एक स्वप्न माझे होते
फारसे न मोठे
झोपडी असे ना का ती
पण प्रेम तिथे मोठे
नसे न का पैसा अडका
नको रेलचेल
दोनघास आनंदाने
सुखे मिळो तेथ
दोन जीव त्यांचा तेथे
नित्य प्रेम भाव
नको रागद्वेषांनाही
किंचितसा ठाव
कुणी येवो जावो तेथे
असो सुखे वास
घासातून त्यांना द्यावा
प्रेमभरे घास
सुखदुःख वाटून घ्यावे
आनंदाने तेथे
हेच जीवनाचे माझ्या
लक्ष एक मोठे
स्वप्न पूर्ण झाले माझे
जाहलो निवांत
पांडुरंगा,ठाव देई
तुझ्या चरणात.