Death Script - Part 2 - Chapter 3 in Marathi Thriller by Dr Phynicks books and stories PDF | डेथ स्क्रिप्ट - भाग 2 - अध्याय 3

Featured Books
Categories
Share

डेथ स्क्रिप्ट - भाग 2 - अध्याय 3

अध्याय ३ 
-------------
धोका 
----------

रात्रीचे जवळपास २ वाजत आले होते. तिघांचे जेवण झाले होते. त्यांनी बिल पे केले आणि तिघांनी ठरवले की प्रयोगशाळेत परत जाऊयात. 
डॉ. फिनिक्स, कर्नल विक्रम सिंग आणि रिया मल्होत्रा गाडीत बसले.

नैनितालच्या त्या टेकडीवरील शांत रस्त्यावर विक्रमची गाडी वेगाने धावत होती. रेस्टॉरंटमध्ये जेवण झाल्यानंतर ते तिघे परत प्रयोगशाळेकडे निघाले होते.

कर्नल विक्रम सिंग गाडी चालवत होता, पण त्याचे लक्ष फक्त आरशातून मागच्या सीटवर बसलेल्या डॉ. फिनिक्स यांच्याकडे होते. सैनिकी प्रशिक्षणामुळे विक्रमला कोणाच्याही देहबोली आणि हावभावावरून लगेच समजत असे की समोरचा व्यक्ती काहीतरी लपवत आहे किंवा मोठ्या तणावाखाली आहे. डॉ. फिनिक्स यांची बैचेनी आणि चेहऱ्यावरील विचलित भाव त्याला स्पष्टपणे दिसत होते.

मागे बसलेले डॉ. फिनिक्स त्यांच्याच विचारात मग्न होते. त्यांच्या डोक्यात अजूनही तो गुप्त मेसेज फिरत होता, "तुझ्या टीम मध्ये एक विश्र्वासघातकी आहे. तो विश्वासघातकी कोण आहे, याचा विचार कर. कारण तोच तुला हरवणार आहे."

त्यांना अजूनही विश्वास बसत नव्हता की त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंगात साथ देणारे कर्नल विक्रम किंवा पत्रकार रिया निशासाठी काम करू शकतात. 

रिया, जी नेहमीच सत्यासाठी लढणारी धाडसी अशी पत्रकार होती आणि विक्रम, जो एक प्रशिक्षित, देशाभिमानी सैनिक होता.

पण त्यांच्यापैकी एक जण निशासाठी काम करत होता? यावर त्यांना विश्वास बसेना.

पण निशाचा विश्वासघात आठवून त्यांची शंका बळावत होती. 

'एकदा ठेच लागलेला माणूस पुढील वेळी अधिक सावध गतीने चालत असतो.' हे तत्त्वज्ञान त्यांच्या मनात घर करून बसले.

बराच वेळ कोणीही एक शब्द बोलले नाही. 

थोड्या वेळाने गाडी प्रयोगशाळेच्या दाराजवळ पोहोचली. विक्रमने गाडी थांबवली आणि तो बाहेर आला. बाहेरची थंडी खूप होती. 

“डॉक्टर, आपण आत जाऊया. EMP हल्ल्यामुळे सिस्टीम ऑफलाईन असली तरी, आपण प्रयोगशाळेत अधिक सुरक्षित आहोत,” विक्रम म्हणाला.

डॉ. फिनिक्स आणि रिया गाडीतून खाली उतरले, पण डॉ. फिनिक्स यांनी आत जाण्याऐवजी गाडीजवळच थांबण्याचा त्या दोघांना इशारा केला.

डॉ. फिनिक्स यांनी विक्रम आणि रियाकडे पाहिले. त्यांच्या मनात आता त्यांना कोणतीही शंका ठेवायची नव्हती. "थांबा, कर्नल."

डॉ. फिनिक्स ने ठरवून टाकले की या दोघांना पण त्या मेसेज बद्दल सांगायचे आणि खरं खोट काय आहे ते यांच्याकडूनच ऐकायचं.

डॉ. फिनिक्स यांनी त्यांच्या फोनमधील तो मेसेज उघडला आणि थेट त्या दोघांना दाखवला.

तो मेसेज बघून दोघेही थक्क झाले. त्यांच्या चेहऱ्यावरील गोंधळ आणि आश्चर्य स्पष्टपणे दिसत होते.

"मला वाटते की आपण आता इथे सुरक्षित नाही," डॉ. फिनिक्स शांतपणे पण गंभीरपणे म्हणाले. "निशा आणि 'द शॅडो' ला आपल्या प्रत्येक हालचालीची माहिती आहे. आता आपण इथेच, या अंधारात बसूया आणि विचार करूया की आपल्या टीममधील विश्वासघातकी कोण आहे.”

रियाच्या चेहऱ्यावर तत्काळ रागाचा आणि दुखावलेपणाचा भाव आला.

“तुम्ही काय बोलत आहात, सर? तुम्ही आमच्यापैकी कोणावर तरी विश्वासघात केल्याचा आरोप करत आहात? आम्ही तुमच्यासाठी आणि 'क्रोनोस' साठी इतका धोका पत्करला!"

“हो,” डॉ. फिनिक्स यांनी शांतपणे म्हटले. "आणि मला वाटते की तो मेसेज मला आला होता. कारण 'क्रोनोस' आणि त्याची प्रत्येक माहिती फक्त मला माहित होती. मला माहित आहे की हा मेसेज आपल्याला गोंधळात टाकण्यासाठी सुद्धा असू शकतो, पण मी त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. आपल्या टीममधील विश्वासघातकी कोण आहे, हे आपल्याला शोधावे लागेल. अन्यथा, निशा तिच्या पुढील कटामध्ये यशस्वी होईल.”

त्या तिघांनी एकमेकांकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर संशय, भीती आणि गोंधळ स्पष्ट दिसत होता.
“पण पुरावा काय आहे?” रियाने विचारले. 

विक्रम शांतपणे गाडीच्या बोनेटवर टेकून उभा राहिला. त्याच्या डोळ्यांत संशय आणि विश्लेषण होते. "रिया, मला हेही माहित नाही की आपण एकमेकांवर विश्वास का ठेवतो, आपण तिघे एकमेकांना ओळखत पण नव्हतो. पण आता आपण एकमेकांवर संशय घेतला तर निशाचा खेळ यशस्वी होईल."

डॉ. फिनिक्स यांचे डोळे रिया आणि विक्रम दोघांच्याही चेहऱ्यावरील हावभाव टिपत होते. “विक्रम, रिया, मला माहित नाही हे खर आहे की नाही, पण तुमच्यापैकी कोणीतरी विश्वासघात करत आहे. आणि मला माहीत नाही तो कोण आहे. आपण आता कोणताही मूर्खपणा करणार नाही. आपण फक्त निशाची वाट पाहूया. ती नक्कीच आपल्यासमोर येईल.”


त्याच वेळी, दुसरीकडे एका गुप्त भूमिगत बंकरमध्ये, निशा आणि 'द शॅडो' चा प्रमुख त्यांच्या पुढील योजनेवर चर्चा करत होते.

“डॉ. फिनिक्सला तो मेसेज मिळाला आहे,” निशा विजयाच्या आत्मविश्वासाने हसली. “तो आता त्याच्याच टीममधील सदस्यांवर संशय घेईल. आपण त्यांना मानसिक स्तरावर कमकुवत केले आहे."

“आणि आता पुढे काय?” प्रमुखाने शांतपणे विचारले. त्याचा आवाज अजूनही गूढ होता.

“आता आपण 'क्रोनोस' च्या मूळ प्रोटोटाइपला ताब्यात घेऊया,” निशा म्हणाली. “डॉ. फिनिक्सला वाटत आहे की तो आपल्यासाठी एक सापळा रचत आहे. पण त्याला माहित नाही की तो माझ्याच जाळ्यात अडकणार आहे. त्याच्या टीममधील विश्वासघातकी व्यक्ती आपल्या बाजूने काम करत आहे."

प्रमुखाने डोके हलवले. “ही एक चांगली योजना आहे. पण ती यशस्वी झालीच पाहिजे.”

"नक्कीच," निशा म्हणाली. "कारण विश्वासघातकी व्यक्ती आपल्याला डॉ. फिनिक्सच्या प्रत्येक हालचालीची माहिती देत आहे. तो आपल्याला सांगेल की फिनिक्सचा सापळा कुठे आहे."


दुसऱ्या दिवशी सकाळी, प्रयोगशाळेत गेल्यानंतर डॉ. फिनिक्स, विक्रम आणि रिया यांच्यात एका मोठ्या वादविवादाने सुरुवात झाली. संशयाच्या वादळामुळे त्यांचे एकत्र काम करणे अशक्य झाले होते. विक्रम आणि रिया एकमेकांवर संशय घेऊ लागले. त्यांचे कडाक्याचे भांडण सुरू झाले. ते एकमेकांवर आरोप करू लागले.

विक्रमने रियावर थेट आरोप केला. "रिया, मला तुझ्या 'द शॅडो' बद्दलच्या ज्ञानावर संशय आहे. तुला त्यांच्या आर्थिक व्यवहारांबद्दल आणि तळाबद्दलची माहिती एवढी लवकर कशी मिळाली? तू पत्रकार म्हणून काम करत आहेस की निशाची गुप्त खबरी म्हणून काम करत आहेस?"

रियाने त्वेषाने त्याला उलट उत्तर दिले. "आणि तुझ्यावर मला जास्त संशय आहे, कर्नल! तू सैनिकी क्षेत्रात उच्च पदावर आहेस आणि तुझ्याकडे सरकारी सिस्टीमची माहिती आहे. मला तर वाटते निशाला सुद्धा तूच मदत केली असणार बाहेर पडण्यासाठी. निशा आणि 'द शॅडो' ला तुझ्या लष्करी ताकदीचा उपयोग करून घ्यायचा आहे."

ते दोघेही एकमेकांवर गंभीर असे आरोप करत होते. कोणीही कोणाचे ऐकायला तयार नव्हते. 

डॉ. फिनिक्सने त्यांना शांत करण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांचे प्रयत्न व्यर्थ ठरले. विश्वास आता पूर्णपणे तुटला होता.

“बस झाले आता. आपण आता एकत्र काम करू शकत नाही,” विक्रमने शांतपणे पण कठोरपणे म्हटले. “आपण वेगवेगळे काम करूया."

मी माझ्या सैनिकी टीमसोबत 'द शॅडो' चा मागोवा घेतो आणि तु रिया, तुझ्या पत्रकारितेच्या 'सोर्स' च्या मदतीने निशाला शोधायचा मार्ग पहा. किंवा तुला जे करायचे असेल ते कर." 

" हो मी बघते मला काय करायचे ते." रिया त्वेषाने म्हणाली.

ते तिघेही वेगवेगळ्या दिशेने निघाले. विक्रम ने त्याच्या सैनिकी क्षेत्रातील त्याच्या काही अगदी खास आणि विश्वासू असलेल्या त्याच्या मित्रांना सोबत घेतले. विक्रम त्याच्या टीमसोबत 'द शॅडो' च्या मागावर गेला, तर रिया तिच्या पत्रकाराच्या 'सोर्स' च्या मदतीने निशाला शोधू लागली. 

डॉ. फिनिक्स एकटेच, संशयाने प्रयोगशाळेत बसले होते. त्यांना वाटले की ते आता एकटे पडले आहेत, पण त्यांना माहित नव्हते की त्यांच्या टीममधील विश्वासघातकी व्यक्ती त्यांच्या प्रत्येक हालचालीवर काळजीपूर्वक लक्ष ठेवत आहे.

विक्रमने त्याच्या सैनिकी क्षेत्रातील अगदी खास आणि विश्वासू मित्रांना सोबत घेतले. आणि तो बाहेर पडला 'द शॅडो' ला शोधायला. त्याला त्याच्या खबरींकडून माहिती मिळाली की त्यांना कदाचित 'द शॅडो' चे एक गुप्त ठिकाण मिळाले आहे. त्यांना माहिती मिळाली होती की त्या ठिकाणी 'द शॅडो' चे काही सदस्य लपलेले आहेत. विक्रमने पूर्ण टीमसह त्या ठिकाणावर छापा मारायचे ठरवले. त्याला वाटले जर 'द शॅडो' चे सदस्य मिळाले तर 'द शॅडो' सुद्धा मिळेल. पण त्याला माहित नव्हते की ती माहिती निशाच्या 'डेथस्क्रिप्ट' ने तयार केलेली चुकीची माहिती होती.

कर्नल त्याच्या पूर्ण टीम सह त्या गुप्त ठिकाणी पोहोचला.
ते गुप्त ठिकाण म्हणजे एक रिकामी पडलेली, मोडकळीला आलेली जुनी इमारत होती. ती इमारत लोकवसाहतीपासून खुप दूर एकांतात होती. 
विक्रम त्याच्या टीम सह इमारतीच्या खाली पोहोचला. 

"ही सर्व इमारत आपल्याला नीट तपासायची आहे. सर्व मजले, एक एक कोपरा नीट तपासा." विक्रमने त्याच्या टीम ला आदेश दिला.

विक्रम त्याच्या टीम सह इमारतीमध्ये शिरला. विक्रम आणि त्याच्या टीम ने संपूर्ण इमारत तपासून काढली, पण कोणालाही काहीही सापडले नाही. 

“कर्नल, इथे काहीही नाही,” एका सैनिकाने सांगितले. “हि फक्त एक रिकामी इमारत आहे.”

हे ऐकून विक्रमला धक्का बसला. त्याच्या सैनिकी बुद्धिमत्तेने त्याला त्वरित इशारा दिला की तो फसलेला आहे. कारण त्याला त्याच्या खबरीवर पूर्ण विश्वास होता. त्याला कळले हे नक्कीच एक कारस्थान आहे. त्याने लगेच 
डॉ. फिनिक्सला फोन केला, पण त्यांचा फोन जाणूनबुजून बंद ठेवण्यात आला होता.

विक्रमला काहीतरी गडबड असल्याचा संशय बळावला. त्याने लगोलग त्याच्या टीमला सांगितले, " आपल्याला लगेच परत प्रयोगशाळेकडे निघायचे आहे, घाई करा." 

विक्रमने त्याच्या टीमसह प्रयोगशाळेकडे परत जाण्याचा निर्णय घेतला, जिथे डॉ. फिनिक्स एकटे होते आणि ती त्याच्या टीमसह प्रयोगशाळेकडे परत निघाला.


तिकडे, रियाला तिच्या सूत्रांकडून माहिती मिळाली की 'द शॅडो' चे एक गुप्त ठिकाण मिळाले आहे म्हणून. रिया सुद्धा एका जुन्या, दुर्लक्षित अशा इमारतीत पोहोचली. रियाकडे कोणतीही टीम नव्हती तिच्यासोबत येण्यासाठी म्हणून ती एकटीच गेली. तिला माहिती मिळाली होती की निशा तिथे आहे. पण तिला माहित नव्हते की ती माहितीही निशाच्या एका जाळ्याचा भाग होती. निशानेच ती माहिती रिया पर्यंत पोहोचवली होती.

रियाने संपूर्ण इमारत तपासली. तिला काहीही सापडले नाही. 

"हे काय चालू आहे. इथे तर कोणीच नाही." ती नाराजी आणि रागातच बोलली. ती हताश झाली. ती तिथून परत निघणार होती.
.
.
.

पण अचानक, तिच्या मागे एक आवाज आला.
“तू खूप उशीर केलास, रिया.”

रियाने घाबरून वळून पाहिले. तिच्या समोर निशा उभी होती. तिच्या चेहऱ्यावर एक क्रूर, शांत हसू होते.

रिया अचानक निशाला समोर पाहून घाबरली. पण स्वतः ला सावरत, 

“तू इथे काय करत आहेस?” रियाने कठोरपणे विचारले.

“मी तुझीच वाट पाहात होते,” निशा हसली. “तुला वाटले की तू मला पकडू शकशील? पण तू चूक आहेस.”

निशाने तिच्या हातातील एक छोटेसे, अति-आधुनिक, धातूचे यंत्र बाहेर काढले. ते यंत्र 'क्रोनोस' च्या मूळ प्रोटोटाइपचा एक छोटा, गुप्त भाग होता.

“हे काय आहे?” रियाने विचारले.

“हे माझ्या डेथस्क्रिप्टचा अंतिम कोड इन्जेक्ट करण्याचे यंत्र आहे,” निशा म्हणाली. “आणि आता त्याचा उपयोग मी तुझ्यावर करणार आहे.”

निशाने त्या यंत्राला सक्रिय केले. त्यातून एक लहानसा, पण शक्तिशाली इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स (EMP) बाहेर पडला, ज्यामुळे रियाच्या हातात असलेल्या सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे (मोबाईल, स्मार्टवॉच) क्षणात बंद पडली. आणि ते इतके गरम झाले की रिया ला त्याचे चटके हाताला बसायला लागले. रियाला काहीही कळले नाही. तिने लगेच ते सर्व काढून फेकून दिले.

“हे काय करत आहेस?” रियाने ओरडले.

निशाने तिच्या हातातील १ रुपयाच्या नाण्याएवढी एक बारीक मायक्रोचिप दाखवली. "ही मायक्रोचिप मी तुझ्या मानेवर इन्स्टॉल करणार आहे. त्या चिपमुळे तू फक्त माझ्यासाठी काम करशील. तू एक जिवंत कठपुतळी बनशील, जी फक्त माझ्या इशाऱ्यावर चालेल."

रियाने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण ती एका मोठ्या जाळ्यात अडकली. आत्तापर्यंत जी इमारत रिकामी होती त्याच इमारती मध्ये निशाचे गुंड आजूबाजूला लपून बसले होते, त्यांनी रियाला पकडले आणि एका खुर्चीवर बांधून ठेवले.

निशा रियाच्या दिशेने गेली. "काळजी करू नकोस रिया, तुला जास्त त्रास पण नाही होणार, तुला काहीही होणार नाही. मी तुला मारणार नाहीये, हे बघ, ही चिप.  ही चिप इंस्टॉल करण्यासाठी काही ऑपरेशन वगैरे नाही करावे लागत. ही चिप डायरेक्ट तुझ्या शरीरावर लावली जाईल. तुझ्या मानेवर लावणार आहे. आणि बस, मग काम झालं. फक्त तुला माझ्या मनाप्रमाणे वागवणारी कठपुतळी बनवणार आहे."

रिया तिथून निसटण्यासाठी आटापिटा करत होती. पण तिला खुर्चीवर बांधून ठेवले होते.

निशाने ती चिप रियाच्या मानेवर ठेवली. त्या चिपमध्ये अगदी केसांसारख्या बारीक चार सुया होत्या. त्या सुया रियाच्या मानेत शिरल्या. रिया असह्य वेदनेने आरडाओरडा करू लागली. पण काही क्षणांतच तिचा आवाज शांत झाला. ती चिप तिच्या मज्जातंतूशी (Nervous System) जोडली गेली होती.

ती चिप इंस्टॉल झाली होती.

तिच्या डोळ्यांतील धाडसी चमक नाहीशी झाली. तिचे डोळे शून्यात हरवल्यासारखे झाले. तिचा चेहरा भावनारहीत झाला होता. ती आता फक्त निशाची कठपुतळी होती.

निशाने तिच्या डोक्यातल्या विचारांना रियाच्या डोक्यातल्या चिपसोबत जोडले. "आता तू माझ्यासाठी काम करशील. आणि तूच डॉ. फिनिक्सला माझ्यापर्यंत घेऊन येशील."

रियाने शांत, यांत्रिक आवाजात मान हलवली. "ठीक आहे, मालकीण."

निशा हसली. "विक्रम आणि डॉ. फिनिक्सला वाटेल की तू त्यांच्या बाजूने आहेस. पण तू माझ्यासाठी काम करशील. तूच त्यांना हरवशील."

निशाने रियाला 'द शॅडो' च्या मुख्य तळ असलेल्या ठिकाणी घेऊन गेली. तिकडे 'द शॅडो' च्या प्रमुखाने रियाकडे पाहिले.

“ती आता आपल्या बाजूने आहे का?” त्याने विचारले.

“हो,” निशा हसली. “तिच्या मनात फक्त माझीच आज्ञा आहे.”

प्रमुखाने डोके हलवले. “चांगले आहे. आता आपल्याला फक्त डॉ. फिनिक्सची गरज आहे. त्याला आपल्यापर्यंत घेऊन ये.”

“मी त्याला घेऊन येते,” रियाने शांतपणे म्हटले.

एव्हाना कर्नल विक्रम त्याच्या टीमसोबत प्रयोगशाळेत पोहोचले होते. डॉ. फिनिक्स कर्नल वर विश्वास ठेवायला तयार नव्हते. त्यांना एक प्रकारचा संशय होता. आणि दुसरीकडे खात्री पण होती की कर्नल त्यांचा विश्वासघात नाही करणार. ते द्विधा मनस्थितीत होते.

निशाने रियाला एक फोन दिला. रियाने दिलेल्या फोनवरून लगेचच डॉ. फिनिक्सला फोन केला. जेव्हा कर्नलने काही वेळापूर्वी फोन केला, तेव्हा तो लागला नव्हता, पण आता रियाने फोन केल्यावर लगेच फोन लागला. हे सुद्धा निशाच्या यंत्रणेने केले होते.

“हॅलो सर, मी रिया बोलत आहे. मला एक अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली आहे. 'द शॅडो' चा तळ मला एका गुप्त ठिकाणी सापडला आहे. तुम्ही लवकर या.”

“मी तिथे लगेच येतो,” डॉ. फिनिक्सने म्हटले.

विक्रमने डॉ. फिनिक्सचा फोन स्पीकरवर असल्यामुळे ऐकला होता.

त्याला वाटले की रियाने खरोखरच 'द शॅडो' ला शोधले आहे. पण त्याच्या मनात असलेला मागील फसवणुकीचा लहानसा संशय त्याला स्वस्थ बसू देत नव्हता.

"डॉक्टर, तुम्ही तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. मला काहीतरी गडबड वाटत आहे." कर्नल ने रिया चा आवाज ऐकून त्याला आलेला संशय व्यक्त केला.

"नाही कर्नल. मी आता थांबणार नाही." डॉ फिनिक्स च्या मनात राग होता निशासाठी.

विक्रमने डॉ. फिनिक्सला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण डॉ. फिनिक्सने काही ऐकले नाही.

डॉ. फिनिक्स त्या गुप्त ठिकाणाकडे निघाले. पण त्यांना माहित नव्हते की त्यांची सर्वात मोठी शत्रू त्यांचीच टीम मेंबर होती, जी आता निशाची कठपुतळी बनली होती.

रियाने डॉ. फिनिक्ससाठी एक संदेश पाठवला: "मी तुमच्यासाठी एक मोठे सरप्राईज तयार केले आहे, डॉक्टर. मला आशा आहे की तुम्ही ते एन्जॉय कराल."

हा संदेश वाचल्यावर डॉ. फिनिक्सला काहीही कळले नाही. पण त्यांना माहित नव्हते की हे त्यांचे शेवटचे पाऊल आहे.

--------

रिया आता निशाची कठपुतळी बनली आहे, ती डॉ. फिनिक्सला कोणत्या धोक्यात घेऊन जाणार आहे? निशा आणि 'द शॅडो' चा खरा उद्देश काय आहे? डॉ. फिनिक्स त्यांच्या सापळ्यातून बाहेर पडू शकेल का? विक्रमला रियावरचा संशय खरा वाटणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे पुढील अध्यायात मिळतील का?

--------

ही कथा काल्पनिक असून केवळ कथेची गरज म्हणून काही ठिकाणांचा आणि व्यक्तींच्या नावाचा उल्लेख केला आहे. वाचकांनी या गोष्टीची नोंद घ्यावी.