Revolver - 7 in Marathi Thriller by Abhay Bapat books and stories PDF | रिव्हॉल्व्हर - प्रकरण 7

Featured Books
Categories
Share

रिव्हॉल्व्हर - प्रकरण 7


प्रकरण ७

पाणिनीचा फोन वाजला.मृण्मयी भगली लाईन वर होती.

“ बोल मृण्मयी, झाली का पोलिसांची तपासणी? काय घेतलं का त्यांनी?” पाणिनीने विचारलं.

“ त्यांनी बरीच उलथ पालथ केली तिथे,पण त्यांना अपेक्षित असलेलं काही मिळालं नाही.जाम वैतागले होते ते.नाराज होवूनच निघून गेले.”-मृण्मयी म्हणाली.

“ तो त्यांचा सापळा असू शकतो.तुला बेसावध ठेवण्यासाठी. बर ते असो, ऑफिस मार्गी लावायला घेतलंस का?”

“ सगळा सावळा गोंधळ झालाय ऑफिसात.काहीही कुठेही ठेवलंय. शिस्त हा प्रकारच नाहीये.पत्रव्यवहार चुकीच्या जागी फाईल केलाय.कित्येक फायली डुप्लीकेट झाल्यात. जी देणी द्यायची आहेत त्याची शहानिशा केली गेली नाहीये.”-मृण्मयी म्हणाली.

“ उदाहरणार्थ?” पाणिनीने विचारलं.

“ म्हणजे बघा की नुकतंच जे नवीन घर साहेबांनी घेतलं, त्यात इलेक्ट्रिक वायरिंग आणि तत्सम कामाची बिले आहेत.त्याचे पेमेंट केलंय पण ती बिले खूपच जास्त रकमेची आहेत. घरातल्या प्रत्येक खोलीत टीव्ही बसवलाय, हे योग्य वाटत नाही.त्याच बिल पण टीव्ही च्या किंमतीहून दुप्पट रकमेच आहे. ” मृण्मयी म्हणाली

“ ओह! ठीक आहे मी बोलेन त्याच्याशी.तुला शक्य होईल तेवढ्या गोष्टी मार्गी लाव.कामत चा फोन आला तर माझ्याशी संपर्क करायला सांग.”

“ सांगते.पोलिसांच्या झडती बद्दल सांगू का त्यांना?”

“ सर्व काही सांग.काही हरकत नाही.” पाणिनी म्हणाला. आणि फोन ठेवे पर्यंत कनक ओजस ने विशिष्ट प्रकारची दारावर मारलेली थाप त्याच्या कानावर आली. पाणिनीने दार उघडून त्याला आत घेतलं.आपल्या पँट च्या मागच्या खिशातून एक छोटी वही बाहेर काढता काढता तो पाणिनी समोरच्या गुबगुबित सोफ्यावर बसला.कनक तिथे बसतांना नेहेमी विचित्र पद्धतीने बसायचा.म्हणजे आपली पाठ सोफ्याच्या डाव्या बाजूच्या हात ठेवायच्या जागी टेकवायचा आणि दोन्ही पाय सोफ्याच्या उजव्या हात ठेवायच्या ठिकाणावरून खाली सोडायचा. तो असा बसला की पाणिनीच्या चेहेऱ्यावर आठ्या उमटायच्या.पण त्याकडे कनक फारसे लक्ष द्यायचा नाही. अत्ता सुद्धा पाणिनीकडे न बघता आपली डायरी उलगडत तो म्हणाला,

“ तू त्या कामत च्या सेकंड हँड कार च्या शो रूम मधे रिव्हॉल्व्हर मधून गोळी उडवण्याचे उद्योग केलेस न त्याला वर्तमान पत्रातून भलतीच प्रसिद्धी मिळत्ये पाणिनी.”

“ अरे बापरे! माझ्या हातून चुकून उडाली ती.” पाणिनी म्हणाला.

“ माझ्या माहितीतील एक हुषार पत्रकार आहे त्याचं म्हणणे आहे की पाणिनी पटवर्धन सारखा अॅडव्होकेट जो भल्या भल्या बॅलॅस्टिक तज्ज्ञांची कोर्टात भबेरी उडवतो, त्याला बंदुकीत गोळ्या असल्याचे कळले नाही आणि चुकून गोळी उडाली हे न पटणारे आहे.” कनक म्हणाला.

“ म्हणजे आता हे सर्व तो पेपरात छापून आणणार की काय?” पाणिनी घाबरून म्हणाला.

“ पाणिनी, तुला मी आज ओळखत नाही.आणि अभिनय तर तुला जमतच नाही अत्ता सिद्ध तू घाबरल्याचा अभिनय केलास पण जमला नाही. किंवा तू अतिशय उच्च दर्जाचा अभिनेता असावास.” कनक म्हणाला.

“ का? काय झालं?” पाणिनीने विचारलं.

“ तू घाबरल्याचा कितीही अभिनय केलास तरी हे सर्व मुद्दाम पेपरात छापून यावं असंच तुला वाटत होतं की नाही ? खरं सांग.” कनक म्हणाला आणि पाणिनीने मिस्कील हसून फक्त भुवया उंचावल्या.

************************************

पाणिनी पटवर्धन आपल्या ऑफिसात सकाळी आला तेव्हा सौंम्याने सकाळच्या वर्तमानपत्रात आलेली बातमी त्याला दाखवली.

पाणिनी पटवर्धन सारखा अॅडव्होकेट जो भल्या भल्या बॅलॅस्टिक तज्ज्ञांची कोर्टात भबेरी उडवतो, त्याला बंदुकीत गोळ्या असल्याचे कळले नाही आणि चुकून गोळी कशी उडाली याबाबतची बातमी तिखट मीठ लावून वर्णन केली होती.तो बातमी वाचे पर्यंत कनक ओजस येत असल्याचं सौंम्याने सांगितलं.

“ कामत ची काय खबर?” पाणिनीने विचारलं.

“ वडील की मुलगा?”

“ कुणाचीही ” पाणिनी म्हणाला.

“ कुमारचा फोन आला होता.त्याच्या ऑफिसात तुमच्या हातून बंदुकीची गोळी उडाली या पेपरात आलेल्या बातमी मुळे त्याला एवढी प्रसिद्धी मिळाली की काय झालं हे बघायला बरेच लोक येत होते सतत.त्यातल्या पाच लोकांना पटवून त्याने त्यांना पाच सेकंड हँड गाड्या विकल्या.” सौंम्या म्हणाली.

“ या बद्दल आपल्याला तो कमिशन देईल बहुतेक.” पाणिनी म्हणाला. “ ऋता ची काय खबरबात? फोन आला?”

“ काहीही नाही सर.”

“ हे मात्र विचित्र वाटतंय. असं नाही व्हायला पाहिजे. तिला फोन लाव जरा.” पाणिनी म्हणाला. सौंम्या फोन करे पर्यंत कनक ने दार वाजवलं.पाणिनी दार उघडायला गेला.

“ ती फोन उचलत नाहीये.” –सौंम्या म्हणाली.

“ ठीक आहे बाहेर रिसेप्शानिस्ट गती ला ते काम दे.तिला सांग सतत फोन करत रहा.” पाणिनी म्हणाला.

“ चांडक चं गुन्हेगारी रेकॉर्ड आहे.” आत येता येताच कनक ओजस म्हणाला. “चरस,गांजा प्रकरणात त्याला पूर्वी

अटक झाली होती आणि एकदा खंडणी प्रकरणात. मंगळवारी रात्री सात ते साडे अकराच्या दरम्यान त्याचा खून झालाय.त्याच्या छातीवर पिस्तूल टेकवून पॉइंट ३८च्या रिव्हॉल्व्हरने त्याला मारण्यात आलंय. हत्यार शरीराला टेकवल्यामुळे नळीमधून बाहेर पडणारा गॅस सुद्धा शरीरात घुसला आणि त्यामुळे जास्तच नुकसान झालं.”

“कोणाला बंदुकीचा आवाज ऐकू आला? ” पाणिनीने विचारलं.

“ सकृतदर्शनी नाही. रिव्हॉल्व्हर छातीला टेकवून गोळी घातल्यामुळे आवाज आतल्या आत दाबला गेला असणार.अशा पद्धतीने गोळी घातली गेली तर कागदी फुगा फुगवून फोडल्यावर जेवढा आवाज येतो तेवढाच येतो.” कनक म्हणाला.

“ ठीक आहे , आणखी काय कनक?” पाणिनीने विचारलं. कनक काही बोलणार तेवढ्यात इंटरकॉम वाजला.सौंम्याने तो घेतला.

“ हां, बोल. आहे, आहे, इथे. ओके.” ती फोन मधे म्हणाली आणि कनकला उद्देशून म्हणाली, “ तुझ्या ऑफिसातून फोन आहे.खूप महत्वाचं बोलायचंय म्हणताहेत.” तिने फोन कनक ला दिला. कनक फोनवर थोडावेळ ऐकत राहिला आणि एकदम उद्गारला, “ माय गॉड !..... खात्री आहे त्यांची? ...... बरं,बरं, ठीक आहे.... ओके.”

“ काय झालंय?” पाणिनीने संयम न राहून विचारलं.

“ आजच्या दिवसातील अत्यंत गुप्त बातमी आहे ही पाणिनी, आणि पोलिसांना हे माहित असूनही त्यांनी तुलाच काय कोणालाच सांगितलं नाही.” कनक म्हणाला.

पाणिनीने आपल्या भुवया उंचावल्या.

“ ऋता रिसवडकर च्या घरात जे रिव्हॉल्व्हर पोलिसांना मिळालं,त्यातून झाडलेल्या गोळ्या आणि चांडकला मारण्यात आलेल्या गोळ्या यावरील खुणा तंतोतंत जुळताहेत.”

“ कुठलं रिव्हॉल्व्हर?” पाणिनीनं पटकन विचारलं.

“ कुठलं म्हणजे? तेच रिव्हॉल्व्हर ना, जे कामत ने ऋता ला दिलं !” कनक म्हणाला.

पाणिनीचे डोळे बारिक झाले.

“ अच्छा! म्हणजे याचा अर्थ खुनी हत्यार तुझ्या ताब्यात होतं.तू कामतच्या ऑफिसातल्या त्याच्या टेबलात त्यातली एक गोळी झाडलीस.अगदी सहज झालं असं दाखवून.सुरवातीला पोलिसांची अशी समजूत झाली की तू काहीतरी मखलाशी करण्याच्या विचारात होतास, मुख्य विषयात गोंधळ उडावा म्हणून.त्यांनी आता कामत च्या कुमारला उचललंय आणि त्याची शाळा घेतायत ते आता.त्यांच्या मूळ कल्पनेनुसार तू कामतच्या टेबलात खुनी हत्यार दडवलस. ” कनक म्हणाला.

“ आता त्यांनी त्याचं मत बदललंय?” पाणिनीने विचारलं.

“ आता त्याचं मत बदललंय. कार्तिक कामत च्या कुमारच्या नव-परिणीत पत्नीवर त्यांचा संशय आहे.ती छम्मक छ्ल्लो च आहे.मॉडेलिंग, बार मधे अर्ध नग्न होवून नृत्य करणारी अशी तिची प्रतिमा आहेच.ती चांडकला ओळखत होती.चांडक चा गुप्त फोन नंबर तिच्या जवळच्या छोट्या वहीत लिहिलेला त्यांना आढळलाय.चांडक हा ब्लॅकमेलर होता, त्यांचा संपर्क होता परस्परांशी आणि तिचं नुकताच लग्न झालं होतं कामत शी या सगळ्याची साखळी काय अर्थ सांगते विचार कर पाणिनी. चुकून गोळी उडाल्याचा तुझा दिखावा हा रिव्हॉल्व्हर तज्ज्ञांच्या डोळ्यात धूळ फेक करायचा तुझा प्रयत्न होता या निष्कर्षाला पोलीस आलेत. तुला यात अडकवण्यासाठी सरकार पक्ष जिवाचं रान करणारे अशी माझी बातमी आहे.” कनक म्हणाला.

“ सौंम्या, कामतच्या कुमारला फोन लागतोय का बघ. कनक, मला सर्व घटनांची अद्ययावत माहिती हव्ये. बहुदा ऋता आणि कामत चा मुलगा दोघांनाही त्यांनी घेरलं असाव, नशिबानं कार्तिक कामत बाहेर गेलाय आपला ठाव ठिकाण कुणालाही न सांगता त्यामुळे अजून तरी वाचलाय.” पाणिनी उद्गारला.

“ सांभाळ स्वत:ला पाणिनी, तू त्या कामतच्या गॅरेजात जावून बंदुकीतून गोळी उडवलीस, चुकून केल्यासारख दाखवलंस नंतर तीच रिव्हॉल्व्हर ऋता ला दिलीस आणि ते ही अशा प्रकारे की पोलिसांना ती सहज सापडेल.या सगळ्या बद्दलच पोलिसांना खूप काही जाणून घ्यायचंय.”

“ तू मला नवीन काहीच सांगत नाहीयेस कनक.या मागे तुला माहित नसलेल्या बऱ्याच गोष्टी आहेत.जा कामाला लाग.” पाणिनी म्हणाला.कनक ओजस निघून गेला.पाणिनी सौंम्या कडे वळून म्हणाला, “ एकच उत्तर असू शकतं या गोंधळाला.”

“ काय?”

“ कार्तिक कामत कडे म्हणजे वडलांकडे कुमारच्या ऑफिस ची किल्ली असणार.खुनी हत्यार वडलांकडे असणार. त्यांना माहीत होतं की मुलगा त्याचं रिव्हॉल्व्हर आपल्या टेबलाच्या ड्रॉवरमधे ठेवतो.त्यांनी आपल्याकडील रिव्हॉल्व्हर, जे गोळ्यांनी भरलेलं होत, ते, आणि कुमारने त्याच्या ड्रॉवर मधे ठेवलेल रिव्हॉल्व्हर यांची अदलाबदल केली.म्हणजे कुमारच्या टेबलाच्या ड्रॉवर मधे खुनात वापरलेलं रिव्हॉल्व्हर ठेवलं आणि कुमारचं रिव्हॉल्व्हर घेऊन त्यातून एक गोळी झाडून ते ऋता च्या घरी ठेवलं.या मागे त्यांचा हेतू हा होता की ऋता कडे ठेवलेल्या रिव्हॉल्व्हर मधून एक गोळी झाडली गेली आहे असं पोलिसांना दिसलं की ते ऋता वर चांडकच्या खुनाचा संशय घेतील पण नंतर जेव्हा त्यांच्या लक्षात येईल की ऋता कडे असलेलं रिव्हॉल्व्हर हे खुनात वापरलं गेलेलं नाहीये तेव्हा त्यांनी ऋता वर घेतलेला संशय चुकीचा होता हे त्यांना मान्य करावच लागेल. याच साठी कार्तिक मला म्हणाला होता की ऋता साठी जे जे करायची गरज भासेल ते कर म्हणून. ” पाणिनी म्हणाला.

“ योग्य तर्कशुद्ध विचार करताय तुम्ही. नंतर काय पुढे?...” –सौंम्या.

“ आणि मी, मला त्यावेळी असं झालं असेल याचा अंदाज न आल्यामुळे चुकीने अशी कृती केली की कार्तिक ची सगळी कल्पना वाया गेली.माझा हेतू हा होता की पोलीस कार्तिक कामत ला शोधतील आणि ऋता ला चौकशीसाठी ताब्यात घेतील तेव्हा कामत ने म्हणजे वडिलांनी तिला रिव्हॉल्व्हर दिल्याचं ते शोधून काढतील त्यात गोंधळ निर्माण करण्यासाठी मी मुद्दामच कामत च्या कुमारला, त्याच्याकडे असलेल रिव्हॉल्व्हर ऋता ला द्यायला लावल.म्हणजे झालं असतं काय की पोलिसांनी जर तिला विचारलं असतं की कामत ने तिला रिव्हॉल्व्हर दिलंय का तर ती कामत च्या कुमारने तिला दिलेलं रिव्हॉल्व्हर पोलिसांना दाखवू शकली असती. नेमका कोणता कामत म्हणजे मुलगा की वडील हे तिने मुद्दाम सांगायची गरज नव्हती. ”

“ थोडक्यात कुमारने आपल्या ड्रॉवर मधून काढलेलं रिव्हॉल्व्हर , ज्यातून तुम्ही एक गोळी ‘चुकून’ झाडलीत, आणि जे तुम्ही कुमार मार्फत ऋता ला द्यायला भाग पाडलंत, ते मूळ कुमारचं रिव्हॉल्व्हर नव्हतंच. ते खुनी हत्यार होतं ! ” सौंम्या उद्गारली.

“ बरोब्बर.आणि ते पोलिसांना अलगद सापडलं.” पाणिनी म्हणाला.

“ आता या सर्व घोळामुळे तुम्ही कितपत अडचणीत याल? ”

“ मी वैयक्तिक अडचणीत नाही येणार कारण मी पुरावा दडवल्याचा आरोप पोलीस नाही करू शकणार. कारण नजरचुकीने का होईना पोलिसांना हवं असलेलं खुनात वापरलेलं रिव्हॉल्व्हर मी ऋता च्या म्हणजे संशियीत क्रमांक एक च्या घरी सापडेल अशी कृती माझ्या हातून झाल्ये.मला काळजी आहे ती माझ्या अशिलावर याचा काय परिणाम होईल. ” पाणिनी विचार करत म्हणाला.

“ जे रिव्हॉल्व्हर, खुनी रिव्हॉल्व्हर असं आपण म्हणूया, वापरून चांडक च्या छातीत कुणी गोळी घातली असं वाटतंय तुम्हाला?” सौंम्या नं विचारलं.

 “ हा फार महत्वाचा प्रश्न आहे सौंम्या. माझ्या मते पोलिसांना वाटतंय की कार्तिकच्या कुमारची नवीन पत्नी ही खुनी असावी. कदाचित मुलगा सुद्धा.पोलीस हा ही विचार करत असावेत की कुमारला सोडवून ऋता ला अडकवण्यासाठी मीच हा सगळा गोंधळ घातला असावा. आणि कामत आणि त्याचा मुलगा दोघेही माझ्यावर प्रचंड चिडले असतील.” पाणिनी म्हणाला.

“ दोघांची चिडायची कारणं वेगळी असतील पण. ” सौंम्या म्हणाली, “ आपला प्लॅन बिघडवल्याबद्दल कार्तिक, आणि आपल्या बायकोवर आणि स्वत:वर पोलिसांचा संशय निर्माण करण्यास तुम्ही कारणीभूत ठरल्याबद्दल त्याचा मुलगा.”

“ बरोबर.” पाणिनी म्हणाला.

“ ‘ते’ रिव्हॉल्व्हर खुनी रिव्हॉल्व्हर होतं हे पोलीस सिद्ध करू शकतील?” सौंम्याने विचारलं.

“ आता करू शकतील.”

“ कसं काय?”

“ त्याच्या म्हणजे कामतच्या कुमारच्या ऑफिसात मी उडवलेली गोळी टेबलात घुसली. ती पोलिसांना मिळाली तर कारण ती मीच मारली हे बघणारी माणसं आहेत.ती टेबलात शिरलेली गोळी आणि ज्या गोळीने चांडक चा जीव घेतला,त्यावरच्या खुणा तपासल्या की त्या सारख्याच आहेत हे सिद्ध होईल. म्हणजेच दोन्ही गोळ्या एकाच रिव्हॉल्व्हर मधून झाडण्यात आल्या आहेत आणि ते रिव्हॉल्व्हर म्हणजे मी कार्तिकच्या कुमारकडून घेऊन ऋताला दिलेलं रिव्हॉल्व्हर होतं हे सहज सिद्ध होईल. मी चांडक ला भेटलो होतो, त्यामुळे पुढे जाऊन ते असंही दाखवण्याचा प्रयत्न करतील की मीच चांडक ला मारलं.” पाणिनी म्हणाला.

“ समजा आपण कनकच्या माणसांना पाठवून टेबलात शिरलेली गोळी काढून घेतली तर?” सौंम्याने विचारलं.

पाणिनीने मान हलवली. “ असं काही सांगून बघ त्याला, तो घाबरेलच.त्याचं लायसेन्स जप्त होईल.”

“ ठीक आहे. मला सांगा सर, ती गोळी नक्की कुठे घुसल्ये टेबलात?”

“ टेबलात शिरली असेल की नाही मला माहित नाही.मी टेबलाच्या टोकावर नेम धरून ती उडवली होती,जेणे करून ती त्याला चाटून भिंतीवर कुठेतरी उडेल.”

“ तसं झालं का पण?” सौंम्या ने विचारलं.

“ मला वाटतंय.” पाणिनी म्हणाला.

“ तुम्ही नक्की कशाकरता गोळी झाडलीत?”

“ ऋताच्या घरातून पोलीस जेव्हा रिव्हॉल्व्हर जप्त करतील तेव्हा त्यांना एक गोळी झाडलेलं रिव्हॉल्व्हर मिळावं म्हणून.ते मिळालं की त्यांना वाटेल की तेच खुनात वापरलं गेलेलं रिव्हॉल्व्हर आहे आणि ते पुढचा तपास थांबवतील. ”

“ पुढे काय करायचंय आपण?” सौंम्या ने विचारलं.

“ सध्यातरी वाट बघणे एवढंच करू शकतो आपण.” पाणिनी म्हणाला. आणि त्याने सौंम्याला घरी जाऊन विश्रांती घे म्हणून आग्रहाने सांगितलं.सौंम्या तयार नव्हती पण गरज लागली तर तिला बोलवायचे या मुद्यावर तिने संमती दिली आणि ती निघाली.

( प्रकरण ७ समाप्त.)