Ti Ek Shaapita - 1 in Marathi Moral Stories by Nagesh S Shewalkar books and stories PDF | ती एक शापिता! - 1

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

ती एक शापिता! - 1

ती एक शापिता!

(१)

सुबोधराव दिवाणखान्यात वर्तमानपत्र वाचत बसले होते. सकाळपासून किती वेळ त्याचे वाचन केले असेल हे त्यांनाही माहिती नसेल. एक चाळा, वेळ जाण्याचे साधन म्हणून वर्तमानपत्र हातात घेणे, एक नजर त्यावर टाकणे आणि लगेच बाजूला ठेवणे असे त्यांचे सातत्याने चालू असे. तितक्यात त्यांचे लक्ष शेजारच्या टेबलवर ठेवलेल्या एका कागदाकडे गेले. कदाचित सुबोधरावांचे लक्ष स्वतःकडे वळविण्यासाठी त्या कागदाने फडफड जोरात सुरू केली असावी. त्यांनी तो कागद उचलला. घडी उकलत असताना त्यांचे लक्ष आतील अक्षरावर गेले आणि ते पुटपुटले,

'आँ! माधवीचे अक्षर दिसतंय. तिने चिठ्ठी का लिहिली असावी?' घडी पूर्ण उकलून होताच त्यांनी मजकूरसुरुवात केली...

श्री. सुबोधराव...

पत्रातील तसा मायना पाहून सुबोध दचकले. पुन्हा त्यांनी एक धावती नजर पत्रावर टाकली. अक्षर तर नक्कीच त्यांच्या सुनेचं.. माधवीचं होतं मग मायना तसा का? त्यांनी पत्र पुढे वाचायला सुरुवात केली...

'दचकू नका. तुम्हाला आयुष्यातील पहिलं आणि कदाचित शेवटचं पत्रं लिहायला घेतलं आणि मायना लिहिताना हात क्षणभर थरथरले. तुम्हाला काय लिहू आणि कसं लिहू असं झालं. प्रत्यक्ष नावाने लिहिले आहे म्हणून गोंधळले असाल परंतु त्याला इलाज नाही कारण ज्या एका टिकलीमुळे आपलं नातं निर्माण झालं होतं त्या टिकलीचा धनी, तुमचा मुलगा आपल्यापासून दुरावला, काळाने त्याला आपल्यापासून दूर नेलं, हिरावलं. अर्थात टिकलीचा धनी.. अशोक असतानाही एक धर्म म्हणून आपण सारे एका छताखाली राहत होतो. ज्या.. ज्या.. सुखासाठी लग्नसंस्था अस्तित्वात आहेत ते सुख मला अशोककडून कधीच मिळालं नाही. हे तुम्हालाही माहिती आहे. अशोक गेला आणि केवळ त्याच्यामुळे जी नाती निर्माण झाली होती ती नाती तोडण्याचा, त्या सामाजिक बंधनातून मुक्त होण्याचा मी निश्चय घेतला. असे करायलाही अशोकच कारणीभूत आहे. कारण त्याची शेवटची इच्छा होती की, मी.. त्याच्या पत्नीने त्याच्या मित्राशी.. पियूषशी लग्न करावे. पीयूष हा तुमच्यासाठी अनोळखी नाही. तोही माझ्यासारखाच! दोन समदुःखी एकत्र येत आहोत. अशोक जिवंत असताना त्याच्याच इच्छेने आणि साक्षीने पीयूषचे आणि माझे संबंध प्रस्थापित झाले. जे सुख मला अशोककडून कधीच मिळाले नाही तेच सुख मला त्याच्याच पुढाकारातून घ्यावे लागले. यापेक्षा अधिक शोकांतिका ती काय असू शकेल? अनेक स्त्रिया पतीचं आयुष्य वाढावं म्हणून नवससायास करतात, मी मात्र अशोकला मरण यावं, माझं सौभाग्य पुसलं जावं म्हणून सकाळ - संध्याकाळ देवाला प्रार्थना करीत असे. चिरकाल सौभाग्य टिकावं म्हणून मी वडाला कधीच प्रदक्षिणा घातल्या नाहीत. माझ्यासारखी स्त्री विरळाच परंतु मला तसं का वागावं लागलं हेही तुम्हाला चांगलेच ठाऊक आहे.

नाही तरी तुमच्या घराण्याला शापच आहे की, घराण्यातील स्त्री पतीच्या मित्राच्या मिठीत जाते, कुणी नवऱ्याशी विश्वासघात करून तर कुणी नवऱ्याच्या साक्षीने तसलं कृत्य करते. तुमच्या घराण्यातील मुलीही त्याच वळणाच्या! जिथे माझ्या नणंदेने.. तुमच्या मुलीने आंतरजातीय विवाह केला तिथे मी वेगळं असे करीत नाही. तुमच्या घराण्यासाठी शाप ठरत असला तरी माझ्यासाठी तो वरदान ठरतोय. तसे पाहिले तर मी कुणाचाही विश्वासघात करीत नाही उलट अशोकला जे समाधान, जे सुख जिवंत असताना मिळालं नाही तेच मी त्याला मरणोत्तर बहाल करतेय. कारण पत्नीचे जे सुख, समाधान असते तेच सुख, समाधान पतीचेही असते.

माझ्या वागण्याने तुम्हाला, सुहासिनीबाईंना त्रास होईल, मनस्ताप होईल याची मला जाणीव आहे परंतु त्या घरात राहून पीयूषशी संबंध ठेवणे मला आवडणार नाही. अशोक होती तेव्हाची गोष्ट वेगळी होती, तेव्हा त्यालाच ते संबंध हवे होते. परंतु त्याच्या पश्चात त्याच्याच पलंगावर त्याच्या मित्राशी ठेवलेले संबंध तुम्हाला कितपत मान्य होतील? तुमच्या अनुपस्थितीत... जाऊ द्या. झालं ते झालं, चांगलंच झालं असे मी म्हणेन. माफी मागण्यासारखा गुन्हा मी केलाच नाही. पतीला दिलेला शब्द मी पाळतेय म्हणजे एक प्रकारचे कर्तव्यच करते आहे. होय ना?...'

तुमची नसलेली सून,

माधवी.

थरथरत्या हाताने पत्राची घडी करून सुबोधने ते पत्र पुन्हा टेबलवर ठेवलं आणि त्या टेबलाच्या वरच्या बाजूला असलेल्या अशोकच्या फोटोकडे त्यांचं लक्ष गेले. त्याचवेळी त्या फोटोवर असलेलं गुलाबाचं फुल खाली पडलं. सकाळीच ते टवटवीत गुलाबाचं फुल सुबोधरावांनी थरथरत्या हाताने, भरल्या डोळ्यांनी अशोकच्या फोटोला अर्पण केले होते. त्याचदिवशी अशोकच्या मृत्यूला बरोबर एक महिना झाला होता. फोटोकडे पाहत सुबोध पुटपुटले,

'हे काय झालं रे? तुला जाऊन महिनाही झाला नाही तोच तुझ्या पत्नीने दुसरा घरोबा केला. अशोक, तिने म्हणे तुझी इच्छा पूर्ण केली आहे म्हणून तर तू फुल खाली टाकून संमती दर्शवली नाही ना? तिच्या निर्णयाला पाठिंबा तर दिला नाहीस ना? ठीक आहे, बाळा. अशोक, उतरत्या वयात तू सोडून गेलास आणि.. आणि.. त्याचवेळी घराण्याला कलंक लावणाऱ्या या घटनेला तुच प्रोत्साहन दिलेस. तू तरी वेगळे काय केलेस? तू माझाच मुलगा ना? परंतु आपल्यासारख्या उच्च विचारसरणीच्या लोकांना या जगात...'

"अहो, ऐकलंत का? अजून माधवी आली नाही..." असे म्हणत सुहासिनी दिवाणखान्यात शिरली. सुबोधला अशोकच्या फोटोपुढे उभं राहिलेलं पाहून तिचेही डोळे पाणावले. ती म्हणाली,

"अहो, सायंकाळ होत आलीय, माधवी अजून आली नाही हो. तिला एवढा उशीर होत नाही हो."

"सुहासिनी, माधवी आता येणार नाही."

"अहो, पण का? ती..."

"नाही. सुहासिनी, नाही. ती आपल्या घरातून निघून गेलीय कायमची. तिने पीयूषसोबत लग्न केलंय."

"का..य? लग्न आणि माधवीने? अहो, अशोकला जाऊन आज महिनाच झालाय आणि... "

"अशोकला दिलेल्या वचनाची तिने पूर्तता केलीय..."

"अहो, पण..."

"हे घे. वाच." असे म्हणत सुबोधने थरथरत्या हाताने ते पत्र तिच्या हातात दिले.

पत्र वाचून सुहासिनी धपकन् सोफ्यावर बसत म्हणाली, "आता काय करायचं हो? उद्या आपल्याला कुणी तोंड बाहेर काढू देणार नाही."

"काढायचा प्रश्नच येतो कुठे? चेहरा आधीच एवढा काळवंडलाय की, आता हा डाग दिसणारही नाही. समाजात दाखवायला तोंडच कुठे आहे, सुहा?"

"काय म्हणताहात तुम्ही?"

"एक का आहे सांगायला? आणि तुला काय ठाऊक नाही?"

"पण मी म्हणते हिला एवढी घाई का व्हावी? अशोकच्या चितेची राख तर थंड होऊ द्यायची. लग्नच करायचं होतं तर चार-सहा महिने थांबायचं... नवीन शहरात जाऊन.."

"नाही, सुहासिनी नाही. ही शरीराची भूक आहे. त्या भुकेचं शमन करणं..."

"अहो, पण त्याला काही मर्यादा?"

"कशाच्या मर्यादा आणि काय? अशोकने स्वतःच तिला साऱ्या बंधनातून मुक्त केलं होतं तिथं आपल्या वृद्धांच्या मर्यादा तिला किती अडवणार?..." सुबोध बोलत असताना काही तरी जळत असल्याचा वास आला.

"पोळी करपली वाटते..." असे म्हणत सुहासिनी आत गेली...

'अशोक, खरेच का रे पोळी करपली?...' असे विचारत सुबोध टेबलाजवळील खुर्चीवर टेकले तरी त्यांचे लक्ष अशोकच्या फोटोकडेच होतं. मनात विचारांनी गर्दी केली होती आणि एक मुक्तचिंतन सुरू झाले....

'लग्नसंस्था अस्तित्वात आहेत म्हणून आज सारे व्यवस्थित आहे असं आपण मानतो. मग माधवी-पीयूषच्या लग्नाला त्या संस्था, हा समाज मान्यता देईल का? शरीरसुख हे प्रत्येकासाठी आवश्यक आहे. वैवाहिक जीवनाच्या चौकटीत राहून हक्काचे शरीरसुख मिळविताना प्राप्त होणारा मोद काही वेगळाच असतो. शरीरसुखाच्या आहारी न जाता मिळालेलं सुख काही वेगळंच असतं. संभोगातून मिळणारे सुख हा प्रत्येकाचा हक्क असला तरी ते मिळविताना काही कर्तव्ये पार पाडावी लागतात ही जाण असणे गरजेचे आहे. वैवाहिक जीवन जगताना अनेक कर्तव्यं स्त्रीच्या अंगावर पडतात त्यापैकीच एक म्हणजे वैधव्य! वैवाहिक जीवनात, लग्नसंस्थेत तशीच एक सोय आहे, ती आजकाल निर्माण झाली नसली तरी तिला आज तडे जाऊ पाहताहेत. तरुण जर अकाली एकाकी झाला तर त्याला लग्न करण्याची आणि पुढे जाऊन आयुष्याच्या उत्तरार्धात कोवळ्या तरुणीशी विवाह करून तिचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याची सोय आहे, तशी त्याला परवानगी आहे. परंतु अकाली वैधव्य पत्करणाऱ्या स्त्रियांच्या बाबतीत तशी सोय नाही. त्यांना आजन्म वैधव्याचा कारावास भोगावा लागतो. ही पूर्वापार चालत आलेली पद्धत आहे आणि काही प्रमाणात वादातीत आहे कारण 'पूर्वजांच्या रीती पुढे चालू..' राहाव्यात अशी एक शपथ प्रत्येकालाच घ्यावी लागते. प्रश्न असा निर्माण होतो की, त्या स्त्रीने आजन्म तसं शापमय जीवन जगणं कितपत योग्य आहे?

ज्या पुरूषांना 'त्या' चार रात्रींचा दुरावा सहन होत नाही ते दुसरीकडे जातात. भावनांना वाट मोकळी करून देतात. त्याच समाजात स्त्रियांचा आजन्म होणारा कोंडमारा तिने सहन करणे कितपत योग्य ठरेल? पत्नीच्या मृत्यूनंतर चार-सहा महिन्यात पुनर्विवाह करणारे लोक पतीच्या निधनानंतर एकाकी पडलेल्या स्त्रियांच्या मागे उभं राहून त्यांचे जीवन पुन्हा फुलविण्यासाठी का पुढाकार घेत नाहीत? लग्नसंस्थेला समांतर विवाहसंस्था का उभी करीत नाहीत? शरीरसुखाची आत्यंतिक गरज असणारे पुरुष स्त्रियांचे पुनः संसार का फुलवित नाहीत? उलट अशा अकाली विधवा झालेल्या स्त्रियांना अंकित करण्यासाठी या समाजाचे हात शिवशिवतात. अशा स्त्रियांशी संबंध जोडण्यासाठी तिला प्रवृत्त करतात आणि नंतर बदनामीच्या भोवऱ्यात तिला गरगरत सोडतात. त्यापेक्षा तशा विधवांना सन्मानाने घरात घेऊन तिचं वैधव्याचं कुंकू पुसून तिच्या ललाटी सन्मानाचा टिळा, सधवेचं कुंकू का लावत नाहीत? अशा विधवांवर लैंगिक अत्याचार करणारे तिचेच जवळचे असतात. दीर, सासरे, इतर नातेवाईक पडद्याआड तिचे लैंगिक शोषण करून तिला बदनाम करतात. समाजमान्य नातं तिच्याशी का जोडत नाहीत? ज्याप्रमाणे सर्वांना... विशेषतः पुरुषांना त्या प्रेमाची, त्या सुखाची गरज असते, तशीच गरज त्या विधवेलाही असते हे का कुणी मानत नाही? तिच्यावर अत्याचार करण्यापेक्षा तिला हक्काचे सुख का देत नाहीत?

लैंगिकदृष्ट्या अपंग असलेल्या तरुणाला जेव्हा लग्नापूर्वीच समजते की, स्त्रीला आवश्यक असलेले सुख तो देऊ शकत नाही. तेव्हा तो लग्न का करतो? त्याचे कुटुंबही त्याच्यावर लग्नासाठी सक्ती का करते? तशा लग्नानंतर त्याचे वैवाहिक जीवन अधांतरी तर असतेच परंतु नुकतेच उमलू लागलेलं फुल... त्या तरुणीचे आयुष्य का बर्बाद करावे? पहिल्या रात्रीच जेव्हा पती-पत्नीला त्याचा अधूपणा समजतो तेव्हापासून त्या सधवेच्या कपाळी वैधव्याचा शाप येतो. दोघांमध्ये एक संघर्ष उभा राहतो. पत्नी तिच्या हक्काच्या सुखासाठी तळमळते. तिला समजून घेण्याऐवजी स्वतःचे पंगुत्व लपविण्यासाठी तो तिला छळायला सुरू करतो. शिव्या, मार, डागणं अशा छळांनंतर तिचा लैंगिक छळ सुरू होतो. स्वतःची अतृप्त, अपूर्ण वासना पूर्ण करण्यासाठी तो विकृत बनतो, तिच्या पाठीचे धिरडे करतो. तिची भूक उफाळून वर येऊ नये म्हणून तो तिच्यावर वेगवेगळे अत्याचार करतो. शारीरिक भुकेपेक्षा शुद्ध, सात्त्विक प्रेम न मिळालेली ती पत्नी जागेवरच तळमळते, सारे अत्याचार सहन करते. तशातच तिच्या जखमांवर हळूवार फुंकर घालणारा कुणी भेटला तर त्याचं वय, त्याच्याशी असलेले नाते विचारात न घेता ती त्याच्या बाहूत जाते. तिला हवे असलेले सुख, तिला तृप्ती देणारे ते संबंध जसे समाजाच्या लक्षात येतात तसे तिच्या नवऱ्याच्याही लक्षात येतात. मग त्या संबंधाचा शेवट नवरा किंवा प्रियकर दोघांपैकी कुणा एकाच्या अंतामध्ये होतो...

जे पुरुष लैंगिकदृष्ट्या कुचकामी आहेत त्यांनी खरं तर कोणत्याही परिस्थितीत लग्न करु नये, परंतु काही अपवादात्मक परिस्थितीत लग्न केले किंवा लग्नानंतर काही कारणांमुळे पंगुत्व आलेल्या तरुणांनी स्वतःचा दोष लपविण्यासाठी पत्नीवर अत्याचार करणे योग्य आहे का? तशा परिस्थितीत शारीरिक प्रेमापेक्षाही त्या स्त्रीला पुरुषाचे प्रेमाचे चार शब्दही अमृतकणासम भासतात. त्यामुळे तिची संसारवेल बहरते. तिच्यात एक चैतन्य निर्माण होते. शेवटी तिलाही भूक असतेच. त्यावेळी तिच्या त्या नैसर्गिक भुकेकडे पूर्वग्रहदूषित दृष्टीने न पाहता एक विशाल दृष्टिकोन, उदार अंतःकरणाने पाहावे. तिच्या भुकेचं शमन तिच्यावर लैंगिक अत्याचार करून होणारे नसते तर तिच्या कोंडलेल्या भावनांना वाट मिळणे अत्यावश्यक असते परंतु कालांतराने ती स्त्री पापाच्या मार्गाने लपूनछपून जाण्यापेक्षा तिच्या पतीनेच तिला त्या पथावर राजरोसपणे का सोडू नये? तिच्या भुकेचे शमन तो स्वतः करण्यासाठी असमर्थ असताना इतर मार्गाने का करु नये?

असे अधू पती... अनेक पती पुढे आले त्यांच्या तळमळणाऱ्या पत्नीला कुणा विश्वासाच्या मित्राच्या, भावाच्या, परिचिताच्या मिठीत सोडून स्वतः तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील तेव्हाच खरी स्त्रीमुक्ती घडेल...' असे एक ना अनेक विचारांच्या भोवऱ्यात सुबोध कितीतरी वेळ गरगरत होता....

******