Seven miles fourlogs road - 2 in Marathi Moral Stories by Prof Shriram V Kale books and stories PDF | सात मैल चार फर्लांग रस्ता - भाग 2

Featured Books
Categories
Share

सात मैल चार फर्लांग रस्ता - भाग 2

            सात मैल चार फर्लांग रस्ता - भाग २         

बापयांच्या फैलातले निम्मे गडी  सुरुंग घालूक  पाव हिश्शान गडी   फोड कामार नी उरलेले गडी नी  बायल मान्सा भर घालूक  ठेवायाची. माजो अंदाज दोन आणे दुकू चुकणार नाय. बाबल्याच्या अंदाजावर भाऊचा पूर्ण विश्वास होता. तो हातातल्या चोपडीत गड्यानी  केलेल्या अंदाजाप्रमाणे  नोंदी करीत होता. ही चर्चा होईतो साडेबारा होवून गेले होते. लांबून जेवणकरी  येताना दिसला. कामाचा अंदाज घेईतो  संध्याकाळ होणार याची कल्पना असल्यामुळे गड्यांसह सात जणांच जेवण घेवून गडी पाठवायची आगावू  व्यवस्था भाऊनी केलेली होती.

                आंब्याच्या  सावलीत बसूनतांदुळाच्या भाकऱ्या  काळ्या वाटाण्याची उसळ, खारातल्या मिरच्या नी दही   खाल्ल्यावर सगळ्यानी पान जुळवून जरा आराम केला. घटकाभर इस्वाटा घेतल्यावर धाकू थोटम म्हणाला. “ चला , लय लोळलास. काम बेगुन पुरा झाल्यार येळी लौकर घरा जांव.... तां परवडला .......रिक्यामा बसोन येळ मोडूचो नाय.” मंडळी  उतरणाला लागली. सूर्य मावळण्या पूर्वी  चवाठ्या पर्यंतच्या भागाची पहाणी करून  अंदाज बांधायचं काम पुरं झालं. बानघाटीच्या निम्मे उतारापासून गोडे कांदळ, सारिवले, अष्ट, कळंब अशी  सव्वाशेझाडं होती.  शेवटच्या  घसारीच्या  भागात चार ते पाच  ट्रकच  लोड होईल एवढी आईन किंजळीची  झाडं होती.गावदरीत  मळ्याच्या कडणीला  गड्याच्या वेंगेत मिळणार नाहीत एवढी पन्नासेक  उंडलीची  झाडं होती. रात्री  जेवून खावून झाल्यावर भाऊने  सगळी मांडावळ नजरेखाली घालून जमा खर्चाचा अंदाज बांधला. दोन दिवसानी  बाबल्या नी धाकु याना सोबत घेवून भाऊ  पुन्हा एकदा  कामाचा  संपूर्ण भाग फिरून मांडावळी  प्रमाणे  ताळमेळ घेवून आला.

           बापू पवाराना भेटून भाऊ घाट्यानी आपला खर्चाचा अंदाज दिल्यावर बापूनी त्याना इतर खर्चाची कल्पना दिली. मुख्य साहेब एकूण बजेटच्या १०% घेणार, त्या बाहेर काम पुरंहोईल तसतसा  पहाणी  अहवाल देण्यासाठी  येणाऱ्यांचे हात ओले करायचे  असे कामाबाहेरचे खर्चाचे  तपशिल त्यानी सांगितले.  या शिवाय सरकारी  हिशोब मिळेपर्यंत  कामगारांची मजूरी नी अन्य खर्च  भागवण्यासाठी प्रसंगी  व्याजाने पैसे घेवून व्यवहार पुरे करावे लागतात ती  बाबही  खर्चाचा अंदाज देताना गृहित धरावी  लागते. या गोष्टी भाऊना नव्यानेच कळल्या. या व्यवहारात मोठी जमेची बाजू होती ती म्हणजे लाकूड वहातूक करणे,  बोल्डर वहातूक    हे  परवाने बिन बोभाट नी  विना खर्चात मिळणार होते.कंत्राट  मंजूरीची  ऑर्डर मिळेल ती सोबत असली की  महाराष्ट्रभर कुठेही  अडचण आळी नसती. तसेच  बोल्डर फोडण्यासाठी  लागणारे सुरूंगाचे सामान म्हणजे  दारू  वाती यांचाही  परवाना विनासायास मिळणार असल्यामुळे या साठी  जादा पैसे द्यावे लागणार नव्हते. सगळा अंदाज घेवून  पक्के टेंडर तयार करून दोघेही  रत्नागिरीला जावून सायबाला भेटले.

                         टेंडर दिल्यावर  साहेबाने त्याना संध्याकाळी  बंगल्यावर येवून भेटायला सांगितले. संध्याकाळी साहेबाला भेटल्यावर अव्वल कारकूनाने भाऊच्या टेंडरमध्ये काही बदल सुचवले होते. खर्चाचे बजेट  दहा  हजाराने वाढवलेले होते. भाऊ या व्यवसायातनव्यानेच पडत असल्यामूळे  वरचा हप्ता आगावू  देण्याची आपली ऐपत नसल्याचे भाऊनी स्पष्टच सांगितल्यावर  त्यातले निम्मे कामाच्या  मोबदल्याचा पहिला हप्ता मिळाल्यावर  आणि उरलेले दुसरा हप्ता मिळाल्यावर द्यायचे ठरले. व्यवहार पक्का करून ते बाहेर पडले. दुसरे दिवशी  सरकारी नियमाप्रमाणे  विहीत नमुन्यात  प्रस्ताव करून तयार होता. त्यावर सह्याकरून तोसादर केल्यावर  “आठवडाभराने खेप  करून बयाण्याची रक्काम भरून वर्किंग ऑर्डर घेवून जावा. ” असं साहेब म्हणाले आणि   भाऊ नी  बापू पवार  राजापूरला निघाले.

                      अगदी अकल्पितपणे  भाऊंचे नशिब उघडले होते. त्यानी  घरचे देव,  ग्रामदेव याना अभिषेक केले.  आता  बाबल्या नी धाकू  यांची  रोज संध्याकाळी  हुकमी  फेरी व्हायची नी  पुढचे पक्के बेत  योजून त्याची चर्चा  व्हायची. काम तीन सीझनमध्ये पूर्ण करायचे होते. रस्त्याची रुंदी  निर्धारित केल्यापमाणे ठेवायची होती. पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी  पूर्णलांबीला एकाबाजूने दीड बाय दीड फूट  चर मारायचा होता. पहिला टप्पा दोन मैल चार फर्लांगाचा नी त्या पुढचे दोन्हीटप्पे  दोन दोन मैलाचे  ठरवून दिलेले होते. संबंधित विभाग ते  टप्पे पूर्ण झाल्यावर पहाणी करून मंजूरी देणारहोता आणि त्यानंतर  टप्प्या टप्प्याने  रक्कमा मिळायच्या होत्या. पहिल्या टप्प्याच्या कामाचा अंदाज घेतल्यावर  बाणे वाडीचे फैल आणि  कुंभारांचे फैल  जोडीला घ्यायचे ठरले. त्या फैलातल्या म्होरक्याना बोलावून व्यवहाराची बोलणी सुरू झाली. थोटम, येरम, बाणे आणि कुंभार या चारही  फैलातले   मिळून अठ्ठेचाळीस गडी नी   तीसेक बायल माणसे  एवढी  जमात ठरवलेली होती.  गडी पैऱ्याना आठवड्याला  निम्मे  मजूरी आणि  गणेश चतुर्थीला  उरलेला हिशोब द्यायची बोली  झाली . सगळी जम करून फायनल ऑर्डर आणायला भाऊ  रत्नागिरीला गेले.  अव्वल कारकूनाने शब्द दिल्याप्रमाणे  वर्किंग ऑर्डर तयार होती. बयाण्याची रक्कम  भरणा करून साहेबाला हजार रुपये   देवून भाऊ  परत आले.

                मुहूर्ताच्या दिवशी  मामलेदार साहेब आ तालुका  बोर्डाचे अध्यक्ष  आलेले होते. मुहुर्ताचा नारळ फोडून मंडळी  रवाना झाली आणि  कामाला  सुरूवात झाली. निर्धारित  अटीप्रमाणे रुंदी  ठेवणे आवश्यक होते म्हणून फूटभर  सरस  माप घेवून चिव्याच्या  काठीचे तुकडे  करून त्याप्रमाणे  लाईन दोरा ताणून रस्त्याचा  भाग उंचवटे  खणून  आणि डबऱ्यामध्ये  दगड मातीची भर टाकून  ती धुमसाने ठोकून  पृष्टभाग सवथळ  करण्यात येत होता. कडेला  पाण्याचा निचरा होण्यासाठी   चर आखून घेवून  खणकाम करायचे काम एकमार्गी  कुंभारांच्या फैलाला दिलेले होते. थोटमांचे फैल  रस्ता सवथळ करण्यासाठी  लागणारे लहान मोठ्या साईजचेदगड  फोडायचे काम करीत होते.  रस्त्याचे लेव्हलिंग  आणि कडा बांधण्यावर धाकूला मुक्रर केलेला होता .  बाबल्याचे फैल खुटवळ  काढायला  ठेवलेले होते. काम सुरू झाल्यावर  दुसऱ्याच दिवशी  धोंडे फोडायला  छिन्या नी  मोठ्या धोंडी फोडायला  सुरूंगाचे सामान आणायला  भाऊ स्वत: खारेपाटणला बंदरावरच्या  दादा  गाडांच्या दुकानात गेले. सुरूंगाच्या सामानाचा रितसर परवाना होता. दादा गाडानी  भाऊशी  बोलणे केल्यावर हे चांगले पतवान आणि मोठे गिऱ्हाईक  आहे हे ओळखले. गाडांचा पिढीजात धंदा होता.ब्राम्हण माणूस सहसा लबाडी करून  देणं बुडवणार नाही  असा त्यांचा पक्का विश्वास होता. तसं त्यानी बोलूनही दाखवलं  आणि लक्ष्मी पुजनापर्यंत जमेल  तेवढी  तरी बाकी पुरी करण्याच्या अटीवर लागणारा माल  उधारीवर देण्याची  बोली ठरली. यादीप्रमाणे सामान ताब्यात घेवून भाऊ परतीला लागले.  (क्रमश:)