आयुष्य म्हणजे वन वे रोड
आयुष्य म्हणजे वन वे रोड
येती प्रवासात अनुभव कटू वा गोड
निर्णय लागती घ्यावे नीट करून विचार
अथवा पश्चातापाचा वहावा लागे भार
कसूर जर केली निवडण्या अचूक वाट
आयुष्याचा निश्चित होई दुस्तर घाट
सदैव नसते उपयोगी स्वप्नांचे विमान
जीवन जगताना हवे वास्तवाचे भान
कधी फायदेशीर ठरती वडीलधारे दिशादर्शक मॅप
कमी होई ज्याने प्रवासाचा क्षीण आणि व्याप
कधी निरुपयोगी ठरती मळलेल्या पाऊलवाटा
उगीच पडत जाई मग फुकटचा हेलपाटा
प्रत्येकाचा रस्ता आयुष्याचा वेगवेगळा असे अंधानुकरण करण्यात प्रवासी हमखास फसे
आयुष्याचा योग्य रस्ता मिळण्याचे हेच आहे गम्य दरवेळी निर्णय घेताना ठेवावे लागे तारतम्य
अनेकदा एकाचा अनुभव दुसऱ्याला न येई कामी प्रत्येकाला शोधावी लागे आपापली युक्ती नामी
प्रवासात आयुष्याच्या असो अडाणी वा शिकलेला
रेषा संचिताच्या ठरवती मार्ग बरोबर की चुकलेला
म्हणूनच शांत डोकं ठेवून आयुष्यात घ्यावी ऍक्शन कारण जीवनाच्या प्रवासात नसते रिव्हर्स रिऍक्शन
नका करू घाई, करून ठेवा तुम्ही हे मनात जतन आयुष्याच्या प्रवासाला नसते कधीच एडिट बटन.
*****************************************