Ti Ek Shaapita - 11 in Marathi Moral Stories by Nagesh S Shewalkar books and stories PDF | ती एक शापिता! - 11

Featured Books
  • स्वयंवधू - 31

    विनाशकारी जन्मदिन भाग 4दाहिने हाथ ज़ंजीर ने वो काली तरल महाश...

  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

  • शोहरत का घमंड - 102

    अपनी मॉम की बाते सुन कर आर्यन को बहुत ही गुस्सा आता है और वो...

Categories
Share

ती एक शापिता! - 11

ती एक शापिता!

(११)

सायंकाळी कार्यालयातून परतलेला सुबोध हातपाय धुऊन आरशासमोर उभा राहून भांग काढत असताना त्याचे लक्ष केसांकडे गेले. बऱ्याच केसांची चांदी झालेली पाहून तो आश्चर्यचकित झाला. चाळिशी उलटली नाही तोच बरेच केस पांढरे झाले होते.

लग्न होईपर्यंत त्याचं विश्व मर्यादित होतं. काही काळजी नव्हती. लग्न झाल्यानंतर सांसारिक अनेक अडचणी मानगुटीवर बसल्या. त्यातल्या त्यात स्वतःचं सामर्थ्य आणि सुहासिनीच्या समाधानासाठी तो तळमळत राहिला. त्याच्या पश्चात, त्याच्या संमतीने फुललेल्या सुहा-निलेशचे संबंधाची नाही म्हटलं तरी त्याला एक प्रकारची चिंताच होती. त्यापूर्वी कार्यालयातला भ्रष्टाचार, ऑडिट प्रकरण अशा विविध घटनांमुळे त्याचे केस पांढरे होत होते...

"बाबा, बाबा...." अशोकचा आनंदी आवाज ऐकून तो भानावर आला. अशोककडे बघत त्याने विचारले,

"काय झाले?"

"मी वर्गात पहिला आलो. आता सहाव्या वर्गात जाणार."

"व्वा! व्वा! छान! अभिनंदन! आणि पीयूष..."

"तो फर्स्टक्लास आलाय. आपली आशटली ना बाबा, चाळीस टक्के गुण घेऊन काठावर पास झाली आहे.. गेली एकदाची चौथीत.."

"पास तर झाली ना? ठीक आहे. बरे. हे शंभर रुपये घे. पेढे आण. पीयूष कुठे आहे?"

"तो घरी गेलाय. त्याच्याआईला सांगायलाः"

"बरे असे कर. जाताना त्यालाही घेऊन जा. दोघे मिळून पेढे आणा. सर्वांना द्या." अशोक गेला. तसा सुबोध स्वयंपाक घराच्या दारात जाऊन चहा ठेवत असलेल्या सुहासिनीला म्हणाला,

"अग, अशोक वर्गात पहिला आलाय."

"अरे वा! खरेच! कुठे आहे?"

"त्याला पेढे आणायला पाठवलंय..." सुबोध सांगत असताना कुणाच्या तरी रडण्याचा आवाज आला आणि सुबोधने मागे पाहिले. दारात आशा दारात स्फुंदत असल्याचे पाहून त्याने विचारले,

"का गं काय झाले?"

"बाबा, दादटलं मला चिडवत गेलं."

"बरे जाऊ दे. पुढील वर्षी तू खूप अभ्यास कर आणि पहिला नंबर मिळव."

"आरशात तोंड बघ म्हणावं तिला. म्हणे पहिला नंबर! त्याची बरोबरी येईल का तुला? तो किती अभ्यास करतो माहिती आहे का? तेवढा अभ्यास करायला तुला वेळ आहे का? सदा त्याच्याशी भांडायचं नाही तर टीव्ही पाहायचा."

"असू दे गं. आत्ता तर चौथ्या इयत्तेत गेलीय. करील अभ्यास. जा. आशाबेटी, पळ. दादा पेढे आणतोय."

"बाबा, मला चार पेढे पाहिजेत."

"चार? ते का?"

"मी चौथ्या वर्गात गेले ना म्हणून..." असे म्हणत ती पळतच गेली तशी सुहासिनी म्हणाली,

"तुम्ही तिला फार लाडावून ठेवलंय बरं. डोक्यावर मिरे..."

"काही मिरे-बिरे वाटणार नाही." सुबोध म्हणाला. सुहासिनी पुन्हा आत गेली आणि तो पलंगावर पडला. वर फिरणाऱ्या पंख्याकडे डोळे लावून बसला. जणू तो फिरणारा पंखा त्याला त्याचा भुतकाळ सांगत होता...

त्यादिवशी निलेशची आलेली तार आणि सुहासिनीच्या बदलीचा आदेश घेऊन तो सुहासिनीकडे निघाला खरा परंतु त्याला एक प्रश्न सतावत होता की, तिची बदली झाली कशी? त्याने तर प्रयत्न करायचे सोडा पण कुणाला साधा शब्द टाकला नव्हता. उलट ती आणि निलेश जोपर्यंत त्या गावी आहेत, उद्या कधी निलेशची बदली झाल्यावर पाहता येईल या विचारात तो होता. कारण तिची बदली न होणे हे त्या तिघांसाठी महत्त्वाचे होते. कदाचित सुहासिनीने बदलीसाठी अर्ज दिला असेल. पण ती तसे का करेल? निलेशकडून भरभरून मिळणारे सुख लाथाडून तिने माझ्याकडे का धाव घ्यावी? निलेशच्या पत्नीला तर त्या दोघांचे संबंध माहिती झाले नसावेत? त्यामुळे तर अधिक भांडणे नको म्हणून त्या दोघांनी तिच्या बदलीसाठी प्रयत्न केले नसावेत? त्याच्या माहितीनुसार सुहासिनीला सातवा महिना होता. पूर्ण दिवस भरण्यापूर्वीच बाळंतपण?

बसस्थानकावर उतरलेला सुबोध सरळ दवाखान्यात पोहोचला. दवाखान्याच्या दारात निलेश उभा होता. त्याला पाहताच तो पुढे येत म्हणाला,

"हे रे काय? गेल्यापासून आता तोंड दाखवतोस?"

"ते जाऊ देत. सुहा कशी आहे? बाळ कसं आहे?"

"ते सर्व ठीक आहे रे. पण आत्ताच ही तार आलीय.." असे म्हणत निलेशने एक कागद त्याच्या हातात दिला. तार सुबोधच्या साडूची होती. त्याची सासू अचानक वारली होती. तार वाचून त्याने निलेशला विचारले,

"सुहाला सांगितले?"

"नाही रे. हिंमत नाही झाली."

"बरे. चल आत."

"नको. मी नंतर येतो. अशोक आहे माझ्याकडे." असे म्हणत निलेशने दुरून सुहाची खोली दाखवली आणि तो निघाला. सुबोधने खोलीत प्रवेश केला. त्याला पाहताच सुहासिनीने लटक्या रागाने चेहरा वळवला. सुबोधच्या त्या पत्रानंतर दोघे प्रथमच समोरासमोर होते. तिचा तो रुसवा पाहून सुबोधने विचारले,

"कशी आहेस, सुहा? बाळ कसे आहे?"

"फार लवकर आठवण झाली म्हणायची."

"तसं नाही गं. पण.."

"कशाचा पण?"

"तसा पण नाही गं. पण म्हटलं लग्नानंतर प्रथमच तू जे सुख मिळवत आहेस ते मनसोक्त लुटू द्यावे. उगाच मी आलो असतो तर तुझ्या सुखात..."

"सुख! सुख!! तुझे सुख!!! कान विटले माझे तेच तेच ऐकून. कुणी आपल्या..."

"बरे बाबा, सॉरी! कशी आहेस? अशोक कसा आहे?"

"सारे चांगले आहे. आम्ही सारे सुखात आहोत." तिच्या त्या वाक्याने आणि 'सुखात आहोत' या शब्दांनी त्याचे कान तृप्त झाले. त्याची योजना कमालीची यशस्वी झाली होती तर! ज्या सुखासाठी सुहासिनी वर्षानुवर्षे झुरत होती, जे सुख तिला त्याच्या पश्चात निलेशकडून चोरून घ्यावे लागत ते सुख तिने तीन महिने भरभरून घेतल्याचे तिच्या आवाजावरून स्पष्ट जाणवत होते...

सुबोधने नंतर स्वतःच्या संसाराची सारी सुत्रे पुन्हा स्वतःकडे घेतली. दवाखान्यात दहा दिवस झाल्यानंतर सारे त्याच्या नोकरीच्या गावी आले. त्यांना निरोप देण्यासाठी दवाखान्यात निलेश, लक्ष्मी, त्याची मुले आणि एक दोन परिचितही आले होते. जीपमध्ये बसताना सुबोधने भरलेल्या डोळ्यांनी निलेशचा हात हातात घेतला. त्या कृतीत अनेक भावनांचे मिश्रण होते. जीपच्या पाठोपाठ सामानाचा टेंपोही धावत सुटला...

योग्य वेळी सुहासिनी नोकरीवर हजर झाली. बाळंतपणानंतर नवीन गावी थाटलेल्या संसारात ती बरीच बदलली होती. पूर्वीप्रमाणे ती अबोल राहिली नव्हती तर लग्नापूर्वीच्या प्रेयसीप्रमाणे शब्दाशब्दांवर हसत होती. चिडत नव्हती तर सुबोधला चिडवत होती. ते पाहून सुबोधला वाटले,

'व्वा! दोन-अडीच महिने सुहाला निलेशकडून ते सुख भरभरून मिळालेले दिसतेय. सुहा एकदम बदललीय. खरेच किती चांगला निर्णय घेतला मी. शारीरिक सुख मानवाला कसे चैतन्यमय करते याचा जिवंत पुरावा म्हणजे आजची सुहा..."

त्या गावी आल्यानंतर अनेक महिन्यांनी ती रात्रही आली. त्या रात्री सुबोध सुहासिनीजवळ गेला. बाळंतपणानंतर अंगोपांगी भरलेल्या सुहासिनीला त्याने मिठीत घेतले. त्या स्पर्शाने तीही पेटली... परंतु दोनच क्षण! पुन्हा तेच! ये रे माझ्या मागल्या.. अशीच अवस्था! तो अपमानित झाल्याप्रमाणे तिच्याशेजारी पडला. त्याचवेळी सुहासिनीने त्याला पुन्हा मिठीत घेतले. त्याचे एक हलके चुंबन घेतले. तो प्रकार वासनामयी, अतृप्तीचा नव्हता, त्याला चेतवणारा नव्हता तर ते चुंबन ममतामयी, तृप्ती, समाधानाचे प्रतीक होते. लग्नानंतर तो तशा चुंबनाचा अनुभव प्रथमच घेत होता. नेहमीप्रमाणे सुहासिनी तळमळत नव्हती, धगधगत नव्हती, असमाधानाचे सुस्कारे टाकत नव्हती तर तिच्या चेहऱ्यावर, डोळ्यात एक प्रकारचे समाधान होते...

"बाबा... बाबा.. दादा आला नाही का? मला चार पेढे खायचे आहेत."

"येईल ग आता. बाजार दूर आहे." असे म्हणत सुबोधने नुकतेच आलेले सायं दैनिक हातात घेतले. एका बातमीवर लक्ष जाताच तो ओरडला,

"अग...अग... ऐकलंस का? लवकर ये."

"काय झाले?" सुहासिनीने बाहेर येत विचारले.

"अग, परवा झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत पीयूष जिल्ह्यात पहिला आला आहे."

"व्वा ! किती छान बातमी आहे. आशा, जा लवकर. काकूंना बोलाव." असे सांगून सुहासिनी आत गेली. पीयूष अशोकचा वर्गमित्र! त्याच्या आईसोबत तो त्याच गल्लीत राहायचा. तो तिसरीला शिकत असताना त्याचे वडील मरण पावले होते. त्यांची पेंशन आणि इतर काही कामे करून पीयूषची आई संसाराचा गाडा एकाकीपणे हाकत होती. तिच्याकडे पाहिले की, सुहासिनीला वाटायचे, 'मी हिच्यापेक्षा खूप सुखी आहे. मला अर्धवट का होईना ते सुख मिळते परंतु हिला ते सुख कणभरही मिळत नाही. कशी काढत असेल ही रात्रं? काढायला रात्रं तरी एक आहे का?'

"बाबा, पेढे आणले..." असे म्हणत अशोक, पीयूष आणि त्यांच्या पाठोपाठ पीयूषची आई.. सुधाताई आत आले.

"ये. ये. पीयूष बेटा. अरे, तुझे अभिनंदन!बघ तर तुझे नाव आलंय पेपरमध्ये." सुबोध म्हणाला.

"पेपरात नाव? भाऊ, सगळं ठीक आहे ना?" सुधाने काळजीने विचारले.

"ताई, आनंदाची बातमी आहे. आपला पीयूष परवा झालेल्या भाषणाच्या स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम आलाय. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. हा मोठा झाल्यावर नक्कीच लेखक, पत्रकार, फार वक्ता नक्कीच होईल." सुबोध आनंदाने म्हणाला.

"भाऊ, तुमच्या तोंडात साखर पडो. पण लेकरू एका पंखानं..."

"असू द्या हो वहिनी. नशिबाचा भोग का कुणाला चुकला आहे? अशा आनंदाच्या प्रसंगी असं वाईट वाटून घेऊ नका." बाहेर आलेली सुहासिनी म्हणाली...

त्या गावात येऊन सात-आठ वर्षे झाली होती परंतु सुबोध किंवा सुहासिनी या दोघांनीही निलेशचे नाव कधीच काढले नाही. निलेशकडून तुला हवं ते सुख मिळालं का नाही असे शब्द त्याच्या ओठावर यायचे परंतु त्याने ते शब्द महत्प्रयासाने टाळले. त्यासंदर्भात सुहासिनी स्वतः होऊन काही सांगेल या आशेवर तो राहिला आणि सुबोध स्वतः त्या विषयावर बोलेल या प्रतिक्षेत सुहासिनी होती. मुलांचा विचार करून त्या निर्णयाबद्दल त्याने पुन्हा मनात काही आणले नाही. सुहासिनी मिळणारे सुखच पूर्ण सुख आहे असे मानून समाधानात राहिली. आश्चर्य म्हणजे ती त्यात कमालीची यशस्वी होत गेली. परंतु नैसर्गिक भावना का कुणाला अशा दाबता येतात. कधीतरी रात्री तिला अचानक जाग यायची त्यावेळी ती बेचैन व्हायची, अस्वस्थ व्हायची. 'धरण उशाला, कोरड घशाला' अशी तिची अवस्था होत असे.

एखादे स्वप्न विसरावे त्याप्रमाणे त्यांनी ते गाव, निलेश प्रकरण, ऑडिटचा गोंधळ विसरला. संसाराचा गाडा ते हाकू लागले परंतु त्यात जोम, उत्साह, चैतन्य नव्हते. एक कर्तव्य, एक सोपस्कार म्हणून दोघे एकत्र येत. सुहासिनीला समाधान मिळतेय, ती सुखी असल्याचे पाहून सुबोधही स्वतःचे पंगुत्व विसरला. अशोक मुळातच हुशार होता, त्याला शाळाही चांगली मिळाली असल्यामुळे त्याच्या बुद्धीचा, कौशल्याचा सर्वांगीण विकास होत होता. दरवर्षी तो वर्गात प्रथम येत असे.

पीयूष! अशोकप्रमाणे कुशाग्र नसला तरी तो चतुरस्त्र होता. अभ्यासासोबत खेळात आणि विविध स्पर्धांतून इतर मुलांना त्याने मागे टाकले होते. निबंध स्पर्धा, लेखन स्पर्धेत तो प्राविण्य मिळवत होता. त्यामानाने आशा मात्र जेमतेम काठावर उत्तीर्ण होणारी! अभ्यासात जशी तिची प्रगती निराशाजनक असे तशीच ती घरकामातही लक्ष द्यायची नाही. लोळणे, टीव्ही पाहणे, आरशासमोर बसून नटणे आणि अशोकसोबत भांडणे यातच तिचा वेळ जात असे. अशोकपेक्षा ती पीयूषच्या सोबत अधिक असायची. गल्लीत तिला मैत्रिणीपेक्षा मित्रच जास्त होते..

एका पाठोपाठ एक दिवस, महिने व वर्षेही जात राहिली. काळ कुणासाठी थांबतो काय? अशोकच्या प्रगतीमुळे सुबोध-सुहासिनीचे दिवसही जात होते. त्याला पाहताच दोघांचाही उर अभिमानाने भरुन यायचा मात्र आशाकडे पाहताच दोघांचेही चेहरे काळवंडून जात असत. दिवसेंदिवस तिचं नटणं मुरडणं आणि मुलांसोबत खेळणं, मुलींपेक्षा मुलांसोबत गप्पा मारण्याचे खुळ वाढतच होतं. अनेकदा सुहासिनीने तिला समजावलं परंतु तिच्या गळी ते उतरत नव्हतं.

सुबोध-सुहासिनी दिवसेंदिवस प्रौढत्वाकडे वाटचाल करीत होते. त्यांचा एक-एक अवयव वृद्धत्वाला कवटाळत होता तरीही त्यांच्या त्या सुखात भर पडली नाही, उलट मिळणारं सुख प्रथम आठवडी झालं, नंतर पाक्षिक झालं आणि नंतर त्या सुखासाठी ते महिन्यातून एखादे वेळी एकत्र यायचे. बदललेली सुहासिनी मिळेल त्या, मिळेल तितक्या सुखात समाधानी होई. जे सुख तिच्यासाठी तारुण्यात मृगजळ ठरलं होतं तेच सुख का वयाच्या माध्यान्ही तळपणार होतं? मनाने जरी समाधान मानले तरी काय झाले? शरीर का स्वस्थ बसणार आहे? इंद्रिये, रसग्रंथी का शुष्क राहणार आहेत? ऋतुचक्रातील काही रात्री स्त्रीला ते सुख हवेच असते. त्या तशा रात्री सुहासिनीची तडफड होत असे. ती तळमळत असे. शेजारी घोरणाऱ्या सुबोधला पाहून ती चिडायची.

अधूनमधून त्यांच्या बदलीची चर्चा होत असे पण त्याचवेळी सुबोध वरिष्ठांचे हात दाबायचा.

त्यांचे त्यांनाच खाऊ घालायचा. बदली प्रकरण दाबून टाकायचा. एकंदरीत काहीसं अर्धवट सुख, बरचसं दुःख सहन करीत त्यांचा संसाराचा गाडा चालत होता. परंतु त्यात जोश, वेग नव्हता तरीही ते जगासोबत, वेळेसोबत धापा टाकत का होईना पण धावतच होते. त्यातच महिन्यांपाठोपाठ वर्षेही गेली. प्रत्येक सरत्या वर्षात अशोक एक-एक पायरी यशस्वीपणे चढत होता. सोबत जसा पीयूष होता तशीच अल्लड आशाही होती...

*****