Ti Ek Shaapita - 5 in Marathi Moral Stories by Nagesh S Shewalkar books and stories PDF | ती एक शापिता! - 5

Featured Books
  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

Categories
Share

ती एक शापिता! - 5

ती एक शापिता!

(५)

नेहमीप्रमाणे निलेशने सुबोधच्या वाड्यात प्रवेश केला. वाड्याशेजारच्या ओट्यावर बसलेल्या काही टारगटांनी एकमेकांना खाणाखुणा केल्या. एक-दोन शब्दही उच्चार. तिकडे दुर्लक्ष करीत निलेश सुबोधच्या खोलीत शिरला. सुबोधच्या त्या आजारापासून निलेशचे जाणे-येणे जास्तच वाढले होते. सुबोध त्या दिवशीनंतर आठ-दहा दिवस झोपूनच होता. ते गोळी प्रकरण निलेशलाही समजलं. त्यामुळे शारीरिक आणि मानसिकदृष्टीने अशक्त झालेल्या सुबोधला निलेशने बरेच सांभाळले. त्याच्या आजारापूर्वी कामानिमित्ताने येणारा निलेश दररोज येऊन त्याची चौकशी करून त्याला धीर देत होता. सुबोधलाही निलेश आला की, खूप बरे वाटायचे. तिघेही एकाच कार्यालयात असल्यामुळे निलेश आणि सुहासिनीमध्ये संकोच नव्हता, वागण्यात मोकळेपणा आणि सहजता होती. डॉक्टरांकडून ते गोळी प्रकरण शेजारी आणि गल्लीतही समजले होते. त्यामुळे सुबोध आणि सुहासिनीकडे बघण्याचा सर्वांचा दृष्टिकोन बदलला. प्रत्येक जण एका वेगळ्याच चष्म्यातून त्या जोडप्याकडे पाहू लागला. कुणाच्या नजरेत दया, कणव आणि अनेकांच्या विशेषतः तरुणांच्या नजरेत सुहासिनीसाठी वासना उसळ्या घेऊ लागल्या. तिच्या कार्यालयाच्या जाण्या- येण्याच्या वेळी काही मुले रस्त्यावर थांबू लागली. सुबोध तिच्या आधीच कार्यालयात वेळेवर पोहोचायचा तर सुहासिनी उशिरा जात असे...

त्यादिवशी निलेश त्यांच्या घरी पोहोचला त्यावेळी सुबोध बाहेर गेला होता. सुहासिनी कामात होती. निलेश आल्याचे बघून ती निलेशसोबत गप्पा मारत बसली. तिने निलेशसाठी चहा केला. चहा घेऊन घड्याळाकडे बघत निलेश म्हणाला,

"बाप रे! मला येऊन एक तास झाला. येतो मी."

असे म्हणत सुहासिनीचा निरोप घेऊन तो वाड्याबाहेर पडला. तीच चांडाळचौकडी ओट्यावर बसून होती. निलेशला पाहताच कुणीतरी म्हणाले,

"मित्र असावा तर असा. संकटसमयी जो मदतीला धावतो तोच खरा मित्र."

"कुणाचे कुंकू कुणाच्या मिठीत.." दुसरा म्हणाला.

"असे सौंदर्य विनासायास मिळणे म्हणजे भाग्यच की."

"कुणाचे भाग्य रे? पतीचे की मित्राचे?" एकाने विचारले. ते ऐकून पुढे जाणारी निलेशची पावलं मागे वळलेली पाहून त्यांची पाचावर धारण बसली. त्यांच्याजवळ जाऊन निलेशने विचारले,

"कुणाचे रे भाग्य?"

"आ.. आ.. आम्ही आमचे .. आमचे बोलत होतो."

"मग तेच आता बोलून दाखवा. आता का दातखिळी बसली..." असे म्हणत निलेशने एकाच्या शर्टला धरून त्याला खाली ओढलेले पाहून इतर मुले पळून गेली. बाहेर चालत असलेला गोंधळ ऐकून सुहासिनी बाहेर आली. तिने निलेशला विचारले,

"काय झाले?"

"काही नाही. यांना जरा 'भाग्य' समजावून सांगत होतो आणि दुसऱ्याच्या भाग्यावर बोलले की, यांच्या भाग्यात काय वाढून ठेवलंय ते सांगत होतो..." निलेश सांगत असताना ते पोरगं हिसका देत पळून गेलं. निलेशनेही तिथून काढता पाय घेतला. निलेशचे ते रुप का कोण जाणे पण सुहासिनीला भावले होते. कार्यालयातही निलेश असाच धाडसी होता. कुणाशी ना कुणाशी भांडण होत नसे पण वाद मात्र नेहमी घालत असे. त्याची तो आक्रमकता सुहासिनीला आवडत असे. परंतु निलेश पूर्णपणे तिच्या ह्रदयात शिरण्यापूर्वी सुबोधने तिचे लक्ष वेधून घेतले आणि नंतर निलेश विवाहित असल्याचेही समजले. सुहासिनीकडे बघताना, तिच्याशी बोलताना इतरांप्रमाणे आणि निलेशप्रमाणे सुबोधच्या डोळ्यात वासना नसायची. ते शांत, स्वच्छ डोळे आणि त्याचा लाजाळूपणा तिला आवडल्यामुळे तिच्या मनपटलावर सुबोध कधी विराजमान झाला हे तिलाही कळले नाही...

जुन्या खोलीत राहत असतानाच प्रसंग सुहासिनीला आठवला... नळावर पाणी भरत असताना त्या तरुणांच्या शेरेबाजींवर चिडण्याऐवजी, त्यांना चांगला इंगा दाखवायचे सोडून सुबोधने सुहासिनीलाच चार शब्दांनी समजावले होते. माणसा- माणसातील व्यक्तिमत्त्वाचा फरक तिला समजून आला होता. सामान्यतः महिलांना आक्रमक, पत्नीसाठी भांडणारा पुरुष आवडतो. सुहासिनीचेही तसेच झाले. गल्लीतील मुले काही सराईत गुंड नसतात. वागतात वाघाप्रमाणे पण कुणी खमक्या भेटला तर त्यांची शेळी व्हायला वेळ लागत नाही. नाही तर त्यांचा त्रास वाढतच जातो. त्या मुलांचेही तसेच झाले. सुबोधने त्यांच्याकडे केलेले दुर्लक्ष हा भ्याडपणा समजून ती मुले जास्तच शेफारली. परिणती त्यांना ती खोली सोडावी लागली.

तितक्यात दूरवरून सुबोधला येताना पाहून सुहासिनी खोलीत परतली. तिच्या पाठोपाठ सुबोध आत आलेला पाहून तिने विचारले, "निलेश भेटला का?"

"नाही. आला होता?" सुबोधने विचारले.

"आला होता. तुमची वाट पाहून निघताना भांडण करून गेला."

"भांडण? कुणाशी?"

"त्या समोर बसणाऱ्या मुलांसोबत?"

"का? काय केले त्यांनी?"

"नेहमीप्रमाणेच काही तरी म्हणाले वाटते. निलेशला सहन झाले नाही. त्याने पकडली एकाची कॉलर. मग पळाले.. पाय लावून..." असे सांगत सुहासिनी तिच्या कामाला लागली आणि सुबोध कपडे बदलून पलंगावर पडला. शेजारी पडलेले वर्तमानपत्र त्याने उचलले. रविवारच्या पुरवणीत आलेल्या एका लेखावर त्याचे लक्ष गेले. लेखाचे शीर्षक होते, 'स्त्रियांची लैंगिक पिळवणूक!'

लेखकाने अगदी मुद्देसूदपणे विषय स्पष्ट केला होता. कामकरी महिला मग त्या खेड्यातील मजुरनी असोत, नोकरीवाल्या बायका. त्यांचे त्यांच्या मालकाकडून, अधिकाऱ्यांकडून कसे लैंगिक शोषण होते हे स्पष्ट केले होते. नोकरी करणाऱ्या महिला आर्थिकदृष्टीने कमकुवत नसल्या तरीही अनेक स्त्रिया ह्या स्वातंत्र्याचा जयघोष करणाऱ्या असतात. त्यांच्या या वृत्तीचा, मोकळेपणाचा फायदा घेऊन अनेक जण त्यांना स्वतःकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. सर्वच महिला त्यांच्या जाळ्यात अडकतात असे नाही. बहुतांश महिला त्यांना सडेतोड उत्तर देतात. त्यांना सहजासहजी प्रतिसाद न देणाऱ्या स्त्रियांवर अधिक कामाचा ताण, त्यांच्या न झालेल्या चुकांवर बोट ठेवून त्यांना सळो की पळो करून सोडताना त्यांना स्वतःच्या मनासारखे वागायला भाग पाडतात..

लेखाच्या उत्तरार्धात पतीकडून स्वतःच्या पत्नीवर होणाऱ्या लैंगिक शोषणाचे वर्णन करताना लेखकाने म्हटले होते, 'जे पती लैंगिकदृष्ट्या सक्षम तर असतात परंतु त्यांना संतती होत नाही असे पती आणि त्याचे कुटुंबीय बायकोला दोषी ठरवताना तिचा नानाप्रकाराने छळ करतात. या प्रकाराची परिणती तो नवरा दुसरे लग्न करण्यामध्ये होते. दुसरी पत्नी आली की, पहिल्या पत्नी सोबतचे शारीरिक संबंध संपुष्टात येत नसले तरीही दुर्लक्षित होतात. परिणाम म्हणजे ती पहिली पत्नी 'त्या' भुकेपोटी तळमळत राहते. हाही एकप्रकारचा छळ म्हणता येईल. दुसरीकडे एखाद्या जोडप्याला एकापाठोपाठ एक मुलीच होत असतात. त्याचाही दोष बायकोच्या माथी मारण्याचा आणि मग तिचा छळ, शोषण करण्याचे उदाहरणे समाजात बरीच पहायला मिळतात. वास्तविक पाहता विज्ञानाने हे सिद्धही केले आहे की, बाईला मुली होणे हा त्या बाईचा दोष नसून तो पुरुषाचा दोष आहे.

ज्या पुरुषांजवळ संततीजन्य क्षमता किंवा स्त्रीला समाधान देणारी शक्ती नसते असे पुरुष स्त्रीचा नानाप्रकाराने छळ करतात. स्वतःचे दौर्बल्य लपविण्यासाठी ते स्त्रीला धाकात ठेवतात. तिची अतृप्त वासना कायम दाबून राहावी म्हणून, ती भलत्याच मार्गावर जाऊ नये यासाठी ते शिव्या, मार, चटके, खुनाची किंवा घटस्फोटाची धमकी देणे अशा विविधांगी मार्गाने तिला भयभीत करून सोडतात. अशा प्रकारामुळे तिची भावना जागृत होण्याऐवजी तिला शरीरसंबंधाबद्दल आणि पुरुषांसाठी चीड निर्माण होते....' असे विचार वाचताना सुबोधला विशेष आनंद झाला कारण सुबोध- सुहासिनीच्या एकत्रित येऊन केलेल्या अनेक प्रयत्नानंतरही त्यांचे शारीरिक संबंध फुलले नाही, अपेक्षित यश त्यांना मिळाले नाही. ऐन मोक्याच्या समयी तो सुहासिनीपासून दूर होत असे. परिणाम म्हणजे सुहासिनी रात्र-रात्र तळमळत असे. तिच्या भावनांचे शमन होत नसे. तिची तशी स्थिती पाहून सुबोधला एक भीती नेहमी वाटायची की, माझ्यापासून दूर जात असणारी सुहासिनी कार्यालयातील कुणाच्या जवळ तर जाणार नाही ना? तिला कवेत घ्यायला सारेच टपलेले आहेत. सुहा त्यापैकी कुणाला तर जवळ करणार नाही ना? विशेषतः सुहासिनीचे साहेबांच्या दालनात नेहमी जाणे, तिथे बराच वेळ बसणे, गप्पा-हसणे असे प्रकार बरेच वाढले होते. तो लेख वाचल्यावर सुबोधने मनाशीच एक निर्णय घेतला आणि त्यामुळे डोक्यावरचे भलेमोठे ओझे उरतले असल्याची त्याला खात्री पटली.

काही वेळाने दोघे जेवायला बसले. वास्तविक पाहता भाजी नेहमीप्रमाणे अतिशय खमंग झाली होती. त्याला आवडायची तशी झणझणीत झाली होती. परंतु त्या लेखातील विचाराने प्रेरित झालेल्या सुबोधने मुहूर्त साधला तो ओरडला,

"किती तिखट टाकलेस वरणात? चांगला स्वयंपाक शिकविला नाही का तुझ्या म्हातारीने?"

स्त्रिया कितीही कामचुकार असल्या, प्रसंगी त्या स्वतः नवऱ्याचा मारही सहन करतील परंतु माहेरच्या माणसाला त्यातल्या त्यात जन्मदात्या आईवडिलांना नाव ठेवलेले त्यांना आवडत नाही. सुहासिनी चूप बसली असती तर नवल. तीही त्वेषाने म्हणाली,

"खबरदार! माझ्या आईचे नाव काढाल तर? आणि तसेच खमंग खायची चाड असेल तर हवं तसं करून खात रहा. तुमचे सारे चोचले पुरवून, नोकरी करत वरती उपाशी राहणं, तळमळणं मला जमणार नाही."

"काय म्हणालीस?" सुबोधने रागाने विचारले.

"खरे तेच म्हणाले. स्वतः हक्क बजवायचा माहिती आहे परंतु हक्काची दुसरी बाजू कर्तव्य असते हेही माहिती असावे." सुहासिनी त्वेषाने म्हणाली.

"मला माझं कर्तव्य शिकवू नकोस. तुला काय कमी पडले गं? सोन्याने मढवलीय तुला. भारीभारीच्या साड्या. खाणे-पिणे, शानशौक..."

"सारे काही मिळते हो? पण त्यात तुमचा काय वाटा? माझ्या कमाईवर माझ्या गरजा मी पुरवून घेते. ही जी यादी तुम्ही माझ्यासमोर ठेवलीय ना तेवढ्याच का गरजा बायकोच्या असतात का? त्यापुढे पत्नीला अजून कशाची तरी गरज असते हे आहे का तुम्हाला माहिती? अर्थात ती माझी गरज तुम्ही आजन्म पुर्ण करू शकणार नाहीत."

"सु.. हे.."

"ओरडू नको. मलाही ओरडता येते आणि मी ओरडले तर साऱ्या जगाला तुमचे खरे रुप समजेल."

"फार माजलीस काय? थांब तुला दाखवतो..." असे म्हणत सुबोधने खरकटा हात तिच्यावर उगारला. परंतु त्याचा हात सुहासिनीच्या शरीरापर्यंत पोहोचण्यापूर्वीच सुहासिनीच्या हाताने तो अडवला. ज्या कोमल हाताची मिठी सर्वांनाच हवीहवीशी असते तोच हात प्रसंगी कसा आणि किती मजबूत होतो हेही अनेकांनी अनुभवले आहे. तसेच ते सुबोधच्या लक्षात आले. तो जेवण सोडून वेगळ्याच तिरमिरीत उठला आणि पलंगावर जाऊन पडला. त्याच्या डोक्यात विचारांनी भाऊगर्दी केली होती.

'खरेच सुहासिनीला धाकात ठेवणे मला जमेल का? आज मी पहिल्यांदा प्रयत्न केला तेव्हा तिने कसा सणसणीत षटकार ठोकला. एक मात्र पक्के की, यापुढे ती माझा कोणताही जाच सहन करणार नाही ही काळ्या दगडावरची रेष आहे. ती आता म्हणाली तशी तिने माझे पंगुत्व जगजाहीर केले म्हणजे? इतर स्त्रियांमध्ये आणि सुहासिनीमध्ये निश्चितच फरक आहे. सुहासिनीचा आताचे रौद्ररूप डोळेझाक करून चालणार नाही. परंतु तिचा असा जाच करणे, तिला शारीरिक त्रास देणे योग्य आहे का? अगोदरच आपण 'त्या' बाबतीत तिच्यावर अन्याय करतोय. तीही त्रस्त आहे. अडाणी, अशिक्षित आणि गेंड्याचे कातडे असल्याप्रमाणे आपण नाही वागू शकत. माझ्यासारख्या सरळमार्गी माणसांकडून तसे दुष्कृत्य कदापिही होणे नाही. तो मार्ग मी स्वीकारणार नाही..'

त्याच सायंकाळी चार वाजता सुहासिनीला अचानक उलटी झाली. सुबोधने ताबडतोब डॉक्टरांना आणले. त्यांनी सुहासिनीला तपासले. ते म्हणाले,

"अभिनंदन! सुबोधराव, तुम्ही पिता बनणार आहात."

"का..य..?" सुबोधप्रमाणे सुहासिनीनेही विचारले.

"होय. ही औषधी आणून सुरू करा.." असे म्हणत डॉक्टरांनी त्यांचा निरोप घेतला. औषधी आणायला जाताना सुबोधच्या मनात विचारांची गर्दी झाली.

'म्हणजे सुहासिनीने डाव साधला तर? सुहासिनीला हवं ते सुख बाहेर मिळत असेल तर मग मूल कशाला? त्याला पाहिले की, मला माझी अपराधाचीपणाची भावना उचंबळून येणार. कोण असेल तो? साहेब तर नसतील? गल्लीतले मुलं चिडवतात त्याप्रमाणे निलेश तर नसेल ना? तिचे दुसरीकडे समाधान होतंय म्हणूनच ती रात्री माझ्याजवळ येत नाही. दोन-चार दिवसातून एखादे वेळी माझं समाधान करते, एक कर्तव्य म्हणून, एक नातं चालावं म्हणून. तिला 'त्या' बाबतीत कुणाचा तरी आधार मिळालाय. शेवटी तिने तिचा मार्ग शोधलाय. सोबत लाज आणि मर्यादाही सोडलीय..."

औषधी घेऊन तो पुन्हा दवाखान्यात गेला. डॉक्टरांसमोर बसत त्याने विचारले,

"डॉक्टर, तुम्ही जे म्हणालात ते खरे आहे?"

"होय. मिस्टर सुबोध, माझे निदान एकशे एक टक्के बरोबर आहे."

"पण डॉक्टर, तुम्हाला का माहिती नाही, मी असा.."

"अच्छा! अच्छा! आलं लक्षात. तुम्हाला असे तर म्हणायचे नाही की, ते मुल तुमचे नाही!"

"हो..हो.."

"असे का वाटले तुम्हाला? अहो, तुम्ही अशक्त असाल, तुमच्याकडून त्यांचं समाधान होत नसेल म्हणून तुम्ही संततीक्षम नाहीत असे होत नाही ना."

"म्हणजे? मी नाही समजलो."

"स्त्री-पुरुषांच्या संबंधाची कालमर्यादा यावरून एखादा माणूस तो माणसात आहे की नाही हे ठरत नाही तर पुरुषांच्या वीर्यामध्ये असलेल्या शुक्राणूंच्या प्राबल्यतेवर संततीचे आगमन अवलंबून असते. दुसरीकडे एखादा मानव स्त्रीचे समाधान करीत नसेल, त्यांचा शारीरिक संबंध काही मिनिटांचा सोडा काही सेकंदांचा असेल आणि त्यामुळे त्याची पत्नी शरीरसुखासाठी तळमळत असतानाही तो सेकंदभराचा संबंध काम करून जातो. त्याचे ते कण बाजी मारून जातात. पौरुषत्वाचे अवडंबर माजविणाऱ्या इसमाला जे जमत नाही ते 'सेकंदी पैलवानाला' जमून जातं. म्हणून स्त्रीचे समाधान आणि संतती यांचा तसा संबंध नाही. मात्र तुम्ही एक गोष्ट चांगली केली..."

"ती कोणती?" सुबोधने विचारले.

"तुमची शंका मला बोलून दाखवली. मला न विचारता तो गर्भ तिसऱ्याच कुणाचा आहे असा गैरसमज करून तुम्ही पत्नीसोबत वागला असता तर त्यातून भलतंच काही पुढे आलं असतं आणि कदाचित तुमचा संसार वाहवला असता."

डॉक्टरांचा निरोप घेऊन सुबोध निघाला. घरी जाण्याऐवजी तो निलेशच्या घरी पोहोचला. काही महिन्यांपूर्वी निलेशने त्याच्या पत्नीला गावाहून आणले होते. त्यांना एक मुलगाही झाला होता. त्याची पत्नी निरक्षर असल्यामुळे निलेश तिला बाहेर कुठे नेत नव्हता. सुबोधचे जाणे-येणे असल्यामुळे ती त्याच्याशी बोलायची. गप्पा गोष्टी, विनोद करायची. सुबोधला आलेले पाहताच तिने डोक्यावरचा पदर नीट केला आणि कुणी सांगण्याची वाट न पाहता तिने चहा ठेवला. सुबोधच्या उतरलेल्या चेहऱ्याकडे पाहून निलेशने विचारले,

"का रे काय झाले? पुन्हा भांडणे झाली काय?"

"का हो, तुम्हाला भांडणाशिवाय दुसरं काही विचारताच येत नाही का? मी म्हणते त्या नवरा- बायकोच्या भांडणात तुम्ही तिऱ्हाईतानं का पडावं?"

"वहिनी, तुम्ही दोघे का परके आहात?"

"परके नाहीत हो. पण असे पहा, नवरा-बायकोचे भांडण म्हणजे संसाराचा एक भागच असतो. दिवसभर कितीही भांडले ना तरी रात्री सगळं काही मिटते."

"ते भांडणाचे सोडा. वहिनी, तुम्ही काकू होणार आहात." सुबोध म्हणाला.

"म्हणजे सुबोध..."

"होय! आत्ताच डॉक्टरांनी सांगितले."

"व्वा! व्वा! खूप छान बातमी दिलीस. अभिनंदन!"

"भाऊजी, आता त्यांना सांभाळा. हा काळ म्हणजे बाईचा दुसरा जन्म असतो. एखादे वेळी घेऊन या इकडे. मी पुरवील त्यांचे डोहाळे. पण त्या कशाला? मीच येते की भेटायला."

"या. जरूर या. निलेश, थोडे फिरायला जाऊया." सुबोध म्हणाला आणि दोघेही खोलीबाहेर पडले. काही वेळ फिरून झाले. तसा सुबोध घरी निघाला... परंतु रस्त्याने जाताना तो जणू विचाराच्या विमानात बसला होता. त्याला वाटले,

'सुहासिनीच्या पोटात असलेला गर्भ निलेशचा तर नाही? आपल्या पश्चात निलेश घरी जातो. खूप वेळ सुहासिनीसोबत गप्पा मारत बसतो. तो त्या टारगट मुलांवर संतापला होता. का? ती मुले सत्य बोलत होती म्हणून? सत्य कडवट असते म्हणून? सुहासिनीसोबतचे सत्य त्याच्या जिव्हारी लागले म्हणून तर तो त्या मुलांना मारायला धावला नसेल? नक्कीच निलेशचे सुहासोबत अनैतिक संबंध आहेत. मला अंधारात ठेवून त्यांनी डाव खेळलेला दिसतोय. निलेश घरी असताना मी बाहेरून घरी पोहोचलो तेव्हा ती दोघे हसत-खिदळत असतात. सुहासिनीच्या गालावरील खळी फुललेली असते. तिच्या डोळ्यात, चेहऱ्यावर वेगळेच तेज असते. मला पाहताच मात्र जणू रंगाचा बेरंग होतो. त्यांच्या आनंदावर विरजण पडते. काही तरी निमित्त सांगून निलेश काढता पाय घेतो. तो असेपर्यंत खळखळून हसणारी सुहा अचानक अबोल होते, प्रत्यक्ष नवऱ्याशी अपरिचित असल्याप्रमाणे वागते.

पण खरेच सुहासिनीचे काही चुकते का? शरीरसुख तिला मिळत नसताना तिने ते दुसऱ्याकडून घेतले तर काय हरकत आहे? या वयात तिला ते सुख आवश्यकच आहे. एकदा का तारुण्याचे वय निघून गेले तर मग? पण त्यासाठी तिने गैरमार्गाने का जावे? तिने मला विश्वासात घ्यायला हवे होते. मी.. मी.. तिची ती व्यवस्था केली असती. तिला असे नाटक करायची काही गरज नव्हती. डॉक्टरांना निलेशने विश्वासात घेतले असणार. दोन-चार हजार रुपये त्यांच्या हातात कोंबून असतील म्हणूनच डॉक्टरांनी मला तसा उपदेश करताना शरीरसंबंधाचा कालावधी आणि संततीचा संबंध नाही हे पटवून दिलंय. डॉक्टर निलेशच्या सांगण्याप्रमाणे बोलत नसतील कशावरून? नक्कीच निलेशनेच त्यांना तसे खोटे बोलायला भाग पाडले आहे. सुहासिनी आणि निलेशने मिळून माझा विश्वासघात केलाय. त्यात निलेशला तरी दोष का द्यावा? सुहासिनीसारखी सुंदर ललना आपणहून कुणाच्या मिठीत शिरत असेल तर कोण माघार घेणार? एक तर नकार देणारा कपाळकरंटा किंवा मग माझ्यासारखा नपुंसक असणार! होय, मी नपुंसक! मला कधीच मुल होणार नाही. डॉक्टर नक्कीच खोटे बोलत आहेत. दोन क्षणाच्या सहवासातून गर्भ राहणे शक्यच नाही. कदाचित ते मुल डॉक्टरांचे नसेल कशावरून? त्यांना माझे पंगुत्व समजल्यानंतर त्यांनीच सुहासिनीला जाळ्यात ओढले नसेल कशावरून? ती तर अगोदरच तळमळणारी स्त्री. तिला निलेश किंवा डॉक्टरांसारखा समर्थ पुरुष मिळत असताना ती त्याला झिडकारून माझ्यासारख्या अर्धवटासाठी कशाला झुरेल? माझ्याकडून मिळणारे सुख हे मृगजळ ठरत असताना ती माझ्यामागे धावेलच कशाला? कुणी काहीही म्हणाले, डॉक्टरांनी कितीही छातीठोकपणे सांगितले तरी तो गर्भ माझा नाही... माझा नाही.. मला मुल होणे शक्यच नाही...शक्य नाही! कारण ते मूल माझं असतं तर डॉक्टरांनी तसं सांगताच आनंदातिशयाने मी सुहासिनीला मिठीत घेतले असते. माझ्या शरीरात एक वेगळीच अनुभूती संचारली असती. कदाचित मी डॉक्टरांना शेकहँड केला असता परंतु माझे रक्त का गोठल्याप्रमाणे शांत राहिले होते. माझ्या रक्ताचा, वंशाचा तो अंश असता तर त्याच्या आगमनाची चाहूल लागताच माझेही रक्त अधिक वेगाने प्रवाहित झाले असते पण... तो... तो... माझा नाही... माझा नाहीच...' विचारांच्या शृंखलेत तो घरी पोहोचला आणि डोके गरगरत असल्याची त्याला जाणीव झाली.

*****