जितवणी पळाले- भाग ०७
थोड्याच वेळात कसलातरी पाला घेवून नाऊ आला. त्याने मागारणीला हाक मारली. सुपात राख घेवूनती आली. राखेच सूप बाजुला ठेवला. मग तिने पाट्यावर ठेचून ठेचून गंधासारखा थलक झाल्यावर तो चौपदरी फडक्यातून गाळून त्यातला निम्मे दंशकरणीला पाजला. “ह्ये बग बया, आता वांतीची भावना आली की सुपातल्या राखाडीवर वोक......”असं सांगून फडक्यातला चोथा बाईचा तळहाताना नी तळपायाना चोळू लागली. काही वेळात बेलदारणीला जोराची वांती झाली. नाऊने सूप बाहेर उजेडाला न्हेवून परीक्षा केली. “आजून वाईच उग्रम हाये…..” उरलेले औषध पाजायला सांगितले. ते पाजल्यावर बाईला पुन्हा उलटी झाली तेंव्हा....“आता ईख़ उतारलें ...... हिला वाईच पाणी पाजा. आता हप्ताभर आंबाट तिकाट वशाट काय खायला द्येवू नगा. चार रोजानी निगडीचा पाला नी तीन धारी निग़डाचे तुकडे टाकून त्या पान्याचे न्हावन घाला नी बाई हिंडा फिरायला लागली की जुगाईची वटी भरा..... ” नाऊने विषयाची निर्गत लावली. बेलदारानी नाऊच्यापायावर माथा टेकला. घंटाभराने धनगरणीने पेजेचा निळ पाजल्यावर बेलदारणीला जरा हुषारी आली. धनगरणीच्या पायावर माथा टेकून स्फुंदत स्फुंदत बेलदारीण म्हणाली, “तुमी यल्लमाच्या रुपात जनु माजी शेवा केलासा की तुमचं उपकार म्यां कसं फेडू...? ”
आठवडाभराने बाई हिंडाफिरायला लागली. दोन रोजाने बेलदारीण धनगरणीची खणा नारळाने ओटी भरायसाठी म्हणून नाऊच्या मांगरात गेली. त्यावेळी तिच्या सासऱ्याच्या लक्षात आले की , विहीरीचा विषय नाऊच्या कानी घालून बघावा. मग त्याने विहीर तोडायच्या सुरुवाती पासून सगळा विषय बैजवार सांगितला. “ तुमी कायतरी करून आमच्या इषयाची तड लावून द्यावाजावा.... तुमाला सव्वा पंचवीस रुपयं यल्लमाच्या नावानी भ्याट करून पटका बांधितो की.....” बेलदाराचे कथन ऐकल्यावर नाऊ म्हणाला, “हा ईषय माज्या कानावर आला व्हता की..... द्येवीचा कोप कमी व्हवून कायतरी तोडगा मिळतो का म्या पर्यत्न करितो...... माला त्यो जागा नदरंखाली घालावा लागतोय..... म्या सवड करून ततं ख्येप करून तुमाला पानी पाडून द्येतो,,,,,,” पंधरा रोजानी नाऊ रस्त्याचं काम सुरू होतं त्या ठिकाणाला गेला. त्याने विहीरीचा जागा बघितला. मग वरच्या अंगाने तीसेक कदम अंतरावर पाणक्याने ठोकलेली खुंटी उमगून काढली. खुटीच्या बाजूला खुणेसाठी रचलेली दगडाची उतरंडही शाबूत होती.
हे आक्रित कसं काय झालं ह्याचा उलगडा होईना. नाऊ म्हणाला.“ तुमी द्येवीचा मान बुडिवलासा म्हंताना ह्ये आक्रित झालं... आता ह्या जाग़ेला पुना खोदकाम करु नगासा. तुमी द्येवीला पाच नारळाच तोराण बांदा , नी मंग हिरीत उतरून तळापासून ह्या खुटीचा अदमास घ्येवून हितं पावत पुरुसभर उंच चर मारा, ह्या जाग्यापतोर खणकाम झाल्यावर पायाच्या आंगट्या यवढा झरा घावतोय नी हिरीला पाणी साटतय की न्हाई बगा.......” नाऊच्या सुचने प्रमाणे अंमल बजावणी झालीनी विहीरीच्या तळातून चराचे खणकाम सुरू झाले. खुंटी मारलेली होती तेवढ्याअंतराकडे पोचल्यावर एक दिवशी खरो खरच पाण्याचा झरा गावला. खणलेली माती लगोलग भरून, उसपून गडी बाहेर आले नी त्या रात्री विहीरीत कमरभर उंचीला पाणी साठलं. रस्त्याचं काम सुरू असताना बेलदारानी वळिवं काढून आड बांधून काढला. गावाने बांधकाम पुरं झाल्यावर त्या विहीरीवर सत्यनारायणाची पुजा बांधून समाराधना घातली. बेलदारानी बोलल्याप्रमाणे नाऊला सवा पंचवीस रुपये दिले नी मानाचा फेटा बांधला. रस्त्याच काम पुरं करून बेलदार निघून गेले.विहीर आजही शाबूत आहे . त्या भागात आता दहा बारा घरांची वाडी आहे.
दुसऱ्या सिझनमध्ये होळीपौर्णिमेपूर्वी पाळेकर वाडीपर्यंतरस्त्याचं नियोजीत काम पुरं झालं . गुढी पाडव्याच्या दिवशी तत्कालिन ज्येष्ठ कॉन्ग़्रेसी नेते बाळासाहेब देसाई यांच्या हस्ते रस्त्याचे उद् घाटन झाले. मंत्री महोदय हेलिकॉप्टरने येणार अशी वदंता होती म्हणून विमान बघण्यासाठी म्हणून आजूबाजुच्या दोन तीन गावातल्या लोकानी कोंडसखलात गर्दी केली होती. बाबाजीराव धुरी दोन दिवस गावात मुक्कामी राहिलेले होते.उदघाटनाच्या दिवशी नऊ साडे नऊला झालेली अलोट गर्दी पाहून बाबाजीरावानी गावतल्या वाडीवार बायका माणसाना आणि सार्वजनिक कार्यप्रस्थाच्या वेळी रांधप करणाऱ्या बापयाना कामाला लावून हजार माणसांसाठी डाळ भात, भाजी, नी गुळाचं घाटलं ( तांदुळाच्या कण्यांची खीर ) असा रांधपाचा जय्यत बेत योजला. त्याना अंदाजहोता तसेच घडले. बाळासाहेबांचे हेलिकॉप्टर दुपारी बारा वाजता पठारावर उतरले आणि तिथून कलेक्टरच्या जीप मधून बाळासाहेब आणि असंख्य कॉन्ग़्रेस कार्यकर्ते ट्रक मधून कोंड सखलात आले. एक वाजता पाळेकर वाडीतल्या मांडावर उदघाटनाचा कार्यक्रम आणि सभा झाली. त्या दिवसापर्यंत गावात गाडी आलेली नव्हती.मंत्री महोदयानी सभेत ग्वाही दिली नी दुसऱ्या दिवसा पासून तरवडात येणाऱ्या एस्टी गाड्या कोंडसखलात यायला लागल्या . सभा आटोपून फक्त शहाळ्याचे पाणी पिवून अडीच वाजता मंत्री महोदय रवाना झाले. (क्रमश: )