Sarkari Nokri - 9 in Marathi Philosophy by Ankush Shingade books and stories PDF | सरकारी नोकरी - 9

Featured Books
Categories
Share

सरकारी नोकरी - 9

***************** ९ **************************

          टेटची ती परिक्षा. ती येण्यापूर्वीच शाळेशाळेत गोंधळ होता. शाळाशाळांमध्ये शैक्षणिक गोंधळ माजला होता. शिक्षकांना शासन सुखानं जगू देत नव्हतं. निव्वळ शासनच नाही तर खाजगी शाळेतील संस्थाचालकही सुखानं जगू देत नव्हता. तो देण म्हणून शिक्षकांच्या रकमेतून पैसे घेत होता. आपली गुंडगीरी दाखवत होता. ऑनलाईन कामानं तर शिक्षकांचं कंबरडं मोडलं होतं. त्यातच सरकार निवडणूक आणि इतर बऱ्याच गोष्टीची कामंही शिक्षकांच्या मागं लावत होते. जसा शाळेचा सृष्टीला त्रास होत होता. तसाच त्रास प्रभासलाही होत होता. त्यामुळंच सृष्टीच्या मनात जे विचार येत होते. तेच विचार प्रभासच्या मनात यायचे. एक दिवस अमेय प्रभासला जेव्हा भेटला. तेव्हा प्रभासनं शाळेबाबतची चिंता त्याचेजवळ व्यक्त केली. शाळेबाबत प्रभास अमेयला म्हणत होता,
              "अलिकडील काळात शाळा, शाळा राहिलेल्या दिसत नाहीत. शाळांमध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे. असंच वातावरण दिसत आहे व तशाच स्वरुपाचं वातावरणही तयार झालं आहे शाळेत. त्याचं कारण आहे शासनाचं धोरण. पुर्वी थोडंफार बरं होतं. परंतु आता जे नवीन शैक्षणिक धोरण आलं. त्यानंतर आली ऑनलाईन प्रक्रिया. तसा ऑनलाईन प्रक्रियेचा बराच फायदाही आहे. परंतु त्या प्रक्रियेनं शिक्षकांची झोप उडवली असून शिक्षकात भययुक्त वातावरण तयार झालं आहे. त्यातच आली आहे टेट परिक्षा. त्या टेट परिक्षेनं तर शिक्षकांचं जगणं कठीण करुन टाकलं असून आता टेट चा अभ्यास करावा की विद्यार्थ्यांना शिकवावं. ही परिस्थिती व सावळा गोंधळ आज तयार झाला आहे.
           तो टेट परीक्षेचा निर्णय. त्या निर्णयानं शिक्षकांमध्ये भीतीदायक वातावरण तयार झालं आहे. शिक्षकांना आता भीती वाटायला लागलीय आपल्या अस्तित्वाची. वाटत आहे की कदाचित आपण टेट परिक्षा नापास झाल्यास आपली नोकरी संपेल की काय?
          शिक्षण हे पवित्र क्षेत्र आहे, त्यातच शिक्षक हा घटक अतिशय इमानदार घटक आहे. शिवाय प्राथमिक शिक्षक हा जास्तच इमानदार आहे. तसं पाहिल्यास या प्राथमिक शिक्षकाला कोणतेच डावपेच समजत नाहीत. अन् तो डावपेचही खेळत नाही. ना त्याला राजकीय खेळी जमत, ना त्याला राजकारण जमत. तसा प्राथमिक शिक्षक हा कमी शिकलेला असतो.
          प्राथमिक शिक्षक हा कमी शिकलेला असतो. शिवाय त्याला मतदानाचा अधिकार नाही. तो संघटनेच्या माध्यमातून शिक्षक संघाच्या निवडणुकीत उभा राहू शकत नाही. अन् राहिल्यास त्याला प्राथमिक शिक्षक मतदान करू शकत नाही. त्यामुळंच की काय, त्याचं गाऱ्हाणं वा तुणतुणं कोणीच ऐकू शकत नाही. याचाच अर्थ असा की त्याचं ऐकणारा कोणी वारसदारही नाही की जो त्याचं गाऱ्हाणं ऐकून त्याची तक्रार दूर करु शकेल. 
           प्राथमिक शिक्षक हा राजकारणात नाही. त्याला राजकारण समजत नाही. अन् मतदान तो करु शकत नसल्यानं त्याचं तुणतुणंही कोणी ऐकत नाही. साहजिकच यामुळंच प्राथमिक विभागात सावळा गोंधळ सुरु राहतो. जो तो अधिकारी येतो, नेता येतो व तो नेमकं आपल्याला याच प्राथमिक शिक्षकांनी लिहायला वाचायला शिकवलंय, हे विसरुन चक्कं थोबाडीत मारुन जातो. खरंच विचार करण्यासारखी बाब ही आहे की जर प्राथमिक शिक्षक नसता तर खरंच आपण लिहायला वाचायला तरी शिकलो असतो काय? याचं उत्तर नाही असंच येतं. 
           प्राथमिक शिक्षक....... प्राथमिक शिक्षक हा काही वर्गावर गेल्यावर बसून राहात नाही. तो विद्यार्थ्यांचे बोट धरुन शिकवतो. शिवाय मोठ्या मुलांना शिकवणं कठीण नाही. परंतु लहान मुलांना शिकवणं कठीण असतं.
          कधीकधी शिक्षकांचं डोकं खराब होतं, शिकवीत असतांना. कारण एकच अक्षर एकाच विद्यार्थ्यांना कितीतरी वेळा गिरवायला लावलं तरी त्याला ते येत नाही. कारण असतं विस्मरण. एक अक्षर शिकविल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना अर्ध्या तासानं विचारलं की ते अक्षर नेमकं कोणतं ते ओळख. तर ते ओळखूच शकत नाही. असं बरेचदा घडतं. त्यावर कोणताच उपाय निघत नाही. अशातच अनेक दिवस निघून जातात. परंतु तशा विद्यार्थ्यात काहीच फरक पडत नाही. तरीही शिक्षक त्या मुलांकडे दुर्लक्ष करीत नाही. त्याला सांगतोच. अन् त्याचेवर बसलेला अधिकारी वर्ग. उचलली जीभ टाळूला लावल्यागत त्याच शिक्षकांना धारेवर धरतात. तेव्हा विचार येतो. विचार येतो की आपण असं कोणतं पाप केलं होतं की या शिक्षक व्यवसायात आलो किंवा आपल्याला कोणती दुर्बुद्धी सुचली होती की आपण शिक्षक बनलो. 
          बोलायला काय जातं. कोणालाही बोलता चांगलं येतं. परंतु तीच कृती जर करा म्हटलं तर कठीण आहे. कारण जशी आपली पाच बोटं सारखी नसतात. तसे विद्यार्थीही सारखे नसतातच.
           काही विद्यार्थी हे मतीमंद असतात, काही गतीमंद असतात. काही स्वमग्न असतात. अशा विद्यार्थ्यांना शिकविणं म्हणजे तारेवरची कसरतच असते. तरीही शिक्षक हे शिकवीत असतातच. अन् खासकरुन प्राथमिक शिक्षक. कारण एकदा का मुल वाचन, लेखन शिकलं की त्याला शिकविणं अवघड जात नाही. तो स्वतः ज्ञान उर्जीत करु शकतो. तसाच तो स्वतःच शिकूही शकतो. 
          सृष्टीचे तसे पाहिले तर बरेच घटक महत्वपुर्ण आहेत. परंतु सर्वात महत्वपुर्ण घटक दोन आहेत. एक शिक्षक व दुसरा डॉक्टर. डॉक्टर हा कोणत्याही व्यक्तीचं आयुर्मान वाढवू शकतो. त्याच्या शारिरीक आरोग्याचा विकास करु शकतो. अन् शिक्षक हा घटक कोणत्याही व्यक्तीचे ज्ञान वाढवू शकतो. त्याचा मानसिक विकास करु शकतो. हे दोन घटक नसतील तर सृष्टी ही चालू शकणारच नाही. पुर्वीचा वैद्य आज जरी डॉक्टर बनला असला तरी त्याचं अस्तित्व सृष्टीसाठी जसं महत्वपुर्ण आहे. तसंच महत्वपुर्ण आहे शिक्षकांचं अस्तित्व. तो जर टिकला तर सारेच व्यवस्थित राहू शकेल अन् तो जर टिकलाच नाही तर साऱ्यांची फजिती होईल व सर्वांची पशुमध्ये तुलना होईल. हे सारस्वत सत्य आहे. कारण माणसाला पशुपासून माणसात आणण्याचं कार्य हे आधीपासूनच शिक्षकांनी केलेलं आहे.
           महत्वपुर्ण बाब ही की अलिकडील काळात आलेली टेट परिक्षा शिक्षकांच्या पात्रतेची परिक्षा जरी असली तरी त्यातून जिल्हा परीषदेच्या निःशुल्क शिकणाऱ्या व त्यांना शिकविणाऱ्या शासनाने नियुक्त केलेल्या शिक्षकांचे नुकसान होणार असून ते घरी बसणार आहेत. त्यातच त्यांना शिकविणारे शिक्षक खासकरुन कमी होतील. ज्यातून त्यांच्या शिक्षणावर परिणाम होईल. ज्यातून त्यांची मानसिकता बनेल की जिल्हा परिषदच्या निःशुल्क शिकविणाऱ्या शाळेत चांगलं शिकवित नाहीत. आपण कॉन्व्हेंटला नाव टाकावं. 
            काही विद्यार्थी कॉन्व्हेंटलाही जातील. ज्यांच्याजवळ पैसे आहेत. ज्यांच्याजवळ पैसे नाहीत, ते मात्र जिल्हा परीषदेच्या निःशुल्क शिकविणाऱ्या शाळेत असतील. ज्या शाळेत दर्जा राहूच शकणार नसेल. कारण एका शिक्षकाला अनेक वर्गांना शिकवावं लागेल. तसं शिकविणं हे खरं शिकविणं नसून गुरं राखण्यागत काम असेल. यात शंका नाही. 
            विशेष म्हणजे टेट परिक्षा नक्कीच घ्यावी. परंतु ती केव्हा? जेव्हा एखाद्या शिक्षकाला नवनियुक्ती देतांना. जे अस्तित्वात आहेत, त्यांच्यासाठी टेट परिक्षा नसावीच. कारण असं केल्यानं जी परिस्थिती सुरळीत चालत आहे. त्या परिस्थितीची हत्या करणे होईल. गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणाचीही हत्या करणे होईल. कारण गोरगरिबांची मुलं कॉन्व्हेंटला शिकू शकत नाहीत. जिथं खायलाही पैसे पूरत नाहीत. तिथं कॉन्व्हेंटचं शिक्षण असे पालक कसे शिकविणार? असं जर झालं तर उद्या कॉन्व्हेंटच्या शाळा वाढतील नव्हे तर कॉन्व्हेंटच्या शाळेतील शिकवायला विद्यार्थ्यांकडून घेतले जाणारे पैसेही वाढतील. कारण अलिकडील काळात कॉन्व्हेंट शाळेत अपात्र व्यक्तीही शिकविण्यास पात्र ठरवला जातो. तशीच गोरगरिबांची मुलं शिकू शकणार नाहीत. ती शिक्षणापासून वंचित होतील. त्यांचं शिक्षण खंडीत होईल. यात शंका नाही. मग देशात दुराचार माजेल व खऱ्या अर्थानं शिक्षणाचा खेळखंडोबा झाल्याशिवाय राहणार नाही."
            प्रभासही शिक्षक बनला होता व त्यालाही टेट परिक्षाच नाही तर शाळेच्या इतरही कामाचा त्रासच होत होता. तोच शिक्षक म्हणून होत असलेला त्रास त्यानं अमेयजवळ व्यक्त केला होता.                          
          मराठ्यांना आरक्षण मिळालं होतं. त्यानुसार त्याच आरक्षणाचा फायदा झाल्यानं प्रभासलाही नोकरी लागली होती. मात्र अमेयला नोकरी लागली नव्हती. तसं त्याला माहीतच असल्यानं प्रभासला नोकरी लागण्यापुर्वीच त्यानं एक साधारण उद्योगधंदा सुरु केला होता. ज्यात मेहनत होती.
          काही दिवस गेले होते. काळ बदलत चालला होता. त्याच बदलत्या काळानुसार अमेयचा धंदाही चालायला लागला होता. आता तो बऱ्यापैकी कमवीत होता. जेवढं प्रभास कमवीत नव्हता. त्याच्या दोन चार इमारती बांधून झाल्या होत्या व नुकतीच त्यानं एक चारचाकी गाडीही विकत घेतली होती. मात्र प्रभासला सरकारी नोकरी असूनही त्यानं आपल्या स्वतःचा तेवढा विकास केला नव्हता. 
          दोघांचा झालेला विकास अमेय पाहात होता. मात्र आजही त्याच्या मनात तो शिकला असल्यानं नोकरी न मिळण्याचं शल्य त्याच्या मनात बोचत होतं. वाटत होतं की नोकरी मिळाली असती तर बरं झालं असतं. तसं पाहिल्यास टेट परिक्षेची थंडी त्यालाही लागलेलीच नव्हती.
           सृष्टी व प्रभासचा विवाह झाला होता व दोघंही शिक्षक म्हणूनच लागले होते नोकरीला. नोकरी लागताच प्रभासनं लावलेला उद्योगधंदा बंद केला होता. दोघांपैकी शालार्थ आयडी घोटाळ्याचा त्रास सृष्टीला झाला होता. तसा शालार्थ आयडी घोटाळ्याचा त्रास प्रभासला झालाच नव्हता. मात्र त्याला वेगळाच त्रास झाला होता. त्यातच आता टेट परिक्षाही आलीच होती. ज्या टेट परिक्षेनं त्या दोघांच्याही नोकऱ्या गेल्या होत्या. ज्यात त्यांची मुलं लहान लहानच होती व त्यांचं शिक्षण पाणी बाकी होतं. 
            अमेयला सरकारी नोकरी नव्हती. तसा तो प्रभासला असलेली सरकारी नोकरी पाहातच होता. ते पाहात असतांना त्याला आपल्याला आरक्षण नसल्याची खंत जाणवत होती. त्यातच जेव्हा तो प्रभासच्या घरी यायचा. तेव्हा त्याला वाटायचं की काश! आपल्याला सरकारी नोकरी असती तर..... तर आपणही सुखीच झालो असतो. 
           नोकरी न मिळाल्याचा विचार करता करता एक दिवस तो प्रभासच्या घरी आला. त्यानंतर दोघात चर्चा झाल्या. आधी इकडल्या तिकडल्या गोष्टी झाल्या व थेट अमेयनं विचारलं,
           "काय म्हणते नोकरी? कशी काय सुरु आहे?"
            ते अमेयचं विचारणं. त्यावर उत्तर देत प्रभास म्हणाला,
           "काय सांगू अमेय. नोकरीबाबत तू विचारुच नकोस."
          "म्हणजे?"
          "अरे, माझी नोकरी गेलीय आणि त्याचबरोबर तुझ्या वहिणीचीही नोकरी गेलीय."
           "कशी काय?"
           "ती टेटची परिक्षा. जिनं आम्हाला घरी बसवलं."
            "म्हणजे?"
             "आम्ही टेट परिक्षा पासच झालो नाही."
            "का बरं?"
            "अरे, यार, कॉलेजमध्ये असतांना जर टेट परिक्षा दिली असती तर पास झालो असतो."
            "अन् आता का नाही पास झाले?"
             "आता? आता कशी होणार टेट परिक्षा पास."
             "म्हणजे?"
             "अरे, सवय सुटली ना. अन् या उतारवयात काही लक्षात राहते का आपल्याला."
             "अरे, मनात आणलं तर सगळंच होतं. तू मनात आणलं नसशील."
              "अरे, नोकरीचा प्रश्न होता. मग मी मनात नाही आणणार तर कोण आणणार. अन् मनात आणलं तर सर्व होतं, या बोलायच्याच गोष्टी आहेत. करणं अवघड आहे व वास्तविकता वेगळीच आहे. शिवाय विद्यार्थ्यांचा प्रश्न होता. त्यांना शिकवायचेही होते. आपण घरची दोन मुलं शिकवून अभ्यास करु शकत नाही. मग एवढी मुलं आम्हाला शिकवावी लागतात. ज्यातून आमचा टेट परिक्षेचा अभ्यास कसा होणार? म्हणूनच आम्ही नापास झालो आणि घरी बसलो."
           "आंदोलन वैगेरे नाही केलं का तुमच्या कर्मचाऱ्यांनी. "
           "अरे, केलं. परंतु काहीच उपयोग झाला नाही. शेवटी घरी बसलो."
            "पेन्शन मिळत असेल न?"
             "नाही. आम्हाला कुठं आली पेन्शन. आमची अपॉइंटमेंट दोन हजार पाचच्या नंतरची आहे."
            "म्हणजे?"
            "म्हणजे आम्हाला पेन्शन नाही."
            "काय बोलतोस? म्हणतात ना की सरकारी नोकरीवाले बरेच सुखी असतात."
            "कसलं आलं सुख? अरे, जावे त्यांच्या वंशा, तेव्हाच कळे. आम्ही सुखी नाही राव. सर्वच सरकारी कर्मचाऱ्यांचे असेच हाल आहेत राव."
              "हो का."
              "हो म्हणजे. होयच. आम्ही सरकारी कर्मचारी म्हणायलाच आहो."
             प्रभासनं अमेयला बऱ्याच गोष्टी सांगीतल्या. ज्या सरकारी कर्मचारी म्हणून लागल्यानंतर त्यानं भोगल्या होत्या. तसं त्यानं सरकारी कर्मचारी बनल्यानंतर बरंच काही भोगलं होतं. ते तो सांगत होता अमेयला. अन् सांगता सांगता त्याच्या डोळ्यातून अश्रूही टपकत होते. 
            प्रभासला आठवत होता तो काळ. तोही एका संस्थेतच नोकरी करीत होता व त्याच्या शाळेत त्यानं कितीतरी पैसा संस्थाचालकाला नगद देवून नोकरी मिळवली होती. तरीही संस्थाचालक त्याला वेतनातून पैसा मागतच होता. जी कबूली होती. त्याही कबुलीपेक्षा कितीतरी जास्त पैसा त्यानं संस्थाचालकाला दिला होता. अशातच त्याला बारा वर्ष झाले होते. बारा वर्ष होताच त्याला वरीष्ठ वेतन श्रेणी हवी होती. ज्यासाठी त्या शाळेतील मुख्याध्यापकानं त्याला पैसे मागितले होते. म्हटलं होतं की त्यानं पैसे द्यावेत. तरच त्याला वरीष्ठ वेतन श्रेणी मिळणार. मग काय, त्यानं आपल्याला वरीष्ठ वेतन श्रेणीचा लाभ मिळावा म्हणून मुख्याध्यापकाला पैसे दिले. परंतु सहा महिने झाले तरी मुख्याध्यापकानं त्या संदर्भात प्रस्तावच पाठवला नाही. तसं दोन तीन वेळेस त्यानं मुख्याध्यापकाला विचारलं. परंतु मुख्याध्यापकानं नकारच दर्शविल्यानं शेवटी सहा महिने झाल्यानंतर जेव्हा त्यानं मुख्याध्यापकाला त्याचा जाब विचारला व म्हटलं की जर वरीष्ठ वेतन श्रेणी त्याला लागणार नसेल तर त्यांनी त्याचे पैसे परत देवून द्यावे. 
          विषय तोच. त्यावर मुख्याध्यापक व प्रभासचं कडाक्याचं भांडण झालं. तशीच त्या भांडणातून मारहाणही झाली. मुख्याध्यापकानं मारहाण केली प्रभासला व तो अपमान वाटला प्रभासला स्वतःचा झालेला. ज्यात प्रभासनं खटला दाखल केला होता. 
           तो खटला. चूक प्रभासची नव्हतीच. चूक होती मुख्याध्यापकाचीच. परंतु त्यात मुख्याध्यापक हा सरस
ठरला. त्यानं त्याकाळात त्याचं वेतन बंद केलं होतं. अशातच प्रभासचं वेतन बंद झाल्यानं त्याची उपासमार होवू लागली होती. बरं झालं की त्याची पत्नी सृष्टीचं वेतन सुरु होतं. नाहीतर त्याला उपासानं आत्महत्याच करावी लागली असती. 
           ते दोन वर्ष. त्या दोन वर्षात त्याचं बंद असलेलं वेतन. शाळेत ड्युटीवर जाणं सुरु होतं. इतरांना वेतन मिळत होतं. परंतु त्याला वेतन मिळत नव्हतं. त्यातच आपलं वेतन पुढं निघेलच. याची काही शाश्वती नव्हती. अशातच मारहानीचा खटला पैसे नसल्यानं व त्याला खटल्यावर पैशाअभावी उपस्थित राहता येत नसल्यानं व वकीलही लावता येत नसल्यानं हारावा लागला. त्यातच त्याला आपल्या वेतनाचाही खटला टाकावा लागला होता. जो जिंकणं अतिशय आवश्यक होता.
         दिवसामागून दिवस जात होते. तसा तो दिवस उजळला. प्रभास वेतनाचा खटला जिंकला होता. ज्यातून त्याला वेतन मिळालं होतं. परंतु पुढं त्याच मुख्याध्यापकानं त्याला त्रास देण्यासाठी त्याचं वेतन सुरु ठेवलं आणि त्याला वर्गच शिकवायला दिला नाही. ज्यातून विना काम करत बसणं अवघड जात होतं. 
          तो मुख्याध्यापक व त्या मुख्याध्यापकानं प्रभासला त्रास देण्यासाठी दोन वर्ष वेतन बंद केलं होतं व वर्ग शिकवायला लावला होता. त्यानंतर दोन वर्ष वेतन सुरु ठेवलं व वर्ग शिकवायला दिला नाही. अन् आता तो त्याला दिलं गेलेलं वेतन परत मागू लागला होता. म्हणू लागला होता की त्यानं कामंच केलं नाही आणि वेतन उचललं तर ते वेतन मागायला नको काय? 
           मुख्याध्यापकाचं म्हणणं बरोबर होतं. परंतु चूक मुख्याध्यापकाचीच होती. कारण त्यानंच त्याला शिकवायला वर्ग दिला नव्हता. वेतन दिलं होतं. तसं पाहिल्यास शाळा त्याच्याच नातेवाईकाची होती. ज्या ठिकाणी त्याचंच वर्चस्व होतं व ते वर्चस्व अबाधित होतं. शिवाय तद्नंतरचा काळ असा उजळला प्रभासच्या जीवनात की प्रभासवर वेगवेगळे आरोप लावून सतत निलंबन केलं जायचं व त्याला न्यायालयात जावं लागायचं. त्यातच तो न्यायालयातून बा इज्जत बरी होवून आला की पुन्हा आरोप लावले जायचे व त्याचं निलंबन केलं जायचं. ज्यातून तो त्याला असलेल्या सरकारी नोकरीतून बराच त्रासला होता. त्यातच आला होता शालार्थ आयडी घोटाळा. ज्यातूनही तो सुटला. परंतु नंतर आलेली टेट परिक्षा. त्यातून तो सुटू शकला नाही व त्याला घरीच बसावे लागले.
          प्रभासला आठवत होती त्याची आजची अवस्था. आज तो बराच दुःखी होता. अन् दुःखी तरी का नाही राहणार. नोकरीची सवय असल्यानं प्रभासला दुसरं काम करायची लाज वाटत होती. आजपर्यंत त्याला मिळणाऱ्या वेतनानं त्यानं आपली स्वतःची गुजराण केली होती. शिवाय निलंबनाच्या काळात जेव्हा त्याचं वेतन बंद असायचं. तेव्हाही तो जवळच्याच पैशात खटला लढायचाच. शिवाय मदतीला होता सृष्टीचा पैसा. त्यामुळं काम करण्याची गरज प्रभासला भासली नाही. परंतु आता तशी परिस्थिती नव्हती. आता टेट परिक्षेच्या निकालानं तो जसा घरी बसला. तशीच त्याची पत्नी सृष्टीही घरीच बसली होती. त्यातच त्या दोघांनाही पेन्शन नसल्यानं घरची स्थिती दुरापास्त होती.
          तो एक एक पैलू. तो एक एक पैलू अमेयला सांगत होता व अमेयचंही ह्रदय ते ऐकून द्रवत होतं. त्यालाही त्याची परिस्थिती ऐकून वाईटच वाटत होतं. तसं पाहिल्यास प्रभासनं सांगितल्यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांचे हाल त्याला बघवत नव्हते. 
          अमेयला विचार आला होता. विचार आला होता की बरं झालं मी सरकारी कर्मचारी बनलो नाही तर...... सरकारी कर्मचारी जर बनलो असतो तर अशी वेळी अवेळी नोकरी गेली असती. तो विचारच करीत होता. तोच त्याच्या तोंडून शब्द फुटले.
         "बरं झालं की मी सरकारी कर्मचारी बनलो नाही. नाहीतर मलाही तुझ्यासारखंच आता घरी बसावं लागलं असतं."
          "हो ना. अगदी तसंच घडलं असतं." प्रभास म्हणाला व चूप झाला. त्यानंतर बरीच रात्र झाली होती व तसा अमेय आपल्या घरी जायला निघाला. वाटेत त्याच्या मनात असंख्य विचार होते. जे विचार नोकरीसंबंधाने होते. विचार होते की आता आपण आपल्या मुलांनाही नोकरीच्या उद्देशानं शिकवायचं नाही. शिकवायचं ते उद्योगधंदा त्यानं सांभाळावा म्हणून. कारण नोकरीत प्रभासला एवढे कष्ट झाले होते. जे कष्ट माझ्या मुलांनाही होवू शकतील सरकारी नोकरी मिळविल्यानंतर. जावे त्याच्या वंशानुसार मला उद्योगधंदा चांगला वाटत नव्हता. सरकारी नोकरी चांगली वाटत होती. परंतु नाही. सरकारी नोकरीही चिंतेचीच बाब आहे. चांगल्या सुखसमाधानाची बाब नाही. सुरुवातीलाच वाटतं की सरकारी नोकरी असावी. परंतु ती मिळाल्यावर ती बरी वाटत नाही.