प्रकरण १६
“ साक्ष देऊन बाहेर पडताना तू मला उद्देशून काही बोललास.काय ते या कोर्टाला सांगशील का?” पाणिनीने विचारलं
कामतचा राग अजून उतरला नव्हता. “ मी म्हणालो की मी तुला ठार मारीन पटवर्धन.” कामतम्हणाला, “ आणि देवा शप्पथ मी मारीन तुला.”
“ तुम्ही भर कोर्टात काय बोलताय समजतंय का तुम्हाला? अॅडव्होकेट पाणिनी पटवर्धनना मारायची धमकी देताय तुम्ही. याचा परिणाम काय होईल माहित्ये?” न्यायाधीश बहुव्रीही यांनी आश्चर्य आणि रागाने विचारलं.
“ न्यायमूर्ती महाराज, साक्षीदाराला ज्या पद्धतीने पाणिनी पटवर्धन यांनी प्रश्न विचारले, त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती ढळली....” खांडेकर मदतीला येत म्हणाले.
“ यांना २४ तासांसाठी कस्टडीत टाका.” खांडेकरांकडे पूर्ण दुर्लक्ष करत न्यायाधीशांनी बेलीफ ला आदेश दिला.बेलीफने कुमार कामतला पकडण्यासाठी त्याचा हात आपल्या हातात घेतला, कामतने तो झटकला.आणि आपलं शरीर ताठ करून बाजूला पाऊल टाकलं.पण लगेचच त्याचं अवसान गळालं आणि स्वत:हूनच बेलीफ बरोबर कोर्टाच्या बाहेर पडला.
“ आद्रिका अभिषेकी ला बोलवा.साक्षीदार म्हणून ” खांडेकर म्हणाले.
कोर्टात नुकत्याच घडलेल्या नाट्यमय घडामोडींचा फायदा उठावायची आद्रिकाला संधीच मिळाली.कोर्टात यायचं म्हणून ती दोन तास ब्युटी पार्लर ला जाऊन आली होती.मॉडेलिंग केल्यासारखं चालत ती पिंजऱ्यात आली आणि खांडेकरांनी पहिला प्रश्न विचारला.
“ तुझा व्यवसाय किंवा नोकरी काय आहे?”
“ मी मॉडेल आणि अभिनेत्री आहे.”
“ ७ ऑक्टोबरला याच व्यवसायात होतीस?”
“ नाही.तेव्हा मी कार्तिककामत यांची सेक्रेटरी म्हणून त्यांच्याकडे नोकरीला होते.” आद्रिका म्हणाली.
“ किती काळ नोकरीला होतीस?”
“ साधारण १ वर्षं.”
“ ७ ऑक्टोबरला तुझ्या ऑफिस मधे वेगळं, लक्षात राहण्यासारखं काय झालं?”-खांडेकर.
“ या प्रश्नाला बचावाच्या वकिलांनी हरकत घेतली नाही पण नेमकेपणाने कुठल्या गोष्टीबद्दल हा प्रश्न विचारला गेलाय ते सरकारी वकिलांनी जर सांगितलं नाही तर आरोपीशी संबंध नसलेला आणि सूचक प्रश्न या दोन कारणासाठी मी हा प्रश्न नामंजूर करते.” न्या.बहुव्रीही म्हणाल्या.
“ कामतने त्या दिवशी नक्की काय केलं ते आम्हाला दाखवायचं आहे. आम्ही दाखवू इच्छितो की कामतला बऱ्याच गोष्टी माहिती होत्या आणि तो त्या आरोपीला कळवू शकत होता. ”
“ पटवर्धन, तुमची हरकत नाहीये याला?” बहुव्रीही यांनी आश्चर्याने विचारलं.
“ नाही.” पाणिनी स्मित करून म्हणाला.
“ उत्तरं दे.” खांडेकर म्हणाले.
“ देवनार वरून कामत यांनी मला फोन करून सांगितलं की ते येणार आहेत ऑफिसात, आणि ते येई पर्यंत मी थांबावं.”
“ किती वाजता आले ते ?”
“ पावणे नऊ ला रात्री.”
“ अपेक्षित वेळेला?”
“ तासभर आधीच, त्यांनी सांगितलं होतं त्यापेक्षा.”
“ पुढे?”
“ ते आल्यावर बोलायच्या मानसिकतेत नव्हते. आल्या आल्याच ते त्यांच्या केबिन ला जोडून असलेल्या बाथरूम मधे गेले आणि स्नान करून कपडे बदलून आले.”
“ वेळेबाबत खात्री आहे तुझी?”
“ शंभर टक्के.”
“ ते तुला चांडक बद्दल काही बोलले?”
“ हो.”
“ कोण हजर होतं तेव्हा?”-खांडेकर.
“ आम्ही दोघेच.”
“ ठीक आहे. काय सांगितलं त्यांनी?”
“ ते म्हणाले की अत्ताच मी अशा माणसाशी बोललो आहे की ज्याने ऋताच्या वडलांचा खून केलाय.त्याच्याशी मी आज रात्री अकरा वाजताची अपॉइंटमेंट घेतली आहे.”—आद्रिका
“ नंतर काय केलं त्याने?”
“ त्यांनी अंगावरचा कोट काढला.डाव्या खांद्याला एक चामड्याचा पट्टा होता त्यात रिव्हॉल्व्हर होतं.पट्टा काढून त्यांनी टेबलावर ठेवला. आणि अंघोळीला गेले.”-आद्रिका.
“ त्यांनी टेबलावर ठेवलेलं रिव्हॉल्व्हर तू ओळखू शकतेस?”
“ सॉरी, मला फारशी माहिती नाही त्यातली पण दिसायला ते ३० नंबरचा पुरावा म्हणून जे आहे त्याच्या सारखंच वाटलं.”
“ क्रॉस.” पाणिनीला उद्देशून खांडेकर म्हणाले.
“ किती वाजता कामत आले म्हणालीस तू?” पाणिनीने विचारलं
“ रात्री पावणे नऊ.”
“ त्यांनी तुला सांगितलं की चांडक ला भेटलेत ते म्हणून?”
“ त्यांचे नेमके शब्द असे होते की अत्ताच मी अशा माणसाशी बोललो आहे की ज्याने ऋताच्या वडलांचा खून केलाय त्याच्याशी मी आज रात्री अकरा वाजताची अपॉइंटमेंट घेतली आहे. ”
“पण त्यांनी चांडकचं नाव घेतलं नाही? ” पाणिनीने विचारलं
“ नाव घेतलं नाही पण त्यांना तोच डोक्यात होता.” -आद्रिका.
“ त्यांच्या काय डोक्यात होतं याचा अंदाज तू लावू नको. त्यांनी चांडकचं नाव घेतलं की नाही ते सांग.”
“ नाव नाही घेतलं.”
“ दॅटस् ऑल ” पाणिनी म्हणाला.
“ मी कुमार कामत च्या पत्नीला, निशांगी जयस्वाल ला बोलावू इच्छितो.” –खांडेकर.
ती अत्यंत आकर्षक होती.आणि आपण तसे आहोत याची तिला जाणीवही होती.ती डौलदारपणे एखाद्या मॉडेल सारखी चालत येऊन साक्षीदाराच्या पिंजऱ्यात आली.
“या खटल्यात पुरावा क्रमांक ३० म्हणून दाखल करण्यात आलेलं रिव्हॉल्व्हर तुझ्या परिचयाचं आहे?”-खांडेकरांनी पहिला प्रश्न विचारला.
“ मला नाही सांगता येणार.अगदी या सारखी दिसणारी बंदूक मी पाहिल्ये पण ती हीच का ते नाही सांगता येणार.”
“ कुठे बघितलंस तू ते रिव्हॉल्व्हर?”
“ माझ्या नवऱ्याने त्याच्या कपाटात ठेवलं होतं तेव्हा.”
“ कधी?”
“ ७ ऑक्टोबरला रात्री.साधारण १०.३० ला.”
“ तेच रिव्हॉल्व्हर तू पुन्हा ८ ऑक्टोबरला पाहिलंस?”
“ पाहिलं.”
“ आणि काय केलंस त्याच्या संदर्भात?”
“ मी कुमारला म्हणजे नवऱ्याला फोन करून सांगितलं की तो त्याच रिव्हॉल्व्हर कपाटात विसरून गेलाय.”
“ तू कधी केलास हा फोन?”-खांडेकर.
“ मी सकाळी उठल्यावर मला जेव्हा ते दिसलं तेव्हाच.”
“ मग काय झालं पुढे?”
“ नवऱ्याने मला ते ऑफिसात घेऊन यायला सांगितलं.त्यानुसार मी केलं.”
“ कधी?”
“ १०.३० नंतर लगेचच.”
“ हे रिव्हॉल्व्हर म्हणजे आपण ज्याला ‘कुमारचं’ रिव्हॉल्व्हर म्हणतोय ते होतं की पुरावा क्र. ३० हे होतं?”
“ मला नाही माहिती. मी एवढंच सांगू शकते की मी नवऱ्याच्या कपाटातून बंदूक घेतली आणि त्याला नेऊन दिली. त्या बंदुकीतून गोळी झाडलेली होती की ती पूर्ण भरलेली म्हणजे लोडेड होती याची सुद्धा मी खात्री देऊ शकत नाही.मला एवढंच माहिती आहे की ७ ऑक्टोबरला रात्री १०.३० च्या सुमारास घरी आल्यावर माझ्या नवऱ्याने कपडे बदलताना ते रिव्हॉल्व्हर काढून कपाटात ठेवलं.मला एवढंच माहीत आहे की ८ तारखेला सकाळी १० वाजता हुबेहूब त्याच्याच सारखी दिसणारी बंदूक त्याच कपाटात होती.७ तारखेच्या रात्री नवऱ्याने कपाटात बंदूक ठेवल्या नंतर आमच्या शिवाय कोणीही त्या खोलीत आलं नव्हतं.मला एवढंच माहीत आहे की दुसऱ्या दिवशी म्हणजे ८ तारखेला सकाळी १०.३० वाजता मी तिथे ठेवलेली बंदूक घेतली आणि नवरा कुमार कामतला नेऊन दिली.”
“ क्रॉस.” खांडेकरांनी पाणिनीला आव्हान दिलं. पाणिनी उभा राहिला.
“ ७ ऑक्टोबर च्या संध्याकाळ पासून ८ तारखेला बंदूक नवऱ्याला देई पर्यंत संपूर्ण वेळ तू घरीच होतीस? ” पाणिनीने विचारलं
“ हो सर.”
“ तुला माहित्ये, कुमार कामत ने तुला दोनदा फोन लावला होता आणि तू तो घेतला नाहीस.”
“ मला कुमार म्हणाला तसं.”
“ कोर्टाची तुला अशी समजूत करून द्यायची आहे का की तू घरी होतीस तरी फोन उचलला नाहीस?” पाणिनीने विचारलं
“ खूप गाढ झोपले होते मी.” निशांगी जयस्वाल म्हणाली.
“ तू नवऱ्याला सांगितलंस हे?”
“ नाही.”
“ का?”
“ आम्ही नव-परिणीत जोडपं आहोत.माझ्या सोबत वेळ घालवायच्या ऐवजी तो आपल्या ऑफिसात गेला ही गोष्ट मला फार लागली होती.मी दुखावले होते आणि चिडले पण होते. मी झोपले होते घरी असं त्याला मी सांगितलं असतं तर त्याला काही वाटलं नसत.माझी इच्छा होती की त्याची सतत वाट बघत होते असं त्याला वाटाव म्हणजे तो पुन्हा मला सोडून दिवसभर बाहेर जाणार नाही, म्हणून मी त्याला म्हणाले की फोन आलाच नाही.त्याने चुकून चुकीचा नंबर लावला असावा.”
“ दोन्ही वेळी?”
“दोन्ही वेळी.” निशांगी जयस्वाल म्हणाली.
“त्याला फार पटवावं लागलं नाही?” पाणिनीने विचारलं
“ नव्याने लग्न झालेली वधू नवऱ्याला तुलनेने लौकर पटवू शकते.” तिच्या या उत्तराने कोर्टात हशा पिकला.न्यायाधीश सुद्धा हसल्या.
“ तू खोटं बोललीस त्याच्याशी.” पाणिनी म्हणाला.
“मी त्याला सुचवलं फक्त की रॉंग नंबर लागला असावा. मी झोपले होते का हे त्याने मला विचारलंच नाही आणि मी पण बोलले नाही.”
“ त्या रिव्हॉल्व्हर कडे पुन्हा येतो मी, जयस्वाल, तू मगाशी सर तपासणीत उ त्तर देताना म्हणलीस की ‘त्या बंदुकीतून गोळी झाडलेली होती की ती पूर्ण भरलेली म्हणजे लोडेड होती याची मी खात्री देऊ शकत नाही’ याचा अर्थ कुमारकडे ते रिव्हॉल्व्हर नेऊन दिलंस तेव्हा त्यातून आधीच एक गोळी झाडलेली असू शकत होती. बरोबर का? ” पाणिनीने विचारलं
ती हसली, “ तसं असतं तर ,पटवर्धन, तुम्ही जेव्हा नवऱ्याच्या ऑफिसात एक गोळी झाडलीत, तेव्हा तिच्यात एका ऐवजी दोन रिकामी काडतुसं मिळायला हवी होती. ”
“ तू नवऱ्याला नेऊन दिलेली रिव्हॉल्व्हर आणि तुझ्या नवऱ्याने मला दिलेली रिव्हॉल्व्हर ही एकच असेल तर.” पाणिनी म्हणाला.
“ आपला नवरा प्रामाणिक आहे असंच गृहित धरायला हवं ना प्रत्येक बायकोने, मिस्टर पटवर्धन ?” जयस्वाल म्हणाली आणि कोर्टात हशा झाला.
पाणिनी सुद्धा हास्यात सहभागी झाला. “ दॅटस् ऑल”
खांडेकरांचा पुढचा साक्षीदार म्हणजे चांडकच्या इमारतीत राहणारी छपन्न वयाची स्त्री होती.७ ऑक्टोबरला रात्री पावणेनऊ वाजता चांडकच्या फ़्लॅट च्या मागच्या दाराने तिने एका स्त्रीला जिना उतरतांना पाहिलं.तिला आधी वाटलं की ती चोरीच्या हेतूने आल्ये म्हणून त्या स्त्री ने तिचा पाठलाग केला.थोडं अंतर राखून.
“ त्या अंतरावरून तू त्या स्त्रीला ओळखू शकलीस?” खांडेकरांनी विचारलं.
“ होय.”
“ अत्ता ती इथे हजर आहे?”
“ होय. ती पहा.” आरोपी ऋता कडे बोट दाखवून ती म्हणाली.
“ काय केलं तिनं ”
“ ती बाजूच्या रस्त्याने चालत असतांना एका माणसाने आपली गाडी तिच्या जवळ थांबवली, तिला गाडीत घेतलं आणि ते दोघं गाडीतून निघून गेले.”
“ कोण होता तो माणूस?”-खांडेकर.
“ अॅडव्होकेट पाणिनी पटवर्धन.”
“ घ्या उलट तपासणी.”
“ चांडक च्या घराच्या मागच्या दाराकडे तुझं लक्ष का गेलं?” पाणिनीने विचारलं
“ त्या आधी सुद्धा बऱ्याच बायका तिथून ये जा करताना दिसायच्या. मी तक्रारच करणार होते.”
“ याच बाईला पाहिलंत?” पाणिनीने विचारलं
“ नक्की नाही सांगता येणार तीच बाई होती की वेगळी.”
“ तुम्हाला म्हणायचंय की ७ ऑक्टोबर पूर्वी दिसली होती?”
“ हो.”
“ आणि मागच्या दाराने बायकांना बाहेर पडताना पाहिलं होतं?”
“ एकापेक्षा जास्त बायका होत्या का या बद्दल मी खात्री नाही देऊ शकत.”
“ या आरोपीला तुम्ही पाहिलं ७ ऑक्टोबरला, तिचा पाठलाग का केलात?”
“ ती कोण आहे हे पाहायचं होतं मला.”
“ ती व्यवस्थित दिसावी इतक्याच अंतरा पर्यंत पाठलाग केलात? ” पाणिनीने विचारलं
“ हो.”
“ नंतर पुन्हा परत यायचा विचार होता?”
“ हो.”
“ती गाडीत बसे पर्यंत तुम्ही तिच्या मागावर होतात?”
“ हो.”
“तसं असेल तर तुमच्याच साक्षीनुसार तुम्हाला ती नीट दिसली नसणार.” पाणिनी म्हणाला.
“नाही,व्यवस्थित दिसली मला ती.”
“पण तुम्ही म्हणालात की ती तुम्हाला नीट दिसल्यानंतर तुम्ही परत फिरणार होतात आणि तुम्ही तर परत फिरला नाहीत.”
“तिला मला जवळून बघायचं होतं. पण.. पण... माझी खात्री होती.”
“ती जर गाडीत बसली नसती तर तुम्ही तिचा आणखीही पुढे पाठलाग केला असता?” पाणिनीने विचारलं
“हो. मला वाटतं केला असता.”
पाणिनी पटवर्धन खुषित हसला.
“दॅट्स ऑल.” तो म्हणाला.
“सरकार पक्षातर्फे आमचं हेच आणि एवढंच सादरीकरण होतं.आम्ही थांबतोय. ” खांडेकर म्हणाले.
न्यायाधीशांच्या कपाळावर आठ्या पडल्या
“आमची कोर्टाला विनंती आहे की या खटल्यात सादर केलेला पुरावा हा संशयास्पद आहे आणि तोंडी पुरावा म्हणजे साक्षीदारांची साक्ष ही केवळ त्यांच्या अंदाजावर अवलंबून असलेली आहे त्यामुळे आरोपीला निर्दोष मुक्त करण्यात यावं.” पाणिनी म्हणाला.
“पटवर्धन यांची ही विनंती आत्ताच्या घटकेला तरी मान्य करण्यात येत नाहीये. दुपारची जेवणाच्या सुट्टीची वेळ आता आलेली आहे. दुपारी दोन वाजता पुन्हा कोर्ट चालू होईल. बचाव पक्षातर्फे त्यांना काही साक्षी पुरावे सादर करायचे असतील तर त्यांनी ते करावेत.” न्यायाधीश म्हणाल्या आणि खुर्चीतून उठल्या. पाणीनी पटवर्धन उठून ऋता कडे गेला.
“ तुला नाईलाजाने का होईना पण पिंजऱ्यात उभे राहून साक्ष द्यावीच लागेल आणि चांडकला तू मारलं असल्याचा इन्कार तुला करावाच लागेल.”
“नाही. बिलकुल नाही. मी पिंजऱ्यात उभी राहणार नाही.”
“तुला रहावंच लागेल. नाहीतर तुला ते खुनाच्या आरोपात शिक्षा करतील. चांडकनं तुझ्या वडिलांना मारलं असल्याबद्दल ची घटना मी कोर्टासमोर आणली असल्यामुळे कदाचित कोर्ट तुला मृत्युदंडाची शिक्षा देणार नाही पण तुला दोषी नक्की ठरवेल. लक्षात घे तुझ्या बुटाला रक्त लागलेलं होतं, तुझ्या हाय हिल्स चा ठसा......”
“माफ करा पटवर्धन, पण मी नाही उभी राहू शकत पिंजऱ्यामध्ये ”
“ का पण? असं काही तुझ्या गत आयुष्यात घडलंय का, की ते चव्हाट्यावर येईल अशी तुला भीती वाटत्ये?” पाणिनीने विचारलं
तिने नकारार्थी मान डोलावली
“त्यांनी माझं काय करायचं ते करू देत पण मी नाही देणार साक्ष ” ऋता ओरडली.
“मी भर कोर्टात साक्षीदार म्हणून तुला बोलवावं असं जाहीर करेन.” पाणिनी म्हणाला.
“तुम्ही तसं केलं तर मी माझ्या या बाकावरून उठायला सुद्धा नकार देईन.”
“दे नकार. किमान त्यामुळे मला माझं म्हणणं मांडायची संधी तरी मिळेल.”
“पुन्हा कोर्ट चालू होईपर्यंत तुम्हाला आत घेऊन जातोय मी.” बेलीफ म्हणाला. आणि तिला आत घेऊन गेला.
( प्रकरण १६ समाप्त)