मागे तुमच्ये सामनी तेका दनको दिलो हुतो तवा पासून माज्या सामनी तो तुमची वार्ता काडीत नाय पन तेनाच डूक धरून तुमका धडो शिकव साटी ही कारस्थानां चलवलेली हत..... तेका शेजाऱ्याच्यो कोंबड्यो कणयो घालून झुजवूची वायट् खोड हा…… तुमच्ये बदली हेरी कोन आसतो तर खचोने.... म्हनून मी गप बसल आसतय.... तेच्या येवारात मी कदीच लक्ष घतलेलो नाय. पन बीन कारनी तुमच्या सारक्या देवमानसाक तरास देना बरोबर नाय. माजो बापूस तानू बारस्कर म्हंजे कर्दनकाळ हुतो.... पन भट माणूस समोर ईल्यावर रस्त्यात दुकू तो तेच्या पायार डोकां ठेवी....आमका तेची शिकवणी हुती काय भटाची जात ही गोडी.... आपून तेंच्या पाया पडॉन दुवो घ्येवचो, भटाच्या आगीधुगीत पडॉचानाय नी तेच्ये विपळाक कदीपन घेयाचे नाय..... नी ह्यो चा़ंडाळ तुमच्याशी दुस्मनी करून तुमच्या कुटंबाचे हपाप घ्येताहा.....
आता जग दुनियेत कितीजण सिलिपाट, खुटवळाचो धंदो करतंहत..... तुमच्या धंद्यामुळां ह्येच्या पोटार पाय ईलो अशातली पन गोष्ट नाय......दोन कपाटांत चोंदून चोंदून नोटी भरलेल्यो हत......पन ह्येची हाव कमी नाय होयत्.... तेना तुमच्या तोंडातलो घास काडून घितलान.... ह्येकाबरां भोगनार नाय.... मी तुमच्या दोगवांच्या पाया पडतय...तेच्या पापात माका गोवू नुको आनी आमका बायका पोरा़क शिव्यो शाप द्येव नुको. मी चुक मागतय…. ह्यो तांदुळाच्यो मोटी हत.....आनी हे पैशे हत...... तुमी घरात बसोन ऱ्हवो नुको...ह्या पैशात्सून कायतरी धंदो सुरू करा..... तुमका बरे दिवस ईले की मग्ये माज्ये पैशे परतकरा. तुमका गाव देवाची आण...... आज तो सैतान फाटपटी उटोन शिरशात गेलेलो हा म्हनान मी ईलय." नी कडोसरीच्या पिशवीतून नोटांच पुडकं काढून भाऊं समोर टाकीत रखमा म्हणाली,” ह्ये पाचशा हत.आता मिरग झालो की काटयो तोडूची सुरवाती होयत.तुमी आवंदू खरेदी करा. त्या धंद्यात बरे पैशे भेटतत.” गंगा वहिनीने तिची खणा नारळाने ओटी भरली. लाह्याच्या पीठाचा लाडू खायला दिला. डब्यात घालून लोणचं नी खारातले आंबे दिले. मग दोघा़च्याही पायावर डोकं ठेऊन रखमाउठली.
ट अकल्पितपणे कोंडी फुटली होती. रखमा खरोखरच लक्ष्मीच्या रूपानेच आली. पाचशे रुपये ही खूप मोठी रक्कम होती. एवढं भांडवल हातातआल्यामूळे भाऊना हुरूप आला.रस्त्याच्या कामात भाऊ़च्या स्वत:च्या काठ्याहीतोडायच्या राहिलेल्या होत्या.मिरगाबरोबर आपल्या काठ्यांच तोडकाम धकल्याच्या लगामी लावून बाबल्याला सोबत घेऊन भाऊ काठ्यांच्या खरेदीला बाहेर पडले. उपळं, तारळ, कुंभवडं, नाणार, सागवे, शिरसे ह्या गावानी कठ्याची मोठ्या प्रमाणात तोडतोड सुरू होती. ऐन मोक्याच्या टायमालारोखीने माल घेणारा भेटल्यामूळे घाऊक व्यापाऱ्यानी घासघीस न करता सौदे तोडले. आठवडभर तंगडतोड करूनजवळ जवळ तीन ट्रकांची भरताड होईल एवढी खरेदी झाली. त्यात करूनही प्रत्यक्ष लोड भरताना गरज पडलीच तर किरकोळवाल्यांकडून माल घेऊन भर करता आली असती. नन्नाजी हातात असले की कुठचं काम अडत नाय.
आता शामरावाला गाठायला हवा होता. राजापूरातला संपूर्ण तालुक्याचा रेशन पोच करायचा मक्ता त्याच्याकडेच होता. राजापूरच्या गोडाऊनकीपर कडे हुकमी माहीती मिळली असती. दोन दिवस आराम करून सोमवारी सुरेशला सोबत घेऊन भाऊ राजापूरात गेले. गुरूवारी शामराव यायचा होता. त्याला रेशन उतरून झाल्यावर काठीचा लोड भरायला यायचानिरोप देऊन भाऊ बाजारात गेले. रमेशला गणवेशाचे दोन जोड आणि एक रंगीत पाटलोण -सद्रा आणि आपल्यासाठी धोतजोडी नी शर्टाचे कापड घेऊन ढेकण्याकडे कपडे शिवायला टाकले. त्याला पहिल्यानेच गंजीफ्रॉकाची जोडीही घेऊन दिली. निमासाठी परकर पोलक्याचे कापड, बायकोसाठी दोन पातळंअशी घाऊक खरेदी झाली. घरी गेल्यावर गुरूवारी रात्री किंवा शुक्रवारी भिणभिणताना काठ्या भरायला जायची वर्दी धकल्याला देऊन भाऊ निर्धास्त झाले. गुरूवारी काळवं पडायच्या वेळेला दस्तुरी नाक्यावरून भाऊंच्या घरापर्यंतच्या नव्या रस्त्यावरून शामराव आला. तासाभरात जेवणाचे डबेसोबत घेऊनच माल भरायला जायचं होतं. भरताड झाल्यावर भाऊ़च्या घरी परत येऊन झोप काढूनदुसरे दिवशी कोल्हापूर असा बेत होता. तासाभरात डबे झाले नीपेट्रोमॅक्स घेऊन ट्रक सुटला. गडी तयारच होते. कुंभवड्यात चार ठिकाणी भरताड झाल्यावर भाकरी खाऊन ट्रकउपळ्यात गेला. उपळे प्रिंदावण दोन गावात लोड पुरा करून भाऊंच्या घरी जाईतो पहाट झाली.
दुसरे दिवशी उशिरापर्यंत झोप काढून ड्रायव्हर नी दोन सोबत्यानी आंघोळी उरकल्या. आरामात जेवणं उरकून दुपार उलटून गेल्यावर ट्रक सुटला. शाहूपुरीत शामरावाच्याओऴखीने दोन तीन व्यापा्ऱ्यांशी दराची चौकशी केली. त्यांच्यापैकी एकाने दर चांगला लावला.पणतो चार आणे व्यवहार रोखीने नी बाकीची रक्कम दिवाळीत भागवणार होता. शामरावाने त्याची हमीदिल्यावर भाऊनी हिशोबाच्या वहीत झालेल्या व्यवहाराची नोंद करून त्यावरव्यापाऱ्याचा नी साक्षिदार म्हणून शामरावाचा आंगठा घेतला. रात्रभर तिथेच आराम करून सकाऴी शामराव वडणग्याला गेला नी भाऊ परतीच्या प्रवासाला सुटले. जुलै अखेर काठ्या भरवणाच काम पुरं झालं. तिसऱ्या ट्रीपला सागव्यात आगावू खरेदीच भरवण कमी पडलं. मग शिरशात ट्रक नेला तिथे किरकोळवाल्या चारपाच लोकांकडे खरेदी केली. हातच्या हातावर पैसे मिळणार म्हटल्यावर काहीही रखड न लागता भरवण पुरं झाल. आता ट्रका सोबत भाऊना कोल्हापूरला जावं लागत नसे. बयाण्याची रक्कम शामराव भागवी. रखमा येऊन रक्कम देऊन गेली आणि कोंडी फुटली. सगळा व्यवहार भागून सव्वाशे रुपये शिल्लक होते. दिवाळीत तीन ट्रीपचा पूरा व्यवहार झाल्यावर रखमाने दिलेलं मुद्दल परत करून,वर्षभराचा खर्चवेत भागून पुढच्या सीझनला खरेदीसाठी चार पैसे हाताशी रहाणार होते. देवाने फार सत्वपरीक्षा घेतली नाही. सगळा ताळमेळ घेऊन नवीन ५० कलमं लावायचा बेत त्यानी योजला. अकस्मात उठणाऱ्या वावटळी सारखं अरिष्ट आलं आणि शेत जमीन गडप करून गेलं खरं पण आपण शाबूत राहिलो. एका सीझनची तरी चिंता मिटली.गेल्यावर्षी सुरेशला वार लावून जेवायला लागलं. पण यंदा त्याला खाणावळ लावून दिली . सहा महिन्याच्या खाणावळीच्या बीलाचे पैसे भाऊनी आगावू भरले. तीन चार सीझन दैवाने साथ दिली तर कलमांच शिपणं सुटल़ की, पुन्हा ऊर्जितावस्था येईल अस़ आशादायक चित्र भाऊना दिसू लागलं. (क्रमश:)