पान खाण्याची देखील मजा काही औरच
फार पूर्वीच्या काळापासून जेवणानंतर पान खाण्याची आपल्याकडे एक पद्धत आहे. कोणी बनारस मसाला, कोणी कलकत्ता मसाला, कोणी साधे पान, कोणी साधे पान काश्मिरी टाकून, कोणी साधे पान बारीक सुपारी वेलची टाकून तर कोणी पानपट्टीचे सगळे घटक खलबत्त्यात कुटून असे अनेक प्रकार आपणास पहावयास मिळतात.पान खाण्याची वेगवेगळी कारणे आहेत. कोणी जेवणानंतर तर कोणी दिवसातून चार पाच वेळा पानाचा तोबरा भरणारे काही कमी नाहीत. मला सुद्धा जेवणानंतर पान खाण्याची सवय आहे.
असे म्हणतात की पान खाणारा मनुष्य खूप शोषिक असतो. त्याला सर्वाविषयी कणव असते. कळवळा असतो. पान खाणे म्हणजे व्यसनाधीन होणे असे मुळीच नाही. पान हा एक सवयीचा प्रकार मानला जातो. लेखकाला काही तरी लिहल्यावर जे समाधान मिळते, बातमीदाराला एखादी चांगली बातमी मिळाल्यावर जे समाधान मिळते, बाळाला दूध पाजल्यावर आईला जे समाधान मिळते, सेवानिवृत्त माणसाला सेवा समाप्ती नंतर जे समाधान मिळते अगदी तसेच समाधान जेवणानंतर पान खाणाऱ्या माणसास मिळते.
पानाचा विडा खाणे म्हणजे व्यसन किंवा सवय नाही. आपल्या संस्कृतीच्या जीवन शैलीचा तो एक भाग असावा असे मला तरी वाटते. विडा तोडणे हा एक प्रणय रम्य कार्यक्रम असतो असे म्हणतात. मी काही त्याचा अनुभव घेतला नाही. आपण जे पान खातो त्याला तांबूल असेही म्हणतात. नवरात्रात, सणासुदीला आपण देवाला देखील विडा देतो. सवाष्ण जेवायला सांगितली की तिला देखील पानाचा विडा देतो. मग मला सांगा पान खाणे वाईट कसे. ते जर वाईट नसेल तर पान खाणाराकडे एवढे तुच्छतेने कशासाठी बघायचे? मला काही कळतच नाही.
काही ठिकाणी देवीच्या तोंडाला पान लावून ते कुटून प्रसाद म्हणूंन भक्तांना देण्याची पद्धत आहे. पूर्वी पान खाणे कोणालाही चुकीचं वाटत न्हवत. पुरुष व स्त्रीया दोघेही पान खात. पुरुष पानाचा विडा तयार करीत. बारीक सुपारी, चुना जरा कमी, गुलकंद घाला आशा सूचना स्वयंपाक घरातून येत असत .
घरातले पुरुष जेवण झाले की पान खात ओसरीत बसलेले असायचे. बायकांचे जेवण झाले की पानांचे तबक आत पाठवले जायचे. त्यानंतर काळ बदलला. बायकांनी पान खाणे अयोग्य मानले जायचे. मधल्या काळात स्त्रियांनी पान खाणे निषिद्ध मानले जायचे. आज मात्र सर्रास पुरुष व महिला पान खाताना दिसतात. पान खाण्याचा विषय निघाला की तिसरी कसम मधील पान खाये सैय्या हमारु या गाण्याची आठवण येते.
असे म्हणतात की एखाद्याने पान खायला दिले व खाणाराचे ओठ चांगलेच रंगले तर त्या दोघात म्हणे प्रेमभावना अधिक असते. मला असा प्रयोग करण्याची संधी काही मिळाली नाही. आता मिळून देखील त्याचा काही उपयोग नाही.
प्रदीप जोशी, मुक्त पत्रकार, मोबाईल क्रमांक 9881157709