुळे काम थांबले. पावसाळ्यात अंडर ग्राऊण्ड टाकीत साधारण पुरुषभर पाणी साठलेले होते. पुढच्या दसऱ्यानंतर पुन्हा कामाला सुरुवात झाली. दोन महिन्यात जलकुंभ पुरा झाला नी गावभर पाईप लाईन टाकायची सुरुवात झाली. दरम्याने मंत्रालय पातळीवरून उच्च्स्तरीय समिती रिव्ह्यू घ्यायला आली. अंडर ग्राऊण्ड टाकीत मूळ जलस्त्रोतातले पाणी सोडल्यावर तीस तासानी सरफेस पर्यंत वॉटर लेव्हल आली तर स्कीम यशस्वी झाली . त्या दृष्टिने ऑब्झर्वेशन करून रिपोर्टिंग करायची सुचना एक्झिक्युटिव्ह इंजिनीअरना देवून रिव्ह्यु समिती निघून गेली.
जितवण्यावर मूळ झऱ्याच्या पुढच्या बाजूला खोदाई करून कॉन्क्रिटचे कुण्ड बांधून त्यातून तीन इंची पाईप लाईनने अंडर ग्राऊण्ड टाकीत पाणी सोडण्यात आले.आठवडाभरातही रिव्ह्यू समितीला अपेक्षित लेव्हलपर्यंत पाण्याचे स्टोअरेज झाले नाही.एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर पेचात पडले.त्यानी ही गोष्ट सभापती धकलोजींच्या कानी घातली. आता धकलोजी इरेला पेटले.त्यानी वडारांच्या फैलांशी चर्चा करून मूळ झऱ्याच्या ठिकाणी दरड फोडून जरा वाव दिला तर झरा मोठा मिळेल का पहायचे असा बेत केला.फैलातले अनुभवी म्हातारे मात्र या गोष्टीला राजी होईनात.“सुरुंगाला पानी भेतया.... येकांद्या येळी जीता झरा सुरुंगाच्या दनक्यान दुसरीकडं पळतुया.... नी पानी बंद व्हतयां.... आमचं आयकशीला तर झऱ्याच्या जवळ पास कुटंच ढका बी लावू नगासा......” मग सर्वानुमते देवीला कौल लावून बघायचं ठरलं. पण कौलकऱ्याने शिकस्त करूनही पाषाण कौल धरीना.
धकलोजीच्या स्वभिवाप्रमाणे त्याने आपला हेका सोडला नाही. फैलात सुरुंग घाळणाऱ्या अनुभविक वडाराना हाताशी घेवून मूळ झरा पडत होता त्याच्या आजुबाजुला पाच फूटी ड्रिल मारून पॉवर फुल जिलेटिन भरून ती शीळा फुटते काप्रयत्न करून बघायचा बेत नक्की केला. सटवाजीचा पोरगा जिलेटेन आणायला कोल्हापुरात गेला. तो आल्यावर कॉम्प्रेसरने झऱ्याच्या भोवारी जरा लांब अंतर राखून पाच ड्रिलं मारून जिलेटीन घातली.सुरुंगकरी वाती पेटवून आले. पाचही जिलेटिनचे उखळी बारासारखे ढुम्म ऽऽ ढुम्म आवाज आले. मग वडारानी पुढे जावून पाहिले तर ड्रिल मारलेल्या जागी जेमतेम वीतभर कपचे उडाले होते .याचा अर्थ शीळा खूप मोठी असल्यामुळे जिलेटिन वरच्यावर फुटलेली होती. मग उलट सुलट चर्चा करून तळाकडे थोडी खोल होलं मारून खेपेन दहा जिलेटिनं घालायचे ठरलं. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तालुक्याच्या ठिकाणी मोठी काळवत्राची खण सुरू होती तिथून लांब बोअर घेणारी पहार आणून खोलवर ड्रिलींग करून जिलेटीनं भरली. काळवत्र एवढं कडक होतं की दुपार उलटून गेली तरी जेमेतेम सहा ड्रिल पुरी झाली होती. वडार जिद्दीला पेटून काम करीत होते. पाच वाजता ड्रिलींग पुरं झालं . मग जिलेटिनं भरून वाती पेटवल्यावर सुरुंगघालणारे सुरक्षित ठिकाणी येवून थांबले. पाच मिनिटात चार जिलेटिन फुटली . पण नंतर अर्धा घंटा गेला तरी जिलेटेन फुटल्याचे आवाज आले नाहीत. त्यातला दर्दी मळक्या वडार म्हणाला, “ आसं व्हतंया कवा कवा पन जिलेटेनं कंदी फ्येल न्हाई जाईत. तोअसं सांगतो तवर आणखी चार जिलेटेन फुटली ह्या वेळी झालेल्या धडाक्याने वडार उभे होते तिथे पर्यंत जमिन हादरलेली जाणवली.
त्या नंतर उरलेल्या पैकी एक जिलेटिन फुटलं आता फक्त एक जिलेटोन फुटायचं शिल्लक होतं. पण सूर्य मावळून गेला नी काळवं पडायला लागलं तरी जिलेटिन फुटलं नाही. स्फ़ोट झालेल्या जाग्यावर काय परिस्थिती आहे हे पहायची खुप उत्कंठा सर्वानाच होती. पण न फ़ुटलेलं जिलेटीन कधि फुटेल काही नेम सांगता येत नव्हता. तेंव्हा आता उजाडल्यावरच काय तो सोक्ष मोक्ष लावायचा असं ठरवून वडार तळाकडे माघारी गेले. दुसरे दिवशी जरा उशिरानेच वडार जितवण्यावर आले.ढोरांच्या टाक्यात येणारा पाट बंद झालेलाहोता. वडार मनोमन चरकले. एक जाणता म्हणाला कालच्या जिलेटीनने फुटल्याली दगडं, कपच्या चरात पडून चर तुंबल्यालं असतेल गा...... तिथवर जाऊन बगुया म्हनं....... एक जिलेटेन फुटलं नव्हतं म्हणताना अजून काही वडार जवळ जायला बाचकत होते. मग धीराचे पाच सहा बापये दबकत दबकत मूळ झऱ्याच्या दिशेने धीमी पावलं टाकीत निघाले.
नेहेमीच्या वाटेने मरड चढून न जाता उजव्या अंगाने अंडर ग्राऊण्ड टाकीला वळसा घालून वडार पुढे निघाले. आता डमरूच्या आकाराची शीळा दृग्गोचर झाली . डमरू ची शीळा मूळ ठिकाणाहून चाळवून किंचित फिरलेली दिसली. गडी एकामेकांच्या तोंडाकडे बघीत राहिले काय बोलावं कोणालाच काही सुचेना. एकधीराचा वडार तम्मान्ना धाडस करून पुढे गेला . त्याला जे दृष्य दिसलं ते पाहून तो गर्भगळीत होवून मटकन् खाली बसला....... सोबत्याना काय झाल कळेचना... काय झालंगा तम्माना म्हणत सोबती पुढे गेले नी तेहीअवाक् होवून जागच्या जागी खिळले. डमरूचीशीळा मधोमध दुभंगलेली होती नी नग्न साधू कोरलेला डमरूचा पुडा तिरका फिरला होता. आता सगळ्यांचीच वाचा बसायची पाळी आली .गडी माघारी आले. बघ्यानी त्यांच्या भोवती कोंढाळं केलं..... काय आक्रीत झालंगा? आमालाबी सांगशीला का न्हाई...? तम्मान्ना मान खाली घालून तोंडात मारून घेत भेसूर आवाजात बोलला ... घडू न्हाई त्ये झालं गा..... नागडं द्येव हाई न्हवं त्यो दग्गूड फुटला गा..... आता आम्हावर काय आनी आफत येतिया कोनाला दखल..... जमलेल्या पैकी कोणालाच त्या जागेपर्यंत जावून बघायचं धारिष्ट्यही झालं नाही. (क्रमश: )