Quotes by Aniruddh Banhatti in Bitesapp read free

Aniruddh Banhatti

Aniruddh Banhatti

@anibanistergmailcom
(33)

व्हॉटस अॅप मेडिटेशन
सध्या सगळ्यात लोकप्रिय मेडिटेशन आहे व्हॉटस अॅप मेडिटेशन . एकदा व्हॉटस अॅप नंदी लागली टाळी तेथे देहाते कोण संभाळी ? आधी मेडिटेशनची पहिली पायरी असायची मांडी घालून बसून डोळे मिटणे . आता व्हॉ- मेडिटेशनची पहिली पायरी म्हणजे आरामशीर बसून कान बंद करणे . मग शेजारी भूकंप झालास तरी त्या लहानशा पडद्यावर पाहत बसलेल्या व्यक्तीला ते जाणवत देखील नाही . त्या व्यक्तीचं आणि त्या छोट्याशा पडद्याचं जणू अद्वैत झालेलं असतं .
या मेडिटेशन मधे दोन्ही हातांचे अंगठे अगदी विजेसारखे चालत असतात . अगदी अर्जुन आणि एक लव्य दोघांनाही हेवा वाटावा असे !
एकदा व्हॉटसप रंगी रंगल्यानंतर सर्व जगाचे यच्चयावत ज्ञान आपोआपच प्राप्त होते .
असे हे मेडिटेशन . जगापासून पूर्ण मुक्ती देणारे . हे मेडिटेशन जरूर करत रहा . पूर्ण टेन्शन रहित होऊन सुखी व्हा .

Read More

#आई ,
तू साठीत पोहोचलीस तेंव्हा एकदा माझ्याशी बोलतांना म्हणालीस , खूप कठीण असतं रे म्हाताऱ्या माणसांचं सगळं करणं. म्हातारपण म्हणजे दुसरं लहानपणच असतं . मला आमच्यापेक्षा तुझी आणि मंजूचीच काळजी वाटते रे अनी ! तुमच्या नोकऱ्या , राधिका चं शिक्षण , कसं रे जमवणार सगळं तुम्ही ? म्हणजे आजारी तू आणि काळजी करतेय आमची . खरंच , हद्द झाली .

कधीतरी तुझ्या जवळ येऊन बसल्यावर तू चेहरा ओंजळीत घेऊन आपला खरबरीत हात गालावरून फिरवायचीस तेंव्हा किती रेशमी वाटायचा तो स्पर्श !
सुदैवानं आमच्याकडे रहायला लागल्यावर तुझी प्रकृती सुधारली .
काय मजा करायचो नं आपण ! दर रविवारी मी काहीतरी गोड आणलं की बाबा खूष व्हायचे . म्हणायचे - चला .फी स्ट आहे आज मेसमधे ! संध्याकाळी जेवणाला खाडा !
बाबा , तू , मंजू आणि मी , काय मजा यायची ब्रिज खेळतांना . अन हक्कानं तू ' वाफ भरला मऊ तूप मेतकूट भात अशी फर्माईश करून खायची मात्र दोन -चार घास आणि चंगळ व्हायची आम्हा सगळ्यांची .

आणि मग एक दिवस मंजू आणि मी माझ्या हृदयरोगासाठी दोन दिवस कुणाच्या तरी सांगण्यावरून कार्ल्याला गेलो काय , तर ती संधी साधून तू अचानक निघून गेलीस ! बाबांचे पाणी भरले डोळे तीन दिवस लाल सर दिसत राहिले .आम्हाला ब्रिज खेळायला बसवून स्वतः डमी झालीस , आणि बागेत फिरते डाव संपेस्तो म्हणून उठलीस , आणि नंतर ती तुझी खुर्ची रिकामीच राहिली गं आई ! त्यानंतर खरच आतापर्यंत आम्ही एकदाही ब्रिज खेळलो नाही . आई, आई , तुझ्या किती आठवणी आई , आता आयुष्यभर त्यांचीच काय ती मायेची साथ - आम्हा दोघांना _

आणि लहानशा राधिकाला देखील !

Read More

संध्याकाळी सूर्यास्त पाहणे हा माझा आजकाल नवीनच छंद झाला आहे . पूर्वी मला पाऊस पहायला खूप आवडायचं . आता सूर्यास्त . कशी क्षितिज रेषा दिवसभर झुरत असते सकाळपासून , सूर्य तिच्यापासून दूरावल्यावर ते संध्याकाळी तीव्रतेनं जाणवतं . दोघेही एकमेकांकडे आकर्षित होतांना स्पष्ट दिसतात .

सोनेरी हे रूप तुझे रे
मज जवळी येता येता
आरक्त झाले गाल माझे
तुला पाहता पाहता .

भल्या पहाटे गेलास तू
अन एकाकी मी झाले ,
संध्याकाळी कातरवेळी
तुुज साठीच सजले .

तुझ्यात मी अन माझ्यात तू
मिसळुन जाता जाता
रात्रीचे चांदणे निथळले
प्रेमात तुझ्या नहाता .

असा हा सूर्यास्त आजकाल मला वेगळाच जाणवतो . त्यात नव्या प्रेमाची नवी नव्हाळी नसून पक्व प्रेमाची पूर्ण तृप्ती असते . कदाचित आता भावना स्थिर झाल्याचा हा परिणाम असेल . कदाचित त्या सोनेरी रंगाची गुलाबी जादू असेल . आणि लांब कुठेतरी टूरिस्ट म्हणून जाऊन सनसेट पॉईंट वर सूर्याशी शर्यत लागल्यासारखं घाईनं जाऊन ' वॉव ' करत बसण्याऐवजी आता आमच्या नवीन घराच्या सज्जातून, बाल्कनीतूनच हा विविधरंगी सूर्यास्त आरामखुर्चीत बसून आम्ही दोघे पाहतो तेंव्हा दिवसभराच्या श्रमांचं सार्थक होतं . सोनेरी क्षण रेंगाळत राहतात आणि एकाएकी भराभर प्रकाश संपून रात्रीच्या जांभळ्या मखमली मिठीत आम्ही हरवून जातो .

क्षितिजरेषेत हरवून गेलेल्या सोनेरी सूर्यासारखे .

किंवा ज्यात सूर्य समर्पित झालाय त्या अदृश्य क्षितिज रेषेसारखे !

Read More