Nidhale Sasura - 12 in Marathi Fiction Stories by Nagesh S Shewalkar books and stories PDF | निघाले सासुरा - 12

Featured Books
  • انکہی محبت

    ️ نورِ حیاتحصہ اول: الماس… خاموش محبت کا آئینہکالج کی پہلی ص...

  • شور

    شاعری کا سفر شاعری کے سفر میں شاعر چاند ستاروں سے آگے نکل گی...

  • Murda Khat

    صبح کے پانچ بج رہے تھے۔ سفید دیوار پر لگی گھڑی کی سوئیاں تھک...

  • پاپا کی سیٹی

    پاپا کی سیٹییہ کہانی میں نے اُس لمحے شروع کی تھی،جب ایک ورکش...

  • Khak O Khwab

    خاک و خواب"(خواب جو خاک میں ملے، اور خاک سے جنم لینے والی نئ...

Categories
Share

निघाले सासुरा - 12

१२) निघाले सासुरा!
दामोधरपंत आणि बाई यांनी शेवटी आकाशच्या मदतीने केळवणाचा घाट घातलाच. त्यादिवशी सारे पंचगिरी कुटंबीय, श्रीपाल यांचेसह दामोदर आणि बाई हॉटेल अमृतमध्ये जेवायला गेले. अत्यंत प्रसन्न वातावरणात जेवणे सुरू होती. केळवण हॉटेलमध्ये असले तरीही बाईंनी पंचगिरी कुटुंबीय आणि श्रीपालच्या ताटाभोवती फुलांची सुंदर रांगोळी काढून छान सुवासिक अगरबत्ती लावली होती. आकाशने मोबाईलवर सुरुवातीला फोटो काढले. जेवताना आकाशने अचानक विचारले,
"मामा, लग्नामध्ये ती कानपिळी काय असते हो?"
"वधूचा भाऊ नवरदेवाचा कान पिळतो आणि नवरदेव त्याला बक्षीस देतो." दामोदर म्हणाले.
"आपून को भी एक चान्स है तो। भाऊजी, बघा हं. मला माझ्या पसंतीचा ड्रेस हवाय नाही तर..." असे म्हणत आकाशने जोरात कान पिळण्याचा अभिनय केला.
"नाही तर काय करशील?" श्रीपालने हसत विचारले.
"असा जोरात कान..."
"आकाश, तुला काही लाजलज्जा?" छायाने काहीशा रागाने विचारले.
"त्यात कसली आलीय लाज? ही तर परंपरा आहे ना?" आकाशने विचारले.
"परंपरा आहे रे पण म्हणून काय उगीच हात धुऊन घ्यायचे नसतात." पंचगिरी म्हणाले.
"ते भाऊजींवर अवलंबून आहे. कसे आहे, आजच वर्तमानपत्रात मी एक चारोळी वाचली...
कान पिळताना भाऊजींचा
आश्वस्त करायचे असते बहिणीला
घाबरु नकोस बहिणाबाई
भाऊ सदैव पाठीशी ताई..."आकाश म्हणाला.
"व्वा! आकाश, छानच आहे हं. आपल्या बहिणीला असे आश्वस्त करताना भाऊजींच्याही हे नकळत लक्षात आणून द्यायचे असते की, भाऊजी, माझी लाडाची बहीण तुमच्या घरी एकटी येत आहे. तिच्याशी चांगले वागा. तिला काही त्रास होऊ नये ही जबाबदारी तुमची." दामोदर हसत म्हणाले.
"बोला. आकाशराव, बोला. कसा हवाय ड्रेस?" ते ऐकून श्रीपालने विचारताच आकाश म्हणाला,
"हे अस्स! ते दुकानात गेल्यानंतर बघू." आकाश स्वतःच्या शर्टची कॉलर सरळ करीत म्हणाला.
"म्हणजे तू स्वतःच्या पसंतीने घेणार आहेस?" छायाने विचारले.
"छायाताई, दोन माणसे बोलत असताना असे मध्येच बोलू नये हो." आकाश म्हणाला तसा श्रीपालही हसतच म्हणाला,
"आकाश, जेवण झाले, की आपण जाऊया. तुला हवा तसा ड्रेस घे. ओ. क्के. खुश?" श्रीपालने विचारले.
"व्वा! जियो, मेरे जिज्जू जियो..." आकाश आनंदाने म्हणाला.
"श्रीपाल, हे काय तुम्ही त्याच्या नादी लागून..."
"छाया, जाऊ दे गं. एक तो 'स्साला' है मेरा।" श्रीपाल म्हणाला.
तितक्यात अलकाने बाईला विचारले,
"आत्या, मेहुणीला असे काही पिळायची, ओढायची संधी नसते का ग?" बाई काही बोलण्यापूर्वीच श्रीपाल म्हणाला,
"असते ना. एक चान्स तुलाही मिळेल."
"कोणता?"
"मेहुणींसाठी ओढायचा, पिळायचा असा प्रकार नसतो तर सांभाळायचा प्रकार असतो." श्रीपाल जरा नाटकीय ढंगात म्हणाला.
"सांभाळायचा? म्हणजे?" अलकाने उत्सुकतेने विचारले.
"मेरी ज्युती... आय मीन... तुला माझा बुट सांभाळून ठेवावा लागेल. आजकाल नवरदेवाचा बुट लपविण्याचा नवीन प्रकार सुरू झालाय ना. लपविण्याचा दुसरा अर्थ म्हणजे व्यवस्थित सांभाळणे आणि त्याबदल्यात नवरदेवाकडून बक्षीस! माय डियर, स्साली, अगर तुम मेरी ज्युती संभालोगी तो मै तुम्हे मुँह माँगा तोहफा दुँगा..."
"म्हणजे 'ज्युते ले लो, पैसा दे दो..' अशी भीक मागायला लावणार आमच्या अलकाताईला! अरेरे! सो..." आकाश तसे चिडवत असताना अलकाने आकाशच्या पाठीत धपाटा दिला.
"भाऊजी, हे हो काय?" अलका लाजून म्हणाली.
"तू तर लाजताना छायापेक्षाही सुंदर दिसतेस..."
"श्रीपाल..." छाया काही तरी म्हणण्याचा प्रयत्नात असताना आकाश म्हणाला,
"म्हणजे तुम्हाला असे सुचवायचे आहे का, की लाजताना आमची छायाताई सुंदर दिसते..."
"अगदी बरोबर!..." श्रीपाल म्हणाला आणि सारे हसत असल्याचे पाहून तो खजील झाला. तशी अलका म्हणाली,
"मग तसे सरळ म्हणा ना. माझ्या खांद्यावर बंदुक ठेऊन का?"
"अलके, बंदुकीचे वजन पेलण्याइतके तुझे खांदे ताकदवान आहेत का ग?" आकाशने विचारले. तशी सरस्वती म्हणाली,
"ये पोरांनो, मस्करी पुरे झाली रे. अहो, डिगुभाऊजींना फोन करा ना. आज प्रुफ देणार आहेत ना?"
"रात्री साडेआठपर्यंत येतो म्हणालाय. श्रीपालराव, तुमच्या मित्राकडून..."
"पत्रिका ना? मिळून जातील. किती लागतील?" श्रीपालने विचारले.
"तीनशे लागतील. तशी यादी अडीचशे लोकांची आहे."
"ठीक आहे." असे म्हणत श्रीपाल क्रमांक जुळवून म्हणाला,
"कुठे आहेस? अरे, त्यादिवशी पसंत केलेल्या तीनशे पत्रिका छायाच्या घरी पाठवून दे, आज! अरे, सावधान मंगलकार्यालयाजवळ घर आहे. नाही. नाही. आम्ही पत्रिकाच छापणार नाहीत. तुझा घाटा? अरे, उलट तुझा फायदाच झाला ना? तू मला 'ना नफा ना तोटा' या तत्त्वावर पत्रिका देणार होतास ना? मग नफा की तोटा? बरे. लगेच पाठव..." म्हणत श्रीपालने भ्रमणध्वनी बंद केला.
"श्रीपाल, तुमचे कपडे घेतले का?" दामोदरपंतांनी विचारले.
"मामा, नाही हो. कुठे घ्यावेत हेच ठरत नाही कारण कपडे घेताना छाया हवी आणि त्यामुळे बाहेरगावी जाता येत नाही. उद्या घ्यायचे ठरलेत." श्रीपाल म्हणाला.
"दयानंद, उद्या छायाच्याही साड्या घेऊ देत. त्यांच्या कपड्यासाठी जशी छाया हवी तसेच छायाच्या साड्यांसाठी श्रीपाल हवेतच ना? हो ना छाया?" दामोदरपंतांनी विचारले.
"ते तर आहेच..." छाया सहज म्हणाली परंतु लगेच लाजेने चूर झाली. तिचा आरक्त झालेला चेहरा श्रीपाल बारकाईने न्याहाळत असताना अलका-आकाशने एकमेकांना टाळी दिली. त्यामागचा अर्थ लक्षात येताच श्रीपाल इकडेतिकडे पाहू लागला.
"भाऊजी, काय शोधताय? ताई इथे आहे." आकाश म्हणाला. तसा श्रीपाल खळाळून हसला. जेवणे झाली. दामोदरपंतांनी बील दिले. श्रीपाल, छाया, आकाश, अलका हे चौघे कपडे घ्यायला बाजारात गेले तर उर्वरित ज्येष्ठ नागरिक घरी परतले.
त्याच सायंकाळी एक मुलगा पत्रिका आणि लिफाफे घेऊन आला. तितक्यात दिगंबरही आला.
"व्वा! सुरेख आहेत, पत्रिका." दामोदर म्हणाले.
"पैसे किती सांगितले?" दयानंदांनी विचारले.
"मला काही म्हणाले नाहीत, मालक." पोऱ्या म्हणाला.
"अरे, मग पैसे किती देऊ? असे कर, तुझ्या मालकाचा फोन नंबर सांग..." पंचगिरी म्हणाले. मुलाने सांगितलेला क्रमांक जुळवून ते म्हणाले,
"नमस्कार. मी पंचगिरी बोलतोय. हो. हो. पोहोचल्या. छान आहेत. आवडल्या. पैसे किती पाठवू?"
"काका, बिलाची काळजी कशाला करता? श्रीपालने सांगितलंय, की तो येऊन हिशोब करेल.."
"अहो, पण..." दयानंद बोलत असताना दुकानदार म्हणाला,
"काका, कसे आहे, मी सध्या तरी तुमच्याकडे पैसे मागू शकत नाही. सॉरी! भेटूया..." असे सांगत दुकानदाराने फोन कट केला.
"अरे, वा रे, वा! असं कसं! ते काहीही म्हणतील..." दयानंद स्वतःशीच पुटपुटत असताना दिगंबर म्हणाला,
"दादा, हे पत्रिकेचे प्रुफ. नीट तपासा. पुन्हा केव्हा येऊ?"
"अरे, पुन्हा कशाला यायचे? चहा होईपर्यंत आपण तपासू की." दामोदर तसे म्हणत असताना सरस्वती स्वयंपाक घरात गेली. ती चहा घेऊन येईपर्यंत दामोदर, दयानंद यांनी दोन-दोन वेळा पत्रिका तपासली.
"दयानंद, भ्रमणध्वनी क्रमांक पुन्हा पुन्हा तपासून बघ रे बाबा. दिगंबरने चुकून एखाद्या डान्सबारचा किंवा बारचा क्रमांक..." दामोदर बोलत असताना तिथे आलेल्या बाईने विचारले,
"काय म्हणता? डान्सबार? या वयात? जनाची नाही तर मनाची तरी असावी ना? शिवाय हे दोघे वयाने लहान आणि नात्याने मेहुणे आहेत ना?"
"अग, हा प्रस्ताव या दोघांचाच आहे. मी नको म्हणत होतो पण हे ऐकतच नाहीत ग..." दामोदर गालातल्या गालात स्पष्टीकरण देत असताना तिथे आलेल्या सरस्वतीने विचारले,
"कशाचा प्रस्ताव? कुणी मांडला?"
"क..क.. काही नाही ग." दयानंद म्हणाले.
"आता का बोबडी वळतेय? तेव्हा तर केवढ्या आनंदाने म्हणत होतास, की भाऊजी, आमच्या गावातील डान्सबार चालू आहेत. चला जाऊया. मी नको म्हणत असताना दयानंदाने डिगुजवळ पैसेही दिले... तिकिटे काढण्यासाठी..."
"का..य? डान्सबार? तुम्ही? कधीपासून चालू आहेत ही थेरं? तरीच अधूनमधून रात्री उशिरा येताय. शोभतो का हा म्हातारचळ? उद्या जावाई येताहेत.."
"घेऊन जाईन त्यांनाही..." दयानंद म्हणाले.
"जिभेला काही हाडबिडं..."
"ते तर कुणाच्याही नसते गं आणि असते ना तर सततच्या बडबडीमुळे तुझ्या जिभेच्या हाडाचे फ्रॅक्चर झाले असते..."
"पण मी म्हणते या वयात ही अवदसा का आठवली?" असे विचारणाऱ्या सरस्वतीचे डोळे पाणावलेले पाहून दामोदर पटकन म्हणाले,
"अग सरस्वती, हे काय? अग, गंमत केली ग. असा कुठलाही विषय नाही. पत्रिकेत छापलेल्या भ्रमणध्वनीवरून मीच फिरकी घेत होतो. दयानंद डान्सबारबद्दल काही बोललाच नाही."
"त्यांची काय हिंमत आहे तिकडे जायची?" सरस्वती हसत म्हणाली आणि क्षणार्धात वातावरणातील ताण निवळला. तितक्यात छाया, अलका आणि आकाश बाजारातून घरी आले. त्या तिघांनीही पत्रिका बारकाईने तपासली आणि आकाश म्हणाला,
"डिगुकाका, केलीस ना घोडचूक?"
"म्हणजे? काय झाले?" दिगंबरने घाबरून विचारले.
"अरे, बघ, 'लग्न समारंभाला सहकुटुंब उपस्थित राहावे.' याऐवजी इथे 'ल' चा 'न' केलास..."
"म्हणजे?" दयानंदांनी विचारले.
"बाबा, नग्नसमारंभाला..."
"का..य?"
"तर मग?"
"बाप रे बाप! ठीक आहे. चूक सापडली बरे झाले. दुरुस्ती करतो." असे म्हणत दिगंबर निघाला.
"बाबा, आई, आत्या, मामा हा बघा माझा रिश्वतीचा ड्रेस!"
"रिश्वतीचा म्हणजे?"
"कान पिळणी या कार्यक्रमात मी भाऊजींचा कान जोरात पिळू नये म्हणून भाऊजींनी माझ्या पसंतीचा, भारीचा ड्रेस घेतलाय म्हणजे रिश्वतच ना?"
"आणि मी त्यांचा बुट पळवू नये म्हणून भाऊजींनी मला दिलेली ही लाच... ढँटढण!" असे म्हणत अलकाने तिचा ड्रेस पिशवीतून काढला.
"लाच घ्यायला लाज नाही रे वाटली! महागाचे..."
"मग सोडतो की काय? आई, आमचे मोठ्ठे भाऊजी आहेत ते..." आकाश म्हणाला आणि मान हलवत अलकाने त्याला अनुमोदन दिले.
"कितीला गंडवलत रे?" बाईने विचारले.
"आत्या, माझा सत्तावीसशे रुपयांचा तर अलकीचा सतराशे साठ रुपयाचा..."
"बाप रे बाप! आक्श्या, अल्के हे बरोबर नाही रे. छाये, तू सोबत होतीस ना?" सरस्वतीने विचारले.
"आई, माझे कुणी ऐकेल तर ना? जाऊ दे ना. घेतले तर घेतले. लहान आहेत दोघेही. श्रीपालनेही 'कानपिळणी' कार्यक्रम फिक्स केलाय." छाया हसत म्हणाली.
"अरे, व्वा! ताई, व्वा! थँक्स हं. मी कान पिळताना आणि अलका बुटासाठी भाऊजींना जास्त सतावणार नाही. हो का नाही ग अलका?" आकाशने विचारले.
"देखेंगे... आगे..आगे होता है क्या?" अलका वेगळ्याच अंदाजात म्हणाली.
"अरे, ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये रे..."
"आई, त्या ऊसाला एक मुंगळी कायम चिकटणार आहे. मग आमच्या हातात ना ऊस ना त्याचे मुळ म्हणून म्हटले त्यापूर्वीच..."
"आक्या, असा डाव आहे का? थांब दाखवतेच..."
"तायडे, कानपिळणी लक्षात आहे ना?" आकाश तसे म्हणाला आणि छायासह सारे खळखळून हसले.
"सरस्वती, उशीर झाला पण तुला जावाई मात्र लाखात एक मिळाला. पोरीनं नशीब काढले बघ."
"वन्स, खरेच आहे तुमचे. घरातील माणसंही खूप प्रेमळ आहेत."
"पण बाई, फार शोधावे लागले ग." दयानंद म्हणाले.
"होते रे तसे. योग आल्याशिवाय भोग संपत नाहीत हेच खरे. दक्ष असूनही जवळच्या ठिकाणाकडेही लक्ष जात नाही."बाई म्हणाली. लगेच छायाकडे पाहून तिने विचारले,
"छाया, ते काय ठरलं गं तुमचं?"
"कशाचे ग आत्या?" छायाने विचारले.
"अग, आजकालचे ते नवीन खुळ गं... फिरायला जायचे? कुठे जाणार आहात तुम्ही?"
"आत्तू, हे ग काय?" छाया लाजत म्हणाली.
"आता हे लाजणं सोड. तुमचे अजून काही कानावर आले नाही म्हणून विचारले. परस्पर तर ठरवले नाही ना?" बाईने विचारले. तितक्यात दिवाणखान्यात आलेल्या आकाशने विचारले,
"काय ठरवायचे ग आत्या?"
"अरे, यांच्या हनिमूनचे विचारतेय." बाई म्हणाली.
"कुठे कुठे जायाचे हनिमूनला
लोणावळा, खंडाळा की काश्मीरला..." आकाश मुद्दाम तसे गुणगुणत असताना छाया ओरडली
"आक्या..."
"अग ताई, चिडतेस कशाला? मी पण येणार आहे हं.." अलका म्हणाली.
"तू? कबाब मे हड्डी कशाला?" आकाशने विचारले.
"वैसा नही, बॉस! मै करवली जो हूँ। मेरी तायडी, तू जहाँ जहाँ जाएगी, वहाँ वहाँ मै आऊंगी। तेरा पिछा ना मै छोडुंगी..."
"आत्या, लग्नानंतर आम्ही यांच्या गावी जाणार आहोत."
"गावी? खेड्यात?" आकाशने आश्चर्याने विचारले.
"असू देत. खेडे असले तरी आधुनिक आहे. साऱ्या सुखसोयी आहेत. गावामध्ये यांचा मोठ्ठा चिरेबंदी वाडा आहे. शेतात फार्महाऊस आहे."
"ताई, अग, ऊन्हाळा आहे. खेड्यात चौदा-चौदा तास..."
"ह्यांच्या गावी 'शून्य' भारनियमन आहे. गावाजवळ असलेल्या साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीपालचे काका आहेत. त्या कारखान्यात वीजनिर्मिती होते. त्यातून परिसरातील अनेक गावांना विद्युत मिळते. शिवाय आमच्या लग्न सोहळ्याचे औचित्य साधत बाबांनी 'कीर्तन तरंग' नावाचा कार्यक्रम ठेवलाय..."
"कीर्तन? ताई, त्यामुळे सगळ्या रंगाचा भंग होईल ना?" आकाशने विचारले.
"काही होणार नाही. दरवर्षी श्रीपालचे बाबा गावामध्ये असे सामाजिक उपक्रम राबवून जनजागृतीचे काम करतात." छाया म्हणाली.
"वा! पोरी, वा! छाया, फार चांगली माणसे मिळालीत ग तुला. आजकाल सामाजिक जाण असलेल्या व्यक्ती दुर्मिळ होत आहेत. अशा व्यक्ती आदरणीय असून त्यांचे कार्य अनुकरणीय आहे." दामोदरपंत म्हणाले.
"पण छाया, तू खुश आहेस ना? तुला आवडले ना?" पंचगिरींनी विचारले.
"बाबा, मलाही असे कार्यक्रम आवडतात आणि माझ्या कविता वाचनाचाही म्हणजे माझ्यासह गावातील कविंचे एक कविसंमेलन ठेवले आहे. गावात श्रीपालचे काका-काकू आणि तशी जवळची पण विभक्त असलेली बरीच कुलकर्णी कुटुंब राहतात. दरवर्षी अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने हे सारे आठ-दहा दिवस एकत्र येतात. शिवाय या सगळ्या विभक्त कुटुंबीयांचा फराळ, स्वयंपाक आमच्या घरीच असतो. शेवटच्या दिवशी अर्ध्यापेक्षा जास्त गाव जेवायला असतो.नंतर वर्षभर जो तो स्वतःच्या कामामध्ये व्यग्र असतो. मामा, गावातील कुणीही व्यक्ती इथे कामासाठी आली ना तर ती बाबांना भेटल्याशिवाय जात नाही. या सप्ताहाचे आणखी एक वैशिष्ट्य असे, की दरवर्षी असे धार्मिक, सामाजिक विषय घेऊन सप्ताह मोठ्या आनंदात, समाधानात साजरा केल्या जातो..."
"पण छाया, या कार्यक्रमाचा कधी गाजावाजा होत नाही. इतरत्र असे कार्यक्रमांची माहिती पोहोचली तर इतरही अनेक गावातील लोक असे कार्यक्रम घ्यायला प्रवृत्त होतील..."
"बाबा, श्रीपालच्या बाबांना प्रसिद्धी, उदोउदो नको असतो. गावातल्या पत्रकारांना या सप्ताहाची बातमी देऊ नका अशी विनंती करतात."
"खूप छान! आजकाल छोट्या छोट्या गोष्टीतून ढीगभर प्रसिद्धी मिळविणारे काही कमी नाहीत त्यांना चांगली चपराक आहे ही." दामोदर म्हणाले.
"चला. कामाचे बघावे लागेल.." असे म्हणत सरस्वती उठून आत गेली आणि ती चर्चा तिथेच थांबली...