" नाम श्रेष्ठ.. नाम श्रेष्ठ "
या मृत्यू लोकी प्रपंच्यात गुरफटलेल्या जीवाची रात्रंदिवस सुख मिळविण्यासाठी धडपड चाललेली असते. शेवटी सुख म्हणजे तरी काय ? आपल्या मनातला दुःखाचा, द्वैत संकल्पनांचा संपूर्ण काळोख नष्ट होणे म्हणजे सुखाची पहाट होणे. त्यासाठी अंतःकरणात भगवंताचं अधिष्ठान हवं. सूर्याला जवळ केल्याशिवाय अंधार कसा नष्ट होणार? सूर्य म्हणजे ज्ञान. ज्ञानाचा उदय झाला की, काळोख नष्ट होतो. ज्ञानमार्गाने भक्तीचा कळस जवळ केला की, सुखाची बरसात व्हायला वेळ लागत नाही.पापांच्या राशींच्या राशीं जाळण्याची ताकद नाम भक्तीत आहे.त्यासाठी सर्वस्वाने भगवंताच्या चरणी निष्ठा प्रेमपूर्वक अर्पण तर करायला हवी. देहाची सुख ज्याला हवी त्याला परमसुख कशात आहे हे शेवटपर्यंत कळत नाही. विषाचे कांदे पिळून रस काढणारे, तो पिणारें लोक अमृत म्हणून पितात. त्यातच त्यांना सुख वाटते. तेच अमृत म्हणून प्याला तर कोणी कधी अमर होईल का ? विषाचा कांदा तुम्हाला केवळ मरणच देईल. त्या रसाला अमृत म्हटल्यामुळे त्यात अमृततत्व कधी साठून येत नाही.याउलट शुद्ध भावाने व निष्ठेने भगवन्ताचे नामामृत सेवन केलें तर निश्चितच जीवांचे कल्याण होईल. नामाने सर्वं पापांचा नाश होतो. भगवन्ताचा विसर पडणे हे सर्वात मोठे पाप आहे. नाम सातत्याने घेत राहिले तर भगवंताचे स्मरण टिकून राहते. नाम हे वेडापेक्षाही श्रेष्ठ आहे. कसे ते पहा, वेदाद्ययनापासून लाभ मिळण्यासाठी चारी वेदांचा अभ्यास करणे जरूर आहे. त्याकरिता वेळ आणि श्रम लागतात. नामजपाला श्रम पडत नाही. अगदी सहज हे घडते. दुसरे म्हणजे वेदाचा अधिकार सर्वं लोकांना नसून समाजातील काही ठराविक वर्गालाच (जातीला) वेदाद्यायनाचा अधिकार आहे. नाम घेण्याचा समस्त मानवजातीला अधिकार आहे. वेदांच्या मंत्राचा आरंभ ॐ कारानेच होते म्हणून वेदा आरंभी देखील नामच आहे. नाम हे तीर्थाटणापेक्षाही श्रेष्ठ आहे. मनुष्याच्या अंतरंगात बदल होण्या साठी तीर्थ यात्रा करावयाची असते. पण त्यासाठी श्रम घ्यावे पडतात. द्रव्य खर्च करण्याची ऐपत, प्रकृती स्वास्थ्य ई. गोष्टी अनुकूल असाव्या लागतात. नाम हे मात्र घरी दारीं, कामात, रिकामपणात घेता येते. नाम चिंतनाने घरी बसून देखील अंतरंग बदलण्याचा सुखद घेता येतो. नाम हे साक्षात सरळ भगवंताकडे पोहचविते. नामाने भव रोग म्हणजे संसार ताप, भौतिक ताप वगैरे त्रितापांची आपसूकच बोळवणं होते. भव म्हणजे विषय भोग. विषयांची आसक्ती असणे. हा सर्वं रोंगाचा पाया आहे, मूळ आहे. दुःखाचे मूळ विषयासक्ती मध्ये आहे. आणि नामाने ती अगदी सहज गळून पडते. शिवाय भगवंत हा आनंद रूप असून त्याला नामाने एकदा घट्ट धरले कीं त्या ठिकाणी दुःख कसे राहू शकेल?
शेवटी सुख म्हणजे मनातला परमेश्वर भक्तीचा सुखद गारवा. तो मिळविणे फार महत्वाचं. समर्थ रामदास मनाला उपदेश करतांना मनाला उद्देशून सांगत आहेत की, हे सज्जन मना, जिथे परमसुख साठलेले आहे, तिथेच तू आदरपूर्वक लक्ष घाल. विषाचे (विषयांचे) कांदे हे सुखाचे कधीही सुखनिधान होऊ शकत नाही. त्यासाठी तुला अमृताचा शोध घ्यायला हवा. आणि ते अमृत तर तुझ्या जवळच (पाशीच) आहे. निर्मळ, निर्मोही अंतःकरणाने परमेश्वरी शक्तीशी अनुसंधान बाळग. तुला त्या सुखाची एकदा का चव लागली की मग मानवी देहावरचं तुझं लक्ष आपोआप उडून जाईल. विवेक जागा ठेव, अशुद्ध कल्पना पालटून टाक आणि श्रीरामरायाच्या चरणांशी तुझी दृष्टी स्थिर कर. तो राघव आकाशापरी निळाभोर होऊन तुझ्यापाशी वस्तीला आला की सुखाच्या अमृतात तू पोहायला लागशील. त्या कृपाघन राघवाच्या नाम स्मरणामुळे प्राण्या तु हा भवसागर अगदी सहज तरुन जाशील यात तिळमात्र शंका नाही.प्रभु श्रीरामरायला तू तुझं सारसर्वस्व अर्पण कर. त्या निळ्याभोर राघवाचें निळेपण तुझ्या मनभर झाले की केवळ सुख तुला मिळेल, फक्त राघवाच्या सहवासात सतत राहा.
____________________________
मच्छिन्द्र माळी, छत्रपती संभाजीनगर.