Revolver - 14 in Marathi Detective stories by Abhay Bapat books and stories PDF | रिव्हॉल्व्हर - प्रकरण 14

Featured Books
Categories
Share

रिव्हॉल्व्हर - प्रकरण 14


प्रकरण १४
या नंतर पियुष कर्नावट, ठसेतज्ज्ञ याला पाचारण करण्यात आले.

“आरोपी ज्या घरात राहत होती त्या घराची ठसे मिळवण्याच्या दृष्टीने तपासणी करण्या चा प्रसंग तुझ्यावर आला होता का?”-खांडेकर. 

“ हो.” 

“कधी?” 

“९ ऑक्टोबरला” 

“तुला आरोपीच्या घरात कपड्यावर रक्ताचे डाग पडलेले कपडे, कापड किंवा इतर कुठलीही वस्तू आढळली का?” 

“हो सर” पियुष म्हणाला.

“कुठल्या वस्तूवर असे डाग आढळले?”-खांडेकर 

“ बुटाच्या जोडी पैकी डाव्या बुटाच्या तळव्यावर आणि टाचावर ” 

“हे डाग मानवी रक्ताचेच आहेत हे ठरवण्यासाठी आवश्यक असलेलं पुरेसं रक्त तुला तपासणीसाठी मिळालं का या बुटावरून? ” 

“ नाही सर ते बूट खूपच काळजीपूर्वक आणि खसखसून घासून धुतले होते. पण त्याच्यावर रासायनिक प्रक्रिया करून त्यावर असलेले डाग हे रक्ताचेच आहेत हे शोधून काढता आलं.” 

“ तुझ्याकडे आत्ता तो बूट आहे ?”

“हो. आहे.” 

“ दे तो माझ्याकडे .हाच तो बूट आहे ना जो तुला आरोपीच्या घरी मिळाला होता?” 

“हो ”

“या बुटाच काही वैशिष्ट्य आहे का?” 

“बुटांचा तळवा एका विशिष्ट पद्धतीने बनवला गेला आहे.” 

“आता तुला असं विचारतो, मृत चांडक च्या घरी तुला ओलसर टॉवेल मिळाला का?” 

“हो सर मी तो आता तुमच्याकडे देतोय माझ्या दृष्टीने तो खूप महत्त्वाचा आहे.” 

“का बरं?”

“ त्याच्यावर सुद्धा रक्ताचे अस्पष्ट असे डाग आहेत. म्हणजे कुठलं तरी रक्ताचे डाग पुसण्यासाठी तो वापरला गेला आहे. रक्ताच्या डागा व्यतिरिक्त एक वेगळेच कण त्या टॉवेलला लागलेले आहेत. आम्ही त्याची बारकाईने तपसणी केली तेव्हा असे लक्षात आलं की मगाशी तुम्हाला मी जो बूट पुरावा म्हणून दिला त्या बुटाचे काही अवशेष या टॉवेलला लागलेले आहेत.”

“ मी अशी विनंती करतो की हा बूट सरकार पक्षाचा पुरावा नंबर ३१ आणि हा टॉवेल पुरावा नंबर ३२ म्हणून सादर करण्यात यावा.” 

न्यायाधीश बहुव्रीही यांनी पाणिनी कडे पाहिलं 

“आमची काही हरकत नाही.” पाणिनी म्हणाला.

“ पुरावा म्हणून सादर करून घेण्यात येत आहे.” न्यायाधीश म्हणाल्या. 

“ आता मी तुला अनुक्रमांक १२ मध्ये पुरावा म्हणून सादर झालेला फोटोग्राफ दाखवतो आणि तुला विचारतो या फोटोची तू काळजीपूर्वक पाहणी केलीस का? ” 

“ हो केली .”

“काय आढळते तुला या अभ्यासात?” 

“ हा रंगीत फोटो स्पष्ट दाखवतो आहे की त्यावर दोन बुटाचे ठसे आहेत त्यातील एक बूट हाय हिल म्हणजे उंच टाचांचा आहे आणि त्या टाचेवर धातूची प्लेट लावली असल्यामुळे त्या धातूच्या प्लेटवरील ३३ असा क्रमांक ठशामध्ये उमटलेला दिसतो आहे या उंच टाचांच्या बुटावर तुलनेने मोठ्या आकाराचा बुटाचा ठसा उमटवला आहे. माझा अभ्यास असं सांगतो की उंच टाचांच्या बुटाच्या ठशावर उमटवला गेलेला मोठ्या पायांच्या बुटाचा ठसा हा काही कालावधीनंतर उमटवला गेला आहे.” 

“ तू हे सांगू शकतोस का, की नक्की किती कालावधीनंतर तो उमटवला असावा?” 

“मला वाटतं दोन ते तीन तासानंतर.” 

“आपण पुरावा क्रमांक ३१ म्हणून ज्या बुटाबद्दल बोलतो आहोत त्या बुटाबाबत तू हे सांगू शकशील का, की चांडकच्या घरात मोठ्या आकाराच्या बुटाच्या ठशाच्या खाली ज्या हाय हिल्स बुटाचे ठसे होते ते पुरावा क्रमांक ३१ म्हणून सादर झालेल्या बुटाचेच आहेत.”

“ माझी हरकत आहे या प्रश्नाला.” पाणिनी म्हणाला. “ हा साक्षीदाराचा अंदाज आहे.” 

“ पण हा साक्षीदार ठसे तज्ञ म्हणूनच साक्ष देतोय. तज्ञाचे अंदाज हे साक्ष म्हणून गृहीत धरता येतात.” खांडेकर म्हणाले 

“ मला तेच म्हणायचं आहे हा साक्षीदार हा ठसे तज्ञ आहे. प्रत्यक्षात पुरावा क्रमांक ३१ हा बुटाचा ठसा चांडक च्या घरात सापडला होता किंवा नाही हे साक्षीदाराला माहीत नाहीये. हा साक्षीदार फक्त वस्तुस्थितीशी निगडित गोष्टीची साक्ष देऊ शकतो आणि हे सांगू शकतो की त्यांने त्याचं अनुमान कुठल्या आधारे काढल आहे.” पाणिनी म्हणाला.

न्यायाधीश सक्षमा यांनी बुटाचा फोटो आणि प्रत्यक्ष बूट आपल्याजवळ मागून घेतलं आणि त्याचा जरा अभ्यास केला 

“ पटवर्धन यांची हरकत मान्य करण्यात येत आहे.” त्या म्हणाल्या. 

खांडेकर या निर्णयाने जरा वैतागले परंतु पुन्हा त्यांनी तपासणी घ्यायला सुरुवात केली. 

“तू मगाशी उत्तर देताना म्हणालास की हाय हिल्स असलेल्या बुटावर त्याहून मोठ्या आकाराच्या बुटाचा जो ठसा उमटला आहे तो दोन तासानंतर उमटला आहे?” 

“मी म्हणालो, दोन ते तीन तासाच्या कालावधीनंतर कदाचित चार तासानंतर सुद्धा.” 

“ हे तू कशावरून म्हणतोस?” - खांडेकर

“रक्त जेव्हा शरीरातून बाहेर पडतं त्यावेळेला त्यात काही बदल होत असतात तीन मिनिटाच्या कालावधीमध्ये रक्ताचे गुठळ्या होतात काही विशिष्ट प्रकारे दाब देऊन किंवा कंपन निर्माण करून ते पुन्हा द्रवरूपात साठवता येऊ शकत. या ठिकाणी पुरुषाचा मोठ्या आकाराचा बूट ज्याने पायात घातला होता त्याने ज्यावेळी रक्ताच्या थारोळ्यात आपला बूट टेकवला त्यावेळेला रक्ताच्या गुठळ्या झाल्या होत्या त्यामुळे हाय हिल्स असलेल्या बुटावर ज्या वेळेला या माणसाने आपला बुटाचा ठसा उमटवला त्यावरील रक्त हे गुठळ्या झाल्या सारखे दिसते आणि माझ्या मताप्रमाणे ज्या पद्धतीच्या या गुठळ्या झाल्या होत्या त्या शरीरातून रक्त बाहेर आल्यानंतर दोन तास ते चार तास या दरम्यान निर्माण होतात.” पियुष म्हणाला. 

“ मोठ्या आकाराच्या बुटाचा ठसा जो बुटाने उमटवला होता असं फोटोत दिसत आहे, ते बूट टू तपासलेस का ?”-खांडेकर

“हो. तपासले आहेत मी.” 

“ते तुझ्याकडे आत्ता आहेत?” 

“ आहेत ” 

“कोर्टाला सादर कर ते.” खांडेकर म्हणाले.

साक्षीदाराने आपल्याकडील बॅग मधून बूट बाहेर काढून वकिलांकडे दिले.

“ या बुटाचं काही वेगळेपण आहे?”

“ आहे.नवीन रबरी टाच लावली आहे पण या टाचेत एक दोष आहे आणि तो ठशात उमटलेला फोटोत दिसतो आहे.”

“ रक्त लागलंय का या बाबत काही चाचण्या घेतल्या गेल्या आहेत का? आणि काय आढळलं त्यात?” खांडेकरांनी विचारलं.

“ रक्ताचं अस्तित्व दर्शवलं.”

“ बूट कुठे मिळाले तुला?”

“ कार्तिक कामत च्या सुटकेस मधे.”-साक्षीदार म्हणाला.

“ सरकारी पुरावा क्र. ३३ म्हणून आपण हा जमा करुया.चांडक च्या घराची तपासणी तू केलीस का ठसे मिळण्याच्या दृष्टीने? ”

“ अर्थातच केली.”

“ काय आढळलं त्यात?” –खांडेकर.

“ दाराच्या मुठीवरचे आणि सर्वच संभाव्य ठिकाणचे ठसे एखाद्या कापडाने किंवा तशा प्रकारच्या वस्तूने पूर्ण पणे पुसून टाकले होते.”

“ म्हणजे तुला एकही ठसा मिळाला नाही?”

“ अपवादाने एकच मिळाला आणि तो मागच्या दाराच्या मुठीवर.डाव्या हाताचा ठसा. ” साक्षीदार म्हणाला.

“ कुणाचा ठसा होता तो?” --खांडेकर.

“ कामत”

“ घ्या क्रॉस.” खांडेकर पाणिनीला म्हणाले.

“ तुला हे काय माहित की सर्व ठिकाणचे ठसे पुसून टाकले होते?” पाणिनीने विचारलं

“ राहत्या घरात अनेक ठिकाणी घरातल्या माणसांचे हाताचे ठसे उमटत असतात.खास करून दार उघडतांना ,बंद करतांना, मुठीवर हमखास ठसे सापडतातच.पण या ठिकाणी कुठलेच ठसे नव्हते.”

“ केव्हा पुसले गेले हे ठसे?” पाणिनीने विचारलं

“ ते सांगता येणार नाही मला.”

“ मागच्या दारावर ठसा मिळाला असं तू म्हणतोस.”

“ हो सर. डाव्या हाताचा.”

“ आणि तो तू ओळखू शकलास? कुणाचा होता?”

“ कामत.”

“ वडील की मुलगा?”

“ केव्हाचा ठसा आहे हा?”

“ ते नाही सांगता येणार.”

“ खून होण्याआधी?” पाणिनी म्हणाला.

“ मी ते नाही सांगू शकत.मी एकाच सांगू शकतो की आधीचे ठसे पुसल्यानंतर तो उमटला होता.आणि ज्या अर्थी सर्वच मुठीवर हा एकच ठसा होता त्या अर्थी कामत खोलीत असतांनाच सर्व संभाव्य वस्तुवरचे ठसे पुसून स्वच्छ केले गेले होते.”

“कशावरून?” पाणिनीने विचारलं

“ दुसऱ्या कोणीतरी ठसे पुसल्यावर कामत आला असता तर दारावर त्याचे ठसे उमटले असते.म्हणजे दाराच्या मुठीवर वगैरे पण त्या ऐवजी तिथे अशी स्थिती होती की सर्वच ठिकाणच्या खुणा पुसल्या होत्या आणि दाराच्या मुठीवर एकुलता एक ठसा मिळाला आणि तो सुद्धा मुद्दाम जास्त दाब दिल्या सारखा स्पष्ट.” साक्षीदार पियुष कर्नावट म्हणाला.

“ हा ठसा मागच्या दाराच्या मुठीवर होता?” पाणिनीने विचारलं

“ हो सर.”

“ कोणीतरी दुसराच आधी आत होता. त्याने आत असतांना सर्व ठिकाणचे ठसे पुसले आणि गेला, त्या नंतर कामत मागच्या जिन्याने आला त्याला मागचं दार किलकिलं म्हणजे किंचित उघडं दिसलं, तो ते बंद करायला गेला आणि त्यामुळे त्याच्या हाताचा ठसा मागच्या दाराच्या मुठीवर उमटला. असं झालेलं असू शकतं की नाही?” पाणिनीने विचारलं

“असू शकतं. अगदी अपवादाने घडलं असू शकतं ” नाईलाजाने पियुष कर्नावट म्हणाला.

“ दॅटस् ऑल ” पाणिनी म्हणाला.

“ आता मी असा साक्षीदार बोलावतोय, जो बचाव पक्षाच्या बाजूचा आहे पण त्याला आम्ही आमच्या सरकार पक्षातर्फे बोलावतोय.”

“ ठीक.कोण आहे?” बहुव्रीही यांनी विचारलं.

“ कार्तिक कामत. आमची विनंती आहे की तो आमच्या विरोधातला असल्यामुळे फार सहकार्य करणार नाही त्यामुळे त्याला थोडे सूचक आणि आक्रमक प्रश्न विचारावे लागतील. त्याला परवानगी असावी.” खांडेकर म्हणाले.

“ तुम्ही तपासणी चालू करा.कोर्टाला जर वाटलं की तुम्हाला तो विरोध करतोय किंवा सहकार्य करत नाही तर परिस्थितीनुसार मी काय तो निर्णय देईन.”न्या.बहुव्रीही म्हणाल्या.

कामत पिंजऱ्यात येताच खांडेकरांनी त्याच्यावर तोफ डागली. “ सरकार पक्षाचा पुरावा क्र.३३ म्हणून जो बूट दखल करून घेतलाय, तो तुझा आहे का?”

“ हो.माझा आहे.”

“ ७ ऑक्टोबर च्या रात्री तू तो घातला होतास?”

“ होय.”

“ चांडकच्या घरात त्याच्या प्रेताजवळ जे रक्ताचं थारोळं साठलं होता त्यात तू तुझ्या बुटाचा पाय बुडवून जवळच फरशीवर आधी उमटलेल्या एका बुटाच्या ठशावर उमटवलास की नाही?”

पाणिनी उठून म्हणाला. “ माझा आक्षेप आहे.संदर्भहीन आणि गरज नसलेला प्रश्न.”

“ ओव्हररुल्ड.”

“ उत्तरं द्यायला मी नकार देतो.” पाणिनीच्या मनातलं ओळखून कामतम्हणाला.

“ कुठल्या कारणाने?”

“ उत्तरं दिलं तर मी दोषी ठरू शकतो या कारणास्तव.” कामत म्हणाला.

“ चांडक च्या घरी तू ७ ऑक्टोबर ला गेला होतास?”-खांडेकर.

“ हो.”

“ किती वाजता?”

“ रात्री ११ ते ११.३० च्या दरम्यान.”

“ तिथे गेल्या नंतर तू कापडाने किंवा तशा प्रकारच्या वस्तूने खोलीतल्या सर्व संभाव्य ठिकाणी उमटलेले ठसे पुसलेस की नाही?”

“ उत्तरं द्यायला मी नकार देतो. उत्तरं दिलं तर मी दोषी ठरू शकतो या कारणास्तव.” कामत म्हणाला.

न्यायाधिशांच्या चेहेऱ्यावर स्मित हास्य उमटलं आणि खांडेकर खुष झाले.कामतच्या उत्तरातून जे सध्या झालं असतं ते त्याच्या नकारातूनही न्यायाधीशांपर्यंत पोचलं होतं.

“७ ऑक्टोबर ला तू या खटल्यातील आरोपीला तुझ्याकडील रिव्हॉल्व्हर वापरायला दिलं होतंस का?तिच्या संरक्षणासाठी म्हणून?”

“ हो.”

“ पुरावा क्रमांक ३० म्हणून सादर झालेलं रिव्हॉल्व्हर तुला मी दाखवतो.मला सांग तेच हे रिव्हॉल्व्हर आहे का?”

साक्षीदारानं ते हातात घेऊन नीट पाहिलं आणि होकार दिला.

“ ७ ऑक्टोबर च्या रात्रीच्या तुझ्या सर्व दिनाक्रमाबद्दल सांग.”-खांडेकर.

“ मी देवनार वरून परतलो होतो.मी माझ्या ऑफिसात गेलो.तिथेच मी स्नान केलं, कपडे बदलले.”

“ ऑफिसात स्नान केलंस?” खांडेकरांनी आश्चर्याने विचारलं.

“ तिथे मी बाथरूम आणि कपड्याचं कपाट, तसचं आराम करायला छोटी बेडरूम अशी सोय केलेली आहे.”

“ बरं, नंतर काय केलंस?”

“ आता मात्र माझी जोरदार हरकत आहे. आपण रात्री अकराच्या सुमारास चांडकच्या घरी गेल्याचं आणि आरोपीला रिव्हॉल्व्हर दिल्याचं त्याने सांगितलंय.या व्यतिरिक्त त्याच्या इतर हालचाली बद्दल माहिती विचारायची काहीही गरज नाही.” पाणिनी म्हणाला.

“ आमच्या दृष्टीने हे महत्वाचं असू शकतं.”

 “ तर मग हे प्रश्न हे प्रश्न विचारून तुम्हाला काय साध्य करायचे आहे ते स्पष्ट करा कोर्टाला. पाणिनी म्हणाला.

“ हा आक्षेप मी मान्य करते.” न्यायाधीश म्हणाल्या. “७ ऑक्टोबर या दिवशीच्या दोन महत्त्वाच्या घटना त्याने मान्य केल्या आहेत. यापेक्षा इतर काही घटना किंवा हालचाली त्याने केल्या असतील तर त्याचा आरोपी शी संबंध आहे किंवा त्या आरोपीवर बंधनकारक आहेत असं म्हणणं योग्य नाही. आणि सरकारी वकिलांना जर असं वाटत असेल की त्याचा आरोपीशी संबंध आहे तर नेमक्या कोणत्या घटना वर ते प्रकाश पाडू इच्छितात ते त्यांनी कोर्टापुढे आणावं.” 

“ ठीक आहे.” खांडेकर म्हणाले; “ मी इतर काही साक्षीदारांची साक्ष घेऊन ते सिद्ध करीन . तोपर्यंत मी माझी साक्ष चालू ठेवतो साक्षीदाराला पुढचे प्रश्न विचारतो.”

“सरकार पक्षाचा पुरावा क्रमांक ३० मध्ये जी रिव्हॉल्व्हर दाखल करून घेण्यात आली आहे ती तू कुठून घेतलीस?” 

“माझे विविध व्यवसाय आहेत. त्याच्यातीलच एक व्यवसाय म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या बंदुका आणि रिव्हॉल्व्हर, बंदुकीच्या गोळ्या वगैरे विकण्याचा माझ्याकडे सरकारी परवाना होता .त्याच कालावधीमध्ये म्हणजे मी या व्यवसायाचा मालक असताना तीन रिव्हॉल्व्हर स्वतःसाठी काढून घेतल्या होत्या.” कामत म्हणाला. 

“या तीन रिव्हॉल्व्हरचं तू काय केलंस?” 

“ त्यातल्या दोन मी स्वतःकडे ठेवून घेतल्या. आणि एक माझ्या कुमारला दिली.” 

“स्वतःकडे तू दोन ठेऊन घेतल्या होत्या त्याचे तू काय केलंस?”-खांडेकर. 

“एक मी सतत माझ्याबरोबर ठेवत असे.म्हणजे माझ्या कोटाच्या आत खांद्याला एक कप्पा करून त्यात ठेवतो. आणि एक माझ्या ऑफिसमध्ये ठेवली होती. मी जेव्हा परगावी जात असे तेव्हा ऑफिसमध्ये ठेवलेली रिव्हॉल्व्हर मी तिजोरीत ठेवत असे.” 

“एक तात्पुरती सोय म्हणून आपण या तीन बंदुकींना नावे देऊ.” खांडेकर समजावून सांगत म्हणाले.

“जी तू कुमारला दिलीस, त्याला रिव्हॉल्व्हर क्र. १- कुमारची रिव्हॉल्व्हर म्हणू. जी तू तुझ्या तिजोरीत ठेवत होतास त्याला आपण रिव्हॉल्व्हर क्र.२- तिजोरीतली रिव्हॉल्व्हर म्हणूया आणि जी तू सतत स्वतःबरोबर ठेवत होतास तुझ्या बगलेतल्या कप्प्यात ठेवत होतास त्याला आपण रिव्हॉल्व्हर क्र.३ कप्पा रिव्हॉल्व्हर असं म्हणूया.” खांडेकर म्हणाले 

“ठीक आहे.” 

“आता तुझ्या काही विशिष्ट हालचालींबद्दलच मी माझे प्रश्न सीमित करतो. कप्पा रिव्हॉल्व्हर तू आरोपीला दिल्यानंतर तू तुझ्या ऑफिसात परत आलास तुझी तिजोरी उघडलीस आणि तिजोरीतली रिव्हॉल्व्हर तुझ्या खांद्यातील कप्प्यात ठेवलीस ही वस्तुस्थिती आहे की नाही?” 

“मिस्टर पटवर्धन या प्रश्नाला तुमची काही हरकत आहे?” न्यायाधीश समीक्षा बहुब्रही यांनी विचारलं 

“काही हरकत नाही या प्रश्नाला” 

“ठीक आहे उत्तर द्या.” न्यायाधीश कामत ला म्हणाल्या.

“ हो तसंच केलं मी.” 

“त्याच रात्री?” 

“हो सर” 

“नेमकं केव्हा?” 

 “११ च्या सुमारास” 

“त्यानंतर तू पुन्हा आरोपीच्या घरी आलास?” 

“होय” 

“आरोपीच्या घरी आल्यानंतर कप्प्यातील रिव्हॉल्व्हर जी पुरावा क्रमांक ३० म्हणून सादर करण्यात आली आहे ती पाहण्याचा प्रसंग आला?”

“हो सर” 

“कुठे होती ती?” 

“आरोपीच्या बिछान्यावर उशीखाली” 

“तू त्यावेळेला ती रिव्हॉल्व्हर तपासलीस?” 

“हो. तपासली” 

“तुझ्या हातात घेऊन?” 

“हो”

“आणि ती तपासल्यावर तुझ्या हे लक्षात आलं का की ही रिव्हॉल्व्हर तू आरोपीला दिल्यानंतर पुन्हा तू त्या वेळेला बघायला घेईपर्यंत त्याच्यातून एक गोळी झाडण्यात आली होती?” 

“माझा आक्षेप आहे या प्रश्नाला. संबंध नसलेला आणि महत्त्व नसलेला हा प्रश्न आहे.” पाणिनी म्हणाला. 

“ओव्हर रूल्ड”

“आणखीन एका कारणास्तव माझा आक्षेप आहे, की याच उत्तर म्हणजे साक्षीदाराचा अंदाज आहे. वस्तुस्थितीला धरून नसणार आहे.” पाणिनी पुन्हा ओरडला. 

“हां, मिस्टर पटवर्धन या कारणास्तव तुमच्या हरकतीचा विचार करता येईल. परंतु त्यावर निर्णय देण्यासाठी आणखी काही तपासणी होणे आवश्यक आहे, त्याचा हेतू निश्चित करण्यासाठी.” न्यायाधीश म्हणाल्या 

“मी जरा बदलून विचारतो हा प्रश्न” खांडेकर म्हणाले, " या बंदुकीची आरोपीच्या घरी तपासणी करताना असं काही घडलं का की ज्यामुळे त्या बंदुकीच्या सिलेंडरची तपासणी करणं आवश्यक ठरलं? "

साक्षीदार थोडा अस्वस्थ झाला त्यांनं लगेच उत्तर दिले नाही. 

"शपथ घेऊन साक्ष देण्यासाठी उभा आहेस तू" खांडेकर कडाडले, “आणि माझ्या या प्रश्नात असं काहीही नाही की ज्याचं उत्तर दिल्यामुळे तुझ्यावर काही दोषारोप होऊ शकतो. माझा प्रश्न अगदी साधा आहे बंदुकीचा सिलेंडरची तपासणी करावी असं तुला वाटावं असं काही कारण घडलं होतं का? आणि तशी तपासणी तू केलीस का?” 

“हो. मी केली.” 

“काय आढळलं तुला?” –खांडेकर

“एक काडतूस रिकामं होतं म्हणजे त्यातून गोळी झाडली होती.” 

“तू आरोपीला रिव्हॉल्व्हर दिली होतीस त्यावेळेला त्याची स्थिती काय होती?” 

“तेव्हा सर्व गोळ्या बंदुकीत भरलेल्या होत्या.” 

“हे सर्व तू तुझ्या स्वतःच्या माहितीनुसार, ज्ञानानुसार सांगतो आहेस?” 

“ होय.” 

“तुला कसं काय माहिती होतं?” 

“देवनार वरून परत येत असताना मीच त्या बंदुकीत सर्व गोळ्या भरल्या होत्या. म्हणजे रिव्हॉल्व्हर फुल लोड केली होती. कारण मला असं मनातून वाटत होतं की मला काहीतरी धोका आहे.” कामत म्हणाला.

“तू चांडकच्या घरी जायचं कारण हेच होतं, की तुला असं वाटत होतं, की आरोपीला तू जी रिव्हॉल्व्हर दिली होतीस त्याचा वापर तिने चांडकचा खून करण्यासाठी केला असावा.” 

“माझा जोरदार आक्षेप आहे या प्रश्नावर. या साक्षीदाराच्या मनात काय आलं असावं हे आरोपीवर बंधनकारक नाही. मुळात हा प्रश्नच मुळी अवाजवी आणि चुकीचा आहे. कोर्टाचं मत कलुषित करण्याच्या दृष्टीने हा विचारला गेला आहे.” पाणिनी म्हणाला. 

“आक्षेप मान्य आहे.” न्यायाधीशांनी दुजोरा दिला. “साक्षीदाराच्या मनात काय विचार चालू होते याचा आरोपीशी काहीही संबंध नाही. सरकारी वकीलानी हे लक्षात ठेवावं की हा खटला आरोपी विरुद्ध चालू आहे, या साक्षीदारा विरुद्ध नाही.”

खांडेकर हसले. साक्षीदारांनी जरी याचं उत्तर दिलं नसलं तरी आपल्याला काय म्हणायचं आहे हे न्यायाधीशांपर्यंत पोहोचवण्यात ते यशस्वी झाले होते. 

“दॅट्स ऑल.” ते म्हणाले आणि खाली बसले 

“एक मिनिट थांबा; मला एखाद- दुसराच प्रश्न विचारायचा आहे उलट तपासणी मध्ये” 

पाणिनी म्हणाला.- " सरकारी वकील आणि पुरावा क्रमांक ३० म्हणून ज्या बंदुकीचा उल्लेख केला म्हणजे ज्याला आपण कप्पा रिव्हॉल्व्हर असे म्हणणार आहोत, ती तू आरोपीला का दिलीस?"

“कारण एकेकाळी तिचा माझ्या कुमारबरोबर साखरपुडा झाला होता माझी सून म्हणून ती आमच्या कुटुंबात यावी या प्रतीक्षेत आणि अपेक्षेत आम्ही सर्व होतो. दुर्दैवाने त्यानंतर माझ्या कुमारने हा साखरपुडा मोडला आणि तिच्याबरोबर चे संबंध तोडले. मला तिच्याबद्दल खूप वाईट वाटलं आणि माझ्या लक्षात आलं की मला ती आवडते आहे.” 

कामतचं हे उत्तर ऐकून आरोपीच्या पिंजऱ्यात बसलेल्या ऋता रिसवडकर च्या डोळ्यातून पाणी आलं तिने पटकन आपला रुमाल बाहेर काढून आपले डोळे पुसले. 

 “आणखी एकच प्रश्न मी विचारतो तुला गारवीन, पाणिनीने विचारलं " सात ऑक्टोबर पूर्वी काही काळ आधी तुला ही माहिती मिळाली होती का, की आरोपीचे वडील कोदंड रिसवडकर याचा खून चांडकने केला होता?"

पाणिनी कडून आलेल्या या प्रश्नाने खांडेकरच काय न्यायाधीश सुद्धा आश्चर्याने उडाल्या.खांडेकर आरडाओरडा करत उठले आणि आक्षेप घेतला.न्यायाधीशांनी तो मान्य केला.पाणिनी नाराज व्हायच्या ऐवजी खुषित येऊन हसला.

“ मी बदलून विचारतो प्रश्न.” पाणिनी म्हणाला. “ सात ऑक्टोबर च्या सायंकाळी किंवा रात्री तू आरोपीला म्हणालास का, की तुझ्या मतानुसार कोदंड रिसवडकर याचा खून चांडकने केला होता? ”

“ पुन्हा माझं ऑब्जेक्शन आहे.” खांडेकर ओरडले.

“ आता मी ते मान्य नाही करू शकत ” न्यायाधीश बहुव्रीही म्हणाल्या. “ कारण आता पटवर्धन साक्षीदार आणि आरोपीचं एकमेकांशी बोलण काय झालं, कोदंड रिसवडकर चा खुनी कोण असावा या बाबत प्रश्न विचारताहेत. ”

“ अहो पण मी ज्यासाठी ऑब्जेक्शन घेतलं होतं, तो प्रश्न वेगळ्या प्रकारे विचारून पटवर्धन पुन्हा ते रेकॉर्ड वर आणतातच आहेत.” खांडेकर गुरगुरले.

“ या साक्षीदाराने आरोपीला रिव्हॉल्व्हर दिली तेव्हा त्यांचं काय बोलणं झालं या बद्दल खांडेकरांनी प्रश्न विचारला होता.तो संपूर्ण संवाद काय होता ते मी आता चव्हाट्यावर आणतोय इतकंच.” पाणिनी म्हणाला.

“ उत्तरं द्या.” न्यायाधीश साक्षीदाराला म्हणाल्या.

“ हो.मी तिला रिव्हॉल्व्हर देताना सांगितलं की चांडकनेच तुझ्या बाबांना मारलंय.आणि त्याच्यापासून तुलाही धोका आहे.त्यामुळे हे रिव्हॉल्व्हर ठेऊन घे.मी चांडक ची माहिती जमा करतोय जेणे करून त्याला अटक करता येण्याजोगी परिस्थिती निर्माण होईल. ” कामत म्हणाला.

“ दॅटस् ऑल ” पाणिनी म्हणाला.

“ माझेही काही प्रश्न नाहीत.”-खांडेकर.

“ या कामत ची संपूर्ण साक्षच रद्द करावी अशी मी कोर्टाला विनंती करतो.” पाणिनी म्हणाला.

“ कोणत्या कारणास्तव?” - न्या. बहुव्रीही

“ कारण कामत काय करत होता किंवा करणार होता याची माहिती आरोपीला होती हे सिद्ध करणारा कोणताही पुअरावा नाही.तो तिला नकळत काही मदत करत असेल तर ते तिच्यावर म्हणजे आरोपीवर बंधनकारक नाही. ” पाणिनी म्हणाला.

खांडेकर काही बोलायला गेले तेवढ्यात पाणिनी म्हणाला. , “ समजा कामतला वाटलं की मी म्हणजे पाणिनी पटवर्धन ने चांडक चा खून केलाय, मला वाचवण्यासाठी तो चांडक च्या घरी गेला.त्याला तिथे चांडक मेलेला दिसला पण मला अडकवणारा कोणताच पुरावा तिथे नव्हता.मी कामत ला सांगितलं सुद्धा नव्हतं या बद्दल किंवा मला मदत कर म्हणून. तरीही त्याने तिथले काही पुरावे नष्ट केले किंवा त्यात छेडछाड केली असेल तर ते माझ्यावर कसं काय बंधनकारक असू शकतं?” पाणिनीने विचारलं

खांडेकर उठून उभे राहिले पण त्यांना हातानेच खाली बसायची खूण करत न्यायाधीश म्हणाल्या,

“ कोर्ट इथे मोकळेपणाने कबुली देऊ इच्छिते की पाणिनी पटवर्धन यांनी या संदर्भात जेव्हा जेव्हा ऑब्जेक्शन घेतलं की हा प्रश्न गैर वाजवी, गैर लागू आहे आणि तो आरोपीवर बंधनकारक नाही तेव्हा ते रुटीन ऑब्जेक्शन आहे असं समजून पटवर्धन यांच्या मनात नेमकं काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न कोर्टाने केला नाही. पण पटवर्धन यांनी सुद्धा खर तर त्याच वेळी आपली भूमिका अधिक स्पष्ट करायला हवी होती. ”

“ मी तसं केलं असतं आणि कोर्टाने माझं ऑब्जेक्शन मान्य केलं असतं तर कोर्टाची आणि इथल्या प्रत्येकाची अशी समजूत झाली असती की मी केवळ तांत्रिक मुद्दे पुढे आणून केस लांबवायला बघतोय.” पाणिनी म्हणाला.

“ बरं, या साक्षीदाराने हा जो मुद्दा पुढे आणलाय की पहिल्यांदा आरोपीला रिव्हॉल्व्हर दिलं तेव्हा ते भरलेलं होतं आणि त्याच रात्री पुन्हा दुसऱ्यांदा पाहण्याचा प्रसंग आला तेव्हा त्यातली एक गोळी कमी झाली होती.” बहुव्रीही म्हणाल्या.

“ कामत ची साक्ष रद्द करायची मी विनंती करतोय तेव्हा आम्ही कोर्टाने उल्लेख केलेली वरील बाब सुद्धा रद्द समजावी असं म्हणत नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे की साक्षीदार चांडक च्या घरात आल्यापासून त्याच्या हालचालीबाबत जे प्रश्न त्याला विचारण्यात आले ते रद्द करावेत.” पाणिनी म्हणाला.

“ मला तुमचा मुद्दा लक्षात आला पटवर्धन.पण आता कामकाजाची वेळ संपत आल्ये.उद्या पुन्हा कोर्ट सुरु होईल तेव्हा या मुद्यावर विचार केला जाईल. ” एवढ बोलून न्यायाधीश बहुव्रीही यांनी हातोडा आपटून कोर्ट संपल्याच जाहीर केलं आणि खुर्चीतून उठल्या.

( प्रकरण १४ समाप्त)



कथेत नक्कीच रंग भरत चालला आहे. तुम्हालाही असं वाटत असेल तर लाईक करा, comments करा. आपल्या मित्रांनाही वाचायला सुचवा.