पालख्याना ओढ पंढरीची -------------------------------- गाव लहान असो वा मोठे.. मंदिर कोणतेही असो भक्तीचा रंग चढलाय. मंदिरात सजावट सुरू आहे. हो.. आषाढी एकादशी जवळ आलीय. भक्तांना व्यवस्थित दर्शनाची तजवीज सुरु आहे. मंदिरातून माऊली तुकोबाचे अभंग ऐकू येत आहेत. आता पंढरपूरला दूरवरच्या आणि जवळच्या संतांच्या पालखी मार्गस्थ झाल्यात. नामप्रसारक संत गोंदवलेकर महाराजांची पालखीही पंढरपूरला मार्गस्थ झालीय. माझिया जातीचा मज भेटो कोणी आवडिची धनी पुरवावया माझिया जातीचा मजशी मिळेल कळेल तो सर्व समाचार संतु म्हणे येथे पाहिजे जातीचे येर गबाळाचे काम नाही "माझिया जातीचा मज भेटो कुणी" हे वाक्य व्यवहारात वारंवार वापरले जाते. पण हे कुणी लिहलेय ते अनेकांना ठाऊक नाही. 'जात' म्हणजे ज्यांच्या धार्मिक श्रद्धा, आचारविचार.. रुढीपरंपरा, चालीरीती, खानपान पद्धती एकसमान असतात, एकमेकांच्या विचारांशी.. भावनांशी ते सहमत असतात अशा घराण्यांचा समुह. वारी.. ज्यामध्ये सगळ्याच भक्तांची जात.. धर्म एकच असतो तो म्हणजे भागवत धर्म. मग या जातीचे लोक एकमेकांना भेटतात तेव्हा विचारणा होते ती विठ्ठल भक्तीचीच. संत जगनाडे म्हणतात की, अशा भक्ताशी मला चर्चा करायची आहे. इतर चर्चात अर्थच नाही. पण भौतिक जगाला विसरून विठ्ठल नामात दंग होणे हे येरागबाळ्याचे काम नाही.. त्यासाठी सच्चा भक्तच हवा. चाकण.. पुण्यातील एक ऐतिहासिक लढाईचे साक्षीदार गाव ज्याची ओळख आज औद्योगिक नगरी आहे. संत संताजी जगनाडे यांचे हे जन्मगाव. मावळ तालुक्यात सुदुंबरेत राहणारे हे संसारी सद्गृहस्थ. एकदा या गावात संत तुकाराम महाराजांचे कीर्तन ऐकून संताजी एवढे प्रभावित झाले की परमार्थासाठी प्रपंच सोडायला निघाले. पण तुकोबांनी समजावले की, परमार्थ हा संसार करुन साधता येतो. तुकोबांनी त्यांना संसार सोडण्यापासून परावृत्त केले. तुकोबांच्या कीर्तनात ते टाळकरी बनले. संताजींचे घराणे हे विठ्ठल भक्त. संताजींचे शिक्षण व्यवसायाच्या गरजेपुरते लिहता वाचता येण्याएवढे झाले होते. संत तुकोबा कीर्तनात वेळेवरच उत्स्फुर्तपणे अनेकदा अभंग रचना ऐकवायचे. टाळकरी संताजी जगनाडेंचेही कौशल्य असे की हे अभंग लगेचच त्यांना मुखोदगत व्हायचे. घरी आल्यावर हे सारे अभंग लिहून ठेवायचे. आज म्हणूनच संत तुकोबांचा अभंगाचा खजिना उपलब्ध झालाय. आता जगाला हेवा वाटावा असा संत तुकोबांच्या सहवासाचा लाभ झाल्याने संताजीं भक्तीमार्गात रमले. मग त्यांनी स्वतःही अनेक भक्ती रचना केल्या. संत जगनाडे म्हणतात की मनुष्य जीवन सुखी व्हावे म्हणून समाजात भक्तीची लाट आणली ती मार्कंडेय ऋषी.. विदुर.. वाल्मिकी, शबरी, अर्जुन, सुदामानी. ही लाट हृदयी स्थिरावायला हवी. भक्ती मार्गाची वाटचाल सुलभ व्हायला जसा विश्वास हवा.. श्रद्धा हवी तसेच या भक्ती मार्गाची अचूक वाट दाखविणारा (मार्गदर्शक) सद्गुरूही भेटायला हवेत. संताजी हे याबाबतीत भाग्यवान त्यांना गुरु लाभले ते तुकोबा. संत संताजी हे कुटुंब.. समाज आनंदी रहावा म्हणून उपदेश करतात की, क्षमा शांती जया नराचिये देही| तया कांही करीत नाही| जरि ही कोणाशी राग फार आला| तरि तुं धरिरे शांती फार | संतु म्हणे शांती ज्यांनी सोडियली | तेथे उडी आली यमाजाची | संताजी जगनाडे हे गुरुकृपेचे धनी. त्यांनी प्रवचने दिली.. कीर्तने पण केली. 'तेलसिंधु', 'शंकरदीपिका' हे ग्रंथही लिहलेत. गुरुकृपा तर एवढी की संताजींच्या इच्छेप्रमाणे अंतिम समयी स्वर्गस्थ तुकोबांनी येवून त्यांना दर्शन दिल्याची कथा पंढरपूर वारीत ऐकायला मिळते. अविश्वासाने भरलेल्या जगात कुणाबद्दल विश्वास निर्माण करणे.. तो सुद्धा आजन्म हे सर्वात अवघड कार्य. पण परमेश्वराप्रती विश्वासच नाही तर कमालीचे प्रेम.. आस्था.. जिव्हाळा निर्माण केलाय तो आमच्या संतानी. या विश्वासार्हतेनेच जगाचे व्यवहार आजही सुरळीत सुरु आहेत. आजही संत तुकाराम महाराज पालखी आणि ज्ञानेश्वर माऊली या मुख्य पालख्या व विविध स्थानाहून नाना संत पुरुषाच्या संत छोटया मोठया शेकडो पालख्या नद्याचे पाणी सागराकडे धाव घेते तशा पांडुरंगाच्या दिशेने धाव घेत आहेत व देवषयनी एकादशीला विठ्ठलाच्या चरणी लिन होतील. विठ्ठल भक्तांची ओढ, आतुरता वर्णन करतांना तुकोबां म्हणतात, त्यांना विठ्ठल भेटीची रात्रंदिवस ओढ लागलीय. त्या चकोराचे जीवन चंद्रावर अवलंबून. त्यासाठी जसा चकोराचा जीव व्याकुळ असतो.. आषाढी एकादशीला पंढरपूरला उसलेल्या अफाट जनसागरात विलीन होऊन विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होऊन वारकरी कृतकृत्य, धन्य होतात. !! जय जय रामकृष्ण हरी ‼
----------------------------------------------------------
मच्छिन्द्र माळी, छ. संभाजीनगर.
मो. नं. 8830068030.