********१०***********************
           मंदोदरीचा विवाह झाला होता व आता ती सुखात होती. कारण तिच्या पट्टराणी बनल्यानं प्रजा सुखी होती. परंतु ते सुख तिला पचत नव्हतं. तर तिला ते सुख दुःखच वाटत होतं एकप्रकारचं. जे दुःख तिला सहन होत नव्हतं.
         मंदोदरीला दिवसभर काही वाटत नव्हतं. जेव्हा ती प्रजेत मिसळत असे. परंतु जेव्हा रात्र असायची व विभीषण तिच्या महालात नसायचा. तेव्हा ती एकाकी असायची. तेव्हा आठवायचा तो वेदनादायी काळ. ज्या काळात तिनं बरंच दुःख भोगलं होतं. असाच तो प्रसंग आठवला तिला. तो सुलोचनेच्या बाबतीतील होता. ज्यात मेघनादाचा वध लक्ष्मणानं केला होता व त्यांच्या परिवाराला ती गोष्ट माहीत व्हावी म्हणून त्याचा उजवा हात कापून त्याच्या पत्नीकडे पाठवला होता. 
          लक्ष्मणानं कापलेला तो हात, ज्यावेळेस सुलोचना यज्ञ करीत होती. तिथे येवून पडला होता. तेव्हा त्या हातानं सुलोचनेला संकेत दिला होता की मी मेघनादाचा उजवा हात असून  मेघनादनं या जगातून निरोप घेतला आहे. परंतु तो संकेत सुलोचनाला समजला नाही व तिला त्याबद्दल आश्चर्य वाटलं. वाटलं की हा हात गैरपुरुषाचाही असू शकतो. तेव्हा मी या हाताला कसा स्पर्श करु. तिनं त्या हाताला स्पर्श केला नाही. त्यानंतर त्या हाताचं परीक्षण केलं व तो हात मेघनादाचाच आहे हे लक्षात आल्यावर राजवैद्यानं सुचना दिली की तो हात मेघनादाचाच आहे. आपण ताबडतोब पावलं उचलायला हवी. परंतु ती पावलं उचलणार. तोपर्यंत उशीर होवून गेला होता.
          मेघनाद मंदोदरीचा जीवलग पुत्र. तो सर्वात मोठा होता आणि तेवढाच शुरवीरही. कारण त्याच्या जन्माच्या वेळेस सर्व ग्रहांना रावणानं लाभस्थानातच आणलं होतं. ज्यातून त्याचा जन्म झाला होता. तसाच त्याचा जन्म जेव्हा झाला. तेव्हा मोठ्यानं वीज कडाडली होती. त्यावरुन त्याचं नाव मेघनाद ठेवलं गेलं. त्यात संकेत मिळाला होता की हा पुत्र तरुण होईल. तेव्हा अतिशय बलशाली निघेल. अन् तसं घडलंही. तो पुत्र जेव्हा मोठा झाला. तेव्हा त्याच पुत्रानं इंद्रालाही जिंकून टाकलं होतं. शिवाय तेथील अप्सरा सुलोचनालाही मोहीत करुन तिच्याशी त्यानं विवाह केला होता. ज्यातून त्याला नाव मिळालं होतं इंद्रजीत.
            मंदोदरीला आठवत होतं त्या हाताचं परीक्षण. ज्यावेळेस राजवैद्यानं त्या हातात कलम दिली. तेव्हा त्या हातानंच लिहून दिलं की तो हात लक्ष्मणानं कापलेला आहे. तेव्हा लक्षात आलं की तो हात मेघनादचाच आहे. मंदोदरीला आठवत होतं सुलोचनेचं सतीपण. सुलोचनेला सतीपणाचा वरदान मिळालेला होता. ज्यातून तिनं इच्छा केल्यास तिचा पतीही जीवंत होवू शकत होता. तेच भय होतं सुग्रीव व वानरसेनेला. ज्यावेळेस ती आपल्या पतीचं कापलेलं मस्तक रामाला मागायला गेली. 
          सुलोचनेनं आपल्या पतीच्या हातात लेखनी देवून प्रमाणित करायला लावलं होतं की तो कापलेला हात मेघनादचा आहे. त्याच हातानं सांगीतलं होतं की मेघनादही मरण पावलेला असून त्याचं मस्तक रामाजवळ आहे. परंतु रामाजवळ मस्तक गेलं कसं? त्याचं कारण होतं, मेघनादला प्राप्त असलेलं वरदान. ज्यावेळेस मेघनादनं ब्रम्हाची तपश्चर्या केली होती. तेव्हा त्याच्या तपश्चर्येवर प्रसन्न होवून ब्रम्हानं त्याला दर्शन दिलं. म्हटलं की मी तुझ्या तपश्चर्येवर खुश असून तू हवं ते वरदान मागावं. अर्थात अमरत्वावर उपाय मागावा. तेव्हा इंद्रजीतानं असं ज्ञान मागीतलं की ज्यातून मृत्यू येणार नाही. परंतु असं ज्ञान ब्रम्हदेव इंद्रजीतला देणार कुठून? त्यांनी वरदान दिलं की त्याचं मस्तक जेव्हा धुळीत मिळेल. तेव्हा तो जीवंत होईल. याचाच अर्थ असा की त्याला प्राप्त असलेलं ज्ञान हे जेव्हा जगाला समजेल. तेव्हा त्याला अमरत्व प्राप्त होईल. 
          ब्रम्हानं त्याला वरदान दिलं व वरदानस्वरुप सांगीतलं की त्याचं मस्तक जर जमीनीवर पडलं तर तो जीवंत होईल. तसाच दुसराही उपाय होता. तो म्हणजे सुलोचनाच्या सतीत्वाचा. तिनं जर विचार केला असता तर तो जीवंतही होवू शकला असता. 
            मंदोदरीला आठवत होतं सुलोचनेचं विचार करणं. सुलोचना विचार करीत होती की मी जर त्या मस्तकाला रामाकडून आणून ते धडाला लावून जीवंत केलं तर....... तर ते मस्तक जीवंत होवू शकते. तसं आठवत होतं मंदोदरीला तिचं रावणाकडे येणं व रावणानं तिला परामर्श देणं. आपल्याकडे कटून आलेला हात हा आपल्या पतीचाच आहे हे माहीत झाल्यावर व आपला पती हा मरण पावलेला आहे, हे माहीत झाल्यावर, तसंच त्याचं मस्तक रामाकडे आहे हे माहीत झाल्यावर ती रावणाकडे आली. त्यांच्यासमक्ष तिनं पदर पसरला व विनवणी केली की त्यांनी रामाकडे जावं आणि आपल्या पतीचं मस्तक त्यांच्याकडून मागून आणावं. कारण तिला इंद्रजीतला जीवंत करायचंय. परंतु त्यावर रावण विचलीत झाला. तद्नंतर तो म्हणाला,
           "राजसा, मी त्या तुच्छ माणसासमोर झुकणार नाही. मग माझा मुलगा का असेना. अगं माझी एवढी मुलं मरण पावलीत. माझा भाऊ कुंभकर्ण मरण पावला. परंतु मी त्याची पर्वा केली नाही. अन् मला हेही माहीत आहे की मीही मरणारच आहे रामाच्या हातून. परंतु मी शरणागती कशी पत्करु. मी जर शरणागती पत्करली तर तो माझा अपमान असेल. या राज्याचा अपमान असेल. अन् माझ्या या तमाम राक्षसजातीचा अपमान असेल. जी राक्षस जात आजपर्यंत आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आलाय. हं, तुला एक उपाय सांगेल. तू रामाकडे जा. तो आदर्श आहे. तो नक्कीच तुला तुझ्या पतीचं कटलेलं मस्तक परत करु शकेल."
           रावणाने म्हटलेले शब्द. ते शब्द सुलोचनेनं ऐकले. तशी ती विचलीत झाली. तिला त्यांचा राग आला. त्याचबरोबर तिला स्वतःचाही राग आला. अन् राग आला त्या संपुर्ण राक्षसकुलाचा. वाटत होतं की असाही कुल. जो स्वाभिमानासाठी कुणापुढं झुकायला तयार नाही. प्रसंगी मरण पत्करतो. असाही हा कुल की जो स्वाभिमानासाठी लढतच राहतो. परंतु या स्वाभिमानाला या जगात कोणतेच स्थान नाही. यापेक्षा मेलेलं बरं. मी सती गेलेली बरी. तसंही या जगात जीवंत राहून काय उपयोग आहे. अन् याच राक्षसकुळातील माझ्या पतीलाही जीवंत करुन काय उपयोग आहे. त्यापेक्षा माझ्या पतीच्याच मस्तकासोबत आपण स्वतः सती जायचं. 
           सुलोचना जेव्हा रावणाकडं गेली. तेव्हा तिनं आपला निर्णय बदलवला. तिला आता वाटायला लागलं होतं की आपण रामाकडे जावं. आपल्या पतीचं मस्तक मागावं व सती व्हावं. त्यांना जीवंत करुच नये. कारण त्यांना जीवंत करणं देखील त्यांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचविल्यासारखं होईल. कदाचित माझे सासरे रावण मरण पावल्यानंतर माझे पती हे राक्षसकुळ चालवतील. कदाचित तेही लढाई स्वाभिमानासाठी सुरु करतील. अन् त्या गोष्टीत मलाही भागीदार बनवतील. ज्यात स्वाभिमान असला तरी जीवहत्या आहे व ते पापच होत असते. मी असं होवू देणार नाही. ना स्वाभिमान वृद्धींगत होईल राक्षसजातीचा. ना त्यांच्या हातून जीवहत्या होईल. अन् ही जीवहत्या म्हणजे स्वाभिमान कसला? ते पापच. घोर पापच. आपले अस्तित्व टिकविण्यासाठी जीवहत्या करणं पापच. ते माझ्या पतीव्रतेपणाला शोभत नाही. मी सतीच जाणार. त्या माझ्या पतीच्या मस्तकाबरोबर. तेच योग्य राहील.
             तिचा तो विचार. तोच ती रामाकडे गेली. त्यांना तिच्या पतीचं कटलेलं मस्तक मागू लागली. त्यांना आर्जव करु लागली. परंतु त्यावर राम तिला म्हणाले,
            "सुलोचना, तू जर हे मस्तक नेवून त्या इंद्रजीतला जीवंत करणार नसशील तर मी हे मस्तक देतोय."
            सुलोचनेला रामानं विचारलेले शब्द. त्यावर उत्तर देत ती म्हणाली,
             "राम, मी आता कंटाळलेय राक्षसजातीत राहून. अन् मलाही वाटते की माझा पतीही जीवंत राहू नये.  ह्या राक्षसकुळाला व येथील जीवनाला मी कंटाळलेय."
          तिचं ते रामासमोर बोललेले शब्द. त्या शब्दात ताकद होती. तशी ती अप्सरा, त्यातच ती एक पतीव्रता स्रीही. अशी अप्सरा आणि पतीव्रता स्री की ती जे बोलायची. ते सत्य व्हायचं. ती बदलवायची नाही शब्द. सत्य वचन बोलायची. बोलायची अन् तेच करुन दाखवायची. ती ताकद होती तिच्यात.
           ते तिचं बोलणं. त्या बोलण्यावर विश्वास करुन राम सुग्रीवला म्हणाले,
            "सुग्रीव, ते इंद्रजीतचं मस्तक देवून टाक या सुलोचनेला."
             सुग्रीवनं रामाचं बोलणं ऐकलं. त्यातच त्याला आश्चर्य वाटलं. आश्चर्य वाटलं की हे मस्तक राम कसे काय सुलोचनेला देत आहेत. ती पतीव्रता स्री जर आहे, तर ती जीवंत करणारच आपल्या पतीला. तसं सुग्रीवनं बोलूनही दाखवलं. त्यावर राम म्हणाले. म्हणाले की ती असं कधीच करणार नाही. कारण एक पतीव्रता स्री जे तेच बोलते, जे ती करते. तिनं आपल्याला सांगीतलं की तिला तिच्या पतीचं मस्तक हवंय. त्यावर ती त्याला जीवंत करणार का, असं विचारलं असता ती म्हणाली की मी असं काहीच करणार नाही. मला या राक्षस जातीचा वीट आलाय. आता मी माझा पती इंद्रजीतच्या मस्तकासोबत सती जाणार आहे. म्हणूनच मला मस्तक हवं आहे. म्हणूनच ते मस्तक तिला दिलं. रामाने म्हटलेले शब्द. परंतु त्या शब्दावर सुग्रीवचा विश्वास बसला नाही व तो म्हणाला,
         "भगवन, मला माफ करा. परंतु सुलोचना ही पतीव्रता स्री नाही आणि ती आपल्या पतीलाही जीवंत करु शकणार नाही असे मला वाटते. हे आपणासही माहीत आहे. मग हे मस्तक एवढं सांभाळून ठेवण्याचा विरोधाभास कशासाठी होता?"
           ती सुग्रीवची शंका. ती शंका एका पतीव्रता स्रीवर होती. ती शंका एका पतीव्रता स्रिची खिल्ली उडविणारी शंका होती. ज्यात सुग्रीवचा राग सुलोचनेला आला. तसे राम बोलले,
           "सुग्रीव अशी पतीव्रता स्रिची निंदा करणं बरोबर नाही. अन् जर सुलोचनेनं चाहलं तर ती एका क्षणात तुला भस्मसात करु शकेल. ती एका क्षणात या इंद्रजीतच्या मस्तकालाही हसवू शकेल."
           "हो काय? असं जर आहे तर सुलोचनेनं हसवूनच दाखवावं आपल्या पतीच्या या मस्तकाला."
            ती एका पतीव्रता स्रिची चेष्टा. तशी रामानं सुलोचनेला विनंती केली. म्हटलं,
            "हे सुलोचनादेवी. माझे वानर बांधव हे अज्ञानी आहेत. त्यांना कळत नाही की ते काय बोलतायेत. त्यांना माहीत नाही एका पतीव्रता स्रिची शक्ती काय असते ते. तेव्हा तू सात्विक आहेस व यांना दाखवून दे तुझं पतीव्रतेपण. जरा यांनाही अक्कल यायला हवी की एक पतीव्रता स्री. तिनं विचार केला तर ती आपल्या पतीलाही जीवंत करु शकते. जर त्यांना तुझ्यातील शक्ती माहीत झाली तर उद्या हे कोणाचीही कधीच टिंगलटवाळकी करणार नाहीत." 
           पतीविरहाचं दुःख असलेली अभागी सुलोचना. तिला इंद्रजीतचं मस्तक रामानं तिच्या स्वाधीन करताच बरं वाटलं. शिवाय रामानं केलेली विनंतीही तिला योग्यच वाटली व तिनं त्याच वानरराज सुग्रीवला धडा शिकविण्यासाठी म्हटलं,
          "हे माझ्या पतीदेवा, मी जर खरी पतीव्रता स्री असेल आणि केवळ तुझीच भक्ती केलेली असेल तर तू या सर्वांना हासवून दाखव."  
         ते सुलोचनेचे शब्द. ते तिच्या मृत पतीच्या मस्तकातील कानात शिरले. त्यानं ते ऐकले. तद्वतच एक चमत्कार झाला व इंद्रजीतचं मस्तक खदाखदा हसू लागलं होतं. ते पाहून वानरराज सुग्रीव रामाला म्हणाले,
           "भगवन, आपण मला माफ करा. माझं चुकलंच. मी विनाकारण सुलोचनेवर शंका केली."
          सुग्रीवनं रामाला केलेली प्रार्थना. ती रामानं ऐकताच राम सुग्रीवाला म्हणाले,
           "सुग्रीव महाराज, माफी जर मागायची असेल तर मला नक मागू. माफी या सुलोचनेला मागा. तीच तुम्हाला माफ करु शकते."
           सुग्रीवानं रामाचे बोलणे ऐकले व तो सुलोचनेच्या चरणावर नतमस्तक झाला. म्हणाला,
            "हे देवी, तू मला माफ कर. मला एका पतीव्रता स्रिची शक्ती माहीत नसल्यानं मी तसं बोललो." सुग्रीवानं माफी मागताच सुलोचना बोलली.
            "उठा वानरराज सुग्रीवजी. ज्याचेवर प्रारब्धच कोपलं. तो कोणाला कसा माफ करेल. उठा आणि फक्त आपलं कर्तव्य तेवढे करा. मला राग नाही लक्ष्मणाचाही. ज्यानं माझ्या पतीची हत्या केली. त्यांनी फक्त आपलं कर्तव्य पाळलं. आता माझं कर्तव्य आहे, माझ्या पतीला या संसारातून मुक्ती देणं. त्याचबरोबर स्वतः मुक्ती मिळवणं. ते माझे कर्तव्य मला पार पाडू द्या. मला निघू द्या."
            रामानं ते ऐकलं. त्याचबरोबर त्यांनी तिला जाण्याची आज्ञा दिली.