The nectar of the saints - 2 in Marathi Spiritual Stories by मच्छिंद्र माळी books and stories PDF | संतांची अमृत वाणी - 2

Featured Books
Categories
Share

संतांची अमृत वाणी - 2

"वितंडवाद्याची कहाणी"

                 

      जगातली अनेक साधने जरी पाहिली तरी त्या सर्व साधनांची पहिली पायरी ही, की मनुष्याला त्याचे अवगुण दिसू लागणे. जसजसे साधन वाढत जाईल तसतसे आपल्यातले अवगुण प्रखररूपाने दिसू लागतात, आणि त्या अवगुणांचा पुढे डोंगरच वाटू लागतो. 'हे परमेश्वरा ! इतक्या अवगुणांनी मी भरलेला असताना, तुझे दर्शन व्हावे अशी मी कशी अपेक्षा करू ? एवढया पर्वतप्राय अवगुणांच्या राशीतून मला तुझे दर्शन होईल हे कालत्रयी तरी शक्य आहे का ?' असे वाटू लागते.

साधन करण्यापूर्वी, रागीट माणूस कधी त्या रागाची खंत बाळगत नाही; किंबहूना, तो अवगुण आहे हे मुळी त्याला पटतच नाही. तो म्हणतो, 'व्यवहारात असा दरारा पाहिजेच; त्याशिवाय कसे चालेल ?' एक साधक     म्हणाला की, 'अलीकडे मला फार राग येऊ लागला आहे.' वास्तविक, तो राग आताच येऊ लागला असे नसून पूर्वीपासूनच त्याच्याजवळ होता, परंतु साधन करू लागल्यापासून त्याला जाणीव होऊ लागली आहे, किंवा क्रोध वाईट आहे हे आता त्याला कळू लागले आहे, इतकेच !

एक लग्नाचा मुलगा होता. त्याने बऱ्याच मुली पाहिल्या, पण एकही त्याच्या मनास येईना. त्याचे आईवडील कंटाळून त्याला म्हणाले, ' तुला मुलगी पसंत पडू दे, मग आम्ही पुढचे काय ते ठरवू.' ते काही मुलगी पाहायला बरोबर जात नसत. त्या मुलाची मोठी बहीण होती तीच त्याच्याबरोबर जात असे. एका ठिकाणाहून मुलगी पाहून आल्यावर मोठया बहिणीने त्याला विचारले, 'कशी वाटली रे तुला हीं मुलगी?' त्यावर तो म्हणाला, 'नाही बुवा आपल्याला पसंत.' मोठी बहीण चाणाक्ष होती; तिने बरोबर आणलेल्या पर्समधून आरसा काढून त्याच्या तोंडासमोर  धरला आणि विचारले, 'या प्रतिबिंबापुढे कशी काय वाटते ?' तेव्हा स्वतःचे आणि मुलीचे रूप त्याच्या ध्यानी आले, आणि तो म्हणाला, 'पुष्कळ बरी आहे.' सारांश, जिथपर्यंत आपल्याला स्वतःचे खरे दर्शन होऊ शकत नाही, तिथपर्यंत दुसऱ्यांचे अवगुणच आपल्याला दिसतात. आपल्याला दुसऱ्यांचे जे काही अवगुण दिसतात, त्यांचे बीज आपल्यातच आहे, हे माणसाने ठाम ओळखले पाहिजे. तेव्हा, दुसऱ्याचे अवगुण पाहण्याची वृत्ती आपण प्रथम टाकून दिली पाहिजे.

दुसऱ्याचे अवगुण पाहणे हा साधा नेहमीचा व्यवहार आहे, तो परमार्थ नव्हे. खरा परमार्थी जो असतो तो सतत आत्मपरीक्षण करीत असतो. त्याला दुसऱ्याचे अवगुणच दिसतात.

         अशा माणसांना सतत दुसऱ्याशी वाद घालण्याची सवय लागलेली असते. काहीतरी सतत विधानं करायची आणि त्यातून शब्दाला शब्द वाढवत न्यायचा. अशा वाद घालणाऱ्या लोकांना आपण खूप हुशार आहोत असा स्वतःपुरता एक समज झालेला असतो. सर्व काही मला ज्ञात आहे आणि आपण सर्व अज्ञ आहात, हा त्यांचा स्वतःपुरता समज झालेला असतो. यातूनच वादविवाद निर्माण होतात. समोरचा माणूस सज्जन असेल, संत वृत्तीचा असेल तर तो अशा माणसांशी काहीच संवाद साधत नाही. कारण  बेजबाबदार विधानं करीत सतत वितंडवाद घालणाऱ्या माणसांशी सुसंवाद होऊच शकत नाही. हे संतप्रवृतीच्या लोकांना कळते. त्या वाद घालणाऱ्या माणसाला हे कळत नसते. मग होते काय की, चिखलात पाय रुतून जावेत तसे ह्या वाद घालणाऱ्या माणसाला हे कळत नसते. त्याच्या अंगावरच सारे वितंडवाद येत राहातात आणि तो मग हळूहळू खचत जातो. परमात्म्याशी संवाद तुटल्यामुळेच हे सारे घडत असते. अशा लोकांचे शेवटी काय होते यासंबंधी समर्थ सांगत आहेत. समर्थ म्हणतात, की एकदा का परमेश्वरप्राप्तीचा निदिध्यास सुटला की माणसाचं मन सैरभैर होतं. त्याला काही कळेनासे होते. वादमार्गाने तो आडमार्गात घुसतो आणि मग आपल्या कर्तव्याचा रस्ता चुकून बसतो. यातून तो अधिक खचत जातो. हरलेल्या माणसात संताप आणि क्रोध पटकन जागा होतो. ती त्या पराजयाची तीव्र निशाणीं असते. अशीच माणसं सज्जनांच्या पंक्तीत बसून वाद खेळतात. तिथे त्यांची एकट्याची शब्द लढाई सुरू होते. कोणीच प्रत्युत्तर देत नाही. त्यातून तोल सुटत जातो. त्यामुळे अंतःकरणात शोक निर्माण होतो. त्या शोकाचे पर्यावसान संतापात होते. यामुळे तो सुखच हरवून बसतो. सुखाचं आयुष्य हरवून बसतो.  मनात मग भेद निर्माण होतात. त्यातून मग हलगर्जीपणा येतो. हा परमेश्वरप्राप्तीचा निदिध्यास सुटल्याचा परिणाम असतो. त्यातून भगवंताच्या अस्तित्वाची जी तीव्र जाणीव अगोदर होती ती समूळ नष्ट होते. तो निरीश्वरवादी होतो आणि या जगात परमेश्वर नाही याची तो हाकाटी सुरू करतो. त्याचे ते वेड्यासारखे बोलणे सुज्ञ लोक ऐकून घेत नाहीत, त्याला दुजोरा देत नाहीत आणि मग अशी वादविवाद करण्यात तरबेज असणारी माणसं असमाधानी राज्याचे स्वामी होऊन बसतात. मनातले निश्चय वितळायला लागतात आणि अविश्वासाच्या खोल अंधारात  ते आपोआप लोटले जातात. ही कहाणी भीषण आहे. त्याची जाणीव समर्थांनी करून दिली आहे

. समर्थ सांगतात कीं, मी -तुं पणाच्या द्वैतवादाची  वितडवाद्यांची (अभक्तांची)हीं कहाणी कथन करून सामान्य जणांना उपदेश केला आहे कीं, तुम्ही असे जगू नका. सतत परमेश्वराच्या नामस्मरणात गुंग भाविक जणांना उपदेश करतात......!                                                                                  ----------------------------------------                                               मच्छिन्द्र माळी, छ. संभाजीनगर.