शाळा हे सुसंस्कार रुजविण्याचं केंद्र. *आज अशी बरीचशी मंडळी पाहतो की त्यांना किती शिकले असं विचारले असता चक्कं सांगतात की पाचवी शिकलो. कुणी सातवी तर कुणी दहावी सांगतात आणि स्वाक्षरी करा म्हटलं तर अंगठा लावतात. यावरुन शिक्षणाची परिभाषा लक्षात येते. परंतु त्यांचेकडे पाहिलं तर ते व्यक्तीमत्व सालस स्वरुपाचं दिसून येतं. त्यांच्यात सुसंस्कार दिसतात. त्याचं कारण असतं, त्यांची शाळा. त्यांच्या शाळेनं ते शिकत असतांना त्यांच्यात संस्कार फुलवलेले असतात. त्यांना सुसंस्कारीत केलेलं असतं. जे सुसंस्कार घरात व परीसरात मिळत नाहीत.* विद्यार्थी घडवायचे असतील तर त्यांना सुसंस्कृत बनवायला हवे. त्यांना सुसंस्कृत बनवून त्यांना सुसंस्कारीत करायला हवे. विद्यार्थ्यात काही वेगळेच सुप्त गुण असतात. ते इतर कोणाला दिसत नाहीत. ते आपले सुप्तगुणही दाखवत असतात. परंतु त्याकडे कोणाचे लक्षच जात नाही. त्यानंतर त्याला मातीचा गोळा समजून त्याच्या सुप्तगुणांना फाटा फोडून त्याला उच्छेद देवून त्याच्यावर वेगळेच काही करण्याचे तंत्र त्याचेवर थोपवलं जाते. ज्यातून त्याच्यातील सुप्त गुणांची कत्तल होते. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. म्हटलं जातं की चूक ही वैयक्तिकपणे दाखवायला हवी व त्यावर मार्गदर्शन करायला हवं आणि प्रशंसा ही सर्वांसमोर करायला हवी. तरच विद्यार्थ्यात वा कोणात आपल्याबद्दल आदर निर्माण होत असतो. मात्र लोकांचं आताचं वागणं याऊलट आहे. आताच्या लोकांच्या वागण्यानुसार लोकं चूक ही सर्वांसमोर दाखवतात आणि जी प्रशंसा सर्वांसमोर करायला हवी. ती एकट्यात करतात. मग कसे वाढतील सुप्त गुण? तसंच विद्यार्थी हा शिकत असतांना नेहमी जाणवतं की ते वारंवार कृती करतांना चुकतात. एकच कार्य काही विद्यार्थ्यांना जमत नाही तर काही विद्यार्थ्यांना चांगलं जमतं. त्यातील कारणांचा शोध कोणीही घेत नाही. हं, एखादा विद्यार्थी चुकलाच तर त्याचेवर रागविण्याशिवाय पर्याय नसतो व ती मंडळी रागावतातच. यात खऱ्या अर्थानं विचार केल्यास असं जाणवतं की ज्या विद्यार्थ्यांच्या हातून वारंवार चुका होतात. तेव्हा ते कार्य त्याला आवडत नसेलच. त्यामुळंच चुका होत असतात आणि ज्या मुलांना ते कार्य आवडतं. त्यांच्या चुका होत नसतात. त्याचं कारण असतं त्याचेतील सुप्त गुण. उदाहरण द्यायचं झाल्यास एखाद्या खेळाचं देवून. ज्या विद्यार्थ्यांना कबड्डी हा खेळ आवडतो. तो त्या खेळाचं प्रात्यक्षिक मन लावून पाहणार व चुका करणारच नाही. परंतु ज्याला तो खेळ अजिबात आवडत नाही. त्याला कितीही सांगितलं, वारंवार चुका त्याच्या निदर्शनास आणून दिल्या. तरी त्याच्या त्या खेळातील चुका होणारच. असं का होतं? कारण प्रत्येकाची आवडनिवड त्या त्या सुप्त गुणानुसार ठरलेलीच असते. समजा एखाद्याला क्रिकेट आवडत असेल तर त्याला भाराभर ज्ञान देण्याची गरज नाही. त्याला फक्त क्रिकेटचंच ज्ञान द्यावं वा एखाद्याला अभ्यासाची आवड असेल तर ते मुल मैदानावर फिरकणारही नाही. एखाद्याला चित्र आवडत असेल तर तो चित्रच काढणार. इतर गोष्टी करणारच नाही आणि करेल तर त्यात वारंवार चुका करेल. अलिकडील शिक्षण पद्धती सुप्त गुणांवर मुलामा घातल्यागत निर्माण झाल्यासारखी वाटतेय. त्याचं कारण आहे. त्या शिक्षणपद्धतीचा दुतर्फी निकष. म्हटलं जातं की या शिक्षण पद्धतीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यातील सुप्त गुणांची वाढ करणे हा होय. मग हे सुप्त गुण तीन वर्षातच दिसणार नाहीत. त्यासाठी वेळ जावू द्यावा लागेल. परंतु अलिकडील काळात शिक्षण हे वयाच्या तीन वर्षापासून देण्याची पद्धत आली आहे. त्या विद्यार्थ्यांना खेळाच्या माध्यमातून शिकवले जाणार आहे. म्हणजेच त्या विद्यार्थ्यांची बुद्धीमत्ता ही अभ्यासाच्या साच्यात भरली जाणार आहे. ज्या साच्यात आधीच बीज टाकलेलं असेल. समजा डॉक्टर बनवायचं बीज असेल आणि त्या विद्यार्थ्याला जर क्रिकेटर बनायचं असेल तर ते त्याला बनू दिलं जाणार नाही. कारण साचा हा कुठंतरी डॉक्टर पदाचा असेल. याचाच अर्थ असा की ज्या पदाचा साचा. ते पद तो विद्यार्थी आपोआपच प्राप्त करणार. कारण तीन वर्ष वयात त्याचा शाळा प्रवेश होणार. विशेष म्हणजे शाळा हे सुप्त गुण वाढविण्याचे केंद्र बनायला हवे असे सरकारचे मत. तसेच मत असावं, ते म्हणजे शाळा हे संस्काराचे केंद्रही असायला हवे. त्या शाळेतून संस्कार रुजायला पाहिजे. परंतु अलिकडील काळात काही काही शाळेतील विद्यार्थ्यात संस्कार नावाची गोष्टच दिसत नाही. त्याचं कारण काय असावं? त्याला दोन कारणं जबाबदार असतात. एक कारण असतं परीसर. तो विद्यार्थी कोणत्या परीसरातून आला? जर तो झोपडपट्टीतून आला असेल, तेथील लोकांची वारंवार होणारी भांडणं पाहात असेल तर त्या विद्यार्थ्यांचं मन हे अभ्यासात लागणारच नाही. ते बदमाशकीपणात वा भांडणातच लागेल. जरी त्या शाळेनं संस्कारीत पणाच्या चार चांगल्या गोष्टी शिकवल्या तरी त्या गोष्टी त्याच्या पचनी पडणार नाहीत. शिवाय त्याच्यात जर भांडणच करण्याचे सुप्त गुण असतील तर तो विद्यार्थी भांडण स्वखुशीनं करेल. त्यात तो वेगवेगळ्या युक्त्या योजेल. त्याला ते सांगण्याची गरज उरणार नाही. अन् दुसरं कारण असतं त्या विद्यार्थ्यांच्या घरचं वातावरण. त्या विद्यार्थ्यांच्या घरचं वातावरण काय? कोणत्या परिस्थितीत त्याला घरी वागवलं जातं? समजा त्या विद्यार्थ्याला घरी आई नसेल व सावत्र आई मारत असेल वा सावत्रपणाची वागणूक देत असेल तर त्याच्यात बदल्याचीच भावना तयार होईल. जरी तो विद्यार्थी हुशार असेल, त्याच्यात उच्च शिक्षण घ्यायची इच्छा असेल तरी त्याच्यातील बुद्धीमत्ता मारली जाईल. त्याला घरुनच शिकवले जाणार नाही. ते मुल आपलं शिक्षण अर्धवटच सोडेल. या सर्व गोष्टी व या सर्व गोष्टीचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असतो. याचा विचार सरकारनं शैक्षणिक अभ्यासक्रमात केला की नाही केला. हा एक संभ्रमाचा विचार व आचार आहे. तसं पाहिल्यास शासन व शैक्षणिक धोरण म्हणतं की त्या विद्यार्थ्यांना वाचन हे त्याच्या वयाच्या सातव्या वर्षी यायलाच हवं. परंतु अशा वातावरणातून आलेली मुलं जर असली तर त्या मुलांकडून त्याच्या वयाच्या सातव्या वर्षी त्याला वाचन यायलाच हवं. अशी अपेक्षा करता येईल काय? शिवाय त्या विद्यार्थ्याला त्याच्या अंगातील सुप्त गुणानुसार वाचनात आवड नसेल तर ते वाचन शिकू तरी शकेल काय? महत्वपुर्ण बाब ही की खरं शिक्षण व शिक्षणातील उणीवा. या सर्व बाबी विचारात घेवून जर शाळेत औपचारिक शिक्षण देत चाकोरीबद्ध रितीनं शिकवलं तर विद्यार्थ्यात असलेल्या सुप्त गुणांचा काही अंशी विकास होईल. सर्वच बाबीतून विकास होवू शकणार नाही. तसेच सर्वच विद्यार्थी हे वाचन कौशल्य हस्तगत करु शकणार नाहीत. काही मुलं हे कदाचीत पहिल्याच वर्गात असतांना वाचन शिकतील तर काहींना तेच वाचन शिकायला दहावीचा वर्ग उजळेल तर काही विद्यार्थ्यांना जन्मजातच वाचन येणार नाही. आज अशी बरीचशी मंडळी पाहतो की त्यांना किती शिकले असं विचारले असता चक्कं सांगतात की पाचवी शिकलो. कुणी सातवी तर कुणी दहावी सांगतात आणि स्वाक्षरी करा म्हटलं तर अंगठा लावतात. यावरुन शिक्षणाची परिभाषा लक्षात येते. महत्वाचं म्हणजे निदान वाचनात तरी शिक्षकांना धारेवर न धरता त्याला दोषी असलेलं वातावरण समजावं. याचा अर्थ सर्वच विद्यार्थी वाचन करणार नाहीत असा नाही. जसे तांदळात दोनचार खडे असतात. तसे वाचन न करणारेही विद्यार्थी दोनचार सापडतीलच. तेव्हा त्याचा बाऊ न करता शिक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांवर संस्कार टाकणारा असावा. पाठ्यक्रमातून संस्काराचे मुल्य शिकवले जावे. जरी विद्यार्थ्यांच्या घरचं वातावरण चांगलं नसेल वा परीसर जरी चांगला नसेल तरी त्या विद्यार्थ्यात चांगल्या विचारांचं बीज पेरलं जावू शकते. उदाहरण द्यायचं झाल्यास शिवरायांचं देता येईल. कारण ज्या काळात शिवाजी महाराज घडले. तो काळ अतिशय धामधुमीचा होता. देशमुख, देशपांडेसारखे आपलेच वतनदार आपापसात भांडत होते. शत्रूही तसेच माणसातील कुविचारांना खतपाणी घालणारेच होते. तरीही शिवाजी महाराजात संस्काराचे बीज पेरले गेले. ते स्वराज्याच्या रुपानं फुलले. दुसरं उदाहरण डॉक्टर बाबासाहेबांचं देता येईल. बाबासाहेबांच्या वेळेसही बाबासाहेबांची शिक्षण घेण्याची परिस्थिती नव्हती. परंतु तरीही बाबासाहेब घडले. अशीच बरीच उदाहरणं आहेत की घरची, परीसराची विपरीत परिस्थिती असतांनाही आपले काही महापुरुष घडले. आपणही घडू शकतो आणि शिक्षक म्हणून या बालवयातील कोवळ्या मुलांचे भविष्य घडवू शकतो. अन् ते कार्य प्रत्येक शिक्षक करतोच. तेव्हा शासनानंही त्यांना धारेवर न धरता त्यांच्या निरपेक्ष मनानं त्यांना कार्य करु द्यावं. जेणेकरुन त्यांना विद्यार्थ्यात सुसंस्कार फुलवता येतील व प्रत्येक शाळेला संस्काराचे केंद्र बनवता येईल यात शंका नाही. अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०