अहिल्या उद्धार.
जीव अनादी आहे, ईश्वर अनादी आहे. अविद्या अनादी आहे. तसेच अविद्या व चेतन संबंध अनादी आहे. जीव ईश्वराचा भेद अनादी आहे परंतु ते अनंत नाहीत. केवळ ब्रम्ह आणि ब्रम्हच अनादी, अनंत आहे. म्हणजेच बाकी हे सर्वं सान्त म्हणजे ज्यांचा अंत होतो असे आहेत. ईश्वर अनंत आहे. श्री वामनावतार, श्री कृष्णावतार, श्री रामावतार असे दशावतार त्या निर्गुण निराकार ईश्वराचे वेगवेगळ्या युगात व काळात झालें आहेत. असा अनंत आणि सर्वं व्यापी ईश्वर केवळ दृढ भक्तीनेच आकळला जातो, आपलासा करता येतो. केवळ भक्ती ही परमभक्ताच्या आयुष्यातली सर्वश्रेष्ठ अशी एक अवस्था आहे. ईश्वराला अनन्य भावाने शरण जाणारा भक्त ईश्वराला आपल्या सगुण साकार अशा भक्तीनेच केवळ जिंकून घेतो. समर्थ रामदास हे श्रीरामाचे निस्सीम भक्त होते. म्हणून म्हणतात की, मर्त्य माणसाने भक्तिमार्गाने जावे. भक्तांची सर्व चिंता वाहाणारा तो रघुनायक आभाळभर होऊन नीलवर्णात पसरलेला आहे. त्याची करुणेची वृष्टी भक्तांवर सतत वर्षाव करीत असते. हे भक्तीला उमगणे फार महत्त्वाचे असते. मनाच्या श्लोकांतून समर्थांनी हा भक्तीचा, श्रीरामाच्या सगुण साकार भक्तीचा विचार फार विस्ताराने केलेला आहे. समर्थांची श्रीरामभक्ती हा एक आश्चर्याला फुटलेला नवा अंकुर होता. समर्थांनी ते सारे स्वानुभवातून प्रकट केले आणि ते सारे प्रकट करतांना वेगवेगळे दाखले दिले की ज्यातून श्रीरामाच्या अपूर्व आणि अथांग व्यक्तिमत्वाचे इंद्रधनुष्य आभाळभर विखरून गेले. प्रस्तुत श्लोकातून समर्थांनी असं म्हटलं आहे की, अहल्या शिळा राघवें मुक्त केली| पदी लागता दिव्य होऊन गेली | जया वर्णीता शिनली वेदवाणी | नुपेक्षी कदा राम दासाभिमानी | अहिल्या हीं गौतम ऋषींची पत्नी.दररोज पहाटे नित्यनेमाने नदीवर स्नान करण्यासाठी गेले असता चंद्राने कपटनीतीने म्हणजे गौतम ऋषींचे रूप धारण करून अहिल्येशी रतिसूख भोगले.हा सर्वं वृत्तांत ऋषींनी अंतरज्ञानाने जाणला. ते अतिशय कोपयमान झालें "जा, तु जड शिळा होऊन पडशील" असा शाप दिला. अहिल्याने उ:शाप मिळण्यासाठी ऋषींना विनवणी केली. त्यावर तिला उ:शाप मिळाला कीं "जेव्हा प्रभू रामचंद्र मिथिलेला जातील तेंव्हा त्यांचे चरणरज शिळेला लागतील त्यावेळी तुझी शापमुक्ती होऊन उद्धार होऊन तूला मूळ रूप प्राप्त होईल. श्रीरामांच्या चरणांचा स्पर्श झाल्यावर शिळेतून अहिल्या प्रकट झाली. अहिल्येला श्रीरामांनी मुक्त केली. श्रीरामाची ताकद काय होती याची ही छोटीशी कहाणी समर्थांनी पहिल्या दोन चरणांतून व्यक्त केली. विश्वामित्र ऋषींबरोबर राम आणि लक्ष्मण मिथिला नगरीत सीतास्वयंवरासाठी निघाले होते. तेव्हा वाटेत विश्वामित्र ऋषींच्या सांगण्यावरून श्रीरामांनी शिळा होऊन पडलेल्या अहिल्येच्या प्राक्तनाला जणू स्पर्श केला आणि अहिल्या गौतम ऋषींच्या शापातून मुक्त झाली. श्रीराम आपल्या भक्तांसाठी सर्व काही करतात हे सांगताना समर्थानी या चरणांतून रामायणातील ही तरल कथा सांगितली. ही झाली व्यक्त कथा. परंतु श्रीरामांनी अशा कितीतरी अबलांची सुटका केली होती. समाजातल्या या जड शिळा श्रीरामांच्या चरणांनी मोकळ्या झाल्या. अशा या श्रीरामाचे कौतुक करताना चारही वेद थकून गेले. वेदना श्रीरामांच गुणगान करता येईना एवढे हे श्रीरामाचं अथांग स्वरूप होतं. तर असा हा श्रीराम आपल्या भक्तांसाठी काहीही करतो. प्रभु रामचंद्र कधीही भक्तांची उपेक्षा करीत नाहीत. म्हणून समर्थ आपल्या मनाला उपदेश करण्याच्या निमित्ताने अखिल मानव जीवास (प्राण्यास) उपदेश करतात कीं "बा मना, म्हणूनच तू बाकीचे सर्व विचार बाजूला ठेवून केवळ श्रीरामांच्या चरणांची पूजा कर. केवळ या श्रीरामाचे नामस्मरण कर. बाकी सगळे संदर्भ विसरून जा. राम हाच शेवटी आपला उद्धारकर्ता असतो हे कदापिही विसरू नकोस." श्रीरामाची संगत एकदा का मिळाली की मुक्तीचा मार्ग मोकळा होतो हे तू कायमचे ध्यानात ठेव आणि केवळ श्रीरामाच्या अनन्य साधारण भक्तीत स्वतःला विसरून जा. ____________________________ मच्छिन्द्र माळी, छ. संभाजीनगर. मो. नं. 8830068030