कथा क्र.११
भाग १ : प्रेमाचा धक्का - बंड्याची फजिती
फजिती एक्सप्रेस – प्रेमाचा धक्का ही कथा तीन भागांत सादर केली जाणार आहे. काही भाग 18+, खुसखुशीत, विनोदी आणि मसालेदार आहेत. प्रेम, फजिती, जवळीक आणि हास्याचा धमाका यामध्ये आहे.
गावातल्या चौकात एकच ठिकाण कायम गजबजलेलं असायचं. शंकरच्या टपरीवरचं चहाचं दुकान. सकाळपासून रात्रीपर्यंत तिथं बंड्या आणि राम्या यांची पक्की हजेरी. टपरीचा चहा जसा उकळायचा, तसंच बंड्याची प्रेमाची भाडी कायम उकळत असायची.
बंड्याचं आयुष्य म्हणजे एकदम ‘चहा आणि चुंबन’ मिशन.तो चहा ढोसत बसायचा आणि येणाऱ्या-जाणाऱ्या बायकामुलींकडे तोंड उघडून बघायचा. इतकी लाळ टपकायची की कधी कधी कुत्र्यालाही वाटायचं,“अरे हा माझ्या जातीतला तर नाही ना?”
राम्या नेहमी टिंगल करायचा.
"अरे बंड्या, तुझ्या आयुष्यात प्रेम नाही तर काही नाही. पण तुझ्या अंगातलं प्रेम जरा जास्तच उफाळून आलं तर लोक तुला ‘गावचा रोमिओ पोरकट’ म्हणतील!"
बंड्या मग आपला झापडलेला चेहरा दाखवत हसून म्हणायचा,
"मला फक्त एक मुलगी मिळाली पाहिजे, बाकी मी तिला देवासारखं जपेन."
पण खरं सांगायचं तर बंड्याच्या मनातला कामदेव म्हणजे वेगळाच.तो कामदेव मंदिरात घंटा वाजवत नाही, तर गच्चीवर उभा राहून रोज चुंबनं मागतो.तो कामदेव आरती करत नाही, तर झोपताना मुलीच्या मांडीवर डोकं ठेवून घोरतो.आणि तो कामदेव प्रसाद वाटत नाही, तर रात्री गुपचूप अंगाला चिकटतो.
राम्याने हे ऐकलं की तो ढसाढसा हसायचा.शंकर-टपरीवाला पलीकडून म्हणायचा,
"अरे बंड्या, एवढं प्रेम प्रेम करत बसलात तर एक दिवस चहाचं उधारीचं बिल ‘प्रेमपत्रा’त भरून द्यावा लागेल!"
आणि चौकातल्या सगळ्यांचा जोरात हास्य स्फोट फुटायचा.
एके दिवशी गावात नवी मुलगी आली.नाव सोनाली. केस असे रेशमी की वाऱ्याने उडाले की बघणाऱ्याला वाटायचं साबणाच्या जाहिरातीचं शूटिंगच चाललंय.डोळे इतके मोठ्ठे की बंड्याला वाटलं, “अरे देवा, यात मी पोहतच गेलो तर बुडून मरेन की काय!”चालताना तिच्या पायाचा टकटक असा आवाज यायचा, जणू नुपूरच लावलेत.
पण गावकरी मात्र कानावर हात ठेवून म्हणायचे, “नुपूर नाही रे बावळटा, ती टोकदार चप्पल आहे!”
अंगकाठी अशी की बंड्याच्या हृदयात धडकी भरावी.
त्याने पहिल्यांदा तिला बघितले, आणि सरळ नजरा तिच्या पृष्ठभागावर पाठीमागे वळल्या.
जीन्स इतका टाईट की शेजारच्या लोहाराला वाटलं, “अरेरे, एवढा फिट लोखंडी रिंग मी पण बनवला नाय!”टॉप हलका सरकलेला…बंड्याचा श्वास घशातच अडकला.
राम्याने लगेच दणकून टोमणा मारला.
"अरे थुंकी पुस रे! लोकांना वाटेल, भुकेला कुत्रा हाड बघतोय की काय!"
बंड्याने आपले ओठ हाताने पुसले आणि बावळटपणे हसून म्हणाला,
"राम्या… हीच ती! हीच माझी भविष्यातली बायको. हिला मिळवल की मी रोज गुलाब तोडून आणीन. तिच्या पायाशी टाकीन. आणि लग्नानंतर तर…"
राम्या मध्येच थांबवत खवचटपणे म्हणाला,
"हो हो, मला ठाऊक आहे! लग्नानंतर तू रोज तिच्या मागे गाढवासारखा धावशील! आणि ती बघेल तुझ्याकडे, जणू खुराड्यातला बैल ओला भुसा मागतोय!"
चौकातल्या टपरीवरचे लोक हसू लागले.
बंड्या मात्र स्वप्नाळू नजरेनं सोनालीकडे बघत म्हणाला,"देवा… ही मिळाली तर मी देवदास होणार नाही, थेट राजा होईन!"
त्या दिवसापासून बंड्याच्या दिनचर्येत फक्त एकच बदल झाला ,सोनाली दर्शन!बाकी आयुष्यात ध्येय, काम, नोकरी काहीच नाही.
सकाळी उठला की सर्वात आधी आरशात तोंड बघायचं.चेहरा बघून स्वतःच हसून म्हणायचा, “देवा, हा चेहरा बघून सोनाली प्रेमात पडली तर खरा चमत्कार होईल!”
त्यानंतर केसात तेल असं लावायचा जणू कसाईने कोंबड्याला मसाला चोपडला आहे.तेलाने केस इतके चमकायचे की सूर्यकिरण परत आकाशात जावेत.गावातले लहान पोरं त्याला बघून म्हणायची,“अरे बापरे, आरसा फिरतोय की बंड्या?”
मग यायचं त्याचं Fog मिशन!अर्धा डब्बा अंगावर फवारायचा.वास इतका जबरदस्त की रस्त्यावरून जाणारा बैलही गोंधळून उलट्या दिशेनं पळायचा.लोकं नाक दाबून पळत असत, पण बंड्या मात्र आनंदाने म्हणायचा,“आता सोनालीला माझा गुलाबासारखा वास येईन!”
त्यानंतर तो थेट सोनालीच्या रस्त्यावर थांबायचा.ती दिसली नाही तर त्याचा चेहरा असा व्हायचा की जणू टपरीवाला त्याच्या हातातून भजी-पाव हिसकावून गेला.आणि ती दिसली की लगेच डोळ्यांनीच “आय लव्ह यू, आय लव्ह यू” असा अभिनय सुरू व्हायचा.पण प्रत्यक्ष बोलण्याची हिंमत?शून्य.तो फक्त हात जोडून तिच्या मागे डोळे मिचकावून उभा राहायचा, जणू ती देवी आहे आणि तो भक्त.
राम्या रोज टिंगल करायचा .
"अरे बंड्या, असं डोळ्यांनी प्रेम केलं तर लग्न ठरलं की मंडपात तुला फक्त आरसा ठेवावा लागेल. तू स्वतःच्याच डोळ्यांना बघून ‘आय डू’ म्हणशील!"
गावकुसभर सगळ्यांचा ठहाका फुटायचा.बंड्या मात्र सोनालीकडे बघून विचार करायचा,"आज बोलतो… आज बोलतो…"पण शेवटी घरी परतून आईला खोटं सांगायचा."आई, Fog संपला म्हणून उशीर झाला!"
एकदिवस बंड्याच्या डोक्यात अचानक दिवा पेटला."मुलीला खुश करायचं तर गिफ्ट द्यावं लागतं."
पहिल्या दिवशी त्याने पंधरा रुपयांचं डेअरी मिल्क घेतलं. सोनालीला पुढे करत म्हणाला,
"हे घे, तुझ्यासाठी."
सोनाली हसली.बंड्याच्या पोटातली फुलपाखरं फडफडली, आणि तो स्वतःशीच म्हणाला,"झालं! हसली म्हणजे अर्धं प्रेम पडलं."
दुसऱ्या दिवशी तो फुलवाल्याकडे गेला.फुलवाल्याने विचारलं,
"किती गुलाब पाहिजे?"
बंड्या म्हणाला,"एकच. बाकी मी स्वतः काट्यात अडकलेलो आहे."
गुलाब घेऊन सोनालीला दिलं. ती पुन्हा हसली.बंड्या तिथून थेट चौकात धावत गेला आणि जोरात ओरडला.
"राम्या! आता ठरलं… ही माझ्यावर जीव लावते!"
तिसऱ्या दिवशी तर त्याने गिफ्टिंगची लेव्हल वाढवली.टपरीवरून अंडा भुर्जीचं ताट घेतलं, त्यात गुलाब ठेवलं आणि सोनालीसमोर केलं.लोकं बघून हसायला लागली,
"हे बघा! बंड्याचं भुर्जी-गुलाब स्पेशल लव्ह पॅकेज!"
राम्या डोकं धरून बसला.
"अरे बावळटा, आता लग्नाला तीला अंड्याच्या टरफल्या गिफ्ट करशील काय?"
गावभर आता चर्चा जोरात होती.कोणी म्हणायचं,
"बंड्याला मुलगी मिळणारच नाही. त्याचं डोकं खरंच फिरलंय."
तर कोणी चहाच्या टपरीवर मिचकावून म्हणायचं.
"सोनालीलाही भारी आवड आहे बहुतेक. नाहीतर भुर्जीवर गुलाब ठेवलं तरी हसली होती बघा!"
बंड्या मात्र गावभर धुंद फिरायचा.त्याच्या तोंडावर कायम सोनालीचं नाव.“सोनाली… सोनाली… सोनाली…”लोकांना वाटायचं एखाद्या पागल पोपटाने त्याला चावा घेतला की काय!
रात्री अंगणात पडून तो आकाशाकडे बघायचा.चंद्र पाहिला की हात जोडून म्हणायचा.
"चंद्रा, तू पण आज सोनालीसारखाच सुंदर दिसतोस."
त्याचे आई-बाप बिथरायचे.आई ओरडायची।
"अरे कामधंदा कर रे! नाहीतर लग्नाला कोण पोरगी देणार?"
बंड्या उलट आपला छाती ठोकून म्हणायचा,
"आई, बाईचं काम माझ्या सोनालीचं आहे. मला काही नको. मी तिच्या प्रेमावर जगणार."
वडील भिंतीवर टाळी मारून म्हणायचे,
"अरे, प्रेमावर जगायचं असेल तर भाकर भाजून बायकोला खायला दे, सोनालीला नाही!
शेवटी एक दिवस बंड्यानं मोठ्ठं धाडस केलं.सोनाली रस्त्याने जात असताना तो तिच्यासमोर आडवा उभा राहिला.घामाने शर्ट भिजून गेला, छाती धडधडायला लागली.
बंड्या थरथरत म्हणाला,"सो…सो…सोनाली… मी… मी तुला पाहिलं की…"
सोनाली हसून म्हंटली,"काय होतय तुला?"
बंड्या जवळजवळ कोसळलाच.
"माझं हृदय धडधडतं. मी तुझ्यावर प्रेम करतो!"
सोनाली दोन क्षण शांत राहिली.बंड्याचं हृदय थांबलं की काय असं त्याला वाटलं.
तो विचार करायला लागला. “आता ही ओरडेल, शिव्या देईल, किंवा मला चपलांनी मारेल.”
पण सोनाली मंद हसली.
"ठीक आहे… बघूया…"
एवढंच म्हणाली, आणि निघून गेली.
बंड्या तिथेच उभा राहिला.त्याला वाटलं जणू आकाश फाटलं, ढगातून गुलाबांची बरसात झाली आणि तो त्यात न्हाऊन निघाला.त्याने चौकात हात वर करून ओरडलं.
"राम्या! सोनाली म्हणाली ‘बघूया’… म्हणजे झालं काम! लग्नाचं निमंत्रण देऊन ठेव रे!"
राम्या जोरात हसून म्हणाला,
"अरे वेड्या, ‘बघूया’ म्हणजे काय कळतंय का? ती बघणार आहे, पण तुझ्या मागे नाही तर कुणा दुसऱ्याच्या मागे!"
पण बंड्याचं डोकं पूर्ण प्रेमाच्या भांड्यात बुडालेलं होतं.तो घरी जाऊन आईला सांगु लागला,
"आई, सोनाली तयार झालीये! आता लग्नाच्या तयारीला लाग!"
आई कपाळावर हात मारून म्हणाली,
"देवा, या पोऱ्याच्या डोक्यावर शहाणपण कधी पडणार?"
समाप्त
अक्षय वरक