आषाढातली प्रसन्न सकाळ असते
कधीतरी आकाशालाही वाटतं की झुगारुन द्यावं या काळ्या ढगांना
किती झेलावेत मी यांचे विभ्रम....
मग ते होतं हळूहळू निळंशार
पांढुरके तान्हुले ढग ठेवतं सोबतीला चार
सूर्याची कोवळी किरणं पसरतात
आणि एक अनामिक आनंद दाटून येतो मनात
वाटतं.. वाटतं की या क्षणालाच पंख फुटावेत
आणि तू आणि मी या निळ्या आकाशाला कवेत घ्यावं
मनमुराद लुटावं त्याच्या निळेपणाला
कोवळ्या तेजाला आणि अनामिक प्रसन्नतेला
पण काय करू?
तुझ्या डोळ्यातनं झिरपणारं चांदणं पहायलाही आसुसते मी
तर निळ्याशार अभाळात फिरण्याची माझी हौस
कशी होणार सुफळ संपूर्ण??