तीन झुंजार सुना
श्रेय  
मुखपृष्ठ चित्र               सौ. शिल्पा पाचपोर
लेखनास सहाय्य               डॉ. अनंत बिजवे
                           Adv. आनंद मुजुमदार.           
पात्र  रचना
 
श्रीपति पाटील                     कुटुंब प्रमुख, प्रगतिशील शेतकरी
कमला बाई                       श्रीपतरावांची बायको
प्रताप                            श्रीपतरावांचा मोठा मुलगा
निशांत                           श्रीपतरावांचा मधला मुलगा
विशाल                           श्रीपतरावांचा धाकटा मुलगा
मेघना                           श्रीपतरावांची मुलगी
सरिता                           प्रतापची बायको.
वर्षा                             निशांतची बायको
विदिशा                           विशालची बायको.
वासुदेवराव सुळे                    वर्षाचे वडील
विजयाबाई                        वर्षांची आई.
शिवाजीराव                        विदिशाचे  वडील
वसुंधराबाई                        विदिशाची आई  
आश्विन                          प्रताप आणि सरिताचा मुलगा
बालाजी आणि सदा                 शेत मजूर  
बारीकराव                         शेत मजूर
कृष्णा आणि राघू                  शेत मजूर
दाजी, रखमा आणि सुरेश            गोठ्यांची व्यवस्था पहाणारे मजूर.
रावबाजी                          ठेकेदार. बटाईदार.
रघुवीर आणि त्यांची गॅंग            परदेशी मजूर.
 
 
 
भाग २६         
भाग २५  वरून पुढे वाचा .................
“विदिशा, रावबाजीनी निशांतला दिलेली जखम अजून भळभळते आहे, तू त्यावर काहीही कारण नसतांना मीठ चोळले हे तुझं चुकलंच. तू त्यांची माफी माग.”
“सॉरी निशांत. माझी चूक झाली आहे, हे माझ्या पण, लक्षात आलंय. प्लीज मला माफ कर.” विदिशानी माफी मागून टाकली आणि विषय संपवला.
“उत्तम” बाबा पुढे म्हणाले “ आदल्या दिवसाच्या कामाचा आढावा आणि आजच्या दिवसाचं प्लॅनिंग यावर चर्चा करण्यासाठी आणि त्यानुरूप निर्णय घेण्यासाठी आपण रोज बैठक घेण्याचं ठरवलं आहे. ज्या कोणाला काही शंका असतील त्याचं निराकरण करण्या साठी सुद्धा ही बैठक आहे. आता निशांतला आपल्या योजनांबद्दल काही शंका आहेत. सरितानी त्याचं निरसन करण्यासाठी बराच प्रयत्न केला, पण अजूनही निशांतचं  पूर्ण समाधान झालेलं दिसत नाहीये. सरिता यावर तुझ्या जवळ याचं काही उत्तर आहे का ?”
“हो बाबा, प्रयत्न करते.” सरिता म्हणाली. “हे बघ निशांत काही अनुमान चुकलं किंवा काही विपरीत घडलं तर आपण रस्त्यावर येऊ अशी भीती तुला वाटते आहे होय ना ?
“हो.” – निशांत.
“नेमकी कशाची भीती तुला सतावते आहे हे सांगतोस का ?” – सरिता.
“हे बघ वहिनी” निशांत म्हणाला “ मला असं म्हणायचं आहे की, हा हर्बल चा प्रदेश आपल्याला नवीन आहे. ही पायाखालची वाट नाहीये. हा सगळा आयुर्वेदाचा धंदा आहे. आपल्याला त्या बद्दल काहीच माहिती नाहीये. केंव्हा त्यांची डिमांड संपेल किंवा खूप कमी होईल सांगता येत नाही, किंवा आपल्याला त्याची पूर्वकल्पना पण येणार नाही, अश्या परिस्थितीत नवीनच लोक भरडले जातात. पटतंय का ?”
“ठीक आहे. तुझी शंका रास्त आहे. आपण या क्षेत्रात नवीन आहोत. पटलं मला” सरिता थोडं थांबली. मग  पुढे म्हणाली “आता मी काय सांगते ते ऐक, बैद्यनाथ, डाबर, चरक, पतंजली, झंडू, सांडू, हिमालय, हमदर्द, अश्या कित्येक मोठमोठ्या कंपन्या गेली कित्येक दशके या व्यवसायात आहेत. या फक्त मोठ्या कंपन्या आहेत. छोट्या मोठ्या अगणित आहेत. माझ्या जवळ एक मोठी लिस्ट आहे. आपल्याला कस्टमर ची कमी नाहीये.”
“वहिनी, आपला आवाका किती, या कंपन्यांचा व्यापार किती, काही तुलना आहे का ? आणि त्या मोठ्या कंपन्या, आपल्याला कधी  आणि कश्या वाकवतील, हे काय सांगता येतं ? त्यांचं काही वाकडं  होणार नाही पण आपण तर संपून जाऊ.” निशांत म्हणाला.
“नाही निशांत, व्यापारामधे असं होत नाही. आपण जर, एकाच कस्टमर ला सप्लाय करत असतो, तर हा प्रॉब्लेम येऊ शकतो, पण आता आपण फक्त नागपूरच्याच कंपनीवर अवलंबून नाही आहोत. आम्ही, म्हणजे वर्षांनी आणखी काही कंपन्यांना भेटी दिल्या, आपल्या मालाचं सॅम्पल दाखवलं. तीन कंपन्यांनी ते अप्रूव केलं आहे आणि आपल्याला advance पण मिळाला आहे. माल सप्लाय करते वेळी, त्याचा दर्जा काय असावा, किती माल पाठवायचा, आणि केंव्हा पाठवायचा, या सगळ्यांचे करार झालेले आहेत. तू एकदा नजरेखालून घाल, म्हणजे तुला कळेल की तुझी भीती किती अनाठायी आहे ते.” सरितानी सविस्तर सांगितलं.
आता निशांतला विरोधात बोलण्या साठी काहीच विषय नव्हता. तो विचारच करत होता की सगळंच या बायकांनी केलं आहे मग आपण काय करायचं. आता तर वर्षांचं मार्केटिंग स्किल पण सिद्ध झालं होतं. म्हणजे आपण दुय्यम दर्जाचे नागरिक होणार की काय ? त्याला याच विचारांनी गोंधळल्या सारखं झालं होतं. तो गप्पच बसला. त्यानी काहीच प्रतिक्रिया दिली नाही हे बघून वर्षा म्हणाली की –
“आणखी अजून एक सांगायचं आहे. सांगू का ? निशांत ?”
निशांतनी मा डोलावली. मग वर्षा म्हणाली की “ ग्लोबल डिमांड ही जवळ जवळ ३५ ते ४० हजार टन मुसलीची आहे. आणि उत्पादन जेमतेम ५ हजार टनांचं आहे. त्यामुळे काहीतरी विपरीत होऊन आपण रस्त्यावर येऊ, असा विचार तू मनात पण आणू नकोस.  असं काहीही होणार नाही. पण त्याकरता आपल्या मालाची गुणवत्ता उत्तमच असायला पाहिजे. आणि मला सांगायला अभिमान वाटतो आहे की, आपल्या मालाची प्रत उत्तम आहे. पण ती तशीच कायम ठेवण्यासाठी त्याच तोडीचे कष्ट अपेक्षित आहेत.” वर्षा निशांतच्या प्रतिक्रिये साठी थांबली. आणि मग पुढे म्हणाली “ खरं म्हणजे आपण फक्त २० एकरच मुसळी साठी वापरतो आहे, त्या ऐवजी १०० एकर, मुसळी च्या लागवडीसाठी घ्यायला पाहिजे.” एवढं बोलून ती स्वस्थ बसली. आता सगळ्यांच्या नजरा निशांत कडे वळल्या.
“हूं, पटतंय मला सगळं पण अजूनही थोडी थोडी धाकधूक वाटते आहे.” – निशांत.
“निशांत” आता विशाल बोलला. “अरे नको टेंशन घेऊ. अरे या लोकांनी या टॉपिक वर इतका रिसर्च केला आहे, की त्यांचं कौतुक करावस वाटत. अरे आपण कधी एवढ्या अभ्यासाचा साधा विचार सुद्धा केला नाही आणि या लोकांनी शून्या पासून सुरवात केली. सर्वांनीच अथक आणि अपार परिश्रम घेतले, माहिती करून घेण्यासाठी. And not only that त्यांनी यशस्वी रित्या उत्पन्न पण घेऊन दाखवलं. आता परवाचीच गोष्ट घे, ज्या पद्धतीने यांनी रावबाजीला हॅंडल केलं आहे, त्यावरून तर यांच्या योग्यते बद्दल शंका घ्यायला वावच नाही. तू निश्चिंत रहा. जी काही कामं आपल्या वाट्याला येतील ती तितक्याच तत्परतेने जर आपण केलीत, तर कुठलाही अडथळा न येता  आपला सर्वांचाच उत्कर्ष निश्चित आहे अशी माझी खात्री आहे.”
“ठीक तर मग” आता सरितानी  पुन्हा सूत्र आपल्या हातात घेतली. म्हणाली “ आता पुढे आपण कामाचं बोलू.”
१)      “निशांत आणि विशाल, तुम्ही ताबडतोब कुंपण घालण्याच्या कामाला लागा. त्यासाठी किती आणि काय काय सामान लागेल त्यांची संपूर्ण यादी करा. आणि ते सामान घेऊन या. कुंपण कोण घालणार ते बघा. इंक्वायरी करा दोन-तीन कोटेशन घ्या, डिसकस करून, रेट फायनल करा आणि लगेचच काम सुरू करा.”
२)      “विदिशा, तुला आता ५ एकरात आपण काय केलं होतं ते सगळं माहीत आहे, तेच आता अजून २० एकरांसाठी करायचं आहे. कामाचा sequence आधी ठरव तो सगळं एका नवीन रजीस्टर मधे उतरवून काढ आणि त्या प्रमाणे कामाला सुरवात कर.”
३)      “वर्षा, तुला फायनॅन्स बघायचा आहे. फंड allocation कसं करायचं ते बघ. कोणतही काम पैशांसाठी थांबायला नको. प्रत्येक गोष्टीकडे आणि व्यवहाराकडे तुझी तीक्ष्ण नजर असली पाहिजे.”
४)      “सर्वांनी एक गोष्ट करा. काय काम करायचं आहे ते एका रजिस्टर मधे लिहून काढा आणि काय काम झालं ते दुसऱ्या मधे लिहा. नंतर आपल्याला बार चार्ट बनवायचा आहे आणि त्याप्रमाणेच सगळी कामं व्हायला पाहिजेत.”
५)      “कोणालाही, कसल्याही सामानाची जरूर पडली तर ते वेळेत आणून देण्याची जबाबदारी निशांत आणि विशाल सांभाळतील. सगळ्यांनीच आपापल्या कामात ढिलाई होणार नाही यांची खबरदारी घेणं आवश्यक आहे. आपल्याला अतिशय शिस्तबद्ध रीतीने काम करायचं आहे हे कायम लक्षात असू द्या. आराम करायला आता वेळ नाहीये. या वर्षी सगळं सेट झालं की पुढच्या वर्षी फारशी उस्तवारी करावी लागणार नाही.”
सगळं ऐकल्यावर निशांत म्हणाला “आम्ही कोणी, कोणी काय काम करायचं ते कळलं, पण वहिनी, तुझं काम काय याबद्दल काहीच बोलली नाहीस, हे कसं ?”
“अगदी करेक्ट बोललास निशांत तू. ही सगळी कामं वेळच्यावेळी होतात की नाही हे मी बघणार आहे. कुठलीही अडचण आली तर मलाच धावावं लागणार आहे. त्यामुळे मी सगळ्याच विभागात असणार आहे. मजुरांचा विभागही मीच सांभाळणार आहे. आणि गौ शाळा पण मीच बघणार आहे. आपण ५ एकरात भृंगराज पेरणार आहोत. आणि एका एकरात गूग्गूळ, ती सर्व जबाबदारी माझी असणार आहे. ही दोन्ही कामं नवीन आहेत, त्यामुळे त्यातही मला जवळ जवळ, पूर्ण वेळ लक्ष घालावं लागणार आहे. आणखीही बऱ्याच योजना आहेत मनात. पण त्यावर आपण नंतर सावकाश बोलू.”
मीटिंग संपली ? विदिशांनी विचारलं.
“हो. आजच्या पुरती संपली. जर कोणाला अडचण आली तर त्याकरता संध्याकाळी भेटू.” सरितानी समारोप केला.
 
क्रमश:..
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com
धन्यवाद.