" भक्ताचे देवाशी हितगुज "
गुजरात राज्यातील डाकोर येथे रामदास नावाचा एक कृष्ण भक्त होता. गावात कोरडी भिक्षा मागून तो कुटुंबाचे पोषण करत होता. तो अत्यंत गरीब होता तो नेहमी राहत असे. तो सतत नामस्मरणात काळ कंठीत असे. दर एकादशीला तो कृष्ण दर्शनासाठी द्वारकेला जात असे. कृष्णाच्या दर्शनाला कधीही रिक्त हस्ते जात नव्हता. दर्शनाला निघण्या आधी तो एक सागाचे लाकूड तोडून आणित असे. त्यात एक तुळस लावायचा आणि ती तुळस बरोबर घेऊन जाई.तिथे पोचल्यावर ती तुळस कृष्णाला मोठया भक्ती भावाने अर्पण करायची असा त्यांचा नित्य नियम होता.त्याचा हा नियम कित्येक वर्षे हा चालला होता. आता रामदास म्हातारा होत चालला.त्याच्यात द्वारकेला जाण्याची शक्ती उरली नव्हती. नेहमीप्रमाणे तो कृष्ण दर्शना साठी गेला होता. तेव्हा तो देवाला म्हणाला, "देवा आता यापुढे मला तुझ्या दर्शनाला येता येणार नाही. ही माझी शेवटची भेट समज" कृष्णाचेही रामदासवर अत्यंत प्रेम असल्यामुळे त्याचे हे बोलणे ऐकून देवाच्या डोळ्यातून पाणी आले. देव त्याला म्हणाले, " तू फार श्रम केले आहेत ते श्रम माझ्या हातून फिटणार नाही तेव्हा तूच मला तुझ्या गावी घेऊन जा. त्याप्रमाणे रामदासाने देव रातोरात रथातुन डाकोरला आणले. मागाहुन शोध काढत मंदिरातील पुजारी आले तर काय करायचे? असा प्रश्न त्याला पडला. म्हणून त्यानें पुजार्यांच्या भीती पोटी ती मूर्ती तलावात लपवुन ठेवली. नेहमीप्रमाणे पुजारी सकाळी पूजा करण्यासाठी मंदिरात आले. पाहतात तर काय नवल. देवळात मुर्ती दिसली नाही. यावेळी ते विचार करू लागले. त्यांनी विचारपूस केली तर कोणी तरी म्हणाले "रात्री रामदास इथे आला होता त्यांनीच मूर्तीचोरून नेली असेल. त्यावरून पुजारी डाकोर येथे रामदास कडे आले. त्यांनी मुर्ति बद्दल विचारले तेव्हा रामदासाने कानावर हात ठेवले. तेव्हा रामदासने" मला काही माहित नाही" असे सांगितले. तेव्हा पुजार्यांनी मूर्तीचा इतरत्र शोधा शोधी सुरू केली. मूर्तीचा शोध करीत ते ज्या तलावात मूर्ती होती त्या गावाबाहेरच्या तळ्यात मूर्ती सापडली. त्यावेळी पुजार्याच्या हातात बर्चि होती ती देवाच्या पोटाला लागून रक्त वाहिल्यामुळे तळ्याचे पाणी रक्तासारखे लाल झाले होते. मूर्ती वर काढलेली पाहून रामदास ला आपण पुजाऱ्या ना खोटं सांगितल्याचा पश्चाताप वाटू लागला. मनोमन तो भक्तीभावाने कृष्णाची प्रार्थना करू लागला. तो म्हणाला " देवा तुझ्या साठी मी खोटं बोललो आता काय करायचे?" रामदासाचा भाव जाणून देव रामदासजवळ प्रगट होऊन त्याच्याशी हितगुज करीत म्हणाले "मी विठ्ठल अवतारात पुंडलिकासाठी पंढरपूर मध्ये विटेवर तिष्ठत थांबलो तसाच मी तुझ्यासाठी ही येथे राहील. तू चिंता करू नको. तु या लोकांना सांग मुर्तिच्या वजना ईतके सोनं देतो मुर्ति नेऊ नका." त्यावर गरीब रामदास देवाला म्हणाला, "देवा माझ्याकडे नाही इतके सोने, मी कोठून देणार तुमच्या वजनाइतके सोनं?"त्यावर देव म्हणाले "तु फक्त देण्याचे कबूल कर म्हणजे मला ते न घेताच परत जातील".रामदास अश्रूपूर्ण नेत्राने देवाकडे पाहू लागला. देव म्हणाले, त्यांनी जर मूर्तिच्या बदल्यात सोने मागितलेच तर तु तुझ्या बायकोच्या. नाकातील सोन्याची नथ आण म्हणजे माझे वजना समान होईल." देवाने सांगितलेली युक्ती रामदासाना आवडली. तो पूजाऱ्याकडे जाऊन त्यांना म्हणाला, " मी देवाच्या वजनाइतके सोने देतो पण तुम्ही मुर्ति इथेच राहू द्या." आणि त्यानीं त्याचे म्हणणे कबूल केले.परंतु गावकऱ्यांना त्याची परिस्थिती माहिती असल्यामुळे ते हसु लागले व तर्क करू लागले कीं भिक्षा मागून जीवन कंठणारा हा मूर्तीच्या समतुल्य सुवर्ण कोठून आणणार? परंतु एकनिष्ठ भक्तीने अशक्य ते शक्य होण्याची किमया घडून जाते.रामदास पत्नीची नथ घेऊन आला आणि त्यांनी देवाची प्रार्थना करून ते सोन्याची नथ पारड्यात टाकली पारडे तंतोतंत समान झाले.सर्वाना आश्यर्य वाटले पुजारी ते सोने घेऊन गेले आणि द्वारकेला त्यांनी नवीन मुर्ति बसवली.रामदासाने कृष्णमूर्ती मंदिरात ठेवली म्हणून तेव्हापासून तो आजतगायत याञेकरु प्रथम डाकोरला व नंतर द्वारकेला जातात. अशा या थोर भक्तास शतश: वंदन. ---------------------------------- मच्छिन्द्र माळी, संभाजीनगर.