आला आला दसरा आला सगळ्यांचा आवडता सण दसरा
चलातर गणपती मोट्या थाटामाटात झालेला आहे. आता आला आहे दसरा. खर तर दसरा या सणाचे एक विशेष महत्व आहे. नऊ दिवसांच्या या उत्सवात देवी दुर्गामाता च्या नऊ स्वरूपाची पूजा केली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, आश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होते. नवरात्रीच्या या सणामध्ये घटस्थापना हि विधी सर्वात महत्वाची आहे. घटस्थापना हे देवी शक्तीचे आवाहन आहे.
पहिल्या दिवशी घटस्थापना करताना देवीसमोर घट उभारला जातो. यामध्ये एक लहानशा टोपलीमध्ये किंवा बुट्टी मध्ये काळी माती घेऊन त्या मातीमध्ये नऊ प्रकारची धान्य पेरली जातात. त्या मातीमध्ये मधोमध एक पाण्याने भरलेले कलश ठेवले जाते. त्या कलशावर विड्याची पाने ठेऊन त्यावर नारळ ठेवला जातो. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटाला विड्याच्या पानाची माळ आणि झेंडूच्या फुलाची माळ घालतात. नऊ दिवस देवी समोर अखंड दिवा ठेवला जातो. सर्वजण मनोभावे देवीची पूजा आरती करतात. प्रत्येकाच्या आपापल्या परंपरेनुसार पूजा करण्याची पद्धत वेगवेगळी असते. बरेच लोक नऊ दिवस उपवास करून, अनवाणी राहून हे देवीचे व्रत पूर्ण श्रद्धेने करतात. तर काही जण उठता - बसता म्हणजेच घट बसण्याच्या दिवशी आणि दसऱ्याच्या दिवशी उपवास करतात.
प्रत्येक मंदिरात नवरात्रीचे नऊ दिवस देवीला वेगवेगळ्या रंगाच्या व काटपदराच्या साड्या नेसवल्या जातात. हे नऊ दिवसाचे नऊ रंग धर्मशास्त्रज्ञांनी ठरवलेले असतात. त्यानुसार देवीला त्या त्या रंगाच्या साड्या नेसवल्या जातात. पूर्ण मंदिरात विद्युत रोषनाई व फुलांनी सजावट केली जाते. त्याचबरोबर मंडप उभे केले जातात. देवी प्रमाणेच सर्व स्त्रियाहि नऊ दिवस वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसून देवीची मनोभावे पूजा करतात. त्याचबरोबर प्रत्येक मंदिरात जाऊन देवाला तेल वाढण्याची सुद्धा प्रथा आहे. तसेच काही ठिकाणी मंडळांतर्फे विविध सांस्कृतिक कर्यक्रम व सर्वांचा आवडता दांडिया व गरबा यांचे आयोजन केले जाते.
अश्विन शुद्ध महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नऊ दिवस नवरात्र असते. त्यानंतरचा दहावा दिवस म्हणजेच नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी येते ती विजयादशमी. विजयादशमीलाच दसरा असेही म्हणतात. दसरा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. दसऱ्या दिवशी आपट्याच्या पानाला सुद्धा महत्व आहे. व त्या दिवशी आपट्याची पाने एकमेकांना वाटली जातात. सगळ्यांमध्ये प्रेमभाव निर्माण व्हावा यासाठी या दिवशी पाने वाटली जातात. दसऱ्याला पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व आहे. दसऱ्याला नवरात्रीच्या सप्तमी चा दिवस असेही म्हणतात. दसरा हा सण विजयाचे प्रतीक आहे म्हणूनच याला विजयादशमी असे म्हणतात.
तुम्हा सर्वाना नवरात्रीच्या या मंगल सणाला माता देवी सुख, समृद्धी, ऐश्वर्य प्रदान करो, तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो हीच प्रार्थना.. नवरात्र आणि घटस्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा…
Article By - Anjali Patil
Brainsmedia Solutions