पुस्तक परिचय: कृष्ण किनारा...
अरूणा ढेरे लिखित कृष्ण किनारा हे पुस्तक वाचणे हा एक खूप वेगळ्या स्तरावरचा अनुभव आहे.
राधा,कुंती ,द्रौपदी,सत्यभामा या महाभारतातील स्त्रीयांची आयुष्य एकमेकांच्या आयुष्याला कधी छेद देतात कधी समांतर धावतात तर कधी काळाचे भले थोरले पटच्या पट त्यांना एकमेकांपासून विलग करतात अगदी कायमचे.
या सगळ्यांचं कृष्णाशी असणारं नातं उत्कट तर आहेच . कधी उघड पण बव्हंशी अव्यक्त.तो बिंदू आहेच. असण्या नसण्याच्या सीमेवरचा. म्हणून गूढता व्यापून उरते.
या पुस्तकाचा काळ कृष्णासकट सगळ्यांच्याच आयुष्याच्या संध्याकाळचा. संध्याप्रकाशात दिसणार्या सावल्यांप्रमाणेच कितीतरी आठवणी मनात येऊन जातात. यमुनेचे पाणी तात्पुरते डहुळते काही उत्तरे मिळतात किंवा मिळाल्याचा आभास होतो.
पण शेवटी कृष्ण पूर्णांषाने कुणाला कधी सापडतो का?
हे पुस्तक उत्तरे देणे म्हणण्यापेक्षा प्रश्र्न निर्माण करते. ज्याने त्याने आपल्या मनाचा डोह ढवळून पहायचा.
कदाचित एखाद्या बेसावध क्षणी कृष्णाची बासरी कानावर येईलही. तो दिसेल याची खात्री त्यांच्यासकट कोणीच देऊ शकणार नाही.
एकाच वेळी तृप्त पण अस्वस्थ करून सोडणारा अनुभव म्हणजे कृष्ण किनारा.....
सदानंद चावरे
२७-९-२०१८