मुलांनी घरदार सांभाळायला शिकावं.
मुलांनी घरदार सांभाळायला हवं. ही बाब सत्य आहे. परंतु आजचा काळ असा आहे की मुलांना मायबाप जन्म देतात. ती मुलं लहानाची मोठी होतात. खुप शिकतात. परंतु कामाला लागत नाहीत. तर ती ओझं बनून मायबापाची मालमत्ता उधळीत असतात. अशी बरीच कुटूंब आहेत की जी आपल्या वडीलांनी कमविलेल्या मालमत्तेवरच जगत आहेत.
शिक्षण..... शिक्षणाच्या बाबतीत म्हटलं जातं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो पिणार. तो गुरगुरणारच. परंतु आजचं शिक्षण असं नाही की जो घेईल. तो गुरगुरेल. आजचं शिक्षण हे उच्चप्रतीचं आहे. परंतु गुरगुरणारं नाही. तर ते शिक्षण गुलाम घडविणारं आहे. आजच्या शिक्षणातून गुलामच घडत असतात. स्पष्ट बोलणारे वक्ते घडत नाहीत. ही शोकांतिकाच आहे. आज उच्च शिकलेली ही मंडळी, त्या मंडळींचे कामाप्रति विचार उच्च झालेले असतात. त्यांना सामान्य काम करणं जमत नाही. सामान्य कामाला ते अज्ञानी लोकांचं काम समजतात. कारण तशी कामं ही अज्ञानी लोकंही अगदी व्यवस्थित पद्धतीनं करु शकतात. जसं चहाची टपरी उघडणं वा एखादा पानठेला लावणं. ही कामं एखादा अज्ञानी व्यक्तीही चांगल्या प्रकारे करु शकतो.
अलिकडील काळात लोकं बरेच शिकत आहेत. ज्ञानाच्या कक्षा पादाक्रांत करीत आहेत. त्यांना शिक्षणाची आवड आहे. त्याचबरोबर कामाचीही आवड आहे. मात्र काम त्या शिक्षणाच्या लायक हवं. असं त्यांना वाटते. जसा एखाद्या व्यक्तीनं डॉक्टर पदवी जर घेतली असेल तर त्याला मोलमजुरीच्या कामावर जायला आवडेल काय? किंवा बाजारात फळं विकायला आवडेल काय? आवडते, परंतु ती कामं करायला लाज वाटत असते. त्यानंतर कामाची गोची होते. वाटतं की ती कामं करण्याऐवजी आपल्याला एखादं कार्यालयीन काम मिळावं. तसं पाहिल्यास कार्यालयीन कामंही असतातच. परंतु त्या कामात मुल्य नसतं. त्याबद्दल देण्यात येणारा मोबदला हा एका अज्ञानी असलेल्या मजुराच्या मोबदल्यापेक्षाही कमी असतो. मग कसे काय कोणतेही काम करायला आवडेल. जर कामात जास्त पैसे असतील तर ते काम शिक्षणानुसार योग्य असते. असे शिकलेल्या लोकांना वाटत असते. जर कामात कमी पैसा असेल तर ती कामंही असा शिकलेला व्यक्ती करीत नाही. ज्यातून मुलांना घरदार सांभाळता येत नाही.
कामाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास अलिकडील काळ हा पुर्वीसारखा राहिलेला नाही. ज्या देशात काल मातृसत्ताक कुटूंबपद्धती अस्तित्वात नव्हती. त्याच देशात आज मातृसत्ताक कुटूंबपद्धती अस्तित्वात येत असलेली दिसून येत असून आजच्या फक्त महिलाच जास्त स्वरुपात काम करतांना दिसत आहेत. शिवाय त्या इमानदारीनंही काम करतांना दिसत आहेत. त्यातच त्यांना देण्यात येत असलेलं मुल्यही त्या जास्त मागत नसल्याचं दिसून येत आहे. हा विचार करता मुलांची गोची होत असून मुलांनी घरदार कसं सांभाळावं. हा प्रश्न आहे. त्यातच मुलं शिकतात. उच्च शिक्षण घेतात. परंतु त्या शिक्षणाच्या योग्यतेनुसार नोकरी न लागणे. शिक्षणानुसार व्यवसायीक पात्रता नसणे, हलक्या स्वरुपाची कामं करण्यास लाज वाटणे. या सर्व गोष्टीमुळे मुलांचं वय होवून जाते. परंतु ती मुलं काम करु शकत नाहीत. ज्यातून मुलं वयाची होवून जातात. लग्नही होवून जातं. परंतु कामाची होत नाहीत. अशी मुलं कितीही मोठी झाली तरी मायबापाच्या उरावरच बसून खात असतात.
विशेष सांगायचं झाल्यास कोणतीही कामं हलकी नसतातच. मग ती चहाची टपरी चालविणे का असेना. तसं कोणीही मानू नये. त्यातही कसब असतंच. ते कसब पाहता मुलांनी स्वतःच स्वतःचं घरदार सांभाळायला शिकावं. जेणेकरुन आपली स्वतःची गोची होणार नाही. उच्च शिक्षण नक्कीच घ्यावं. कारण त्या शिक्षणानुसार आपल्यात कसबही येत असतं. ग्राहकाशी कसं बोलावं, कसं नाही, याबद्दलचं बोलणं, चालणं येत असतं. एकंदरीत सांगायचं म्हणजे आपण मोठे झालो ना. मग आपण मायबापावर ओझं बनून राहू नये घर सांभाळायला शिकावं. घर सांभाळावं. जेणेकरुन मायबापांनाही तुमचा अभिमान वाटेल व ते तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देतील. ज्यातून तुम्हाला पावलोपावली यशच मिळेल, यात शंका नाही.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०