जवळची शिल्लक तर सगळीच संपली होती .पुढे काय करायचे हे ठरवायला तिने ऑफिसमध्ये अर्ज देवून रजा वाढवून घेतली .तिचा पगार व्हायला अजुन पंधरा दिवस होते .आता या आकस्मिक खर्चासाठी तिला मैत्रिणीकडून थोडे पैसे उसने घ्यायला लागले . पैशाची अडचण आता कशी भागवायची असा विचार करताना .तिच्या लक्षात आले आपल्या हातात चार बांगड्या आहेत त्या गहाण ठेवून थोडे पैसे उभे करता येतील .संध्याकाळी ती काहीतरी कारण काढून घरातून बाहेर पडली आणि सोनाराकडे गेली .हातातल्या बांगड्या गहाण ठेवण्यासाठी तिने सोनाराला दाखवल्या .त्या हातात घेताक्षणी सोनाराने स्पष्ट सांगितले की ह्या खोट्या आहेत .हे ऐकुन ती थक्कच झाली ,शंका आल्यामुळे तिने मंगळसूत्र पण दाखवुन घेतले .तिच्या अंदाजाप्रमाणे तेही खोटेच निघाले . आता सोनार पण तिच्याकडे संशयाने पाहू लागला .अत्यंत निराश होऊन ती घरी परत आली .दुसऱ्या दिवशी तिने तिच्या साहेबांकडे तिने पुढच्या महिन्याच्या पगारातली उचल मागितली .साहेबांनी पण तिची परिस्थिती पाहून तिला उचल मंजूर केली .सध्यापुरता पैशाचा प्रश्न सुटला होता एकदाचा ...आता ती नयनाला घेऊन आपल्या घरी गेली .चार पाच दिवस घराकडे अगदी दुर्लक्ष झाले होते .थोडी साफसफाई करून तिने स्वयंपाकाची तयारी सुरु केली .नयनाला थोडे जेवायला घालायला हवे होते ,स्वतःही थोडे खावे असे वाटले तिला .आणि थोड्याच वेळात सतीश दारात येऊन उभा राहिला .म्लान चेहेऱ्याच्या सतीशला बघुन ऊमाला वाईट वाटले .सतीश आला तो अंघोळ करून आधी नयनाशी खेळायला लागला .नंतर लगेच जेवायला बसला,फार भुकेला वाटत होता तो .जेवण झाल्यावर ऊमाने इतके दिवस कुठे होतास असे विचारले .पण काहीच सांगायची त्याची तयारी नव्हती .सगळे ऐकू येत असून सुद्धा नुसता घुम्यासारखा नुसता बसून होता तो .बऱ्याच गोष्टींचा जाब तिने त्याला विचारला पण त्याने तिच्या कोणत्याच प्रश्नाला काहीच उत्तर नाही दिले .शेवटी तीच स्वतःशी धुमसत गप्प बसली. नंतर मात्र काही वेळाने सतीश तिच्याजवळ आला आणि फक्त माझे चुकले ,मी आता परत असा नाही वागणार एव्हढेच बोलत राहिला .आता ऊमा यावर काय बोलणार होती ? माफी मागणाऱ्या माणसाला माफ तर केलेच पाहिजे .ऊमा म्हणाली ,ठीक आहे मी जरी तुला माफ करायचे ठरवले तरी मला एक सांग हे जे माझ्या अंगावर लग्नाच्या वेळी दागिने घातले आहेस ते खोटे आहेत हे मला आता समजले आहे .का खोटे बोललास तु माझ्याशी आणि काका काकुंशी ?का अंधारात ठेवलेस तु आम्हा सगळ्यांना ?त्यावर तो तिरसटपणाने ऊमाला म्हणाला,“एवढ्याशा गोष्टीचा किती बाऊ करते आहेस ?काय चार दागिने खोटे निघाले इतकेच ना ?त्यासाठी इतकी का तडतड करते आहेस ?”हे सतीशचे बोलणे ऐकल्यावर ऊमा चकितच झाली .म्हणजे त्याची चूक झाली किंवा त्याने हे मुद्दाम केले ह्याची कबुली न देता तिच्यावरच तो डाफरत होता .काय म्हणावे या माणसाला असे विचार तिच्या मनात आले .तिच्या चेहेऱ्यावरचे क्रुद्ध भाव बघताच सतीश पुन्हा आरडा ओरडा करू लागला ..,” तु मला सांग मी कुठून आणणार होतो तुझ्यासाठी सोन्याचे दागीने ?माझ्याकडे कुठले असणार होते यासाठी इतके पैसे ?बरे लग्नात तुला दागिने घातले नसते तर तुझे काका काय म्हणाले असते मला ?आणि त्यांच्याकडे तरी कुठे पैसे होते लग्नात तुला दागिने करायला ?लग्नाचा सगळा खर्च तर मीच केला होता तेव्हा .आपल्या पुतणीला लंकेच्या पार्वतीच्या रुपात बघवले असते का त्यांना ?आणि तुझ्या अंगावर लग्नात काहीतरी दागिने घालायला हवेच होते ना .म्हणून मग मला हा पर्याय सुचला आणि मग मी तुझ्यासाठी असे दागिने घेतले .यात माझे काही चुकले आहे असे मला अजिबात वाटत नाही .तुझाच उगाच कांगावा सुरु आहे .नवर्यापेक्षा तुला दागिने महत्वाचे आहेत ना ..”हे सतीशचे असे बोलणे आणि त्याचा आवेश बघून ,,..नि:शब्द ऊमा त्याच्याकडे बघतच राहिली ..मग तिने सतीशला नयनाच्या आजारपणा विषयी सांगितले .तो म्हणाला ,इतकी आजारी होती नयना?तरीच म्हणले आमची प्रिन्सेस इतकी बारीक का वाटते आहे ?तुला नीट लक्ष नाही का ग देता येत नयनाकडे ?एवढी गोड एकुलती एक मुलगी तरी तुला तिची काळजी नाही का ग घेता येत काय झाल होते प्रिन्सेस तुला ?असे आजारी नाही पडायचे पिल्लू ..”माझी गोड गोड परी ती ...असे काहीतरी नयनाशी बोलत राहिला ..नयनाच्या आजारपणाचा सगळा दोष सतीशने उमाच्याच माथी मारला होता .नयना पण चार दिवसांनी बाबा भेटल्याने त्याला अगदी चिकटून खेळत होती . बाकी नयनाला कोणत्या दवाखान्यात ठेवले होते ?तिला नक्की काय झाले होते ?तिथे बिल किती झाले ?ते बिल तु कसे भागवले वगैरे विषयी एक अक्षर सुद्धा त्याने ऊमाला विचारले नाही .दुसऱ्या दिवशी जणू कालपर्यंत काहीच घडलेच नव्हते असे भासवत सतीश डबा घेऊन ऑफिससाठी बाहेर पडला .जाताना नयनाला काकुकडे सोडायला घेऊन गेला .यानंतर ऑफिस मध्ये जाऊन मोहनला भेटावे आणि हे सारे घडलेले सांगुन पैशाची काही व्यवस्था होते का ते पहावे असे तिला वाटले .पण ती ऑफिसमध्ये आली होती हे सतीशला नुसते समजले जरी असते तरी तिची खैर नव्हती ..आणि शिवाय त्या दिवशीच्या मोहनच्या बोलण्यात सतीशने ऑफिसच्या मित्रांकडून पण बरेच पैसे उसने घेतले आहेत हे समजलेच होते .त्यामुळे तो मार्ग तर आता पूर्णच बंदच झाला होता . असेच दिवस सरत होते ,प्रत्येक दिवस उमासाठी कठीण जात होता .त्य गुंडांनी दिलेली मुदत खरेतर कधीच संपली होती पण त्याविषयीची भीतीची टांगती तलवार मात्र अजुन तशीच होती .पुढे काय होणार याबद्दल काहीच समजत नव्हते .त्या पैशाची काय व्यवस्था झालीय हेही समजत नव्हते .कारण सतीश त्याविषयी काहीच बोलत नव्हता .अगदीच बेफिकीर होते त्याचे वागणे ..बरे ऊमाने काही विचारले तर सतीशचा आरडा ओरडा सुरु व्हायचा .काका काकूंना तर हे सांगण्यात काहीच अर्थच नव्हता . ती गुंड माणसे परत येऊन काय करतील याचा काहीच नेमच नव्हता .सगळेच अनिश्चित आणि भीतीदायक वाटत होते .ऊमाचा दिवस कसातरी कामात पार पडत होता पण रात्री तिला एक सेकंद पण डोळा लागत नव्हता .आणि एके रात्री परत सतीश पुन्हा बेपत्ता झाला .रात्र कशीतरी पार पडली ..सतीशची वाट पाहण्यात सकाळी मात्र उठल्यावर लगेच ऊमाने त्याच्या शोधासाठी बाहेर पडायचे ठरवले .मागच्या वेळची पुनरावृत्ती तिला नको होती . त्याचा शोध घेण्यासाठी सगळे आवरून नयनाला घेऊन ती निघतच होती ..इतक्यात ऑफिसमधली काही माणसे सतीशला शोधत घरी आली .मोहन पण होता त्यांच्यासोबतच .त्या सर्वांना पाहिल्यावर ऊमाच्या छातीत धस्स झाले .काय झाले असेल याचा अंदाज तिला येईना .बाकीची दोघे बाहेर थांबली होती मोहन मात्र आत आला .ऊमाला बाहेर निघालेली पाहून “तुम्ही कुठे निघाला ?असे मोहन म्हणाला क्रमशः