शिक्षण क्षेत्र पवित्रच. त्यात प्रत्यक्ष देवच वावरतात.
*अलिकडील काळात शिक्षण पवित्र बनण्याच्या मार्गावर आहे व त्याची सुरुवात झाली, शालार्थ आयडी घोटाळा अंतर्गत भ्रष्टाचार बाहेर काढून. खरं तर शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात भ्रष्टाचारानं पाऊल टाकलेलं असतांना त्या क्षेत्रातील भ्रष्टाचार कधीच बाहेर येणार नाही असं वाटत होतं. परंतु देवाच्या दरबारात देर है अंधेर नही है, या वृत्तीला अनुसरुन भ्रष्टाचार बाहेर आला. ज्यांनी योग्यता नसतांनाही शालार्थ आयडी डुप्लिकेट तयार करुन त्याद्वारे नियुक्त्या दिल्या. त्यांचा भ्रष्टाचार उघड झाला व त्यातून ज्या लोकांच्या योग्रता असतांना त्यांना डावललं गेलं. त्यांना न्याय मिळेल असे वाटते.*
शिक्षण क्षेत्र. पवित्र असं क्षेत्र. खरं तर भ्रष्टाचार या क्षेत्रात व्हायलाच नको होता. त्याचं कारण आहे, शिक्षण क्षेत्र करीत असलेलं कार्य. ते कार्य पवित्र असं कार्य आहे. ते क्षेत्र खरं तर देशासाठी सृजाण नागरीक घडवत असतं. ज्या नागरीकात वाईट गुणच नसावेत. अशी अपेक्षा असते. अन् त्यांच्यात वाईट गुण असतील तर देशाचा बट्ट्याबोळ नक्कीच होईल ही भावना.
देश....... देशाला सृजाण नागरिकांची गरज आहे. चांगले नागरिक देशाला चांगल्या पदावर नेवू शकतात. ज्यातून देशाचा विकास होतो. परंतु देशाला जर भ्रष्टाचार लिप्त, गुन्हेगारी जगतातील नेतृत्व मिळालं तर देशाचं वाटोळं झाल्याशिवाय राहात नाही. शिवाय देशाला जर इमानदार नेतृत्व मिळालं नाही तर एखादा व्यक्ती देशच विकून जाईल. हे तेवढंच खरं.
शिक्षणासारखं पवित्र क्षेत्र. त्या क्षेत्रात वर्गखोल्यातून शिकणारी सर्वच मुलं ही इमानदार बनायला हवीत. ती कार्यकुशल बनायला हवीत. तेव्हाच उद्या त्यांना देशाचं नेतृत्व मिळाल्यावर देशही उज्वल व इमानदार असाच बनेल. अन् तसं इमानदार, कार्यकुशल नेतृत्व तयार होण्यासाठी त्यांना शिकविणारे शिक्षकही इमानदार व कार्यकुशल असायलाच हवेत. ते शिक्षकही नियमानंच चालणारे हवेत. त्यांची नियुक्ती ही भ्रष्टाचारानं होवूच नये. नियमानं व्हावी. तेव्हाच ते विद्यार्थ्यांनाही इमानदारीचं ज्ञान देतील. परंतु आता शाळेत नियुक्त होणारे शिक्षकच भ्रष्टाचार करुन नियुक्त होतात. कारण बऱ्याचशा शाळा अशा आहेत की ज्या खाजगी स्वरुपाच्याच आहेत. अशा शाळेत शिक्षकांची नियुक्ती करतांना नियुक्तीसाठी त्या शाळेतील संस्थाचालक अर्धा कोटी रुपये घेतो आजच्या घडीला. ज्यातून भ्रष्टाचार होतो व अशी भ्रष्टाचार करुन नियुक्त झालेली मंडळी वर्गात विद्यार्थ्यांना शिकवितांना इमानदारीचे धडे शिकवूच शकत नाही. शिवाय जे शिक्षक अशा भ्रष्टाचारी प्रकारानं लागतात. ते शिक्षक खरंच वर्गातही इमानदारी पद्धतीनं शिकवू शकतील काय? यावर प्रश्नचिन्हं उभं राहातं. अर्थातच देशासाठी वर्गखोल्यातून सृजाण नागरीक घडवत असतांना चांगल्या गोष्टीलाही ब्रेक लागतो. ज्यातून देशाचं भवितव्य धोक्यात येत असतं. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे शाळेचं नेतृत्व. शाळेचं नेतृत्व अर्थात शाळेला सांभाळणारा व वर नेणारा घटक अर्थातच त्या शाळेचा मुख्याध्यापक. त्यातील काहींची नियुक्ती ही अशाच भ्रष्टाचारी मार्गानं होते.
शाळेचं नेतृत्व हे खलाशाच्या नेतृत्वाएवढंच महत्वाचं असतं. ज्याप्रमाणे खलाशी हा चांगला जर असेल तर जहाज कधीच बुडत नाही. अर्थात जहाजामध्ये असलेल्या सर्व लोकांचा जीव हा नावाड्याच्या मुठीत असतो. तसंच शाळेचं आहे. शाळेचं नेतृत्व करणारा मुख्याध्यापक हा सक्षम आणि दबाबरहित असायला हवा. परंतु अलिकडील काळात ज्या खाजगी संस्था बनल्या. त्या संस्थांनी शाळा उघडल्या व जाणीवपूर्वक भ्रष्टाचार करण्याची शपथच घेतल्यागत त्यांनी भ्रष्टाचार केला व त्यातूनच शालार्थ आयडीसारखा शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला काळीमा फासणारा भ्रष्टाचार घडला. हे सगळं घडलं, खाजगी शाळेत नियुक्त झालेल्या मुख्याध्यापकामार्फत. जो संस्थेनंच नियुक्त केला होता.
शाळा ती कोणतीही असो, त्या शाळेत प्रशासन चालविण्यासाठी मुख्याध्यापक लागतो. तो जर इमानदार असेल, तर कार्यकुशलता वाढते. अन् तोच जर भ्रष्टाचारानं नियुक्त झालेला असेल तर त्या शाळेतील एकंदर कार्यकुशलतेवर डागच लागतो. खाजगी शाळेत मुख्याध्यापकाची नियुक्ती ही संस्थाचालक करतो. कारण तो मोठा भाऊच असतो एकंदर सर्व कर्मचाऱ्यांचा. ज्याला दादा म्हणतात. तो आपली दादागिरी दाखवत सर्व शाळेतील जेष्ठ शिक्षकांवर दबाव आणतो. त्यानंतर तो नियमबाह्य कामे करतो. ज्यात भ्रष्टाचार असतो. असा संस्थाचालक नियमबाह्य कामे करुन शिक्षकांना वेठीस धरून स्वतः मुख्याध्यापक बसवतो व असा मुख्याध्यापक बसवतो की जो एकतर संस्थाचालकाचा नातेवाईक असतो किंवा तो एकतर अनैतिक मार्गानं संस्थाचालकाला पैसे देणारा वा पैसे मिळवून देणारा असतो. शिवाय ज्याप्रमाणे आपल्या मोठ्या भावानं आपल्याला काही म्हटलं तर त्याची तक्रार आपण आपल्या वडिलांना करतो व आपले वडील ताबडतोब ती तक्रार ऐकून आपल्या मोठ्या भावाला दाटतात. प्रसंगी त्याला घराच्या बाहेर काढण्याची धमकी देतात. शिवाय कोणतेच आईवडील आपल्या मुलांच्या बाबतीत पक्षपातीपणा करीत नाहीत. मात्र अशा संस्थांच्या वर जे अधिकारी बसले असतात. ते अधिकारी खरं तर शिक्षकांच्या वडिलांच्या भुमीकेत असतात. ते अधिकारी संस्थेतील शाळेत जरी शिक्षकांवर अन्याय झाला किंवा होत असेल तरी त्या प्रकरणात वडिलांची भुमिका साकारत नाहीत. ते पक्षपात करतात व संस्थाचालक रुपी मोठ्या भावालाच मदत करतात. ज्यातून पक्षपात होतो व भ्रष्टाचारही. अशातूनच शालार्थ आयडी घोटाळे होतात व शिक्षण क्षेत्राचं वाटोळं होतं. त्याचबरोबर वाटोळं होतं देशाचंही.
अलिकडेच अस्तित्वात आलेला शालार्थ आयडी घोटाळा. ज्यातून वडिलांची भुमिका अदा करणारे अधिकारी सापडले. परंतु मोठे भाऊ असलेले संस्थाचालक मात्र तेवढ्या प्रमाणात सापडले नाहीत. कारण मुलं वात्रट जरी निघाली असतील तरी दोष मुलांचा नसतोच. दोष असतो बापाचा की ज्यांनी त्या मुलांना घडवलंय. खरं तर त्या बापानं चांगले संस्कार मुलं घडवितांना त्यांच्यावर करायला हवे होते. ते केले नाही म्हणूनच मुलं बिघडली. तेच अधिकारी वर्गाच्या बाबतीतही घडलं. त्यांनी आपली वडिलांची भुमिका अदा करुन शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात काम करीत असतांना इमानदारीनं काम करायला हवं होतं. भ्रष्टाचार करुन संस्थाचालकासारख्या मोठ्या भावाच्या बोलण्यात वा कर्तृत्वात पक्षपाती भुमिका घेवून भ्रष्टाचार करायला नको होता. ज्यातून शालार्थ आयडी घोटाळा झाला व अधिकारी सापडले.
महत्वपुर्ण बाब ही की शिक्षण क्षेत्रातील हा शालार्थ आयडी घोटाळाच नाही तर त्या क्षेत्रात होत असलेला घोटाळा कधी ना कधी उघड होणारच होता. कारण हे पवित्र क्षेत्र आहे व हे क्षेत्र भ्रष्टाचार खपवून घेणार नाही. कधी ना कधी तो बाहेर येणारच. कारण यात त्या अबोध मुलांचं भवितव्य आधारलेलं आहे. ज्यांना आपण प्रत्यक्ष देव मानतो वा देवाचे रुपक देतो. हा भ्रष्टाचार देवच त्या मुलांच्या रुपानं का असेना. प्रत्यक्ष उघड्या डोळ्यानंच पाहतो. मग तोच देव कधीकधी असला गैरव्यवहार बाहेर आणतच असतो. देशाला वाचविण्यासाठी. कारण आपल्यालाही माहीत आहे व इतिहास साक्षीला आहे की पृथ्वीवर जेव्हा जेव्हा अन्याय, अत्याचार झाला. तेव्हा तेव्हा प्रत्यक्ष देवानंच पृथ्वीवर अवतार घेतले आहेत. पृथ्वीवर होत असलेल्या दानवांच्या अत्याचारापासून वाचविण्यासाठी.
विशेष सांगायचं म्हणजे आज शालार्थ आयडी घोटाळा जरी बाहेर आला असला, मोठमोठे मासे जरी गळाला लागले असले तरी शिक्षणक्षेत्रातील भ्रष्टाचार संपण्याची चिन्हं दिसत नाहीत. आजही शिक्षण क्षेत्रात भ्रष्टाचार होतोच व आजही शिक्षण क्षेत्र नियम डावलूनच पदोन्नत्या देत असल्याचे आणि पैसे कमवीत असल्याचे दिसत आहे. परंतु त्याला प्रत्यक्ष पुरावे नसल्यानं असे होत असलेले भ्रष्टाचार आजही उघड करता येत नाही. परंतु काळाच्या ओघात तेच भ्रष्टाचार कधीकधी बाहेर निघतीलच, शालार्थ आयडी घोटाळ्यासारखेच. कारण शिक्षण क्षेत्र पवित्र क्षेत्र आहे व त्या क्षेत्रात प्रत्यक्ष देवच लहान मुलांच्या स्वरुपात वावरत असतो. यात शंका नाही. म्हणूनच निदान शिक्षण क्षेत्रात तरी भ्रष्टाचार करु नये म्हणजे झालं.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०