जात नष्ट करणे आहे? *जात अस्तित्वात आली कामावरुन. कामाची आखणी केली गेली व त्या कामानुसार कामाचं वर्गीकरण झालं. त्यातच विशिष्ट कामाची माणसं लवकर ओळखायला यावीत. म्हणून जात निर्माण झाली. ज्यात सुरुवातीला जातीजातीतील भेदभाव नव्हता. ज्यात विटाळही नव्हता. परंतु कालांतरानं त्यात विटाळ व भेदभाव शिरला. ज्यातून सामान्य माणसांचे जीवन जगणे असह्य झाले होते. हे सर्व स्वार्थापायी झालं होतं. विशिष्ट वर्गानं आपली अक्कलहुशारी वापरुन आपल्या बिरादरीला सुख भोगता यावं म्हणून निर्माण झालेल्या जातीचा वापर कलुषीतता निर्माण करण्यासाठी केला. आजही करीत आहे. म्हणूनच जात नष्ट करणे आहे.* जात...... जी जात नाही, ती जात. जातीवरुन विटाळ अस्तित्वात आला. विटाळ हा स्वच्छतेवरुन अस्तित्वात आला. काही लोकं म्हणतात की पुर्वी जातीवरुन विटाळ नव्हता तर तो विटाळ म्हणजे काही काळाकरिता लोकांना दिलेली शिक्षा होती. जातीवरुन विटाळ जर असता तर कुंभार, सुतार वा इतर तत्सम कामे करणाऱ्यां लोकांच्या बाबतीतही विटाळ असता. परंतु तो नाही. याचाच अर्थ जातीवरुन विटाळ नव्हताच. विटाळ होता कामावरुन. लोकांना वाटत होतं की ती कामं अर्थात घाणेरडी कामं कोणीही करु नये. ती सोडावीत. म्हणून विटाळ नावाची शिक्षा. ती शिक्षा होती लोकांनी सुधरावं यासाठी. त्यांनी व्यवस्थीत राहावं. घाणेरडं राहू नये यासाठी दिलेली. त्यांचं म्हणणं होतं की लोकांनी घाणेरडं काम करु नये. स्वच्छ अंघोळ करावी व नीटनेटकं राहावं. कारण असं अस्वच्छ राहण्यातून लोकांना आजार शिवतो. साथीचे रोग पसरतात. कारण पुर्वी गावात साथीच्या साथी यायच्या. ज्या साथीत कित्येक लोकं मरण पावत असत. ती आजाराची साथ अस्वच्छतेपासून पसरत असल्यानं ती अस्वच्छतेची कामं करणाऱ्यांचा तत्सम लोकं विटाळ मानत असत. म्हणूनच जे लोकं चांगले राहात असत. स्वच्छता पाळत असत. त्यांच्याबाबतीत विटाळ नव्हताच. यासाठीच मनुस्मृती लिहिल्या गेली. विटाळ...... अस्वच्छतेवरुन व कामाच्या स्वरुपावरुन आलेला. लोकांचं आजचं म्हणणं की त्या वेळच्या लोकांचं म्हणणं की लोकांची अस्वच्छतेची कामं करु नये. म्हणूनच विटाळ. परंतु हे जरी खरं असलं तरी ती अस्वच्छतेची कामं करणं एखाद्या तरी घटकाला आवश्यक होतं. जर ती कामं त्या विशिष्ट घटकानं केली नसती तर कदाचीत अस्वच्छताच अस्वच्छता पसरली असती. शिवाय तेवढेच आजारही आणि आजाराच्या साथीही. उदाहरण द्यायचं झाल्यास एखाद्या गाईचं देवू. एखादी गाय जर एखाद्या व्यक्तीच्या घरी मरण पावली असती आणि तिला ओढत नेवून फेकणारी जात जगात नसती तर कदाचीत त्या गाईला तिथंच सडत राहावं लागलं असतं. तिच्या पार्थिव शरीराची दुर्गंधी परीसरात सुटली असती. शिवाय त्यातून आजार पसरलाच असता. त्यामुळंच ती अस्वच्छतेची जात तेवढीच महत्वाची होती. जेवढी स्वच्छतेची कामं करणारी जात महत्वाची होती. त्यामुळंच विटाळ मानायलाच नको होता. व्यतिरीक्त मनुस्मृती लिहून जगाला मनुस्मृतीतील जाचक नियमांच्या आधारे जगायला लावले. जे जगणे अस्वच्छतेची कामं करणाऱ्यांसाठी व संपुर्ण स्रीवर्गासाठी जाचक स्वरुपाचे होते. मनुस्मृतीत स्वच्छता बाळगणाऱ्या विशिष्ट वर्गासाठी वेगळे व अस्वच्छ राहणाऱ्या विशिष्ट वर्गासाठी वेगळे नियम होते. शिक्षेच्या बाबतीतही भेदभाव केलेला होता. शिवाय अधिकार आणि स्वातंत्र्यही गोठवले होते. काही लोकांनी विटाळाला अतिशय महत्वपुर्ण घटक मानून त्याचा साथीच्या आजाराशी सःबंध जोडला. त्याला अधिक प्राधान्य दिलं. परंतु हे जरी बरोबर असलं तरी विटाळ हा अतिशय महत्वाचा घटक नव्हताच आणि तो मानणे गरजेचे नव्हतेच. शिवाय आजाराशी विटाळाचा संबंध लावून लोकांनी एका विशिष्ट जातींना अस्पृश्य मानलं. तसंच रजस्व नावाच्या नैसर्गिक प्रवृत्तीलाही विटाळ मानून स्रियांच्याही स्वतंत्र्यपणे जगण्यावर मर्यादा आणल्या. त्यांचे समाजातील अधिकार नाकारले. त्यातच अस्पृश्यांचा सुर्योदयानंतरच्या काही तासाचा गावातील प्रवेश नाकारला. एकीकडे त्यांचा स्पर्श म्हणजेच आजाराचा शिरकाव मानलं. तर दुसरीकडे त्यांनी तयार केलेल्या वस्तू त्यांना चालल्या. याचाच अभ्यास बाबासाहेबांनी केला होता. त्यानंतर बाबासाहेबांनीच सांगीतलं की पिढीतील धंदे सोडा. ते धंदेच विटाळ टिकवतात. आपल्याला माणसाप्रमाणे जगू देत नाहीत. आपल्याला त्या धंद्यामुळेच अतुच्छतेचं जगणं सहन करावं लागतं. त्यांनी पिढीजात धंदे सोडायला लावले. जातीगत विटाळ मिटविण्यासाठी. परंतु जात मिटवली नाही. जी जात मिटवायला हवी होती. ज्या कामातून जात निर्माण झाली होती व जातीअंतर्गत विटाळही निर्माण झाला होता. जो विटाळ मनुस्मृती आणि भाला संग्राममधील काही जाचक नियमांनी निर्माण केला होता. जाती, विटाळ व भेदभावाच्या पैलूतूनच त्यांनी मनुस्मृती जाळली. कारण त्यात लिहिलेल्या काही अनैतिक गोष्टी. ज्या मनाला रुचत आणि पटत नव्हत्या. शिवाय त्या प्रकरणाचा खटला न्यायालयात गेला. ज्यात विटाळ, भेदभाव होता. प्रथम तो खटला खालच्या न्यायालयात चालला. त्यानंतर तिथं बाबासाहेबांना विजय प्राप्त झाला व तो विजय इतर लोकांना पटला नसल्यानं तो खटला उच्च न्यायालयातही चालला. ज्यात विटाळ वाईटच असा निकाल आला होता. तरीही आज काही लोकं विटाळाच्या नियमांचा उदोउदो करुन त्या संबंधित विटाळाचा संबंध साथीच्या आजाराशी लावतात. त्या अस्पृश्य शोषत असलेल्या व स्रियांचे हक्कं नाकारणाऱ्या गोष्टी काही लोकं चांगल्या होत्या असे मानतात. म्हणतात की आजपर्यंत जो देश मनुस्मृतीच्या आधारावर चालला. चांगला चालला. ज्यानं राष्ट्र टिकवलं. त्यांचं म्हणणं असं की मनुस्मृती चांगली. मनुस्मृती, विटाळ, भेदभाव स्रियांचे अधिकार नाकारणे. या गोष्टी चांगल्या होत्या की वाईट. हे म्हणणं नाही. प्रत्येकांचं मत याबाबतीत वेगवेगळं असू शकते. कारण सर्वच व्यक्तींना सर्वच गोष्टी चांगल्या वाटतीलच असं नाही. एखाद्याला एखादी गोष्ट जास्त आवडते तर तीच गोष्ट दुसऱ्याला अजिबात आवडत नाही. तेच झालं मनुस्मृती म, विटाळ, भेदभाव व इतर गोष्टींबद्दलबद्दल. आज जेही लोकं त्या सर्व गोष्टीला चांगले म्हणत असतील. त्यांना त्या गोष्टी आवडत असेलच यात शंका नाही. त्याचं कारण म्हणजे त्यांना त्यातील जाचक नियमांची झळ पोहोचलेली नसेल. त्यामुळं त्यांनाच त्यातील नियमांबद्दल काही घेणं देणं नव्हतंच. परंतु ज्यांना त्यातील नियमांची झळ पोहोचली. त्यांना मनुस्मृती, विटाळ, भेदभाव, स्रियांचे अधिकार नाकारणे या गोष्टी तरी कशा आवडतील? समजा एखाद्याला कारल्याची भाजी आवडत नसेल तर तो व्यक्ती कारल्याच्या भाजीला कडूच म्हणेल व ज्या व्यक्तीला कारल्याची भाजी आवडत असेल, तो व्यक्ती आवडीनं कारल्याची भाजी कडू होवूनही खाईलच खाईल. तेच झालं बाबासाहेबांबद्दल. त्यांनी या सर्व गोष्टींचा अभ्यास केला. त्यांना त्यातील नियम अजिबात पटले नाहीत. म्हणूनच त्यांनी मनुस्मृतीचं दहन केलं आणि चवदार तळ्याचा सत्याग्रहही. ही बाब नाकारता येत नाही. तसाच तो खटला न्यायालयात गेला व न्यायालयानंही त्यातील नियम सामान्य लोकांच्या जीवन जगण्यासाठी वाईट आहेत याची पडताळणी करुन वा गृहीत धरुन जी मनुस्मृती जाळण्याची कृती वा इतर कृती चवदार तळ्याच्या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर केल्या होत्या. त्या कृतींना योग्य ठरवत बाबासाहेबांच्या कृतींचं समर्थन केलं. त्यानंतर निकाल दिला की आजपासून अशा सर्वच कृत्यांवर कायमस्वरुपी बंदी लावण्यात येत आहे. त्यातूनच विटाळ, स्रियांचे अधिकार नाकारणे आणि भेदभावावर बंदी घालण्यात आली. विटाळ व भेदभावाची पाश्वभुमी. समाजाला बाबासाहेब जागृत करीत होते. सांगत होते की पिढीजात धंदे सोडा. ते अस्वच्छतेचे धंदे आहेत व त्यापासूनच भेदभाव, विटाळाचे किडे वळवळतात. वाढतात. विटाळ ही कीडच. शेवटी काही लोकांना वाटले, विटाळ नष्ट व्हावा. त्यांनी पिढीजात धंदे सोडले. ज्यातून सामाजिक परीवर्तन झालं व विटाळ मिटला व त्याचा परिणाम हा झाला की तद्नंतर समाजातील काही लोकांनी पिढीजात धंदे सोडले नाहीत. त्यांनाही समाजात सन्मानाचं स्थान मिळायला लागलं. आज विटाळ नाही. विटाळ कायमचा मिटला आहे असंही म्हणता येत नाही. तरीही समाजात काल ज्या घटकाला हीन समजलं जात होतं. त्या घटकाला आज समाजात मानाचं तसंच सन्मानाचं स्थान आहे. काल धंद्यावरुन नीच समजल्या अस्पृश्यांनाही आज उच्च जातीचे लोकं आपल्या बरोबरीनं जगण्याची परवानगी देतात. त्यांना हीन लेखत नाहीत. विटाळाच्या कालचक्रात काल मोठं घर बांधण्याची इच्छा ठेवणाऱ्यांना काल मोठं घर बांधता येत नव्हतं. आज तेही मोठं घर बांधू शकतात. एकमेकांच्या विवाह समारंभात भेदभाव न बाळगता सहभागी होत असतात. काल उच्च शिक्षण शिकता येत नव्हतं. आज उच्च शिक्षण शिकता येतं. काल एका अस्पृश्यानं तपश्चर्या केली म्हणून त्याच्या कानात शिसं ओतलं. आज तशी गोष्ट घडत नाही व तसा अन्याय झाल्यास आज न्यायालयात दाद मागण्याची तरतूद उपलब्ध आहे. कोणीच कोणाला हीन लेखू शकत नाही. अत्याचार करु शकत नाही. कारण आज कायद्याचं राज्य आहे व कायद्याचं उल्लंघन आज तरी करता येणे शक्य नाही. हेही शक्य झालं बाबासाहेबांमुळं. तरीही काही ठिकाणी विटाळ वळवळतोच. भेदभावही वळवळतोच. काही ठिकाणी स्रियांचे अधिकारही नाकारले जातातच. हे सगळं घडत असतं जातीमुळे. काही ठिकाणी आजही विशिष्ट जातीला हीन समजलं जातं. विटाळ मानला जातो. जात सहजासहजी सांगता येत नाही. ती जाणीवपूर्वक जाणूनबुजून लपवून आपली दुसरीच उच्चभ्रू जात सांगीतली जाते. याला काय म्हणता येईल. भेदभाव आणि विटाळच ना. आज बाबासाहेब आंबेडकर देवच आहेत की ज्यांनी समाज सुधरवला. समाजातील विटाळ थोडाफार बदलवला. लोकांना खुल्ल्या मनानं जगात प्रवास करता येत असतं. आपली जात लपवून का असेना, वावरता येत असतं. अन् तरीही यदाकदाचित जातीवर अन्याय झाल्यास न्यायालयात दादही मागता येत असतं. याचाच अर्थ असा की बाबासाहेबांनीच कायद्याचं राज्य आणलं. लोकांना सन्मानानं जगण्याचाही मार्ग उपलब्ध करुन दिला. विटाळ थोडासा का होईना, परंतु कायमचा संपला. हे जरी बरोबर असलं तरी आजही काही ठिकाणी भेदभाव आहेच. विटाळाच्या कालचक्रात आजही माणसं मारलीच जात आहेत. असं का होतं? तर त्याचं एकमेव कारण आहे जात. कारण जातीनंच भेदभाव निर्माण केला अन् जातीनंच विटाळदेखील. ती जात जेव्हा बंद होईल, तेव्हाच विटाळालाही पायबंद बसेल. त्यातल्यात्यात जातीप्रथा देखील नष्ट होईल यात शंका नाही. जर जात नष्ट होत नसेल तर, विटाळ, भेदभाव वा स्रियांचे अधिकार नाकारणे ह्या गोष्टी कधीच संपणार नाहीत. काल जरी मनुस्मृती जाळली असेल, तरी आज ती जाळून काहीच उपयोग नाही. काल चवदार तळ्याचं आंदोलन केलं गेलं व खटला लढल्या गेला असला तरी आज त्याचा काही उपयोग नाही. अन् कालच्या निकालानं विटाळ व भेदभाव थोडासा का होईना, संपला असला तरी आज त्याचा काहीच फायदा नाही. हे म्हणणे संयुक्तिक ठरते. डॉ. बाबासाहेब हे हिंदू होते. आरक्षण हे त्यांनी हिंदू धर्मात राहूनच लोकांना मिळवून दिलं. जेव्हा संविधान जगजाहीर झालं. ते कशासाठी तर हा सर्व उपेक्षित राहिलेला समाज सुधरावा. त्या समाजानंही आरक्षणाचा वापर करुन आपला सर्वप्रकारचा विकास करावा. परंतु तेवढी सोय करुनही जेव्हा त्यांनी पाहिलं की हा अस्पृश्य समाज जागच्या जाग्यावर आहे. त्यांच्यात एवढासाही बदल झालेला नाही. तेव्हा तसाच विचार करुन धर्म बदलवला तर कदाचीत आपला समाज सुधरु शकतो असं बाबासाहेबांना वाटलं व त्यांनी धर्म बदलवला. ते बौद्ध झाले. परंतु ते जरी बौद्ध झाले असले आणि आपल्या समाजालाही बौद्ध बनवलं असलं तरी समाज सुधरला नाही. त्यांनी आरक्षणाचा लाभ घेतला नाही. म्हणूनच आरक्षण वाढवावं लागलं. आज आरक्षण आहे. परंतु समाज सुधरला नाही. समाजातील काही लोकांनीच फक्त आरक्षणाचा लाभ घेतला. काहींनी लाभ घेतलाच नाही. म्हणूनच आरक्षण आजही सुरु आहे व त्यातूनच आज इतरही जातीचे वाद सुरु झाले आहेत. त्यामुळंच विशेष सांगायचं म्हणजे हे सर्व जात आहे, म्हणूनच सुरु आहे. जात जर नसती तर आरक्षण, भेदभाव, विटाळ नसताच, ना कोणावर कोणाचा अत्याचार झाला असता, ना कोणीच कोणाला उच व कोणीच कोणाला नीच समजले नसते. सर्व लोकं समान असते, समानतेनं जगले असते. म्हणूनच जात नष्ट करणे आहे व सर्व लोकांना समाजात समानतेने वागणे शिकवणे आहे यात शंका नाही. अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०