🌵हिरव्या मिरचीचा झणझणीत ठेचा (खर्डा)
श्रावणातले विविध सण
गौरी गणपती
नवरात्र
आणि मग दिवाळी...
घरात
बाहेर
धार्मिक कार्यक्रमात...
सतत गोड गोड खाऊन अगदी कंटाळा आलाय ना...
🌵"लई ग्वाड खाऊन तोंडाला बाभळी आलिया..
कायतरी चरचरीत पायजे आता..."
असे आमच्या कोल्हापूरात म्हणतात..😀
सगळ्या प्रकारच्या गोडावर उतारा म्हणजे
हिरव्या मिरचीचा झणझणीत ठेचा....
याला इकडे ग्रामीण भागात खर्डा म्हणतात
🌵जेवताना वरण भात किंवा पोळी भाकरी बरोबर खाण्यासाठी ठेचा किंवा चटण्या असतील तर जेवणाची लज्जत आणखीन वाढते.
🌵मिरच्या आपल्या स्वयंपाकघरात असतातच
या मिरच्यांचा ठेचा करायला अगदी सोपा असतो
आणि ५ ते १० मिनिटांत हा ठेचा तयार होतो.
जर या ठेच्यावर लिंबू पिळून फ्रीज मध्ये ठेवले वर आठवडाभर ठेचा चांगला राहतो.
🌵 हा ठेचा खाल्ल्याने पचनक्रियाही चांगली राहते आणि जिभेला चव येते.
पण तिखट चवीमुळे मिरची खाणं काही काही लोक टाळतात किंवा कोणत्याही पदार्थातील मिरच्या बाजूला काढून मग खातात😀😊
🌵मिरचीमध्ये आजारांशी लढणारे अनेक गुणधर्म असतात. त्यामुळे आहारात मिरचीचा समावेश करावा असं म्हटलं जातं.
🌵हा ठेचा बनवण्यासाठी जर तुम्ही जास्ती तिखट खाणारे असाल तर बारीक हिरव्या मिरच्या घ्या.
(ही मिरची लवंगी मिरची कोल्हापूरची😀 म्हणून ओळखली जाते)
जर जास्त तिखट चव नको असेल तर पोपटी जाड हिरव्या मिरच्या वापरा
हा ठेचा करण्याची अगदी पारंपरिक पद्धत अशी आहे
🌵सात आठ मिरच्या धूवून पुसून तुकडे करून घ्यायच्या
लोखंडी तव्यात किंवा कढईत (तवा अथवा कढई लोखंडी असल्यास हा ठेचा अधिक चवदार होतो)
तेल गरम करून त्यात धुवून पुसून घेतलेल्या मिरच्याचे तुकडे घालायचे त्यात दहा बारा पाकळ्या सोललेला लसूण, चार चिरलेल्या कोंथिबीर काड्या आणि मीठ घालून थोडे परतून घ्यायचे
हे परतत असताना घरभर मिरचीचा खमंग तिखट वास दरवळत असतो
(या चार पदार्था व्यतिरिक्त या पारंपारिक ठेच्यात कशाचीही गरज नसते )
🌵गॅस बंद करून मिश्रण जरा गार झाले की त्याच तव्यात बत्ता अथवा वरवंटा अथवा एखाद्या जाड बुडाच्या वाटीने चांगला खरडून घ्यायचा
(तव्यात खरडून घेणे असाच वाक्प्रचार आहे म्हणूनच याला खर्डा सुध्दा म्हंटले जाते)
हा तयार चवीष्ट हिरवागार ठेचा बघताक्षणी तोंडाला पाणी सुटते 😋😋
🌵हा ठेचा थोडा जाडसर हवा
चटणी सारखा बारीक नाही वाटायचा
वरवंटा अथवा बत्ता नसेल मिक्सरचाही वापर करू शकता.
🌵या ठेच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी बेसनाचं पीठ दाण्याचं कुट, ओले खोबरे, साखर अशा गोष्टी सुद्धा वापरतात..
ज्याची त्याची करायची पद्धत..बस
🌵 माझ्या या पद्धतीने हा चवीष्ट ठेचा जरुर करून बघा 😊