शिक्षक गॉड की डॉग?
(गुरुपौर्णिमेनिमित्त)
*GOD गॉड. या शब्दाचा किती मोठा महान अर्थ आहे. त्याचा अर्थ भगवान, ईश्वर, अल्ला असा करण्यात येतो. त्याला उलटं केल्यास त्याचा मूळ अर्थच पुर्ण बदलून जातो. जसे गॉडला उलटं केल्यास त्याचा डॉग बनतो व डॉग म्हणजे कुत्रा होतो.*
गॉड (God) म्हणजे परमेश्वर, देव किंवा सृष्टीचा निर्माता. ही संकल्पना विविध धर्मांमध्ये आणि संस्कृतींमध्ये वेगवेगळ्या प्रकारे मांडली गेली. काही धर्मांमध्ये देवाला एक व्यक्ती म्हणून मानले गेले तर काही धर्मात एक प्रतिक म्हणून गॉडला पुजलं गेलं. गॉडची संकल्पना प्रत्येक धर्मात वेगवेगळी होती. जसा हिंदू व मुळचा वैदिक धर्म. या धर्मात, गॉडला प्रतिक रूपात पूजलं गेलं. एक मातीची किंवा दगडाची प्रतिमा. तिच्यावर श्रद्धा छेवून तिला पुजण्याची पद्धती या धर्मात रुढ झाली व ती प्रथा पुर्वीपासून आजतागायत सुरु आहे. ख्रिश्चन धर्मात मात्र असे नाही. या धर्मात गॉडला पवित्र आत्म्याच्या स्वरुपात पुजलं जातं. या धर्मात प्रभू येशूला तो पवित्र आत्मा आहे असं मानलं जावून त्याच्या अंतिम समयीच्या, 'मी परत येईल' ' या विधानावर विश्वास केला जातो. इस्लाम धर्मात गॉडची संकल्पना वेगवेगळी आहे. या धर्मात अल्लाला प्रथम स्थान दिलं जातं. त्यालाच ईश्वर वा सर्वशक्तीमान मानलं जातं. बौद्ध धर्मात,गॉडची संकल्पना विशिष्ट नाही. बौद्ध धर्मात गॉड मानत नाहीत. या धर्मात वास्तविकता व वैज्ञानिक दृष्टिकोनावर जास्त भर दिला जातो. या धर्मात गॉड हे विज्ञानालाच मानले जाते. जैन धर्मात, देवाची संकल्पना काहीशी वेगळी आहे. तेथे, प्रत्येक आत्मा स्वतःच्या प्रयत्नांनी मोक्ष प्राप्त करु शकतो. असे मानले जाते.
ही झाली गॉड या शब्दाची संकल्पना. प्रत्येक धर्मात वेगवेगळी असलेली. कोणी गॉड म्हणजे सर्वशक्तीमान अशी शक्ती मानतात तर कोणी मार्ग दाखविणारी अद्वितीय अलौकिक शक्ती मानतात. अनेकजण देवाला निराकार आणि अमूर्त शक्ती मानतात, जी विश्वात व्यापलेली आहे. गॉडला सर्वशक्तिमान मानले जाते, म्हणजेच तो काहीही करू शकतो. असेही लोकं मानतात व त्या शक्तीवर विश्वास ठेवतात. गॉड हा सर्वज्ञ आहे, म्हणजेच त्याला सर्वकाही माहीत आहे. तो न्यायप्रिय आहे, आणि तो चांगले आणि वाईट यांच्यात फरक करतो. तो विश्वाचा निर्माता आहे व तो कोणताही जीव कसा निर्माण करायचा हे जाणतो. अनेक धर्मांमध्ये त्याला विश्वाचा निर्माताही मानले जाते. याचाच अर्थ असा की गॉडची संकल्पना ही व्यक्तिनिष्ठ आहे. प्रत्येक व्यक्तीचा गॉडबद्दलचा अनुभव आणि श्रद्धा वेगळी आहे. मग तो कोणत्याही धर्मातील का असेना. काहीजण देवाला वैयक्तिकरित्या भेटल्याचंही सांगतात तर काहीजण त्याला केवळ एक शक्ती मानतात. परंतु गॉड काही खेळण्यातील एखादी वस्तू नाही की त्याला भेटता येईल. ते सर्व थोतांड असतं व आपण भोळेभाबडे लोकं त्यांच्यावर विश्वास करीत असतो.
गॉड संकल्पनेचा हा दृष्टिकोन जरी खरा असला तरी हे जरी गॉड ही संकल्पना खऱ्या स्वरुपात रुजली, ती म्हणजे शिक्षकांपासून.
पुर्वी माणूस झाडावर राहात होता. तो जमिनीवर आला. हे सर्वांनाच माहित आहे व यात काही शंका नाही. हे चार्लस डार्वीननं आपल्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतात सिद्ध केलंय. त्यानुसार त्यावेळेस गॉड आहे हे काही त्या माकड अवस्थेतील मानवांना माहित नव्हतं. त्यातच त्यावेळेस जी माकडं खाली आलीत. त्यापैकी एक सल्लागार बनला असेल, त्याच्याच सल्ल्यानं पुढं माकडांनी प्रगतीक्रमण केलं. नवेनवे शोध लावले. आपण झाडावर राहात नसल्यानं हिंस्र प्राण्यांपासून कसं वाचता येईल याचेही उपाय सांगितले. त्याच व्यक्तीच्या सल्ल्यानं पुढं भटकंतीही बंद झाली व शेती करण्याची पद्धती रुढ झाली. तो एकच माकडमानव व्यक्ती सल्लाच देत असे व बाकी इतर माकडमानव व्यक्ती त्याचं ऐकत असत. महत्वाचं म्हणजे हा सल्ला देणारा व्यक्ती कोण होता? असा जर विचार केला तर तो व्यक्ती त्या काळातील शिक्षक होता. याचाच अर्थ असा की तो व्यक्ती त्या काळातील त्यांचा गॉड होता. अशा व्यक्तीने पुढे जावून या गॉड संकल्पनेत परीवर्तन केलं. काहींनी जीवंत व्यक्तीला देव मानणं सुरु केलं तर काहींनी मृत आत्म्यांना देव मानणं सुरु केलं. काहींनी दगड वा मातीच्या देवाला प्रतिकात्मक रुपात गॉड संबोधलं तर काहींनी अद्वितीय शक्तीला गॉड मानण्यास सुरुवात केली. जी अस्तित्वात आहे की नाही हे कोणीच पाहिलं नव्हतं. त्याच गॉड संकल्पनेच्या वेगवेगळ्या मताद्वारे व मतभिन्नतेद्वारे धर्म निर्माण झाले असतील, हे सत्य नाकारता येत नाही. म्हणतात की मुलांचा पहिला गुरु त्याची आई व त्याचे वडील असतात. त्यानंतर शिक्षक असतात. परंतु ती जर आई त्याला शिकवीत असेल वा ते वडील त्याला शिक्षक शिकविण्यापुर्वी शिकवीत असेल, तर त्यांचा समावेश आईवडीलात करताच येणार नाही. त्यांचा समावेश शिक्षकात करता येईल. गॉडच्या संकल्पनेत सांगायचं झाल्यास तेच खरे आणि पहिले देव.
शिक्षक हा इतर धर्म संकल्पनेच्या दैविक तत्त्वानुसार पहिले देव आहेत. मग ते कोणी मानो, अगर न मानो. कारण धर्म संकल्पना व गॉड संकल्पना ही मानव उत्पत्तीपुर्वी निसर्गात अस्तित्वात असली तरी त्या संकल्पनेची कल्पना लोकांना नव्हती. त्यातच सृष्टीतील प्रत्येक जीवाला देव म्हणजे काय? हेही माहित नव्हतं. ती देवाची ओळख व त्यांचं अस्तित्व ज्यानं आपल्याला समजावून दिलं. तोच आपला सर्वांचा देव. तसंच ज्यांनी समजावून दिलं, तो कोणी मानो वा न मानो, तो शिक्षक आहे.
विशेष बाब ही की धर्म संकल्पनेनुसार आज प्रत्येक धर्माचे वेगवेगळे देव असले व त्याला वेगवेगळी नावं असली तरी शिक्षकांना देव संबोधलं जाणारं अस्तित्व नाकारता येत नाही. याचा अर्थ मी लेखक या नात्यानं विविध धर्मातील देवांचं व दैवीय शक्तींचं अस्तित्व नाकारत नाही. फक्त शिक्षकांना एक सल्ला आहे की त्यांना पुर्वी ज्या माकडमानवानं शिक्षकांचा दर्जा दिला. ज्यानं त्या काळात देव मानलं. ज्यानं त्या काळापासून लोकांना चांगला सल्ला दिला. ज्यानं उत्तम मार्गदर्शन केलं. ज्यानुसार समाज सुधारणा योग्य प्रकारे झाली. ज्यात काही खडेगोटेही होते. या खड्यागोट्यांनी शिक्षक बनून समाज नासवला. त्यांच्यावर विविध प्रकारची बंधनं टाकली. ज्याचा जनतेला त्रास झाला. ज्यातून शिक्षकांचेच दोन गट पडले. एक गॉड व दुसरा डॉग. आता शिक्षक म्हणून आपल्याला ठरवायचंय की आपण गॉड म्हणून कार्य करायचंय की समाज त्यालाच डोक्यावर बसवेल की आपण डॉग बनून कार्य करायचंय की समाज आपल्याला पायानं मारेल.
पर्यायानं सांगायचं झाल्यास शिक्षक हा आधीपासून देवच होता. परंतु त्यातील काहींनी पुर्वीही शैतानासारखंच कार्य केलं. ते अपवादच होते. त्यांनीच शिक्षकांचा पेशा नाशवला. त्यांनीच समाज नाशवला. आजही असे बरेच शिक्षक आहेत की जे तशाच पद्धतीनं वागतात. समाजाचं भलं करण्याचा प्रयत्न करीत नाहीत. स्वार्थ पाहतात. अन् ते तरी का बरं पाहणार नाही. कारण त्यांच्या उरावर त्यांना शैतान बनविणारी प्रशासनाची व खाजगी स्तरावर संस्थाचालकाची सुरी मानेवर असते. जर असा शिक्षक आपल्या वर्गात वेगळ्या उत्तम प्रकारच्या विचारानं वागला, त्यानं वेगळं ज्ञान आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी पाजळवलं तर ते अशा अधिकारी वर्गाला आवडत नाहीत. मग आपल्याला मिळालेल्या अधिकाराचा गैरवापर करतात. त्यानंतर शिक्षकांवर बंधनं येतात. आपण वागायचं कसं? प्रशासकीय वा संस्थामंडळाच्या बाजूनं राहायचं की आपले स्वतंत्र विचार प्रस्तुत करायचे. शेवटी विचार करीत करीत तो शिक्षक या निर्णयापर्यंत पोहोचतो की आपल्याला नोकरी टिकवायची आहे ना. मग एक शिक्षक म्हणून सुचलेले विचार मांडू नयेत. त्यांना मारुन टाकावं. अन् तो शिक्षक तसा जेव्हा विचार करतो. तेव्हा त्याच्या मनातील विचार जरी सुविचार असतील तरी त्या विचारांची हत्या होते. इथेच विचारांना कुलूप लागतं आणि शिक्षकांचा डॉग होतो. परंतु त्याला शिक्षकही काही करु शकत नाही.
महत्वाचं सांगायचं झाल्यास आपण शिक्षक आहोत, त्यामुळंच आपल्याला चांगले विचार येणारच. कारण आपणच समाजाचे मार्गदाते आहोत. समाजाला दिशा देणारे आहोत. आपण विचार करावा की सॉक्रेटिसनं चांगले विचार प्रस्तुत केले. जे विचार न पटल्याने त्यांना विष दिलं गेलं व सॉक्रेटिसनं विषाचा प्याला हसतहसत प्राशन केला. तद्नंतर लोकांना कळलं की त्यांचे विचार चांगले होते. आपण विनाकारणच त्यांना विषाचा प्याला दिला.
तो पश्चातापच होता, लोकांना सॉक्रेटिस मृत्यूनंतर झालेला. परंतु तेव्हा सॉक्रेटिस जीवंत नव्हते. आजही सॉक्रेटिसच्या विचारांचा आपण अभ्यास करतोच. दुसरं एक उदाहरण गॅलिलिओ. त्यानं पृथ्वी गोल आहे असा सिद्धांत मांडला. परंतु त्या काळात पृथ्वी सटाट आहे हे मानणाऱ्या लोकांनी त्याचा गळफास दिला. त्यानंतर कोलंबस व मॅगेलाननं जगप्रदक्षिणा करुन सिद्ध केलं की पृथ्वी गोलच आहे, ती सपाट नाही. अशी बरीच मंडळी झालीत की ज्यांनी समाज सुधारणेसाठी बरंच काही सत्य मांडलं. जे लोकांना त्या काळात रुचलं व पटलंही नाही. त्यांनी त्या काळात विरोधच केला. परंतु त्यांनी त्या काळात माघार घेतली नाही. ज्यांचा त्यांना भयंकर त्रासच झाला. या श्रेय नामावलीत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रोहिदास, संत चोखामेळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महाराणी ताराबाई, राजा राम मोहन राय, महादेव रानडे, रमाबाई रानडे, महर्षी कर्वे इत्यादी बऱ्याच लोकांचा समावेश होतो. काहींची हत्याच केल्या गेली तर काहींची हत्या करता येत नसल्यानं त्यांना त्रासच देण्यात आला. परंतु ते चांगले विचार प्रस्तुत करतांना शरणागत गेले नाहीत. लढत राहिलेत.
ते जर लढले नसते तर आज विधवांना पुनर्विवाह करता आला नसता. सती म्हणून कित्येक महिला आजही पती मरण पावताच त्याच्या शरणावर जाळल्या गेल्या असत्या. आजही अस्पृश्यांना कुठलंच सार्वजनिक ठिकाणचं पाणी पिता आलं नसतं.
हे सर्व आपले समाजसुधारक आहेत नव्हे तर आपले शिक्षकच. तेच खरे गॉडच आहेत. कारण ज्यावेळेस आपल्यावर अत्याचार सुरु होता. तेव्हा कोणताच अस्तित्वात असलेला देव धावला नाही. त्यानं असं म्हटलं नाही की सॉक्रेटिसांना मारु नका. त्याचे विचार उत्तम आहेत. त्यानं असं म्हटलं नाही की गॅलिलिओचं म्हणणं खरं आहे, पृथ्वी गोलच आहे. ते पुढं सिद्ध होणार. जर देव अस्तित्वात असता तर त्यांचं रक्षण झालं असतं. असो, ती आपली बाब नाही. देव अस्तित्वात आहेच. तो काही माणसांना असं वात्रट वागू नका असं सांगू शकत नाही. कारण त्यानं जर तसं सांगीतलं तर उद्या सगळेच लोकं चांगलेच वागतील. कोणी कोणाला मारणार नाही. कोणी मरणारही नाही. सृष्टीत सगळेच जीवंत राहतील. महत्वाची गोष्ट ही की देव आहे की नाही ही आपली संकल्पना नाही. आपली संकल्पना आहे की जसे लोकं प्रत्येक धर्मात गॉड मानतात. त्या प्रत्येक धर्माचा शिक्षक नावाचा आणखी एक गॉड आहे की जो माता, पिता, मित्र, पत्नी, मुलं, शेजारी, पाजारी, ओळखी, अनोळखी या रुपात विचरण करतो. त्यालाही देव मानावं. अन् याच देवानं कोणालाही न घाबरता मार्गदर्शन करतांना न्यायपूर्ण मार्गदर्शन करावं. तसं जर घडलं तर लोकं त्याला गॉड संबोधतील. अन् तसं घडलंच नाही तर त्याला डॉग. आता आपण ठरवायचं आहे की आपल्याला आपल्यानंतर येणाऱ्या वा आफण शिकवीत असलेल्या पिढीनं गॉड संबोधावं की डॉग.
विशेष सांगायचं म्हणजे आपण शिक्षक आहोत ना. मग आपण कितीही कठीण परिस्थिती उद्भवली तरी स्वतः विचलीत होवू नये. स्वार्थही पाहू नये. लढावं सिस्टमशी आणि न्यायपूर्णच मार्गदर्शन करावं. जेणेकरुन समाजात बदल घडवता येईल. सामाजिक परीवर्तन करता येईल हे तेवढंच खरं.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०