" समर्थांची शिकवण "
साठच्या (1960) दशकात शालेय पाठय क्रमात "हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास" होता. प्राचीन काळी हिंदुस्थानात आर्य व अनार्य अशा दोनच जमाती होत्या. आर्य हे वैदिक धर्माचे पालणकर्ते व उपासक होते. आ पली वैदिक संस्कृती खूप जुनी आहे. त्या पुरातन वैदिक संस्कृतीत यज्ञ, दान आणि तप यांना अनन्य साधारण महत्त्व होतं. त्या काळात मोठमोठे यज्ञ व्हायचे. ईश्वरप्राप्तीच्या मार्गतले हे टप्पे होते. परंतु यज्ञ करायचा म्हणजे खूप धन द्रव्य हवं. त्या यज्ञात दानाची संकल्पना रुजलेली होती. पूर्वीच्या काळी राजे लोक यज्ञ झाल्यावर आपलं धनाचं कोठार दानाद्वारे रिकामं करून टाकत. यज्ञ आणि दान हा सांघिक जीवनपद्धतीचा भाग होता. परंतु तप मात्र व्यक्तिगत साधनेचा एक भाग होता. तपाचे सामर्थ्यही अफाट होते. ती वैदिक संस्कृती हळूहळू लुप्त व्हायला लागली.यज्ञसंस्था हळूहळू कमी व्हायला लागल्या. परंतु दान संकल्पना आजही अस्तित्वात आहे. म्हणजे ईश्वरी साधनेच्या प्रवासात दान मात्र आजही आहे. म्हणजे पुन्हा पैशांचा खेळ आलाच. समर्थांच्या या सतराव्या शतकात यज्ञ आणि दान दोन्हीही होते. राजे लोकांचे ठीक होते. परंतु सर्वसामान्य माणूस परमेश्वराच्या आराधनेतसुद्धा हे पैशांचे डोंगर उल्लंघू शकत नव्हता. त्यामुळे समर्थ प्रस्तुत श्लोकात पुन्हा सांगत आहेत की, परमेश्वर प्राप्तीच्या या साधनांमध्ये खूप संकटं आहेत. पैशाच्या सामर्थ्याची आवश्यकता टाळता येत नाहीत. व्रत करायचे, दान करायचे, त्या व्रताची आणि दानांची उद्यापने करायची, म्हणजे पुन्हा पैशाचे पाठबळ हे हवेच. मग सामान्य माणसाने परमेश्वर प्राप्तीच्या या सर्वसामान्य अडचणींच्या मार्गावर मात कशी करायची ? समर्थ म्हणूनच पुन्हा पुन्हा सांगत आहेत की, हा परमेश्वर खूप दयाळू आहे. तो कृपाळू आहे. त्याला भेटण्यासाठी या कुठल्याही गोष्टींची आवश्यकता नाही. त्याला केवळ आपल्या मनात साठवत राहावे. त्याच्या नित्य स्मरणात आपला जीव गुंतवून ठेवावा. त्याच्या सततच्या आठवणींसाठी पैसा अजिबात लागत नाही. त्यासाठी कुठलेही व्रत करायची आवश्यकता नाही. त्याला फुलं अर्पण करावी लागत नाहीत. नारळ सुद्धा फोडायला नको. केवळ श्रीरामाच्या चिंतनाचा घोष मनात जागता ठेवायचा. त्याच्या आठवणीने प्रत्येक क्षण घालवायचा. आपलं प्रत्येक कर्म त्या श्रीरामाला अर्पण करायचे. किंबहुना आपला प्रत्येक श्वास त्याच्या नावाने घ्यायचा. त्याचाच केवळ ध्यास घ्यायचा. आणखी काहीही नको. भगवंताचे स्मरण ही एक अत्यंत साधी गोष्ट आहे. दिवस–रात्र त्याच्या नावाने प्रत्येक क्षण सुखाने घालवायचा. त्यासाठी एकच करायचे. सकाळी उठल्यापासून त्या श्रीरामाचे चिंतन करायचे. त्याच्याच नादात आयुष्य फुलवायचे. समर्थांची समष्टींशी संवाद साधायची लडिवाळ पद्धत फार सुरेख होती. श्रीरामाच्या स्वरूप ध्यासात सर्वांनी आपलं मन समर्पित करावं असं त्यांना नेहमी वाटायचं. श्रीरामाच्या स्वरूपाविषयी मनात प्रेम आणि ओढ निर्माण होईपर्यंत त्याच्या नामस्मरणात मन कधीही गुंतणार नाही याची जाणीव समर्थांना होती. नामस्मरणामुळे मन पवित्र होत जातं याची लोकांना खात्री वाटावी म्हणून समर्थ या मनाच्या श्लोकांमधून वारंवार त्याची जाणीव करून देतात. शेवटी निराकारातल्या परमेश्वराला भेटण्यासाठी आकाराला मिठी ही मारावीच लागते. त्याशिवाय निराकारातल्या परमेश्वराला तुम्ही पाहाणार कसे ? आकाराला दृश्य पातळीवर तुम्ही एकदा का मनात साठवले की, त्या भव्य निराकाराला आपण नक्षत्रांच्या मार्गे आकाशातून जाताना पाहू शकतो. या आकार–निरकाराच्या खेळासाठी एक दृष्टी तयार व्हावी लागते आणि त्यासाठी या नामस्मरणाचा राजमार्ग समर्थ वारंवार दाखवत आहेत. प्रस्तुत श्लोकातून समर्थ सांगत आहेत की, सर्व आध्यात्मिक वाटचालीत साधकाने नामस्मरणाचा मार्ग निश्चित करून त्या वाटेवरून जावे. त्यासाठी काहीही त्रास नाही. तुकाराम महाराजांचा त्या संदर्भातला एक अभंग फार महत्त्वाचा आहे. महाराज म्हणतात की,**नाम घेतां न लगे मोल ।**नाममंत्र नाहीं खोल ।।**दोंचि अक्षरांचे काम ।**उच्चारावें राम राम ।।**नाहीं वर्णधर्मयाती ।**नामीं अवघींचि सरतीं ।।**तुका म्हणे नाम ।**चैतन्य हें निजधाम ।।* *तुकाराम महाराज सुद्धा नामस्मरणासंबंधी सांगत आहेत की, या नामस्मरणासाठी कसलेही मोल द्यावे लागत नाही. केवळ " रामा " च्या या दोन अक्षरांच्या ध्यानात अवघ आयुष्य काढलं तर आयुष्याचं सोनं होऊन जाईल. जात, पात धर्माच्या पलिकडची ही नामसाधना ईश्वराप्रती आपलं आयुष्य अर्पण करण्याचा फार सोपा मार्ग आहे. समर्थ सुद्धा हेच सांगत आहेत. ते म्हणतात की, माझं म्हणणं जर कळत नसेल तर वेद–शास्त्र चाळा. त्यांचा अभ्यास करा. संत साहित्यात डोकावून पाहा. मनातला संशय दूर होण्यासाठी हे सर्व तुम्ही वाचा. रामनामाचं सामर्थ्य तुम्हांला कळून आल्याशिवाय राहाणार नाही. नामस्मरणाचा मार्ग हा सर्वोत्तम मार्ग आहे. त्याबाबत मनात कोणताही संशय बाळगू नका. मनातला संशय दूर फेकून द्या आणि पहाटेच्या पहिल्या क्षणापासून अखंडपणे नाम चिंतनात दंग होऊन जा.भगवंताची उपासना करण्यासाठी " अखंड नामचिंतन म्हणजेच नामजप " यासारखे सुलभ व सुगम साधन नाही. त्याला पर्याय नाही. 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
मच्छिन्द्र माळी, छ. संभाजीनगर.
मो. नं. 8830068030.