Fajiti Express - 14 in Marathi Comedy stories by Akshay Varak books and stories PDF | फजिती एक्सप्रेस - भाग 14

Featured Books
Categories
Share

फजिती एक्सप्रेस - भाग 14

कथा क्र.०९: गडबडखेडचा व्हायरल व्हिडीओ

गावाचं नाव होतं गडबडखेड. नावाप्रमाणेच तिथे गडबड नसेल तर लोकांचं जेवणच उतरत नसे.एखाद्या दिवशी बैलगाडीत बैल ऐटीत बसून आराम करत आणि बिचारा मालक गाडी ओढत असे. गावकरी हसत म्हणायचे – “अहो, इथे माणूस बैल झाला आणि बैल माणूस!”शाळेत मास्टर इतका गडबड्या की विद्यार्थ्यांना गणित शिकवताना स्वतःचं नाव चुकीचं लिहायचा. एकदा तर खडूने फळ्यावर मोठ्ठं लिहिलं – “मीच चुकीचा आहे.” त्या दिवशी पोरं टाळ्या वाजवत वर्ग सुटल्यासारखे हसत पळाली.ग्रामसभा तर कायमच विनोदी होती. विषय काहीही असो – पाण्याचा, रस्त्याचा, शेतीचा – शेवटी ग्रामसभेचा शेवट एकाच वाक्यात व्हायचा – “चल, आता भांडण सुरू करूया!”

गडबडखेडचा सरपंच होता गबाळू गोटाळकर. भाषणात तो मोठ्ठ्या शपथा घ्यायचा. “गाव बदलू, गाव सुधारू, गाव उजळू!” पण दुसऱ्याच दिवशी तो दारूच्या दुकानात बसलेला सापडायचा. लोक हसत म्हणायचे, “हा गाव उजळवायला नाही, तर दारूच्या बाटल्या उजळवायला बसतो.”

पण गावाचं खरं आकर्षण म्हणजे सरपंचाची बायको – झगमगबाई गोटाळकर. तिच्या अंगावर सोन्याचे गजरे, गळ्यात मंगळसूत्र एवढं जाड की ते बघून कुणी विचारलं, “ताई, हे मंगळसूत्र आहे की लोखंडाचा साखळी कुलूप?” ओठांवर लाल लिपस्टिक एवढी चकाकत असे की गावातल्या पोरांना दिवसा देखील टॉर्च काढायची गरज नसे.बोलणं मात्र इतकं तिखट की गावकरी म्हणायचे, “ही बाई साधं वाक्यही बोलली की तोंडात मिरच्या फुटल्यासारखं वाटतं. झणझणीत मिरचीचं लोणचं जिवंत झालंय!”

गडबडखेडात एक भारीच इसम होता, दम्या दरवेळे.त्याचं टोपणनाव “दरवेळे” हे अगदी त्याला शोभणारं. कारण कुठलीही बाई दिसली की दम्याच्या हृदयात लगेच टुनटुन-टुनटुन घंटा वाजायच्या.लग्नसमारंभात पाहुण्यांची ओळख करून द्यायला सांगितलं तर तो सगळी मुलींची नावे लक्षात ठेवायचा, पण वराच्या नावाऐवजी “कुठल्यातरी शेजारच्या बाईचं नाव” घ्यायचा.

पण दम्याचं खरं स्पेशल प्रेम मात्र सरपंचाची बायको, झगमगबाईवर होतं.दोघांचं गुपित लफडं बरंच दिवस गावात कुजबुज म्हणून फिरत होतं.कधी झाडामागे उभं राहून दोघं बोलायचे, कधी देवळाच्या पायऱ्यांवर थांबून खिदळायचे, तर कधी शेताच्या बांधावर दम्या झगमगला गाणी गुणगुणायचा.गावकरी दूरून बघून टवाळ्या मारायचे –“आपल्या गावात वीज नाही रे, पण हे दोघं मात्र रोज करंट लावतात! आणि तो करंट असा, की ट्रान्सफॉर्मरच जळेल!”

गावातल्या शहाण्या पोरांना एक दिवस भारीच चान्स मिळाला. दम्या आणि झगमग एकांतात भेटले होते. पोरांनी हळूच झुडपामागून मोबाइल काढला आणि रेकॉर्डिंग सुरू केलं.

सीन असा दिसला, दम्या झगमगच्या डोक्यावरून केस सारतोय, ती खिदळतेय. एवढ्यात मागून एक शेळी उडी मारून थेट त्यांच्यात शिरली.

पण व्हिडिओत शेळीचा आवाज म्यूट झाला आणि असा भास झाला की दम्या-झगमग कुठलातरी “भलताच खेळ” खेळतायत.शेळी मागे हटल्यावर तर फ्रेम अजून गडबडली, दम्याचा हात झगमगच्या खांद्यावर, झगमग पोट धरून वाकलेली… सगळं सिनेमास्कोपमध्ये!

दुसऱ्या दिवशी सकाळीच तो व्हिडिओ WhatsApp वर *“ब्रेकिंग न्यूज”*सारखा फिरू लागला –“सरपंचाच्या बायकोचा सस्पेन्स व्हिडिओ!”

गावात जिकडे-तिकडे तोच क्लिप.पानपट्टीवाल्याने तर आपला मोबाईल दुकानातल्या टीव्हीला जोडला आणि जोरात प्ले केला.ग्राहकांना म्हणाला –“चहा घ्या हो, सोबत बोनस म्हणून झगमगबाईचा सिनेमा पण मिळतो!”

लोक पोट धरून हसू लागले. कुणी चहा सांडला, कुणी बीडी उलटी पेटवली.शाळकरी पोरं तर ओरडली –“अरे हा YouTube नाही, हा तर ZagmagTube!”

सरपंच गबाळू गोटाळकरच्या हातात जेव्हा पोरांनी तो मोबाईल दिला आणि व्हिडिओ प्ले केला, तेव्हा त्याच्या अंगावर अक्षरशः काटा आला.व्हिडिओत दम्या झगमगबाईचे केस सारतोय, ती खिदळतेय… गबाळूच्या तोंडून जोरात ओरड बाहेर पडली, “माझं गाव मी सांभाळू शकतो, पण माझी बायको… हिला तर दम्या सांभाळतोय!”

चौकात शेकडो लोक होते. कुणीतरी लगेच कॉमेंट मारली,“सरपंचा एकही प्रकल्प अजून पूर्ण झालेला नाही, पण दम्याचा प्रकल्प मात्र दररोज ऑनलाईन चालू असतो!”

गावकरी टाळ्या वाजवत पोट धरून लोळले.

कोणी शिट्टी मारली, तर कोणी ओरडला,“सरपंचा ‘स्मार्ट व्हिलेज’ नाही झालं, पण दम्यामुळे गाव ‘हॉट व्हिलेज’ नक्की झालंय!”

शेजारच्या आज्जीबाईसुद्धा आपला काठीवरचा तोल सांभाळत म्हणाल्या – “आमच्या काळी लफडं झाडामागे लपून व्हायची. आता बघा, व्हिडिओ बनून पानपट्टीवर दिसते. काय काळ आलाय बुवा! आमच्याकडे जर मोबाइल असते, तर आमची पण फिल्म सुपरहिट झाली असती!”

पण झगमगबाई काही साधी बाई नव्हती. ती अंगावर हिरवी झगमगती साडी नेसून चौकात थाटात उभी राहिली. एक हात कंबरेवर, दुसऱ्या हातात लिपस्टिक फिरवत म्हणाली –

“होय, माझं दम्याबरोबरचं प्रेम खरं आहे. पण तुम्ही पाहिलात ते सगळं तसंच खरं नाही… थोडं फिल्टर झालेलं आहे.”

लोकांचा गोंधळ उडाला –“फिल्टर म्हणजे काय गं?”कोणी म्हणालं, “चहा फिल्टर?” तर दुसरा ओरडला, “पाण्याचा फिल्टर का व्हिडिओचा?”

झगमग हसत केस झटकून म्हणाली – “अरे बावळटांनो, पोरांनी व्हिडिओत शेळी येतानाचा भाग कापून टाकला. त्यामुळे सगळं जरा गरमागरम दिसतंय. खरं तर ती शेळी दम्याच्या अंगावर पडली होती… पण तुम्हाला वाटलं, मीच पडलेय!”

हे ऐकून गावकरी उर फुटेपर्यंत हसू लागले. कुणीतरी ओरडलं –“बाई, तुमचं प्रेम आहे की शेळीपालनाचा धंदा?”

शेवटी गावात कितीही ओरडा झाला तरी निर्णय काही लागला नव्हता.सरपंच गबाळू संतापून घरी गेला आणि दारूची बाटली उचलून म्हणाला –

“हेच माझं खरं साथीदार!”

दम्या मात्र हसत-हसत पळून गेला. त्याच्या पाठीमागे पोरं ओरडली ,“दम्या भाई, भाग २ कधी येतोय?”

पण गावकरी थांबले नाहीत. रोज संध्याकाळी चौकात लोक जमून तोच व्हिडिओ पुन्हा-पुन्हा बघायचे आणि प्रत्येक वेळी नवा डायलॉग मारायचे.कोणी म्हणायचं – “गावात पाणी आलं नाही, पण व्हिडिओ मात्र ओसंडून आलाय.”कोणी म्हणायचं – “गावात रस्ता नाही, पण या व्हिडिओनं सगळ्यांच्या मोबाईलला शॉर्टकट दिला.”

शेवटी सगळे एकच वाक्य म्हणू लागले –“गावात विकास व्हायचा की नाही माहीत नाही… पण लफड्याचा व्हिडिओ मात्र नक्की व्हायरल होतो!”

आणि अशा रीतीने गडबडखेड गाव शेजारीपाजारी प्रसिद्ध झालं – रस्त्यामुळे नाही, शाळेमुळे नाही, तर सरपंचाच्या बायको आणि दम्या दरवेळेच्या भन्नाट व्हिडिओमुळे!

🎉 समाप्त 🎉

-अक्षय वरक