*शिक्षकांनी आपली वागणूक बदलवावी?*
        *सर्वच शिक्षक हे विद्यार्थ्यांचा राग करीत नाहीत. ते भेदभावही करीत नाहीत. ते विद्यार्थ्यांशी अतिशय सौजन्यानं वागत असतात. कधी रागवत असतीलही. परंतु ते रागावणं त्यांचं प्रेममयी असतं नव्हे तर विद्यार्थ्यात संस्कार फुलविण्यासाठी असतं. विद्यार्थी हा संस्कारी बनावा असंच शिक्षकांना वाटत असतं. मात्र काही शिक्षक त्यातही अपवाद असतातच. ज्यांच्या शिकविण्यातून दैत्यही तयार होत असतात. दुर्योधन व दुःशासनही तयार होत असतात. तसेच कोणकोणते शिक्षक एकलव्याचे अधिकारही नाकारत असतात. यात शंका नाही.*
          शिक्षक असा एक निसर्ग प्रक्रियेतील घटक आहे की जो नियम शिकवतो. त्याचा जन्मच मुळात सृष्टीचं रक्षण करण्यासाठी झालेला असतो. त्याचेसमोर येणारा प्रत्येक घटक की ज्यांच्याबाबत त्याच्या मनात आकस नसतो. भेदभावही नसतोच. याबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण घेता येईल. 
         डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे हुशार होते. तसं पाहिल्यास त्या काळात बराच भेदभाव होता व त्याच भेदभावात्मक वातावरणानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिकत असतांना बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागला. जेव्हा ते लहान होते.
           बाबासाहेब जेव्हा लहान होते व शाळेत जायचे. त्यावेळेस शाळा या इंग्रजांच्या होत्या. ज्या शाळेत नियुक्त झालेले शिक्षक ब्राम्हण समाजाचे होते. ज्यांचं नाव आंबेडकर होतं. 
            बाबासाहेब ज्या काळात शाळेत जायचे. त्या काळातही भेदभाव होता समाजात. तसा भेदभाव शिक्षण शिकत असतांना मुलांमध्येही होताच. तसं पाहिल्यास त्या काळात अस्पृश्यांना ना शिक्षण शिकायचा अधिकार होता ना शाळेत जायचा. शिक्षण तसं पाहिल्यास पिढीजातच शिकावं असं बंधन होतं व तेच पिढीजात शिक्षण हे आपल्या भविष्यातील उदरनिर्वाहासाठी शिकवत असत वडीलधारी मंडळी. बाप जी कामे करायचा. तीच कामं शिकवायचा आपल्या मुलांना. परंतु रामजींना शिक्षणाचं महत्व कळलं असल्यानं त्यांनी आपल्या मुलांना शिक्षण शिकविण्याचा बोध घेतला. ज्यातून डॉक्टर बाबासाहेब शिकते झाले. 
         डॉक्टर बाबासाहेब शिकले. परंतु ते शिकत असतांना भेदभाव असल्यानं त्यांना शाळेत उपस्थित असणारे विद्यार्थी आपल्यासोबत बसू देत नसत. तसा शिक्षकांसमोर त्या तमाम विद्यार्थ्यांच्या विचार प्रक्रियेनं पर्याय नव्हता. समजा बाबासाहेबांना इतर सर्वसामान्य विद्यार्थ्यांसोबत शिक्षण शिकण्यासाठी बसायला परवानगी दिली असती तर शिक्षकांच्या नोकरीवर आच आली असती. त्यातच भेदभाव असल्यानं त्या काळच्या इतर विद्यार्थ्यांच्या वडिलांनी आपली मुलं त्या शाळेतून काढून दुसर्याच शाळेत नेवून टाकली असती. ज्यातून शिक्षकांच्या वागण्यावर प्रश्नचिन्हंच उभं राहिलं असतं. 
         डॉक्टर बाबासाहेबांना प्रवेश देणारे शिक्षक आंबेडकर. त्यांच्याही मनात भेदभाव होताच. कारण तेही ब्राम्हण समाजाचेच होते. परंतु एक शिक्षक म्हणून नियुक्त होतांना शिक्षकात कोणत्याही प्रकारचा दुराग्रह नसतोच आणि नसावाच. भेदभाव नसावाच. कारण तो ज्ञानदानाचं काम करतो. जे काम त्यानं निःशंक मनाने करायला हवे. हाच विचार करत आंबेडकर नावाच्या शिक्षकांनी जे पाऊल उचललं. ते महत्वपुर्ण होतं. तशी त्या काळातील इंग्रजी मिशनऱ्यांच्या दबावानं बाबासाहेबांना शिक्षण शिकायला परवानगी मिळाली. परंतु सामाजिक परिस्थितीच्या बंधनातून त्यांना भेदभावानं वागविण्याची इच्छा नसूनही बाबासाहेबांना आंबेडकर शिक्षकानं वेगळं बसवलं नव्हे तर वेगळं बसवावं लागलं. त्यातच बाबासाहेबांची हुशारी पाहून त्यांना बाबासाहेब आवडायला लागले व वाटायला लागलं की हा विद्यार्थी भरपूर शिकावा. त्यानं भरपूर शिक्षण घ्यावं. परंतु ते शिकणार कसे? शिक्षकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न उपस्थित होते. 
         आंबेडकर नावाचे ते डॉक्टर बाबासाहेबांना लाभलेले शिक्षक विचार करु लागले. विचारांती लक्षात आलं की जर बाबासाहेबांना आपलं नाव दिलं तर...... तर कदाचित त्यांना दिलेल्या आडनावावरुन ते जातीचे अस्पृश्य आहेत, हे समजणार नाही. कोणीही त्यांना ब्राम्हणच समजतील व त्यांच्याबाबत पुढं कोणी शिकवीत असतांना कोणत्याच स्वरुपाचा भेदभाव करणार नाहीत. ते आंबेडकर नावाचे शिक्षक. त्यांनी तसा आपल्या मनात विचार करताच एक विचार आणखी होता की हे जर बाबासाहेबांना म्हटलं तर राग येईल. मग काय करायचं. थोडा विचार केल्यावर त्यांना आठवलं त्यांचं आडनाव. जे लांबलचक नव्हतंच. तरीही बहाणा बनवून ते एक दिवस बाबासाहेबांना जवळ बोलावून म्हणाले,
          "भीमराव, तुझं अंबावडेकर नाव जरा जास्तच लांबलचक आहे. मला सहज घेणं शक्य होत नाही. मी तुझं नाव बदलवतो. माझं आंबेडकरच नाव तुला देतो. चालेल काय?"
          ते आंबेडकर नावाच्या शिक्षकांनी बाबासाहेबांना विचारलेले शब्द. तसे बाबासाहेब लहान होते, त्यांना ते समजायला वेळ लागला नाही. त्यांनी नकार दिला. परंतु आंबेडकर नावाच्या शिक्षकांच्या मनात जो प्रश्न उपस्थित झाला होता. तो काही त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. शेवटी त्यांनी ठरवलं. आपण बाबासाहेबांच्या वडिलांना शाळेत बोलावून विनंती करायची. पाहू काय होते ते. तद्नंतर त्यांनी रामजींनाही बोलावलं. विश्लेषण समजावून सांगीतलं. ज्याचं महत्व रामजीच्या लक्षात आलं व डॉक्टर बाबासाहेबांचं नाव सपकाळ वरुन आंबेडकर पडलं. 
          डॉक्टर बाबासाहेबांचं खरं नाव सपकाळ. त्यांच्या पुर्वोत्तर पिढीनं ज्या कोण्या राजेरजवाड्यांची चाकरी केली असेल. त्या राजेरजवाड्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुर्व पिढीतील लोकांच्या कर्तृत्वाला व शुरतेला वंदन करुन दिलेली सपकाळ नावाची पदवी. जे पुढं त्यांचं आडनाव झालं. परंतु रामजींनी जेव्हा बाबासाहेबांचं नाव शाळेत टाकलं. तेव्हा सपकाळ टाकलं नाही. अंबावडेकर लिहिलं. त्याचं कारण होतं, त्यांचं अंबावडे गावाला राहाणं. तसं पाहिल्यास सपकाळ हे आडनाव न टाकण्याचं कारणही तेच होतं, भेदभाव. सपकाळ हे नाव महार जातीतच त्यावेळेस अस्तित्वात होतं. इतर जातीत नाही. त्यामुळंच स्पष्टपणे महार जात ओळखू येईल व आपल्याही मुलासोबत शिक्षण शिकत असतांना भेदभावच होईल. हाच हेतू मनात गृहीत धरुन रामजींनी आपल्या मुलाचं नाव अंबावडेकर शाळेत टाकलं होतं. अर्थात जे आंबेडकर नावाच्या शिक्षकांना वाटलं. तेच रामजींनाही वाटलं होतं. म्हणूनच जसं रामजींना आंबेडकर नावाच्या शिक्षकानं सुचना केली. त्यावर रामजीनं लगेच होकार दिला व ठरलं. आजपासून आपण आपल्या मुलाचं नाव आंबेडकर उच्चारायचं.
         डॉक्टर बाबासाहेबांचं खरं नाव सपकाळ. शाळेत प्रवेश घेतांना त्या नावाचं रुपांतरण अंबावडेकर झालं आणि पुढं आंबेडकर. त्यातच ते शिक्षण शिकत गेले. मोठमोठ्या पदव्या मिळवत गेले. त्यांना आंबेडकर जरी नाव मिळालं असलं तरी काही ठिकाणी भेदभाव व अस्पृश्यतेचा सामना करावाच लागला. तरीही त्यावर ते मात करुन शिकले व त्यांनी संविधान लिहून आपल्या कार्यकर्तृत्वाची प्रचीती देशालाच नाही तर जगाला दिली.
         आज वर्गखोल्यात तेच घडते. काही काही वर्गखोल्यात आजही अस्पृश्यांची, मुस्लिमांची मुलं शिकतात. काही गरीबांची तर काही धनिकांचीही मुलं शिकतात. ज्यातून कधीकधी वर्गातच भेदभावात्मक वातावरण निर्मिती होते. तो गरीब, मी श्रीमंत अशी भावना कधीकधी विद्यार्थ्यात तयार होते. त्यातच मी हिंदू, तो मुस्लिम अशीही भावना कधीकधी विद्यार्थ्यात तयार होते. मग वाद निर्माण होतो कधीकधी त्याच गोष्टीवरुन वर्गात. अशावेळेस शिक्षकांची भुमिका अगदी मोलाची असते. तसं पाहिल्यास त्यावर उपाय म्हणून शासनानं शाळेला एकच ड्रेसकोड दिलेला आहे. मग तो विद्यार्थी गरीब असेल तरी त्याला तोच पोशाख आणि श्रीमंत असेल तरी तोच पोशाख. तो विद्यार्थी मुस्लिम असेल तरी तोच पोशाख आणि हिंदूही असेल तरी तोच पोशाख. परंतु कधीकधी जहराची भाषा विद्यार्थ्यात वृद्धींगत होते, हे बहुतेक त्यांच्या त्यांच्या घरच्या वातावरणानं. घरी जर पालक हिंदूंच्या जनजागृतीबाबत बोलत असतील तर विद्यार्थीही वर्गात हिंदूंच्या जनजागृतीवर बोलतात. ज्यातून इतर मुस्लिम विद्यार्थ्यात त्वेषाची भावना तयार होते. तसेच घरी जर हम पाकिस्तान का झेंडा फहराएंगे असं बोलत असतील तर साहजिकच ती मुलंही वर्गात तीच भाषा बोलतात. ज्यातून सामाजिक द्वेष वाढतो. परंतु ते बालवय असतं व त्या वयात आपण काय बोलतो आहोत. हे समजायला मार्ग नसतो. परंतु तेच बोलता बोलता जेव्हा वय वाढतं. तेव्हा मात्र भाषाच नाही तर स्वभावही बदलते. अर्थात जिथं दिवाळी असते. त्या ठिकाणी साहजीकच होळी तयार होते. म्हणूनच शिक्षकांनी संयम राखत वर्गातून दुर्योधन, दुःशासन घडवू नये तर युधीष्ठीर, अर्जून व भीम घडवावेत. तसंच द्रोणाचार्यासारखं वागून एकलव्याचा अधिकारही मोडू नये. यात शंका नाही.
          अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०