Live water escaped - 8 in Marathi Moral Stories by Prof Shriram V Kale books and stories PDF | जितवण पळाले- भाग 8

Featured Books
Categories
Share

जितवण पळाले- भाग 8

           जितवणीपळाले- भाग ०८

               त्या दिवशी  पाच वाजे पर्यंत  जेवणावळी झडल्या. बरेच अन्न उरले होते. पण पंक्ती  उठल्यावर गावकरी आणि वडारा-बेलदारानी उरलेले सगळे अन्न भरून नेले, अगदी कणही वाया गेला नाही.  या निमित्ताने बाबाजीराव आणि पंचायत समितीचे सभापती  अनंतराव धुरी यांची ख्याती तालुकाभर सर्वतोमुखी झाली. बाबाजीरावांचे घोरणही  फळाला आले आणि   राजकीय पटावर बाळासाहेबांचे वजन वाढले.लगतच्या सार्वत्रिक निवडणुकीत अनंतरावाना  आमदारकीचे तिकिट मिळालेनी  ते बहुमताने निवडूनही आले. त्यानंतर बाळासाहेबांकडे मुख्यमंत्रीदाची सुत्रं गेली नी बाबाजीरावांची  वट वाढली.अगदी  ग्राम पंचायत पातळी पर्यंत सत्तेची समिकरणं बदलली. बाबाजीरावानी अनंतरावांच्या  ऐवजी   रावाच्या वाडीतल्या  धकलोजी मर्गजाला  पंचायत समितीचा  सभापती केला. धकलोजी मर्गजाला गाववाले अचागणी  मर्गज म्हणून संबोधित, त्या मागचे कारणही  तसेच होते.

                  धकलोजी हा हुम दांडगा होता.मनात येईल त्याचे परिणाम काय होतील याचा तारतम्याने विचार न करता तो करून मोकळा होई. पावसाळी   लावणीच्या हंगामात  जोताच्या बैलाना  उरी फुटेस्तो नांगरटीला जुंपलं जाई. त्या काळात जनावर हुषार रहावीत म्हणून आगदी गोरगरीब लोकं सुद्धा उधारीवर झाली तरी अर्धा मण पेंड आणून सकाळ संध्याकाळ चार चार खडे बैलाना चारीत. धकलोजीच्या हाती कारभार आला.घरची श्रीमंती होती. त्यांची  दोन जोतं होती. त्याने पाच मण पेंड आणली. लावणी सुरू झाल्या दिवसा पासून प्रत्यएक बैलाला सूपभरपेंड सुरू केली. आईस म्हणाली, “ह्योतू अतिरेक करतंहस.... लय पेंड बरी नाय... ह्येना जनावरां कुंदावती.....”आयशीचे बोलणे उडवून लावीत धकलोजी म्हणाला, “बैलाचा प्वॉट  केवडा खेपेन येंगाट्भर गवात खाणारी जात सूप भर पेंड खावन् काय होणार हा....?”  सलग दोन दिवस इतकी पेंड खावून बैल कुंदावले.  त्यांची  पोटं फुगली..... नाकपुड्या सुकल्या, रवंथ परतणंही बंद झालं नी  जनावराना बुळक लागली. दाव्याची  कानी काढली तरी बैल गोठ्याच्या बाहेर पाउलटाकीनात.ऐन लावणीच्या टायमाला  घोटाळाझाला. ही गोष्ट  गावात फुटल्यावर लोक त्याला अचाग़णी धकल्या  म्हणायला लागले.

              त्याच्या अचागणी  कर्तुकीच्या गोष्टी  हा चेष्टेचा नी चर्चेचा विषय होता. त्या वेळी नव्यानेच मिश्र खत  मिळायला लागले होते.धकलोजी पठारावर पाव्हण्यांकदे गेलेला असताना  त्यानी  सड्यावरून आणलेले  चिबूड दाखवले. एकेक चिबूड एवढा  गरग्रीत पोसलेला  की पैज मारूनही दोन तीग गड्याना खावून संपला नसता. त्यामागचे रहस्य हे होते की पाव्हण्याने  चिबडीच्या वेलाना  चिमटे चिमटी मिश्र खत घातलेले होते. धकलोजीने त्याच दिवशी  तालुक्याच्या गावी जावून दोन पोती मिश्रखत  न्हेले. गोठ्या मागे  चिबूड , पडवळी, तोवशीचे वेल  माजलेले होते. त्याने गडी करून प्रत्येक वेलाला  दोन दोन करवंट्या भरून खत टाकले.आगराच्या कडणीला लावलेल्या पाचसहा माडाना टोपूल टोपूल खत टाकले. दुसरे दिवशी जित्रब सगळे जळून  मरगळून पडलेले दिसले.  पंधरा  दिवसानी एकेक माडही सुकत चालला नी सोन्या सारखे माड  सुकून वठून गेले. धकलोजी पंचायत समितीचा सभापती झाल्यावर गावकरी म्हणत की, ह्यो थयव कायतरी अचागणीपणा करून लाखाची खाक तरी  करूने नुको म्हंज्ये  मिळवली.

                अनंतराव आमदार झाले. त्यानी आणि बाबाजीरावानी मंत्रालय, पोर्टट्रस्ट, युनिवर्सिटीत,  म्युनिसिपालिटीत आणि पोलिसात  संधी मिळेल त्या त्या ठिकाणी असंख़्य गाववाल्याना नोकरीला लावले.  गावात सगळ्यावाड्यांमध्ये घरटी  एकेक  माणूस तरी मुंबईत  नोकरीला  लागला होता. दरमहा  शेकडो मनिऑर्डरी  यायच्या. चाकरमान्यांच्या जीवावर गाववाले  वधारले. गावात सुबत्ता आली.  त्यांची  धकलोजीला ही बजावणी असे की  संधी मिळाली की आपला परका भेदभाव न करता  गावाचे भले करता येईल  ते बघ. पंचायत समितीत  मोफत बियाणी, फवारणीचे पंप अशा योजना आल्याकी  सर्वात आधी  कोंड खोलातल्या लोकाना फायदा मिळे.  ६७साली ज्या गावानी  पाण्याची कमतरता होतीआणि  बारमाही   ओहोळ, नदी आणि  नैसर्गिक  जलसाठे होते  अशा  गावानी नळपाणी योजना सुरू  करण्याची   महत्वाकांक्षी  योजना सरकारने पुरस्कृत केली होती. यात बजेटच्या १० % लोकवर्गणी ग्रामपंचायतीने  भरायची   उर्वरित संपूर्ण खर्च  सरकार करणार होते.  योजना कार्यान्वित  झाल्यावर त्या ग्रामपंचायतींकडे हस्तांतरित करायच्या  असे सरकारी धोरण होते.

                     ही योजना कार्यान्वित  झाली तेंव्हा अनंतरावानी  कोंडसखलात ती सुरू करायचे आदेश धकलोजीला दिले. ग्रामपंचायतीने भरावयाची  लोक वर्गणी आमदार स्वत:च्या निधीतून देणार होते. त्या प्रमाणे  ग्रामपंचायतीचे  ठाराव करून प्रस्ताव सादर झाले. राज्यात पहिलाचप्रस्ताव कोंड सखलातून   सादर झाला.आमदारानी लोकवर्गणी भरली आणि पीडब्ल्युडीचे   इंजिनीअर  पहाणी करायला आले. पाळेकर वाडीत  मूळ जितवणी होते तो भाग  तसाच राख़ून  पुढच्या मरडात ढोरांच्या टाक्या होत्या  त्याच्या बाजुला  अ‍ॅंडरग्राऊण्ड  टाकी खोडून त्यात  जितवण्यावरून पाईपने पाणी आणून ते  सोडायचे. टाकी शेजारी   पन्नास फुट उंच चबुतरा बांधून  त्या वर जलकुंभ  बांधून  पन्नास एच्. पी. च्या पंपाने  अण्डर ग्राऊण्ड टाकीतले  पाणी चढवायचे आणि  मग पाइप लाईनने गावात  वाडीवाडीवार  पोचवायचे अशी ती स्कीम होती.   आमदारांच्या हस्ते भुमी पुजन होवून धुमधडाक्यात  कामाची सुरुवात झाली. (क्रमश: )