मराठी शाळेकडे लोकांचा ओंढा वळेल काय?
*जवळपास गतकाळातील तीस वर्ष मागच्या तीन दशकाचा काळ. या काळात मराठी माध्यमाच्या शाळेतील पटसंख्या हळूहळू कमी होवून मोडकळीस निघाल्या. त्याला अनेक कारणं आहेत. संस्थाचालकांचं शिक्षकांना चांगलं न वागवणं, पालकांच्या मानसिकता, त्यांच्या भावना, पाश्चिमात्य संस्कृती प्रभाव, मुलांना ठेवण्याचा प्रश्न. त्यातीलच एक कारण म्हणजे लोकांची मानसिकता. लोकांची मानसिकता ही इंग्रजी विषयाला जास्त महत्व देणारी आहे. जे इंग्रजी शिक्षण कॉन्व्हेंटच्या शाळेत मिळतं. तरीही शासनानं सन २००० पासून मराठी माध्यमांच्या शाळेत एक विशेष विषय म्हणून इंग्रजी विषयाचा समावेश केला. तरीही त्या विषयानं फारसा फरक पडलेला नाही. आजही इंग्रजी माध्यमांच्या शाळेत पटसंख्या भरभरुन आहे व मराठी माध्यमांच्या शाळा ओस पडायला लागल्यात. काही ठिकाणी तर बंद आहेत. ज्याला वेगवेगळी कारणं आहेत.*
मराठी शाळा..... अलिकडील काळात मराठी शाळेला दुर्दशा आलेली आहे. राज्यातील अठरा हजार शाळा नुकत्याच बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न विचारल्यास नक्कीच त्याला अनेक कारणं असरी तरी त्याला जबाबदार आहे पाश्चिमात्य धोरण व महागाई, असं त्याचं उत्तर देता येईल.
पाश्चिमात्य धोरण म्हणजे नेमके काय की ज्यानं मराठी शाळा ओस पडायला लागल्याय. पाश्चिमात्य धोरण म्हणजे मुलगा जन्माला आला, तेव्हापासून त्याला शिकवणं. त्यासाठी पाश्चिमात्य प्रदेशात मुले लहान असतांनाच त्याला पाळणाघरात टाकण्याची प्रक्रिया आहे. ते लोकं आपल्या मुलांना पाळणाघरात टाकतात. कारण त्यांच्यासमोर पर्याय नसतो. त्याचं आणखी एक महत्वपूर्ण कारण आहे त्यांचे विवाह. त्यांचे विवाह हे संस्कार म्हणून होत नसतात. ते विवाह एका करार पद्धतीने झालेले असतात. अशातच मुलं जेव्हा जन्मास येतात. त्यानंतर कधीकधी लगेच करार मोडतो व मुलांना ठेवायचा प्रश्न येतो. मग मुलांना आई वडील यापैकी एकानं त्यागलं नसेल व मुलं घरी राहात असतील तर पाहायला कोणी नसल्यानं व त्या जोडीदाराला कामाला जायचं असल्यानं ती मुलं पाळणाघरात ठेवावी लागतात. कारण मुलांचं संगोपन करतांना आई किंवा वडीलांना, ज्यांच्याजवळ ते मूल असेल त्याला कामाला जावंच लागतं. अशावेळेस मुलं ठेवणार तरी कुठे? हा प्रश्न पडतो. यासाठीच पाळणाघराची सोय व ते पाळणाघर कॉन्व्हेंटला जोडून आहे. म्हणूनच कॉन्व्हेंटच्या शाळा या भरभरुन पटसंख्येने ओसंडून वाहत आहेत. तसे मराठी माध्यमाच्या शाळेत नाही. कधकधी मुलांना आईवडील या दोघांनीही त्यागलं तर ती मुलं अनाथालयात जातात. तिथंच शिकतात. तिथंच ती लहानाची मोठी होतात. तिथंच ती स्वतः आत्मनिर्भर देखील होतात. आता मात्र पाश्चिमात्य देशही बदलला आहे व तो आपली भारतीय संस्कृती वापरायला लागला आहे. आज त्याच पाश्चिमात्य देशात विवाह करतांना लोकं भारतीय परंपरा वापरायला लागले आहेत. ते विवाहही भारतीय संस्कारानुसार करु लागले आहेत. त्यातच आपले विवाहही टिकवू लागले आहेत. आता तेथील बऱ्याच मुलांना पाळणाघरात राहावे लागत नाही. तशीच आता मुलं अनाथालयातही जात नाहीत. याऊलट आता भारताचं चाललेलं आहे.
भारतात पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव पडलेला आहे व या भारतातील लोकांनी पाश्चिमात्य संस्कृतीचा स्विकार केलेला असून बऱ्याचशा लोकांनी भारतातच राहून विवाहाला कराराचे स्वरुप आणलेले आहे. प्राचीन व पुरातन असलेली विवाह पद्धत आता ओस पडायला लागलेली असून पाश्चिमात्यांची करारपद्धती भारतात सुरु झाल्यानं काही भारतीय लोकं विवाह तर करतात. परंतु जसं मुल गर्भात सामावतं, त्यानंतर घटस्फोट घेत असतात. कारण ते विवाहाला संस्कार मानत नाहीत. करार मानतात. त्यानंतर जन्मास आलेल्या मुलांना ठेवायचे कुठे? हा प्रश्न सांभाळ करणाऱ्या घटकांपुढे निर्माण होत असतो. त्यानंतर साहजीकच पाळणाघर सुचतं व मुलं पाळणाघरात राहतात. दुसरी यात महत्वाची वस्तुस्थिती अशी की पुर्वी चूल आणि मुल हे स्रीचं कार्य असायचं. पुरुषाचं कार्य बाहेर जावून कमावून आणणं असायचं. परंतु काळ बदलला व बदलत्या काळानुसार आज पती पत्नी हे आधी स्री आणि पुरुष असून सध्याच्या परिस्थितीत दोघंही कामाला जात आहेत व दोघांनाही या भारतात समानतेचा दर्जा आहे. त्यातून मीच का बरं मुल सांभाळायची? असा प्रश्न स्रीवर्गांमध्ये निर्माण झालेला आहे. त्यानुसार स्रीही पुरुषांसारखीच कामाला जावू लागली आहे. ज्यातून मुलांना कुठं ठेवायचं? हा प्रश्न निर्माण झालेला आहे. साहजीकच अशी मुलं पाळणाघरात ठेवावी लागतात. त्यातच त्या गोष्टीवर महागाईनंही जास्त परिणाम केलेला आहे.
स्री पुरुष समानतेच्या गर्तेत महागाईवर मात करण्यासाठी आता भारतात स्री पुरुष विवाह झाल्यानंतर दोघंही कामाला जातात. मग मुलं ठेवायची कुठं? हा प्रश्न भारतातही निर्माण होतो. अशातच पाळणाघराची कल्पना डोक्यात येते. भारतात काही ठिकाणी पाळणाघर आहेत तर काही ठिकाणी पाळणाघर नाहीत. परंतु नर्सरी, केजी वन, केजी टू हे विकल्प आहेत व हे विकल्प कॉन्व्हेंटच्या शाळेत आहेत. ते मराठी माध्यमाच्या शाळेत नाहीत. त्यातच लोकांवर पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव पडल्यानं त्यांना मराठी संस्कृती आवडत नाही. मग लोकं आपल्या मुलांना मराठी माध्यमांच्या शाळेत टाकतील का की ज्या शाळा मुलांच्या वयाची सहा वर्षे पुर्ण झाल्यानंतर सुरु होतात. अशा शाळेत टाकतील? शिवाय तंत्रज्ञान विकल्प वेगळाच. लोकांनी समानतेच्या हितसंबंधांतून आपल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी व मुलांना ठेवण्यासाठी नर्सरी माध्यमातून जो पर्याय शोधला. त्या पर्यायानुसार लोकं आपल्या मुलांना नर्सरीत टाकतात व ते बिनधास्तपणानं कामावर निघून जातात. त्याबद्दल चिंता बाळगत नाहीत. तसा पर्याय हा मराठी माध्यमाच्या शाळेत दिसत नाही. हेच एकमेव कारण आहे मराठी माध्यमाच्या शाळा ओस पडण्याचे. तसं पाहिल्यास नवीन शैक्षणिक धोरणानं यावर अभ्यास केला व नव्या स्वरुपाचं जे धोरण बनवलं. त्यात याच गोष्टीचा अंतर्भाव केलेला दिसून येतो. ज्यातून अंगणवाडी, बालवाटिका एक व दोन असे वर्ग काढले व ते मराठी शाळेला जोडलेले आहेत. हे गट कॉन्व्हेंट शाळेला पर्याय म्हणून कॉन्व्हेंटच्याच धर्तीवर आणलेले आहेत. शिवाय मराठी माध्यमांच्या शाळा ओस पडू नये म्हणून शासनानं अशा शाळेला तंत्रज्ञानाचीही जोड दिलेली आहे आणि शिकवायला कॉन्व्हेंट शाळेतील मुलांना जसे दहावी बारावीचे शिक्षक असतात. तसे शिक्षक ठेवलेले नाहीत. असे शिक्षक ठेवले आहेत की ज्यांनी उत्तम शिकविण्याचे तंत्रज्ञान स्वतःमध्ये विकसित करुन घेतलंय. जे उच्चविद्याविभूषित आहेत व जे तंत्रज्ञानातही पारंगत आहेत. ज्यांनी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी ई टी पास केलेली आहे. आता निश्चितच मराठी माध्यमाच्या शाळेतही पटसंख्या वाढू शकते. परंतु ते काळ सांगेल.
काळ बदलला आहे व या बदलत्या काळानुसार नवीन शैक्षणिक धोरण आखून सरकारनं मराठी माध्यमांच्या शाळांनाही बदलवलं आहे. त्यानुसार खरंच मराठी शाळाही बदललेल्या आहेत. परंतु आता विचार येतोय की जरी मराठी माध्यमाच्या शाळा बदलल्या असल्या तरी मराठी माध्यमाच्या शाळेत शिकायला मुले येतील काय? त्यांच्या शाळेतही पटसंख्या वाढेल काय की आजसारख्याच कॉन्व्हेंटच्या शाळा विद्यार्थी पटसंख्येनं भरुन राहतील. हा चिंतेचा प्रश्न आजतरी समाज, शिक्षक व शासन यांना पडलेला आहे. महत्वाचं सांगायचं झाल्यास आज जो ओंढा इंग्रजी माध्यमांच्या शाळेत जात आहे. ज्यात पालकांच्या भावना जुळलेल्या आहेत. ज्या कॉन्व्हेंटच्या शाळेत लोकांना पाश्चिमात्य संस्कृतीसारखा बदलाव दिसला. तोच बदलाव आता मराठी माध्यमांच्या शाळेत झाल्याने आता मराठी माध्यमांच्या शाळेकडे पाहण्याचा पालकांचा दृष्टिकोन व भावना बदलतील काय? खरंच पालकांच्या मुलांचा ओंढा मराठी माध्यमांच्या शाळेकडे वळेल काय की जैसे थे हीच परिस्थिती राहिल की मराठी शाळा या पालथ्या घड्यावर पाणी फेरल्यागत ओसच राहतील. हे काळ सांगेल. तुर्तास शासनाला मराठी शाळेत पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे व तेच प्रयत्न सरकार करीत आहे. मात्र पालकांच्या मराठी शाळेसंदर्भात भावना बदलविण्याची प्रतिक्षा आहे. त्या भावना बदलाव्यात व मराठी शाळेतही विद्यार्थी पटसंख्या ओसंडून वाहावी म्हणजे झालं.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०