प्रिय मित्रास,
तुला अनेक उत्तम आशीर्वाद. मला ऐकून फार आनंद झाला, की तुम्ही मित्र सध्या एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा देत आहे आणि माझ्या सोबत घालवलेल्या क्षणाचा त्यात उल्लेख होतोय. ऐकून फार बरे वाटले की आजही माझ्याबद्दलची छबी तुम्ही तशीच मनात जपून ठेवली आहे. पण गेल्या काही वर्षात सारे काही बदलले आहे. मी देखील तुमच्यासोबत आता एकवीस वर्षे जुनी झाली आहे. म्हणूनच की काय आज मी तुला मित्र म्हणून हाक मारली आहे, कारण माझ्याच एका वर्गात बसून तुम्ही सुभाषिते जोरात म्हणत होतात आणि त्यात असे म्हटले होते की "प्राप्ते तू षोडशे वर्षे पुत्रे मित्र वदाचरेत". आणि तुम्ही तर आता सारे तुमच्या मुला- मुलींचे पालक झाले आहात. जणू काल-परवा चे सारे चित्र आहे की काय असा भास होतो आणि हो तू माझ्या सावली पाशी येऊन देखील अनेक वर्षे झाली आहे. आता माझ्याकडच्या ज्ञानाची शिदोरी घेऊन तू तुझ्या क्षेत्रात अनेक किर्तीमान स्थापन करत असशील. तेव्हाची तुझी गुणवत्ता आणि आताचे कौशल्य यात खूप अंतर असेल. कदाचित माझ्या ज्ञानाची शिदोरी तुला अपुरी वाटत असेल पण मला मात्र तुझा अभिमान वाटत आहे कारण की तू हे सर्व तुझ्या आत्म बळावर अर्जित केल आहेस. आणि सगळ्या संकटातून खंबीर उभा राहिला आहेस. पण तुझ्यात आणि माझ्यात आता हाच एक फरक आता शिल्लक राहिला आहे. आज दिसायला मी तशीच उंच इमारत रस्त्याच्या चहूबाजूंनी घेरलेली उभी आहे. पण माझा आत्मबळ आता मात्र संपले आहे. माझ्या भोवतालची वर्दळ आता भयाण शांततेत बदलले आहे. तुम्ही केलेल्या गोंगाटाचा आता स्मशान शांततेत रूपांतर झालाय. पण माझ्या वाईट अवस्थेचं वर्णन करायला हे पत्र मी लिहिलं नसून दुसऱ्या वेगळ्याच कारणासाठी तुला हाक मारली आहे आणि हो मला तुझी कुठलीही मदतही नकोय, फक्त एक शेवटची शिकवण तुला द्यायची राहून गेली आहे जी मी माझ्या गेल्या वीस वर्षाच्या अनुभवावरुन शिकली आहे. तुला माहिती आहे की आज मी अशी हतबल का झाली आहे ते? एकेकाळची शहरातली नंबर 1 ची शाळा बंद का पडायला आली आहे? कारण एकच मला माझ्या भूतकाळाचा आणि वर्तमान चा फार गर्व होता मी जे काय करते ते योग्य आहे आणि राहणार!असेच मला वाटत होते आणि काळानुरूप मी स्वतः मध्ये हवे ते बदल करायला विसरले. आणि त्यानेच माझा घात केला. सुरुवातीपासूनच जर हे छोटे छोटे बदल स्वतःमध्ये करत गेली असती, तर मोठे बदल व्हायला फार सोपे झाले असते. पण तुझ्या आत्याच्या भाषेत सांगायचं झालं तर मी आउटडेटेड होता होता ॲप्सोल्युट झाली रे!! आणि हे समजायला आता फार उशीर झाला आहे.
पण तू आता चाळीस वर्षाच्या जवळ आला आहेस. घरात ऑफिसमध्ये देखील एक नवी पिढी नवे विचार घेऊन तुझ्यात होणाऱ्या बदलाची अपेक्षा करते आहे. त्यांना तू सहज आत्मसात कर नवीन गोष्टी पुन्हा सुरुवातीपासून शिकून घे. आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या लोकांकडून शिकायची तयारी ठेव. तेव्हा तू अपडेटेड राहशील .आणि मला खात्री आहे की तू त्याचे देखील सोने करशील. आणि स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण करशील. पुढच्या वीस वर्षांनी कदाचित माझं अस्तित्व राहणार नाही. आणि तू देखील रिटायरमेंटच्या उंबरठ्यावर आलेला असशील पण तेव्हा तू आत्मबलाने खंबीर उभा राहून येणार्या पुढच्या काळासाठी सज्जे राहशील. कारण काळाप्रमाणे बदलणे हेतू आधीच शिकलेला असशिल. मला खात्री आहे माझ्या या अखेरच्या शिकवणीचा ओलावा तुझ्या मनात कायम स्मरणात राहील.
कळावे लोभ असावा!!
तुझीच शाळा.