Putting someone in an old age home is a sin. in Marathi Classic Stories by Ankush Shingade books and stories PDF | वृद्धाश्रमात टाकणं हे पापकर्मच

Featured Books
Categories
Share

वृद्धाश्रमात टाकणं हे पापकर्मच

वृद्धाश्रमात टाकणं हे पापकर्मच?

           वृद्धाश्रम....... वृद्धाश्रम म्हणजे तुरुंगच असतं त्या म्हाताऱ्या लोकांसाठी. कारण तिथं मायेचं पाखरु कोणीच दिसत नाही. ना स्वतःच्या अंगाखांद्यावर खेळविलेला मुलगा दिसत, ना स्वतःचं फोट फाडून काढलेला गर्भ दिसत. तो गर्भ, जो बालपणात हरवला असल्यास किंवा डोळ्यासमोरुन ओझल झाल्यास त्या गर्भाला उदयास आणणारी मंडळी तिनही लोक एकत्र करीत असतात नव्हे तर पिंजून काढत असतात.
          एक असाच व्हिडिओ सोशल मिडीयावर येवून धडकला. ज्या व्हिडिओतून मुलामध्ये असलेला संस्कार दाखवला होता. तो संस्कार की वडिलाला विसरायचा आजार असतांना व वडील हरवले असतांना त्या मुलानं त्यांच्यासाठी बराच परीसर पिंजून काढला. शेवटी वडिलाला शोधलंच. त्यावर विचार मांडणारा एक विचारवंत म्हणाला की त्या वडिलाला तसा जर आजार आहे तर त्यांना वृद्धाश्रमात का टाकू नये. ते वृद्धाश्रम की ज्या वृद्धाश्रमात वृद्धांची पुरेपूर काळजी घेतली जाते. 
          तो विचारवंत आपले मत मांडून मोकळा झाला. कारण त्याची आईदेखील त्यानं त्याच वृद्धाश्रमात ठेवली होती व तिची फार काळजी घेतली जात होती त्या वृद्धाश्रमात. म्हणूनच त्याचं ते सुचवणं.
         वृद्धाश्रम...... वृद्धाश्रमात सर्व सोयी असतात वृद्धांना. त्यांना वेळोवेळी औषधोपचार दिला जातो. जेवणाखावण्याचे वेळापत्रक असते. दर आठ दिवसानं त्यांच्या मनोरंजनासाठी काही कार्यक्रम राबविण्यात येतात. जेवनातही दररोज बदलाव असतो व खमंग जेवन मिळत असतं. परंतु सुख असतं का? सुखाचा विचार केल्यास सुख नसतंच. याबाबत उदाहरण म्हणून एक कथा सांगता येईल. कथा जुनीच आहे. सर्वांनाच माहित आहे व इथं उदाहरणादाखल देत आहे. 
         कहाणी अशी की एक राणी. ती फार दुःखी होती. तिला झोपेचा आजार होता व तिला झोपच येत नव्हती. राजानं तिला झोप यावी म्हणून बरेच प्रयत्न केले. ज्या प्रयत्नात ऐकदा तिच्यासाठी राजानं आपल्या राजवाड्यात खास व्यवस्था केली. एकदा तिच्या अंथरुणावर फुलं अंथरली. वाटलं की मऊशार फुलांच्या सुगंधानं तिला झोप येईल. परंतु रात्र जाताच व सकाळ होताच जेव्हा राजा तिच्या कक्षात गेला व विचारलं की तिला झोप आली का? त्यावर तिचं उत्तर नाही असंच होतं. त्यावर कारण विचारलं असता तिनं उत्तर दिलं की मला एक कळी टोचत होती.
           समाजात दोन गट असतात. एक श्रीमंत व दुसरा गरीब. गरीबांना कितीही धन दिलं तरी त्याचं राहणीमान कधीच बदलणार नाही. तो गरिबांसारखाच राहिल. तेच ते फाटके कफडे अंगावर परिधान करेल आणि त्याला झोपही साध्या जमीनीवरच येईल. याउलट श्रीमंतांचं आहे. श्रीमंत व्यक्ती जर गरीब झालाच तर जगतांना त्याला जीव घुटमळून जाईल. वाटल्यास त्याची आत्महत्याही घडेल. हेच तत्व वृद्धांबाबतीही लागू पडते. वृद्धांना जेव्हा वृद्धाश्रमात टाकलं जातं, तेव्हा त्यांचं सुख हरवतं. स्वातंत्र्यही तेवढंच हरवतं. कारण वृद्धाश्रमात पाहिजे तसं व तेवढ्या प्रमाणात स्वातंत्र्य नसतं. आनंदही मुळातच नसतं. म्हातारपणातील आनंद हा वृद्धाश्रमातील विविध उपक्रमात वा वृद्धाश्रमात राबविल्या जाणाऱ्या कार्यक्रमात नसतो. आनंद असतो, ती नातवंड खेळविण्यात. त्यांच्या मागं लागून त्यांच्याशी वटवट करण्यात. त्यांची वटवट ऐकून घेण्यात. ज्याचा मुलांना व खासकरुन सुनांना राग येतो व सुनांना राग आलाच तर तिच्या इशाऱ्यावर चालणारे तिचे पती नाईलाजास्तव तिनं आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात टाक म्हणताच तो व्यक्तीही नाईलाजास्तव आटल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात टाकतो. त्यावेळेस असा विचार करीत नाही की मी जेव्हा लहान होतो, तेव्हा याच पाखरांनी माझं रक्षण केलं. मला त्यागलं नाही वा मला सोडून दिलं नाही. उन्हातून सावलीत नेलं. अन्न भरवलं. शिक्षण शिकविलं. मला माझ्या लायक बनवलं नव्हे तर आत्मनिर्भर बनवलं. आज जो काही मी आहे, ते माझ्या आईवडिलांमुळेच आहे. 
         सेवा...... म्हणतात की दीन, दलीत, गरीब, अनाथ, अपंग व वृद्ध यांची सेवा करावी. त्यांचा आशिर्वाद बहुमोल आहे व तो मिळावा. बरेच लोकं सेवा करतात व जे करतात, ते बोलून दाखवत नाहीत. आज मुलं मुली समान आहेत व या समानतेच्या काळात मुलगीही मायबापांना तेवढीच प्रिय असते. जेवढा मुलगा असतो. तसंच मुलांना आईवडीलही तेवढेच प्रिय असतात. परंतु ते प्रिय असतात, त्यांचे विवाह होईपर्यंत. एकदा का विवाह झाला आणि मायबापांना थोडं म्हातारपण आलं की मुलांचे विचार बदलतात. मुलगी असेल तर ती आपल्या पतीच्या विचारानं चालते. स्वतः सक्षम असूनही ती पतीच्याच आज्ञेत वागते. पती जसं म्हणेल तसं. त्यानं पश्चिमेला पुर्व दिशा म्हटली की ती पुर्व. तेच घडतं मुलाच्याही बाबतीत. मुलगाही विवाह होताच आपल्या पत्नीच्याच आज्ञेत वागते. ती जे म्हणेल ते. कारण त्यांना धाक असतो. धाक असतो की त्या त्या घटकानं काही कमीजास्त केल्यास वा सांगीतलेली आज्ञा न मानल्यास वा न पाळल्यास ते जोडीदाराला सोडून जातील. अन् तसं घडतंही. कारण अलिकडील काळात संस्कार हे तुटत चाललेले आहेत. आजच्या काळातील संस्कारात मी, माझी पत्नी वा पती व माझी मुले. एवढेच अभिप्रेत आहे. आईवडील आजच्या काळात प्रत्येकाला नकोच आहेत. आईवडील असले तर प्रचंड त्रासच वाटतो. यामुळेच वृद्धाश्रमाची संख्या वाढते आहे. अन् समजा वृद्धाश्रमात जर आपल्याच मुलांनी पाठवलं तर त्यापेक्षा दुसरं दुर्दैव नाही आपल्यासाठी.
         म्हातारपणात म्हाताऱ्यांना वृद्धाश्रमात पाठवून द्या. सुखी राहतील. असं म्हणणं सहज सोपं आहे. बोलायला काय जातं. ते आपल्यासाठी तात्पुरतं चांगलं असतं. आपल्या तरुणपणाचा काळ त्यानं चांगलं कटतं. तरुणपणात वाटतं की मीही वृद्धाश्रमात जाईल व मजेनं राहिल. परंतु जेव्हा म्हातारपण येतं व आपण म्हातारे होतो आणि जेव्हा अशीच वृद्धाश्रमात जाण्याची वेळ आपल्यावर येते ना. तेव्हा आपल्याला ब्रम्हांड आठवतं. जुन्या आठवणी येतात. वाटतं की मी माझ्या तरुणपणात माझ्था आईवडिलांना वृद्धाश्रमात टाकायला नको होतं. 
        विशेष सांगायचं म्हणजे वृद्धाश्रमात आपल्या आईवडिलांना नक्कीच टाका. टाकायला मनाई नाही. कारण तुम्ही स्वतःच आपल्या स्वतःच्या विचारांचे मालक आहात. परंतु थोडा विचार करा. खरंच याच वृद्धाश्रमात जाण्यासाठी आपल्याला आपल्या आईवडिलांनी जन्म दिला काय? यासाठीच आपल्याला आपल्या आईवडिलांनी शिकवलं काय? यासाठीच आपल्याला आपल्या आईवडिलांनी लहानाचं मोठं केलं काय? उन्हातून सावलीत नेलं काय? अन् हाही विचार करता येत नसेल तर हा विचार नक्कीच करा की जर मी म्हातारा होताच मला माझ्या मुलानं वृद्धाश्रमात टाकलं तर..... तर माझे काय होणार? कारण आजची परिस्थिती पाहता भविष्यात वृद्धाश्रमाची संख्या निश्चितच वाढणार आहे. संस्कार आजही तुटत चालले आहेत. पुढे जास्त तुटणार आहेत. त्यातच आज ज्या सुखसोई आहेत वृद्धाश्रमात. त्या सुखसुविधा निश्चितच उद्याच्या वाढत्या वृद्धाश्रमातील संख्येनं अपुऱ्या होतील. त्यातच आपलं स्वातंत्र्यही हिरावलं जाणार आहे. तिथंही त्रासच होणार आहे. हा त्रास 'जावे त्याच्या वंशा' असाच असणार आहे. हे तेव्हाच घडू शकेल. जेव्हा आपण आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात टाकू. जे आपलं आईवडिलांना वृद्धाश्रमात टाकणं आपली मुलं पाहतील. तेच अनुभवतील व आपल्या म्हातारपणी ते आपलं काही एक न ऐकता आपल्याला वृद्धाश्रमात टाकतील. महत्वपूर्ण बाब ही की वृद्धाश्रम हे म्हातारपणातील आधारवड नसून ते तुरुंग आहे. त्या ठिकाणी आपल्या आईवडिलांना टाकणं म्हणजे एकप्रकारची हत्याच आहे. जीवच घेण्यासारखी हत्या, असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. अशा ठिकाणी म्हाताऱ्या मंडळींना पाठवणं म्हणजे त्यांच्या मनातील संपुर्ण स्वातंत्र्याची गळचेपी नव्हे तर हत्याच आहे. अशी हत्या कोणत्याच जन्मदात्या मुलाने करु नये. कारण आपल्याला आपल्याच जन्मदात्याने एवढं आत्मनिर्भर बनवलंय की त्याच आधारावर आपण त्यांना वृद्धाश्रमात टाकायलाही मागपुढं पाहात नाही. असं टाकून आपण पापाचं भागीदार बनत चाललोय. जे पापकर्मच पुढे जावून आपलीही रवानगी वृद्धाश्रमात करायला मागंपुढं पाहणार नाही.

          अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०