तीन झुंजार सुना
श्रेय
मुखपृष्ठ चित्र सौ. शिल्पा पाचपोर
लेखनास सहाय्य डॉ. अनंत बिजवे
Adv. आनंद मुजुमदार.
पात्र रचना
श्रीपति पाटील कुटुंब प्रमुख, प्रगतिशील शेतकरी
कमला बाई श्रीपतरावांची बायको
प्रताप श्रीपतरावांचा मोठा मुलगा
निशांत श्रीपतरावांचा मधला मुलगा
विशाल श्रीपतरावांचा धाकटा मुलगा
मेघना श्रीपतरावांची मुलगी
सरिता प्रतापची बायको.
वर्षा निशांतची बायको
विदिशा विशालची बायको.
वासुदेवराव सुळे वर्षाचे वडील
विजयाबाई वर्षांची आई.
शिवाजीराव विदिशाचे वडील
वसुंधराबाई विदिशाची आई
आश्विन प्रताप आणि सरिताचा मुलगा
बालाजी आणि सदा शेत मजूर
बारीकराव शेत मजूर
कृष्णा आणि राघू शेत मजूर
दाजी, रखमा आणि सुरेश गोठ्यांची व्यवस्था पहाणारे मजूर.
रावबाजी ठेकेदार. बटाईदार.
रघुवीर आणि त्यांची गॅंग परदेशी मजूर.
भाग २३
भाग २२ वरून पुढे वाचा .................
वर्षा म्हणाली “ वहिनी तुम्ही अनाठाई चिंता करता आहात. एवढी माणसं आहेतच की आपल्या जवळ. गस्त घालण्यात काही अडचण येईल असं मला सुद्धा वाटत नाही.”
पण सरिता काही बोलायच्या आत, याचं उत्तर विदिशानी दिलं. “मला वाटतं की वहिनींच्या मनात काय चाललं आहे ते माझ्या लक्षात आलं आहे.”
“नेहमीच तू असं कसं म्हणतेस की तुला कळलं आहे म्हणून ? तू अंतर्यामी आहेस की काय ?” विशालनी थट्टेच्या सुरात म्हंटलं.
“नाही, पण मी सतत वहिनीच्या बरोबर असते ना, म्हणून मला पण आता त्यांच्या मनात काय चाललंय ते थोडं फार कळायला लागलय.” विदिशाने वार परतवला.
“असं ? मग कळू दे आम्हाला.” – विशाल. अजून विशाल थट्टेच्याच मूड मधे होता.
“मला जेवढं समजलंय त्यावरून सांगते, मुसळी आणि अश्वगंधा दोन्ही गोष्टींची फार काळजी घ्यावी लागते. त्या साठी माणसंच लागतात. दुसरं आपण भृंगराज लावणार आहोत, त्याला वर्षभर बऱ्याच काही गोष्टी कराव्या लागतात. आणि ..” विदीशाला निशांतनी मध्येच थांबवलं. म्हणाला-
भृंगराज ही वनस्पती आमच्या माहिती प्रमाणे, रानटी वनस्पती आहे आणि तिची काहीही काळजी घेण्याची जरूर नसते. आम्ही तर असंही ऐकलं आहे की मुख्य पिकांच्या मधे बऱ्याच वेळेला ही वनस्पती उगवते, आणि ज्यांच्या शेतात ही उगवते, त्या शेतातलं तण म्हणजे ही वनस्पती मजूर लोकं विनामूल्य काढतात आणि विकतात.”
विदिशाला हे माहीत होतं पण तिच्याजवळ समर्पक उत्तर नव्हतं. तिने सरिताकडे पाहिलं. आता सरिता समोर आली आणि म्हणाली “ मी सांगते, समजावून तुम्हाला. पण त्या आधी मला सांगा, तुम्ही दोघं कॉलेज मधे असतांना मेस मधे जेवायचे ना ?”
“हो, पण त्याचा इथे काय संबंध ?” विशाल.
“सरिता म्हणाली. “सांगते ना, कसं होतं तिथलं जेवण ?”
“एकदम बकवास” – निशांत.
“आणि आता घरी जेवता आहात, तर काय तुलना कराल ?” – सरिता.
“अरे, काय वहिनी, काय पण प्रश्न विचारला ! अग अशी काही तुलना होऊच शकत नाहीये. घरच्या जेवणाची सर मेसच्या जेवणाला कशी येईल ? – निशांत.
“करेक्ट. त्या जेवणांनी भूक तर भागली, पण पोषक द्रव्य किती मिळाली ते नाही सांगता येणार. पण घरच्या जेवणाचं तसं नसतं. तुम्हाला कशाची जरूर आहे ते पाहूनच स्वयंपाक केला जातो. आणि त्या साठी तुमच्या बायका अपार कष्ट घेतात, त्यामुळे घरचं जेवण चविष्ट तर असतच पण त्याच बरोबर, भरपूर पोषक द्रव्य तुम्हाला मिळतात. बरोबर आहे ना ? – सरिता.
“हो, बरोबर आहे, पण हे सर्व तू का सांगते आहेस ? आम्हाला याची जाणीव नाही, असं तुला वाटतंय का ?”- निशांतला कळतच नव्हतं की वहिनी हे का सांगते आहे ते.
“मला असं वाटलं होतं की तुम्हाला मतितार्थ लक्षात येईल म्हणून. पण ठीक आहे. उलगडूनच सांगावं लागेल असं दिसतंय.” सरिता म्हणाली.
“गुणवत्ता, निशांत क्वालिटी.” अचानक विदिशांनी सूत्र पुन्हा हातात घेतली आणि उत्तर दिलं. “मेस च्या जेवणाची क्वालिटी आणि घरच्या जेवणाची क्वालिटी यात जो फरक आहे तोच फरक तणा सारखी उगवणारी आणि मशागत करून उगवलेली वनस्पती यामध्ये आहे. यील्ड मधे खूप फरक असतो. हे यील्ड प्रयोग शाळेत तपासणी करून मगच निर्धारित केलं जातं. आणि त्यावरच किंमत ठरते. आणि यील्ड जर कमी आलं तर नुकसानच होणार न ? आता ही मशागत करण्यासाठी माणसं लागतील. पण रात्रीच्या गस्ती साठी ५-६ माणसं वेगळी काढावी लागली तर, दुसऱ्या दिवशी तेवढा वर्क फोर्स कमी होईल. आणि त्याचा परिणाम पिकांच्या गुणवत्तेवर होईल.”
“एवढं बोलते आहेस मग सांग तरी नेमकं काय काय करावं लागतं ते. आम्हाला पण कळू दे की, का नुसतीच पोपटपंची आहे. ” – विशाल.
“निशांत” सरिता बोलायला सुरवात करतच होती पण विशालनी मधेच थांबवलं.
“वहिनी थांबा विदिशालाच बोलू द्या. काय अभ्यास केला आहे, आणि काय योजना मनात आहे ते तरी कळू द्या आम्हाला.” विशाल अजूनही विदीशाला शेतीतलं काही समजतं, यावर विश्वास ठेवायला तयार नव्हता. साहजिकच विदीशाला राग आला पण ती शांतपणे म्हणाली –
“आत्ता पर्यन्त तरी हा अभ्यासच आहे. अजून प्रॅक्टिकल करायचं आहे. पण हीच परिस्थिती मागच्या वर्षी मुसळी बाबत होती आणि आम्ही त्या परीक्षेत पास झालो आहोत. त्यामुळे यावेळेस सुद्धा तसंच होईल याची खात्री आहे. आता योजना काय आहे त्या बद्दल, तर याची तयारी आम्ही खूप आधीपासून करत होतो. काय आहे, उत्तम प्रतिच्या औषधांसाठी वनस्पती सुद्धा उत्तमच लागते. आणि जमीन तयार करण्यापासूनच सर्व क्वालिटी सांभाळावी लागते. जमिनीत योग्य प्रमाणात रेती आणि खत मिसळावं लागतं.”
निशांतनी विदीशाला मध्येच थांबवलं. म्हणाला “काय वेगळं सांगीतलस तू. हे तर करावंच लागतं. पण एकदा केलं की मग फार उस्तवारी दरवर्षी करावी लागत नाही.”
“बरोबर आहे तुझं म्हणण” विदिशा म्हणाली “पण इथेच फरक आहे. चार गाड्या शेणखत, चार पोती युरिया आणि पोटॅश टाकलं की संपलं, असं इथे होत नाही. मुसळी साठी वेगवेगळी काही औषधं योग्य प्रमाणात मिसळून मग पूर्ण वाळलेलं आणि तयार झालेलं शेणखत जमिनीत मिसळून नीट पद्धतशीर वाफे तयार करावे लागतात. अश्वगंधाचं पण थोड्या फार फरकांनी तसंच आहे. पण हा सगळा प्रमाणाचा खेळ आहे. घटक द्रव्यांच योग्य प्रमाण आणि कालबद्ध कार्यक्रम आवश्यक आहे. भृंगराज चं तर अजूनच वेगळं आहे.”
“काय वेगळं आहे ?” – विशालचं कुतूहल आता जागृत झालं होतं. आधी त्याचा इगो दुखावल्या गेला होता, पण आता त्याची जागा आता, तिच्या बद्दलच्या कौतुकानी घेतली होती.
“ जमीन तयार करतांना भरपूर प्रमाणात खत, म्हणजे गोमूत्र, शेण, वाळलेली पानं, फूलं, कचरा आणि सांडपाणी मिश्रित माती. हे मिसळावं लागतं. हे खत भरपूर लागतं आणि सध्या तरी ते बाहेरून आणावं लागेल. मग बीज पेरून नर्सरी मधे रोपं तयार करायची आणि दोन-तीनदा त्यांची जागा बदलायची, मग फवारणी, खतं वगैरे करून दोनदा तोंडणी करायची. असा हा वर्षभराचा कार्यक्रम आहे. गुग्गुळाची शेती तर खूपच किचकट आहे, खूप सारी अवधानं सांभाळावी लागतात. त्याचा तर पाच ते सहा वर्षांचा काळ असतो. हा सगळा असा कार्यक्रम आहे. तुम्ही आमच्या बरोबर काम करा म्हणजे तुम्हाला पण कळून येईल. आज नुसतं ऐकून काही कळणार नाहीये.”
विदिशा एवढं बोलून थांबली. बाबांना एवढा आनंद झाला की त्यांनी टाळ्या वाजवलया . म्हणाले “ शाब्बास पोरी. शाब्बास.”
विदिशा पुढे म्हणाली “ या सर्व गोष्टींसाठी माणूस बळ लागतं. त्यामुळे जर गस्ती साठी माणसं वेगळी काढावी लागली तर कामं हवी तशी होणार नाहीत. म्हणून आम्ही या सर्व बाबींचा विचार करून वेगळाच उपाय करायचा विचार करतो आहोत. आणि तोच आत्ता तुमच्या समोर मांडायचा आहे. त्या बद्दल वहिनी सविस्तर सांगतील.”
विशाल म्हणाला “ निशांत जरा बाजूला येतोस?” आणि मग बाजूला जाऊन तो निशांतला म्हणाला “हे बघ या बायकांनी खरंच खूप कष्ट घेतलेले दिसताहेत. त्या शिवाय ५ एकरात ते सोनं पिकवू शकले नसते. आणि आता आपण ऐकलंच की किती जीव तोडून त्यांनी अभ्यास केला आहे ते. निशांत, आपण गेले वर्षभर नुसतीच मजा केली. काहीही काम केलं नाही, की नवीन व्यवसायाच्या दृष्टिनी सुद्धा काही हालचाल केली नाही. मला असं वाटतं की आता आपल्या विचारांना फाटा द्यावा आणि यांच्या बरोबर जावं. एवढं मोठं काम आहे आपली जरूर त्यांना लागणारच आहे. आपल्याच बायकांना आपण मदत नाही केली, तर तो आत्मघात ठरेल असं मला वाटतं. त्यापेक्षा त्यांच्या बरोबरीने कामाचा भार उचलून आपल्या सर्वांच्याच उत्कर्षात सामील होऊ. काय म्हणतोस ?”
“बरोबर आहे तुझं म्हणण” निशांत म्हणाला. आणि मग ते दोघ परत येऊन बसले. विशाल म्हणाला “वहिनी, सांगा तुमचा प्लॅन, आमची आता पूर्ण खात्री पटली आहे. आणि आता आम्ही पण तुमच्या बरोबर आहोत.”
क्रमश:..
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com
धन्यवाद.