Use videos and photos for good. in Marathi Classic Stories by Ankush Shingade books and stories PDF | व्हिडीओ व फोटोचा वापर चांगल्यासाठी करावा

Featured Books
Categories
Share

व्हिडीओ व फोटोचा वापर चांगल्यासाठी करावा

व्हिडीओ व फोटोचा वापर चांगुलपणासाठी करावा          सध्या फॅशन आली आहे व्हिडीओ बनविण्याची. मग तो व्हिडीओ कोणत्याही पद्धतीनं बनलेला का असेना, लोकं व्हिडीओ टाकतच असतात. त्याचबरोबर फोटोही टाकत असतात. कधी वात्रट तर कधी फॅशन करुन. फॅशनेबल काळ असल्यानं अतिशय तोकडे कपडे घालून व्हिडीओ वा फोटो सोशल मिडीयावर टाकण्याची पद्धत अलिकडे रुढ झाली आहे. मात्र त्याला कोणी काहीही म्हणत नाहीत. लोकांना वाटते की त्याचा फायदाच होत असतो आणि लोकांचंही त्यादृष्टीनं बरोबरच आहे. कारण लोकं चांगल्या गोष्टी कधीच पाहणार नाहीत. वाईट गोष्टीकडं मात्र चटकन लक्ष जात असतं.  कारण गत काही वर्षापूर्वीच पुनम पांडे वा ममता कुलकर्णी नावाच्या अभिनेत्रीनं असेच फोटो सोशल मिडीयावर पोष्ट केले होते. त्यांना चित्रपटात काम मिळालं. म्हणूनच लोकांचं असं वागणं. लोकांचं यात काय चुकतं. लोकांनाही वाटते की आपणही असेच प्रसिद्ध होवू.           प्रसिद्धी, पद, पैसा, प्रतिष्ठा. ह्या जेवढ्या काही प वर आधारीत गोष्टी आहेत. या नशिबाचाच एक भाग आहे. नशिबात असेल त्यालाच या गोष्टी मिळतात. इतरांना त्या गोष्टी अजिबात मिळत नाहीत. त्यामुळंच त्याचा बाऊ होवू नये. परंतु लोकांना कोण सांगेल. लोकं सर्व कामधंदे सोडून त्यापाठीमागेच लागले आहेत. शिवाय ह्या गोष्टीनं माणसांचीच अधोगतीही होत असते. कामात रस वाटत नाही. सगळी कामं खोळंबतात. मित्रमंडळ तुटतं. नातेसंबंधही तुटतात. शिवाय माणूस हा एकाकी बनतो. आजार बळावतो व व्यक्ती अशा निराशेच्या गर्तेत पोहोचतो की तेथून तो परत येवूही शकत नाही. ज्याला डिप्रेशन म्हणतात. हे लोकांना माहीत आहे. तरीही लोकं त्यामागे लागत असतात.          आज असंच जग आहे व हे जग आम्हाला अशाच गोष्टीमागं फिरायला लावत असते. कारण स्पर्धाकाळ आहे. शेजारचा व्यक्ती असे करतो ना, मग आपणही तसेच करायला हवे. मग त्यासाठी कर्ज काढणं आणि ते कर्ज चुकवणं नाही झालं तर आत्महत्या.          आज आत्महत्याही अगदी सोप्या झाल्यात. आत्महत्येचं प्रात्यक्षिक करुन दाखवतात लोकं. परंतु बाबा रे, त्यात तुमचाच मृत्यू होतो ना. हे मात्र कोणीही जाणत नाहीत. लोकं आत्महत्याही या सर्रास करीत असतात.          व्हिडीओ व फोटोचं हे जग. लोकं या व्हिडीओ व फोटोच्या जगात चांगले फोटो वा व्हिडीओ कधीच बव्हंशी व्हायरल करणार नाही. याबाबतीत सांगतांना एका व्हिडीओबाबत सांगणे गरजेचे समजतो. एक व्हिडीओ असाच फेसबुकवर व्हायरल झाला. एक तीन वर्षाची मुलगी भांडे घासत होती. सुंदर होता तो व्हिडीओ. परंतु बोध काय, तुम्हाला पुढेही चांगले भांडे घासता यावेत यासाठी असेल का तो व्हिडीओ की स्रियांच्या नशिबात चूल आणि मूल असतं हे दर्शविणारा होता  का तो व्हिडीओ. साहजिकच तेच दर्शवत असेल तो व्हिडीओ. त्यापेक्षा जर त्याच व्हिडीओच्या ठिकाणी त्याच तीन वर्षाच्या मुलीचा अभ्यास करतांना व्हिडीओ वा फोटो पोस्ट केला असता तर बराच संदेश वा बोध त्यातून देता आला असता. परंतु हे व्हिडीओ पोष्ट करणाऱ्यांना कोण सांगेल.           फोटो वा व्हिडीओ आपल्याला बरंच काही सांगून जातात. तसं पाहिल्यास आजच्या काळात लोकांकडे वेळ जरी बराच असला तरी मोबाईलच्या संगतीनं त्यांच्याकडे अजिबात वेळच नाहक असे दिसायला लागले आहे. एवढे गर्क असतात लोकं मोबाईलच्या दुनियेत. मोबाईल म्हणजे त्यांना आत्माच वाटते स्वतःचा. मोबाईल जर,त्यांच्याकडून हिसकला की आक्रनतांडव होत असतं. मग माहीत नाही. लोकं काय काय डोक्यावर घेतात ते. लहान मुलंही मोबाईलमध्ये गर्कच असतात. त्यांचंही सांगायलाच नको. त्यांच्याही हातून थोडासा मोबाईल का घेतला की बस, त्यांना चूप करणं कठीण होवून बसतं.          सोशल मिडीया ही मोठी कामाची वस्तू आहे. त्यातून राजनेते निवडूनही येत असतात. चांगलेच नाही तर गुन्हेगार राजनेतेही निवडून येत असतात. काही व्हिडीओ व फोटो हे बरंच काही सांगून जात असतात. एक फोटो असाच व्हाट्सअपवरुन व्हायरल झाला. एक आई आपल्या बाळाची आंघोळ करुन देत होती व लिहिलं होतं की जर बाळानं मोठे झाल्यावर या स्नानाचे ऋण फेडले तर त्याला कुंभमेळ्यात स्नान करण्याची काहीच गरज नाही. फोटो लहानसाच होता. परंतु त्यातून अर्थबोध किती होत होता. हे सांगायलाच नको. परंतु असे व्हिडीओ वा फोटो कुणीही लक्षात घेत नाहीत. त्याबद्दल कोणीही काही बोलत नाहीत वा प्रतिसाद देत नाहीत आणि वात्रट व्हिडीओ असले की बस. प्रतिक्रियेची सरबत्तीच होते. त्याचं कारण म्हणजे आजचा काळ. आज कलियुग आहे व या कलियुगात वाईट गोष्टींनाच जास्त प्राधान्य दिलं जात असतं. महत्वाचं म्हणजे आपल्याला जर व्हिडीओ बनवायचे कौशल्य प्राप्त झालेले आहे व ती प्रदत्त रुपात विधात्यानं दिलेली देणगी आहे. विचार करा की मोबाईलचा शोध जरी मानवानं लावला असला तरी तरी मानवाला विचार करण्याची शक्ती एका नैसर्गिक शक्तीनं दिलेली आहे. ती शक्ती निसर्गातीलच वस्तू प्राशन करुन वाढलेली आहे. म्हणूनच आपले विचार प्रगल्भ होवू शकले. जर आपण या निसर्गातील वस्तू प्राशन केल्या नसत्या तर आपली विचार करण्याची शक्ती वाढली नसती व आपण शोधही लावू शकलो नसतो. तेव्हा त्याच शक्तीच्या जोरावर आज आपण व्हिडीओ निर्मिती करु शकतो वा फोटोही काढू शकतो. तसं पाहिल्यास फोटो वा व्हिडीओ हे चांगले तसेच वाईटही काढू शकतो. तेव्हा आपल्याला मिळालेल्या त्याच अद्वैत शक्तीच्या जोरावर आपण वाईट वा वात्रट व्हिडीओ वा फोटो न काढता, चांगले फोटो वा व्हिडीओ काढावेत. जेणेकरुन त्या फोटोचा वापर जनकल्याणासाठी होईल. कधीकाळी सुचलंच तर लहान मुलांचा भांडे घासण्याचा व्हिडीओ पोष्ट न करता त्याच ठिकाणी एखादा अभ्यासाचा व्हिडीओ काढावा. जेणेकरुन त्या व्हिडीओच्या माध्यमातून लहान मुलांच्या मनात अभ्यासाची गोडी वाढेल. भांडे घासण्याची नाही हे तेवढंच खरं. म्हणूनच आपण निदान आपल्या मुलांना संस्कार लावण्यासाठी तरी तशा स्वरुपाचे व्हिडीओ वा फोटो काढू नये. ते सोशल मिडीयावर अपलोड करु नये. वात्रट व्हिडीओ वा फोटो त्याला दाखवू नये. म्हणजे झालं.        अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०