मार्गशीर्ष गुरूवारचे पवित्र व्रत

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमो स्तुते !!

सर्व प्रथम आपल्या सर्व महिलांना मार्गशीर्ष गुरुवार व्रताच्या हार्दीक, हार्दिक शुभेच्छा.

श्रावणाइतकाच महत्वाचा आणि पवित्र म्हणजेच मार्गशीर्ष. दिवाळी नंतर सण अगदी थंड पडलेले असतात. मग सुरू होतो तो मार्गशीर्ष महिना. मार्गशीर्ष आला की महिलांचे गुरूवारचे व्रत सुरू होतात. म्हणजेच सणाचा माहोल पुन्हा एकदा सुरू होतात. ठिकठिकाणी सर्व स्त्रिया हे गुरूवार लक्ष्मीचे व्रत करताना दिसतात. हि पूजा करताना उपवास करण्याची पद्धत असते. तसेच सवाष्णींना वाण देण्यालाही मार्गशीर्ष महिन्यात खूप महत्व आहे.

या महिन्यात स्त्रिया श्री महालक्ष्मीची भक्तिभावनाने पूजा अर्चना करतात. या दिवशी सर्व महिला आपल्या घरामध्ये श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचतात, आरती म्हणतात, गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो व लक्ष्मीची पूजा विधी केली जाते. हे महालक्ष्मी व्रत घरामध्ये सुख, शांती, आनंद नांदावा म्हणून केलं जातं. तसेच लक्ष्मीच्या स्वरूपात सवाष्णी स्त्रिला हळदी-कुंकू देऊन तिचा आदर राखला जातो. सोबत फुलं, गजरा, महालक्ष्मी व्रताचं पुस्तक, एखादी भेटवस्तू आणि फळ, नारळ भेटवस्तूच्या स्वरूपात दिली जाते.

वैदिक मान्यतेनुसार सर्व महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्व आहे. या महिन्यांमध्ये धार्मिक कार्य केल्यास आपल्या जीवनामध्ये शुभ फल व सफलता प्राप्त होते. भगवान कृष्णाची पूजा करण्यासाठी हा महिना सर्वोत्तम, अतिउत्तम मानला गेला आहे. मार्गशीर्ष महिना म्हणजे मी स्वयम् आहे स्वतः कृष्णाने "गीता" मध्ये सांगितले आहे. याच महिन्यामध्ये श्री महालक्ष्मीची आपल्यावर कृपा व्हावी, तिने सतत आपल्या घरी वास करावा म्हणून हे मार्गशीर्ष महिन्यातील चार गुरुवार हे व्रत करतात. जे कोणी महालक्ष्मी व्रत मोठया श्रद्धेने आणि मनोभावे करतील, त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल. पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये, मातु नये, नित्य नेमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे, देवीचे मनन - चिंतन करावे, म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील,तुमची कामना पूर्ण करील असे मानले जाते.

मार्गशीर्षातील गुरूवारची चाहूल लागताच बाजारपेठ फळाफुलांनी भरून जातात. या व्रतासाठी आंब्याचे डहाळे, पांच पत्री, पाच फळे, नारळ आणि या निमित्ताने घरी येणाऱ्या सुहासिनी साठी गजरे आदी गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. त्यामुळे बाजार सगळा याच गोष्टींनी भरून फुलून गेलेला दिसत आहे.

Article By - Anjali Patil

Brains Media Solutions

Marathi Religious by Brains Media Solutions Pvt. Ltd. : 111846473

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now