" नामस्मरणास योग्य वेळ "
संत महात्म्यानी श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन असे नऊ प्रकार सा. सांगितले आहेत. यालाच ' नववीधा भक्ती ' असे म्हणतात. सर्वसाधारण माणसं स्मरण भक्ती या मार्गाचा अवलंब करतात. स्मरण भक्ती म्हणजे नामस्मरण किंवा नामजप भक्ती होय.
पहाटेच्या वेळच्या नीरव शांततेत आपलं लक्ष परमेश्वरीं अस्तित्वाकडे केंद्रित करावे. पहाटेच्या वेळी आपलं मन फुलासारखं ताज असतं. सुगंधित असतं. मनात जर त्या परमेश्वराच्या नामस्मरणाची साखळी रुणझुणायला लागली तर आपल्या मनात परमेश्वराच्या चिंतनाच्या मंद घंटा वाजू लागतात. त्या घंटानादातच संपूर्ण दिवस मन निनादत राहातं. पहाटेच्या वेळच्या या श्रीरामाच्या चिंतनाच्या अखंड घंटा म्हणून समर्थ आपल्या अमृतमय शब्दातून सतत वाजवत राहातात. या नामस्मरणाविषयी समर्थ सतत सांगत आहेत. त्याचे एकमेव कारण हेच आहे की मनातली किल्मिष दूर व्हावीत आणि मन शांत शांत होत जावं. एकदा का मन निवायला लागले की, मनात केवळ ओंकाराचे ध्वनी घुमत राहातात. समर्थ सतत आपल्या ओंकाराचा ध्वनी प्रभु रामचंद्रांच्या नामस्मरणात विरघळवून टाकतात. अशा त्या रामनामासंबंधी समर्थ प्रस्तुत श्लोकातून सांगत आहेत की, प्रत्येक क्षणी रामनामात दंग व्हा. पूर्णपणे आपल्या चित्तवृत्ती रामनामाला अर्पण करा. एकदा का श्रीरामाच्या नादवलयात मन गुंतून गेले की, आपल्या मनाला परमशांती तर लाभेलच; परंतु मनातल्या कामना पूर्ण होतील. अर्थातच ज्याच्या मनात श्रीरामाच्या चिंतनाची नादवलयं उमटतात त्याच्या मनात एकच कामना जिवंत अवस्थेत असते आणि ती म्हणजे श्रीरामाच सगुण साकार दर्शन घडावं आणि आपल्या भक्तांची ती तीव्र इच्छा प्रभु रामचंद्र ती पुरी करतात. फक्त भक्त सदैव त्या रामनामाच्या जपात समरसून गेला पाहिजे. समर्थ पुढे म्हणतात की, एकदा का आपलं मन त्या रामनामात गुंग झालं की, त्याला कुठलीही संकटं बाधत नाहीत. कुठलेही संकट आले तरी प्रभु रामचंद्र तात्काळ आपल्या भक्ताच्या मदतीला येतात. भक्त संकटमुक्त तर होतोच, परंतु श्रीरामाच्या निकट तो अलगदपणे जातो. पहाटेपासून श्रीरामाच्या चिंतनात मन गुंतवून मात्र ठेवायला हवे. पण होते काय, तर आळस माणसाच्या मनाचा ताबा घेतो. अहंकार सतत आपल्या मनात नागासारखा फणा काढून बसलेलाच असतो. परमेश्वरीं चिंतनाच्या आड येणार मन आणि आळस हे दोन फार मोठे शत्रू आहेत, ते नष्ट करायलाच हवेत. या दोन बलाढ्य शत्रूंशी मुकाबला करून त्यांचा पहिल्यांदा निःपात करायला हवा. तरच पहाटे श्रीरामाच्या चरणांचा मंजुळ नाद ऐकायला येईल आणि श्रीरामाच्या विचाराने मन अष्टौप्रहर निनादत राहील.
समर्थ श्रीरामाच्या वर्णनात रममाण झाले आहेत. श्रीरामाचा प्रत्यक्ष सहवास त्यांना लाभतो आहे. त्यामुळे श्रीरामाच्या प्रत्येक गुणांचा समर्थ आपल्या परIने परीने रेशीम धागा विणीत आहेत. मनाच्या श्लोकाच्या निमित्ताने समर्थ आपल्या मनाशीच जणू संवाद साधत श्रीराम वर्णनात दंग झालेले आहेत. त्यांच्या मनात आणि मुखात सतत श्रीरामाची पूजा चालूच आहे. स्वानुभवाचं बोलणं ऐकणाऱ्याच्या हृदयात आपोआप वस्तीला येतं. समर्थ तर प्रत्येक क्षणी आपला परमेश्वरप्राप्तीचा आनंद सांगत होते. त्यामुळे मनाचे श्लोक आपल्या मनात चटकन रुजतात हा प्रत्येकाचा अनुभव झाला होता. अशा परमेश्वराच्या स्वरूपात समर्थ विरघळून गेल्यामुळे " मी श्रीरामाचा झालो आहे " ही जाणीव त्यांचे हे मनाचे श्लोक वाचताना सतत होते. प्रस्तुत श्लोकात त्याची प्रचिती येते. समर्थ मोठ्या प्रेमाने म्हणत आहेत की, हा माझा श्रीराम मला परमानंद देतो. तो माझ्या सुखाचं मुख्य सूत्र आहे. श्रीरामाच नुसतं स्मरण सुद्धा आनंदकारी असते. केवळ आनंद म्हणजे प्रभु रामचंद्रांच स्मरण आहे. परमेश्वराच्या सान्निध्याचा ध्यास घेऊन त्याच्या स्मरणात नित्य राहिलं तर तो परमेश्वर भेटल्याशिवाय राहणार नाही. कारण तो तुमच्या हृदयात असतोच. आपण फक्त त्याला हाक मारायची. बाकी काही नाही. हाकेला फक्त परमेश्वरच प्रतिसाद देतो. समर्थ पुढे म्हणतात की, हा माझा श्रीराम मनातल्या भीतीला पळवून लावतो. भयाचं निवारण करतो. मनात भीती असली की कुठलाच काम चांगल्या प्रकारे होत नाही. मनात भयाचा डोह निर्माण झाला की, देहाला व्यापून टाकणारा आनंद बुडायला लागतो. कारण आपल्याला खूप प्रकारचे भय वाटत असते. या भयापासून आपल्या पूर्ण मुक्तता मिळायला हवी. आणि ती मुक्तता परमेश्वरच करतो. श्रीरामाच्या सान्निध्यात भय कधी शिल्लकच राहात नाही. सूर्य उगवल्यावर अंधार जसा पळून जातो तसे श्रीरामाच्या अस्तित्वाचा उदय आपल्या हृदयात झाला की, भयाचा अंधःकार नष्ट होतो हे जाणून घेणे महत्त्वाचे असते. समर्थ पुढे म्हणतात की, प्रभु रामचंद्रांची भक्तिभावाने पूजा करावी. त्याच अष्टौप्रहर भजन करावं. त्याचा आश्रय घ्यावा. तरच श्रीरामाचे चरण आपल्या हृदयात उमटतील. आपल्या मनात विवेक सतत जागा हवा. अनाचारी वृत्ती सोडून द्यायला हवी. कुणाचाही हेवा करण्याची आणि आपण कुढत बसायची वृत्ती सोडून द्यायला हवी. कुणाचाही द्वेष किंवा मत्सर करू नये, तरंच मन शांत राहातं आणि ते शांत मनच प्रभु श्रीरामचंद्रांच स्मरण चिंतन करू शकतं. भयमुक्त, द्वेषरहित मनच परमेश्वरी चिंतनात दंग होऊ शकतं. समर्थ म्हणूनच म्हणतात की, प्रातःकालापासूनच श्रीरामाच्या चिंतनात मन दंग करावं. त्यातच संपूर्ण आनंद साठला आहे. ____________________________
मच्छिन्द्र माळी, छत्रपती संभाजीनगर.
मो. नं. 8830068030