Ti Ek Shaapita - 2 in Marathi Moral Stories by Nagesh S Shewalkar books and stories PDF | ती एक शापिता! - 2

Featured Books
  • स्वयंवधू - 31

    विनाशकारी जन्मदिन भाग 4दाहिने हाथ ज़ंजीर ने वो काली तरल महाश...

  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

  • शोहरत का घमंड - 102

    अपनी मॉम की बाते सुन कर आर्यन को बहुत ही गुस्सा आता है और वो...

Categories
Share

ती एक शापिता! - 2

ती एक शापिता!

(२)

सुबोधच्या आत्याची तेरवी झाली. तेरवीसाठी जमलेली पाहुणेमंडळी निघून गेली. सुबोधचे आईवडील त्याच्या लहानपणीच वारले होते. त्याची आत्याही बालविधवा होती. सुबोध आत्याकडे राहायला आला. आत्याने त्याचा सांभाळ केला. त्याला लहानाचा मोठा केला. सुबोधचे बी. कॉम. पर्यंत शिक्षण झाल्यानंतर तो एका सरकारी कार्यालयात नोकरीला लागला. तसे त्याच्या आत्याने अंथरूण धरले ते कायमचेच! आत्याच्या मृत्यूनंतर सुबोध एकाकी पडला...

सरकारी काय किंवा इतर कार्यालये काय सारे जणू भ्रष्टाचाराचे आगार! तशा आगारात नोकरीला असलेला सुबोध प्रामाणिकपणे काम करताना भ्रष्टाचारापासून दूर होता हे कुणाला सांगितले तर खरे वाटायचे नाही. जणू कोळशाच्या वखारीत काम करूनही कपडे पांढरेशुभ्र असल्याप्रमाणे! परंतु हा समाज का प्रामाणिकपणे काम करणारांना सुखासुखी जगू देईल? सुबोधचे साहेब म्हणजे भ्रष्टाचाराचा बकासूर! नवनवीन योजनांचा निधी हडप करून त्या योजनांचा पार बट्ट्याबोळ करण्याचे त्यांना बाळकडूच मिळाले होते की काय न कळे! आकड्यांची जुळवाजुळव करताना मात्र सुबोधच्या नाकीनऊ येत. अनेकदा त्याचे साहेबांशी खटकेही उडत परंतु शेवटी सुबोधला साहेबांचे ऐकून खोटेनाटे आकडे जुळवावेच लागत.

"काय यार सुबोध, मजा आहे बुवा तुझी." एखादा सहकारी म्हणे.

"कशाची रे?" काही न समजलेला सुबोध विचारत असे.

"आता मलाच विचार बाबा. अरे, लग्नापूर्वीच एवढी कमाई करतोस. बायकोला काय स्वतःच्या मालकीचे घर लग्नात भेट देणार आहेस काय?"

"काय चाललय काय? कमाई काय? स्वतःचे घर काय? काय म्हणतोस काय तू?"

"अरे, साहेब एवढे खात आहेत तेव्हा त्यातले तुला काही तरी..."

"छे रे, बाबा! मी त्या पापातला एक रुपयाही घेत नाही. अरे, कितीही झालं तरी पापाचाच पैसा तो. आज ना उद्या खाल्लेले ओकावेच लागेल."

"नाही. बिल्कुल पटत नाही. तळं राखताना कुणी तहानलेला कसा काय राहू शकतो?" दुसऱ्या मित्राने विचारले.

"अरे, बाबा तो समाजाचा पैसा, समाजाचा विकास करण्याऐवजी आपण आपलाच विकास करू लागलो तर त्यांचा तळतळाट लागल्याशिवाय राहील काय? असा पैसा खाण्यापेक्षा उपाशी राहणे मी पसंत करेन." सुबोध म्हणाला.

"ओ महर्षी, तत्त्वज्ञान कशाला आणि कुणाला शिकवता? आम्ही काही तुला वाटा मागणार नाही आहोत. तुझी कमाई तुलाच लखलाभ..." एक सहकारी बोलत असताना दुसरा पटकन म्हणाला,

"तू कशाला त्याला मागशील? सुबोधच्या आधी तूच त्या विभागाचा प्रमुख होतास तेव्हा काय कमी कमाई केलीस? चार मजली बंगला बांधलास, कार घेतलीस, बहिणीचं लग्न केलंस. आईला, बायकोला दागिन्यांनी मढवलंस हे का आम्हाला माहिती नाही?"

"अरे, मी का ते नाकारतोय? म्हणून तर अनुभवाचे बोलतोय की, सुबोधने किती कमाई केली असेल ते. माझं सांगतो, मी टाकलेल्या आकड्यांच्या जाळ्यात कितीही हुशार, चाणाक्ष अधिकारी असला ना तरी तो अडकायचाच. एकही नाही सुटला. साहेबांपेक्षा मीच नेहमी फायद्यात राहिलो. वर त्यांच्यावरच रूबाब टाकून अनेकांना शरमिंदा केले आहे..." अशा एक ना अनेक सुरस कथा चर्चेत असत परंतु सुबोध कुणाचाही एका रुपयाने कानकोंडा नव्हता.

"हे पहा, मिस्टर सुबोध, ही बिलं ऍडजेस्ट करा..." नेहमीप्रमाणे साहेब म्हणाले.

"अहो, पण साहेब..."

"अधिकारी कोण? तुमचे काम ऐकण्याचे नि कार्यवाही करण्याचे तेवढे इमानेइतबारे करा."

"पण साहेब, ऑडिट ऑब्जेक्शन..."

"ती जबाबदारी माझी. मागे कधी ऑब्जेक्शन आले का? नाही ना? तुम्हाला सांगतो, तुम्ही सहभागी व्हा किंवा न व्हा .. अगदी खालपासून ते थेट वरपर्यंत भ्रष्टाचाराचे जाळे विणलेले आहे. आज भ्रष्टाचार शिष्टाचार होऊन बसलाय. भेट झाल्याबरोबर अभिवादनाच्या शिष्टाचाराकडे कुणाचे लक्ष नसते तर त्या भेटीतून प्राप्त होणाऱ्या 'अर्था'कडे 'लक्ष्य' असते. जा. बदला थोडे. प्रवाहात या..." पावत्या घेऊन बाहेर पडणाऱ्या सुबोधच्या कानावर साहेबांचा आवाज आला,

'मोठा आलाय प्रामाणिक! मला तत्त्वज्ञान शिकवतो...'

सुबोधचा कार्यालयातील सहकारी निलेश मात्र त्याला समजून घ्यायचा. त्याला प्रोत्साहन द्यायचा. निलेश आणि सुबोध दोघेही पंचविशीले. तीन महिन्यांपूर्वीच निलेशचे लग्न झाले होते. गावाकडे मोठे कुटुंब असल्यामुळे त्याची पत्नी गावीच असे. पत्नी अशिक्षित असल्यामुळे तिला नोकरीच्या गावी आणण्यासाठी निलेशचे मन होत नव्हते. तो एकटाच नोकरीच्या गावी राहत होता. आत्याच्या मृत्यूनंतर सुबोधही एकटाच होता. त्यामुळे दोघांची मैत्री जमली. सहज एकत्र येत असलेले ते दोघे नंतर एकमेकांचे जीवाभावाचे मित्र झाले. कार्यालयीन वेळेनंतर दोघे बराच वेळ एकत्र असायचे. अधूनमधून एकमेकांच्या खोलीवर जायचे. सुबोधच्या नोकरीचे गाव तालुक्याचे ठिकाण असले तरीही बरेच मागासलेले होते. इतके की, गावात रस्ते, नाल्या, विद्युत अशा सोयीही नव्हत्या. नवख्या माणसाला एक वेळचं जेवण मिळेल असे चांगले हॉटेलही नव्हते. गावातील स्त्रियांची पावले सणासुदीला रस्त्यावर येत असत.

तशा गावात सुहासिनी नामक एका कन्येचे आगमन झाले ते नोकरीनिमित्ताने आणि तेही सुबोधच्या कार्यालयात! ज्या गावात स्त्रीचे दर्शन दुरापास्त होते, त्या गावच्या 'महामार्गावर' तिची कोमल पावलं चालू लागली. तशी ती त्या गावात औत्सुक्याचा विषय झाली. आबालवृद्धांमध्ये तिच्या चर्चा रंगू लागल्या. तिच्या जाण्या-येण्याच्या ठराविक वेळी अनेकांच्या नजरा रस्त्यावर आणि पर्यायाने सुहासिनीकडे लागलेल्या असायच्या. नजरेच्या पायघड्या रस्त्यावर अंथरताना त्याच पायघड्या तिला मिठीतही घेऊ लागल्या...

सुबोध चार दिवसांची रजा संपवून कार्यालयात परतला. तेव्हा त्याला जाणवले की, कार्यालयीन वातावरण खुपच बदललेले आहे. नेहमी उशिरा येणारा हेडक्लार्क अगदी वेळेवर पोहोचला होता. शिपायांच्या अंगावरील मळके कपडे जाऊन स्वच्छ कपडे दिसत होते. त्याच्या आगमनाची कुणी विशेष दखल घेतली नाही. नेहमी बाहेर फिरणारी कारकून मंडळी आपापल्या खुर्च्यांवर बसून कामात दंग आहोत असे भासवत असले तरीही सेकंदाच्या गतीने साऱ्यांच्याच नजरा एका विशिष्ट खुर्चीकडे वळत होत्या. सुबोधने असमंजसपणे त्या दिशेने पाहिले आणि तोही भान हरपला. सुबोधच्या लगतच्या खुर्चीवर एक तरुणी बसली होती. दिसताक्षणी लक्ष खिळवून ठेवणारे ते लावण्य पाहत पाहत सुबोध स्वतःच्या खुर्चीवर जाऊन बसला. एका वेगळ्याच दर्पाने सुबोधचे स्वागत केले. तरुणी थोडी जास्तच नटली होती. तिने वापरलेल्या सौंदर्य प्रसाधनांचा वास सुबोधच्या शरीरात वेगळीच स्फूर्ती निर्माण करीत होता. ती तरूणी तिच्या कामामध्ये दंग होती. आजूबाजूला काय चालले ह्याचाशी जणू तिला काही घेणेदेणे नव्हते. काही वेळानंतर दोघांची नजरानजर झाली आणि तिने हलकेच स्मित केले. उत्तरादाखल सुबोधलाही चेहरा हसरा करावा लागला. नेहमी एकमेकांभोवती कोंडाळं करून त्याच त्याच विषयांचे रवंथ करणारी मंडळी आपापल्या कामात व्यस्त होती, निदान तसे दाखवित होती. सुबोधनेही काम सुरू केले आणि तो त्याच्या कामात मग्न असताना कानामध्ये एक सुमधुर आवाज शिरला,

"एक्सक्यूज मी..." तसे सुबोधने आवाजाच्या दिशेने पाहिले आणि तो म्हणाला,

"यस! मी सुबोध..."

"आणि मी सुहासिनी! परवाच्या दिवशी हजर झालेय. तुम्ही..."

"मी रजेवर होतो. यापूर्वी कोणत्या गावी होता?" सुबोधने विचारले.

"नाही. मी पहिल्यांदा इथेच हजर झालीय. आधी कुठे नव्हते. मला मदत कराल का? मी हे पूर्ण केलंय पण थोडे चुकल्यासारखे वाटतंय."

"का नाही? बघूया..." असे म्हणत सुबोधने तिने केलेले काम तपासले आणि एक छोटी चूक दुरुस्त करून दिली. तितक्यात त्याचे लक्ष आजूबाजूला गेले. सारे कार्यालय त्याच्याकडेच बघत असल्याचे त्याला जाणवले. नेहमीप्रमाणे मध्यंतर होताच सारे जण हॉटेलमध्ये जमले. त्यावेळी तीच चर्चा रंगली जी दोन दिवसांपासून रंगत असली तरीही प्रत्येक वेळी नवीन वाटायची, हवीहवीशी वाटायची. सुहासिनीप्रमाणे तिच्या चर्चेची गोडीही अवीट अशीच होती.

"काय पण सौंदर्य आहे यार."

"नजर हटतच नाही ना."

"सौंदर्य तर अफलातून आहे रे, पण तिचं नटणं म्हणजे जणू त्या सौंदर्याला चंद्राने कवेत घेतल्याप्रमाणे!"

"अरे, ही सिनेमात शोभणारी नायिका चुकून तर आपल्या कळपात आली नाही ना असे वाटते."

"अरे, चार दिवस झाले तळमळतोय...तिचे शब्द ऐकण्यासाठी किमान एक नशिला कटाक्ष टाकेल या म्हणून पण छे! ढुंकूनही पाहिले नाही राव!"

"हो ना. आणि हा सुबोध आज कार्यालयात आला न आला की गेली त्याच्या..."

"नशीब असते यार एकेकाचे!"

"नशीब नाही यार, तिने ओळखले की, कार्यालयातील सारे बिलंदर दिसतात. हाच एवढा एक तसा दिसतोय."

"तसा म्हणजे कसा रे?" सुबोधने विचारले.

"तळं राखताना पाणी न चाखणारा. स्त्रीया आणि त्यातल्या त्यात तरुणी पहिल्याच नजरेत समोरचा माणूस ओळखतात म्हणे. नजरेतल्या भावावरून त्या व्यक्तिच्या मनात काय शिजतेय हेही त्या ओळखतात. त्यामुळेच सुबोधसोबत मैत्री करणे तिला सुरक्षित वाटले असणार."

"ये, तुला काय म्हणायचे बे?" सुबोधने पुन्हा विचारले.

"ते तू ओळखलंस ना मग झाले तर."

प्रथम कामानिमित्त एकत्र येणारे सुबोध-सुहासिनी नंतर एकत्र येण्यासाठी काम आणि निमित्त शोधू लागले. कुठलंही साधं कारण शोधून ते एकमेकांच्या जवळ येऊ लागले. त्या सहवासात नंतर सहजता आली. सहजता आल्यावर ते विनाकारण एकत्र येऊ लागले. विविध विषयांवर त्यांच्या चर्चा रंगू लागल्या. सहकाऱ्यांना मात्र फुकटात वादविवाद स्पर्धेचा आनंद मिळू लागला.

सुहासिनीच्या आगमनामुळे सुबोध- निलेशच्या मैत्री दुरावा निर्माण झाला नसला तरीही अंतर मात्र पडले होते. कार्यालयात असतानाही ते दोघे एकमेकांपासून दूर होत होते. मध्यंतराच्या सुट्टीत सुबोधने हॉटेलमध्ये जाणे सोडले होते. सुहासिनीच्या खुर्चीला खुर्ची लावून दोघे गप्पा मारताना जेवण करीत असत. इतरांप्रमाणे विवाहित असूनही निलेशच्या मनात सुहासिनीबाबत नकळत प्रेम निर्माण झाले होते. त्याचे सारखे लक्ष सुहासिनीकडे लागलेले असे. सुहासिनी किंवा सुबोधचे लक्ष जाताच तो आजूबाजूला बघायचा.

सुहासिनी! एक उमलतं सौंदर्य! गोरापान रंग! मोठमोठे बदामी डोळे! बोलताना होणारी डोळ्यांची हालचाल म्हणजे तरुणांच्या भाषेत कलेजा खल्लास! सुंदर लांब नाक. त्याखाली बारीक पातळ ओठ! ओठाच्या वरील बाजूस मनमोहक तीळ! हसताना गालावर पडणारी खळी म्हणजे एक वेगळीच अनुभूती! तशा मनमोहक सौंदर्याच्या जाळ्यात सुबोधसारखा सरळमार्गी तरुण न अडकला तर नवलच! तो तसा सुहासिनीच्या जवळ जाताना पाहून निलेशच काय सारेच तडफडायचे, हातावर हात चोळत बसायचे.

सुबोध-सुहासिनीच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात कधी झालं ते त्यांनाही समजले नाही. त्या गावात विशेष स्थळं नसल्यामुळे आणि गाव अतिशय मागासलेले असल्यामुळे त्यांच्या भेटी कार्यालयात आणि घर अशा ठिकाणीच होत असत. कार्यालयात सहकारी आणि घरी सुहासिनीची आई असल्यामुळे विशेष असे बोलणे होत नसे.

त्यादिवशी सुहासिनी कार्यालयात नव्हती. आदल्या दिवशी रात्री अचानक ताप आल्यामुळे तिने सुबोधसोबत रजा पाठवली होती. सुहासिनी नसल्यामुळे सुबोधचे लक्ष कामात लागत नव्हते. नेहमीप्रमाणे त्याचे हात चालत नव्हते. बोटांमध्ये एक प्रकारचे जडत्व शिरले होते. आकडे जुळत नव्हते तर चुकत होते. कंटाळून सुबोधने समोरच्या पंजिका बाजूला सारल्या आणि डोक्यावर दोन्ही हातांची घडी देत जोराचा आळस देताच किसन नावाचा शिपाई म्हणाला,

"का हो साहेब, मन लागत नाही का? असेच होते बघा..."

"म्हणजे कसे रे?" सुबोधने विचारले.

"म्हणजे असे की, आज बाईसाहेब नाहीत म्हणून तुमचा कारभार सुस्तावलाय. आपलं माणूस..."

"किसन्या..." सुबोध ओरडला.

"त्याच्यावर का ओरडतोस रे? ते जाऊ दे. लाडू कधी देणार आहेस?" निलेशने विचारले.

"ए निल्या, लग्न म्हणजे काय तुला येड्या गबाळ्याचे काम वाटते का रे?" शेजारचा कारकून म्हणाला.

"का...का..." निलेश म्हणाला.

"अरे, पाहतोस ना, हा असा काडी पहिलवान आणि ती तशी रंभा!..." तो बोलत असताना बाहेर जीप थांबल्याचा आवाज आला आणि साऱ्यांनी आपापल्या माना रजिस्टरमध्ये खुपसल्या, मांजराची चाहूल लागताच उंदराने बीळ गाठल्याप्रमाणे!

नवीन आलेले साहेब भलतेच कडक होते. अल्पावधीतच त्यांनी कार्यालयातील सर्वांना सुताप्रमाणे सरळ केले होते. त्यामुळे साहजिकच कार्यालयीन कामांनी वेग घेतला होता. कामांना योग्य दिशा प्राप्त झाली होती. नियमाविरुद्ध वागणारांची, भ्रष्टाचार करणारांची गय केली जाणार नाही असा कडक, सणसणीत इशारा साहेबांनी दिला होता. एकंदरीत ते आल्यानंतर पंधरा दिवसातील त्यांचं वर्तनही तसेच कडक, प्रामाणिक आणि स्वच्छ होते. साहजिकच जिथे सुबोध आनंदी होता, खुश होता तिथे इतर सहकाऱ्यांचे धाबे दणाणले होते, त्यांची कुरकुर चालू असे.

"सुबोधराव, तुम्हाला साहेबांनी बोलावले आहे." किसनने निरोप देताच सुबोध साहेबांच्या दालनात शिरला. त्याला पाहताच साहेब म्हणाले,

"घ्या ही बिले. हिशोबात घ्या आणि पैसे आणून द्या."

"क...क..काय?" साहेबांच्या त्या वक्तव्यामुळे प्रचंड धक्का बसलेला सुबोध म्हणाला.

"असे काय पाहताय? मी काय..."

"प..पण.."

"मि. सुबोध, मलाही घरदार आहे. लेकरंबाळं आहेत..." साहेब बोलत असताना सुबोध बाहेर पडला. खुर्चीवर बसत त्याने शेजारचे कपाट उघडले. ती बिलं व्यवस्थित ठेवून कपाटातून रक्कम काढली. तो पुन्हा साहेबांच्या दालनात आला. रक्कम साहेबांच्या हातात ठेवली तशा साहेबांनी काही नोटा काढल्या आणि सुबोधपुढे धरत म्हणाले,

"ठेवा. ठेवा हो. मी देतोय ना मग ठेवा.लग्न व्हायचे आहे ना. पैसा कमविण्याचे हेच वय आहे."

"परंतु साहेब..."

"अहो, घ्या. कोणत्या युगात वावरता आहात याची कल्पना आहे का?" साहेब सांगत असताना का कोण जाणे सुबोधने त्या नोटा खिशात टाकल्या आणि तो बाहेर आला. बाहेर पडताना त्याच्या मनात विचार आला,

'भ्रष्टाचाराची कीड संपायची काही लक्षणे दिसत नाहीत. उलट जिथं जावं तिथे भ्रष्टाचार...'

बाहेर येताच सुबोध खुर्चीवर बसला. कार्यालयातलं वातावरण नेहमीचेच होते. तो बदलला म्हणून वातावरणात असा कोणता फरक पडणार आहे? पण त्याची स्वतःची मनस्थिती वेगळी झाली होती त्यामुळे त्याला सहकारी, कार्यालयाच्या भिंती, कपाटे त्याच्याकडे पाहत असल्याचा त्याला भास झाला. कपाळ घामाने डबडबले असल्याचे त्याला जाणवले. छातीची स्पंदने त्याचा धिक्कार करीत असल्याचे भासले. खिडकीतून त्याने बाहेर पाहिले. खिडकीतून दिसणाऱ्या आणि मावळतीच्या कवेत जाणाऱ्या सूर्याचे तेज कसे निस्तेज वाटत होतं. साहेबांचे ते रुप अचानक पुढे आल्याने सुबोधला प्रचंड धक्का बसला होता.

"का रे, काय झालं?" निलेशने विचारले.

"काही नाही रे..." कपाळावर रुमाल फिरवत सुबोध म्हणाला.

"साहेब, काही म्हणाले का?"

"काय म्हणणार? शेवटी पळसाला पाने तीनच! हे साहेबही मागच्या साहेबांसारखे 'ऍडजस्ट द बील' असे म्हणणारे."

"का..य सांगतोस?" ते ऐकून निलेशलाही धक्का बसला.

"होय. मलाही तुझ्याप्रमाणेच धक्का बसला. बरं ते जाऊ दे. निलेश, एक विचारु का?"

"अरे, विचार की. असा दुरावा का?"

"सुहासिनीबद्दल म्हणजे तिला कसे..."

"म्हणजे? तू तिला आणखी विचारलेच नाहीस का?"

"नाही रे. शब्दच सापडत नाहीत."

"सुब्या, अरे, पटकन विचार बरे. नाही तर माझ्यासारखा तिसराच कुणी धाडस करेल आणि तुझ्या प्रस्तावाची वाट पाहणारी सुहासिनी त्याला होकारही देऊन मोकळी होईल."

"नाही. सुहासिनी तसे करणार नाही." सुबोध तसं म्हणाला खरा परंतु निलेशच्या सांगण्यावरून तो दोलायमान झाला होता. 'खरेच सुहासिनी तसे करणार तर नाही ना?' अशी शंका येत होती.

त्याच दिवशी सायंकाळी तो सुहासिनीच्या घरी गेला. बाहेरच्या खोलीत सुहासिनी बसली होती. सुबोध येणार ही खात्री असल्यामुळे सावरून, नटून बसली होती. पण चेहऱ्यावरचा निस्तेजपणा लपत नव्हता. एका दिवसातच ती पार गळून गेली होती. डोळे खूप खोल गेले होते. गालांचा गुबगुबीतपणा आत दबला होता.

"चहा ठेवू का?" अत्यंत थकलेल्या आवाजात तिने विचारले. तरी आवाजातला आनंद लपत नव्हता.

"का? आई नाहीत?" सुबोधने विचारले.

"नाही. आत्ताच देवळात गेली आहे."

"बरे झाले. मोकळेपणाने बोलता येईल."

"म्हणजे?" सुहासिनीने विचारले.

"आज आपण वेगळ्याच विषयावर बोलणार आहोत."

"कोणत्या?" वेगळ्याच शंकेने सुहासिनीने विचारले.

"आपल्या लग्नाच्या..."

"का..य?" सुबोध काय विचारणार ह्याची कल्पना आलेली असतानाही त्याने तसे विचारताच स्त्रीसुलभ लज्जेने तिच्या गालावरची फिकी पडलेली लाली अधिकच गर्द झाली असल्याचं त्याला जाणवलं. तो पुढे म्हणाला,

"माझ्याकडचा तर प्रश्नच नाही. मी असा सडेफटिंग! तुला, तुझ्या आईला किंवा इतर कुण्या नातेवाईकांचा सल्ला..." त्याला पूर्ण बोलू न देता सुहासिनी म्हणाली,

"अहो, आई तर केंव्हापासून मागे लागलीय..." तत्क्षणी आपण काही तरी वेगळेच बोललोय असे लक्षात येताच तिने दोन्ही हातात चेहरा लपविला. तिची ती लगबग पाहून सुबोध अंतर्बाह्य सुखावत म्हणाला,

"उद्याच जाऊन नोटीस देऊया."

"नोटीस? ती कशाची? आपल्या लग्नाची? काय हे, इथेही कारकुनीच काय? ठीक आहे. जशी तुझी इच्छा. परंतु एक गोष्ट माहिती आहे ना?"

"ती कोणती?" सुबोधने शंकित स्वरात विचारले.

"आम्ही दोघीच आहोत. मोठी बहीण तिकडे दूर राहते. ना बाप, ना भाऊ! त्यामुळे..."

"त्यामुळे काय?" सुबोधने विचारले.

"हुंडा, मानपान किंवा लग्नानंतर..." बोलताना तिच्या डोळ्यात आसवांनी गर्दी केलेली पाहून तिची फिरकी घ्यावी हा मनात आलेला विचार सोडून सुबोध म्हणाला,

"अग, इथे हुंडा, मानपान हवाच कुणाला? तू मला पूर्ण ओळखले नाहीस..."

"तसे नाही हो." सुहासिनी म्हणाली तसा सुबोध हसत उठला. तो निघाला तितक्यात सुहासिनीची आई देवळातून परत आली. सुबोधने तिच्याकडे बघत स्मित केले. तिनेही हसून प्रतिसाद दिला पण तिच्या डोळ्यात असलेले संशयाचे भाव सुबोधच्या लक्षात आले.

सुहासिनीच्या होकारानंतर त्याच्या चालीत, कामात वेगळाच उत्साह आला. रोजचीच कामे तो पटापट आटोपत होता. परंतु साहेबांचे ते रुप आणि त्याने घेतलेली लाच आठवली की, चालत्या गाडीला खीळ बसावी तसे त्याचे हात जागेवरच थांबत आणि आपण फार मोठा गुन्हा केला आहे, चोरी केलीय असेच त्याला वाटायचे पण दुसऱ्याच क्षणी सुहासिनीची आठवण येताच मनात आलेली भ्रष्टाचाराची मळभ दूर होत असे.

रात्री जेवण झाल्यानंतर सुबोधने सकाळी आलेले वर्तमानपत्र उचलले. सकाळी गडबडीत वर्तमानपत्र वाचायला वेळ मिळायचा नाही म्हणून तो सायंकाळी सविस्तर वाचत असे. वर्तमानपत्रात आलेल्या एका बातमीने त्याचे लक्ष वेधून घेतले. तसा तो दचकला. त्याचं शरीर गारठलं. तो थरथरु लागला. जिल्हा परिषदेच्या एका विभागाचे भ्रष्टाचार प्रकरण चव्हाट्यावर आले होते. कारकुनावर खटला भरण्यात आला होता. सुबोधला वाटले,

'ही बातमी आजच का यावी? जीवनात पहिल्यांदा मी काळा पैसा खिशात टाकला आणि आजच ही बातमी? काय असेल या योगायोगाच्या मागे? मी भ्रष्टाचारापासून परावृत्त व्हावे असा तर संकेत नसेल ना? परंतु मी तरी काय करणार? माझ्या हातात तरी काय आहे? आजपर्यंत कटाक्षाने दूर राहिलो. नव्या आलेल्या साहेबांनी निर्माण केलेल्या जाळ्यात मी अडकलो. त्याचं खरं रूप समोर येताच मी एवढा गोंधळलो की, मला नकार द्यायचेही सुचले नाही. त्यात माझा तरी काय दोष? परंतु मी नकार दिला असता तरी काय फरक पडला असता? साहेबांनी हात आखडता घेतला असता? त्यांनी भ्रष्टाचार थांबवला असता? हे जग का माझ्यासारख्या प्रामाणिकपणांना डोक्यावर घेणार आहे?' त्याच्या मनात तशा विचारांची गर्दी झालेली असताना सुबोधने नेहमीप्रमाणे गादीखाली असलेला 'तो' अंक काढला. असे अंक तरुणांचे आधारस्तंभ असतात. कुठे जाता आले नाही तरी आवश्यक असलेले सुख तशा अंकातील वर्णनांमधून मिळविता येते. ते अनैतिक असेलही, शरीराला हानीकारक असेलही परंतु कोंडलेल्या भावनांना वाट मिळते, शरीर हलके होते, झोप शांत लागते हा अनेकांचा अनुभव आहे...

त्याच अंकातील एका लेखात स्त्रियांच्या बाह्य रुपानुसार पडलेले सौंदर्य प्रकार वाचत असताना त्यातील एका प्रकारचे वर्णन तंतोतंत सुहासिनीशी जुळत होतं. त्या स्वरूपाची सहचारिणी मिळणे म्हणजे मोठ भाग्य असे त्यात लिहिलेले वाचून सुबोधचे बाहू फुरफरू लागले. त्याच्या भावना हिंदकळू लागल्या. परंतु पुढील वर्णन वाचून तो गलितगात्र झाला. पुढे लिहिले होते,

'या स्वरूपाच्या स्त्रिया जेवढ्या सुंदर असतात तेवढीच त्यांची भूक प्रचंड असते. अशा स्त्रियां सामान्यतः असमाधानी वैवाहिक जीवन जगत असतात. असमाधानी असल्यामुळे त्या नेहमीच तळमळत असतात. तशा काळात त्यांना अन्य कुणी भेटला तर त्या स्त्रिया त्याच्या मिठीत जायलाही कमी करीत नाहीत. ज्याप्रमाणे सौंदर्य त्यांना वरदान असते त्याप्रमाणे असमाधान, पतीशी बेईमानी हा शापही त्यांना असतो...' ते वाचताना सुबोधने अचानक ते पुस्तक बंद केले. त्याच्या मनात विचारांनी पुन्हा गर्दी केली, 'खरेच मी तिची शारीरिक भूक भागवू शकलो नाही तर? शरीरसुखासाठी तळमळणाऱ्या सुहासिनीने दुसऱ्या कुणाला जवळ केले तर? पण मी तिला सुखी करु शकणार नाही कशावरून? तिच्या आठवणीने शरीरात वेगळीच संवेदना संचारते. अशा पुस्तकात लिहिलेले सारे खरेच आहे असे नाही म्हणता येणार. या माहितीला कोणताही शास्त्रीय, मानसशास्त्रीय किंवा वैद्यकिय आधार नसताना मी कशाला नाही नाही ते विचार मनात आणू. पुस्तकात लिहिलेले वर्णन सुहासिनीप्रमाणे हजारो बायकांनी जुळत असेल म्हणून काय त्या साऱ्या महिला काय स्वतःचे सुख इतरत्र थोडीच शोधतात? सुहा खूप सुंदर आहे, स्वतःच्या सौंदर्याला अजून खुलवण्यासाठी ती प्रसाधने वापरते याचा अर्थ ती 'तशा' विचारांची आहे असे होऊ शकत नाही. ती सुसंस्कृत आणि सुसंस्कारित आहे. आईसोबत एकटी राहत असताना, कार्यालयात सारे टपून बसलेले असताना तिचा पाय कधीच वाकडा पडला नाही...' पाठोपाठ दुसरे मन म्हणाले,

'अरे, हे जरी खरे असले तरीही मी तिला संतुष्ट करु शकलो नाही तर? माझे शरीर हे असे काटकुळे आहे खरेच मी लैंगिकदृष्ट्या सक्षम नाही का? अशा शरीराची माणसे पत्नीला खरोखर तृप्त करू शकत नाहीत का? माझ्याहीपेक्षा अशक्त, रोड माणसे खूप आहेत म्हणून का ती सारी सक्षम नाहीत असे कसे म्हणता येईल...' अशा विचारात विचारातच सुबोध झोपेच्या अधीन झाला...

*****