वाढदिवसाच्या कार्यक्रमात नयनाकडे बघताना शकयतो मनातली घालमेल बाहेर दिसू नये याचा ऊमा प्रयत्न करीत होती .मोहनला तिच्या या अवस्थेची कल्पना होतीच .न बोलता फक्त नजरेने तो तिला धीर देत होता .पार्टी बऱ्याच उशिरपर्यंत चालू होती .नयनाच्या सर्व मैत्रिणी मनापसून एन्जोय करीत होत्या .पार्टी संपायच्या आधी थोडा वेळ मोहन दोघींचा निरोप घेऊन बाहेर पडला .त्याला लगेचच त्याच्या गावी परतायचे होते .जाताना पुन्हा एकदा सतीश विषयी काहीही समजले तर कळवेन असे ऊमाला सांगुन गेला .नयनाच्या सगळ्या मैत्रिणीनी जाताना ऊमाला पार्टी खुप छान झाली असे सांगितले .ऊमाला पण अगदी समाधान वाटले ..लेकीने आयुष्यात प्रथमच काहीतरी मागितले होते आणि ते पूर्ण करता आले .सगळ्यांना निरोप देऊन दोघी घरी परत आल्या .कपडे बदलुन झोपताना नयनाने आईचे हात हातात घेऊन दाबले . “आई फार छान वाटले ग मला ..मला आणि माझ्या मैत्रीणीना तु अगदी खुष करून टाकलेस बघ ..”नयनाच्या केसात हात फिरवत ऊमा म्हणाली नयन तु खुष आहेस न ..मग मला दुसरे काहीच नको ग ...खुशीने अर्धमिटल्या डोळ्यांनी झोपलेल्या नयनाकडे पाहताना ऊमाच्या डोक्यात परत सतीशविषयीचे विचार चालू झाले ..खरेच लाभेल का आपल्या लेकीला परत बापाचे प्रेम ?काय होईल खरेच तो माणूस सतीश असेल तर ..?करेल का नयना नव्याने ..त्याचा बाबा म्हणून ..स्वीकार ?मधल्या बऱ्याच वर्षात बाबाचे नाव जरी तिने काढले नसले तरी तिच्या मनात बाबाविषयी एखादा हळवा कोपरा असेल न शिल्लक ..?का आता जे सगळे ठीक चालू आहे.. त्याला आणखी काही खीळ बसेल ..?फार मुश्किलीने,मेहेनतीने आणि मोहनच्या मदतीने आयुष्याची घडी आपण बसवली आहे त्यात आता काही विपरीत नको घडायला .. एक न दोन ...शंभर गोष्टीनी डोक्यात नुसते थैमान घातले होते .शांत समाधानाने झोपलेल्या नयनाकडे बघताना आता हिचे आयुष्य तरी सुखासमाधानात जाऊ दे ..आपण तर खुप भोगले ..हिच्या आयुष्यातील सुखाला आता कोणाची दृष्ट नको लागू दे देवा !!अशी ती परमेश्वराकडे मनोमन प्रार्थना करीत राहिली ..खिडकीतुन आलेल्या मंद प्रकाशात नयनाच्या गालावरचा तीळ चमकत होता.तिच्या मैत्रिणी त्याला “ब्युटीस्पॉट” म्हणायच्या ..तो तीळ परत परत सतीशची आठवण करून देत होता ..रात्र अशीच पार पडली ..झोप येणे तर अशक्यच होते ..उद्यापासुन परत सतीशविषयी काय बातमी कळते यासाठी मोहनच्या फोनची वाट पाहायला लागणार होती .काय लिहून ठेवलेय कोण जाणे भविष्यात..” सगळेच अंधारात होते ..भूतकाळातल्या चांगल्या वाईट घटनांनी तिच्याभोवती फेर धरला होता .झोपलेल्या नयनाकडे बघतच तिची रात्र पार पडली .सकाळ झाली आणि नेहेमीच्या वेळी नयनाला जाग आली .शेजारी बसून राहिलेल्या आईकडे पहात ती डोळे चोळत उठली .आई अग तु झोपली नाहीस की काय ,..?अशी काय बसली आहे अवघडल्यासारखी ....?नयनाच्या या प्रश्नावर “अग कालच्या आनंदाने मला झोपच लागली नाही बघ ..चल आता उठून कामाला लागले पाहिजे मला असे म्हणत तिच्याकडे बघण्याचेटाळत..ऊमा आत गेली. दुसऱ्या दिवशीपासून दोघींचे नेहेमीचे रुटीन चालू झाले .दिवस गडबडीत जात असल्याने सतीशचा विषय थोडा मागे पडला मनातून .दोन तीन दिवसांनी ऊमाच्या लक्षात आले अजुन मोहनचा काहीच फोन आला नाही सतीशसंबंधात .करावा का फोन मोहनला ?विचारावे का त्याला काय झाले असे ?असा विचार जरी मनात आला तरी तिला मात्र स्वतः फोन करायचे धाडस होईना.... असेच एक दिवस संध्याकाळ होत आली होती .दुकानातले काम आवरून सुजाता थोडा वेळापूर्वीच घरी गेली होती आता आपण पण आवरून कुलूप लावावे अशा विचारात ऊमा असताना तिचा फोन वाजला .मोहनचा असेल का फोन अशा विचाराने ती थोडी धास्तावली .फोन वाजत होता ..ऊमाने फोन उचलला ..नंबर तर अनोळखी दिसत होता ..तरी पण तिने उचलला ..हेलो ...एक खोल आवाज तिकडून आला ..हेलो ..ऊमा म्हणाली आपण ऊमा बोलता आहात का ..?ऊमाने हो म्हणताच ..तिकडून आवाज आला..ऊमा अग मी सतीश बोलतोय ..तुझा नवरा ..ऊमाने सतीशचा आवाज ओळखला ..क्षणात तिच्या हृदयात जोरात धडधड सुरु झाली .आज इतक्या वर्षांनी सतीशचा आवाज ऐकुन तिचा हातापायाला घाम फुटला .बोल ना ग ..ऊमा ओळखले नाहीस का ?तुझ्या सतीशला ..त्या आवाजात असलेली मग्रूरपणाची झलक ऊमाच्या चांगलीच लक्षात आली .पण त्या आवाजात आता थोडी अगतिकता पण वाटली तिला “होय मी ऊमाच बोलते आहे ..असे म्हणल्यावर सतीश पाण्याचा बांध फुटल्यासारखा भडभडा बोलु लागला ..“किती दिवस शोधतो आहे तुम्हा दोघींना ..आपल्या घरात तु सापडली नाहीस ..काकांच्या वाड्यात पण तुमचा पत्ता लागला नाही .मोठ्या मुश्किलीने तुझा हा नंबर मिळवला कसातरी ..आणि आधी तुला फोन केला ..तूच फोनवर आहेस पाहून अगदी हायसे वाटले बघ ..कुठे आहात कुठे तुम्ही दोघी ?मला भेटायचे आहे तुम्हाला ..”खरेतर ऊमाचा हा नंबर त्याने पूर्वी मोहनकडूनच घेतला होता .आणि त्या दोघी आता गावात राहत नाहीत हे तर पूर्वीच मोहनने सांगितले होते .पण खोटे बोलायची सतीशची सवय अजून गेलेली दिसत नव्हती .आता ऊमा त्याला उत्तर द्यायला सरसावली ..“तु कुठे होतास इतकी वर्षे ?आणि काय करीत होतास ?आम्ही पण तुला किती हुडकले पोलीसात पण तु हरवल्याची तक्रार केली तरीही तु सापडला नाहीस ..आणखी कुठे कुठे कर्जे करून ठेवली होतीस तू ?आणि ती फेडता येईनात म्हणून पळालास का आमच्यापासून तोंड लपवायला पळून गेलास ?”नकळत ऊमाच्या बोलण्यात त्रागा आणि कडवटपणा डोकावला .. “ऊमा अग आज इतक्या वर्षांनी मी तुला फोन करतोय इतकी वर्षे तु कुठे होतास ?काय खातपीत होतास ?कसे जगलास ?हे सगळे विचारायचे सोडुन माझीच उलटतपासणी कशी काय करू शकतेस तु ?”सतीशच्या स्वरात हताशपणा डोकावत होता ..ऊमा वैतागाने म्हणाली “मग काय करू ?इतक्या वर्षात तु तरी कुठे विचारलेस तुम्ही दोघी कशा जगता आहात ?आपली एकुलती एक मुलगी नयना तिला तु कसे मोठे केलेस ?काय काय भोगायला लागले माझ्यामागे तुम्हाला ?केलीस का कधी चौकशी तु ?ऊमा आता ताडताड बोलु लागली “मला माफ कर ग ऊमा बोलताना माझ्या तोंडून जर काही वेडेवाकडे गेले असेल तर .पण खरेच ग माझे मलाच माहित इतकी वर्षे माझी काय अवस्था होती ती पण एक दिवस सुद्धा असा गेला नाही की तुझी आणि नयनाची आठवण नाही आली खुप वेळा वाटायचे तुम्हाला फोन करावा बोलावे तुमच्याशी ..पण धाडस नव्हते होत ग ..आणि आता समोरासमोर भेटून तुमची माफी मागावी म्हणतो म्हणून तर फोन केलाय .येऊ दे ना ग मला घरी ...”त्याचा सारवा सारवीचा स्वर ऐकून ऊमा थोडी शांत झाली ..‘बर ठीक आहे ये तू घरी ..पण आधी सांग तरी काय काय घडले तुझ्या बाबतीत ..”मी आहे तयार ऐकायला सगळे ..क्रमशः